स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात्प्राप्तेन सन्तुष्यताम्।
अर्थ :- मधुर चविष्ट अन्नाची याचना करू नका
४) यदृच्छेनं..
दैववशात् जे मिळेल त्यावर समाधान माना..संतुष्ट रहा
चिंतन :- साधकानं अन्नाच्या रुचि स्वाद रंग यामधे गुंतून न राहता आपलं
लक्ष आपल्या साधनेवर केंद्रित करायला हवं या हेतूनं आचार्य सांगतात की स्वादु अन्न, मधुर अन्न, सुग्रास अन्न मागत बसण्यात
वेळ घालवू नका. तिकडे आसक्ति ठेवू नका! शिवाय यदृच्छेनं. दैववशात् जे झोळीत अन्न पडेल त्यावरच संतुष्ट
रहा. त्यातच समाधान माना. भुकेला कोंडा व निजायला धोंडा अशा वृत्तीनंच साधकानं जीवन घालवायचं
आहे.
कारण प्राधान्य आपल्या जिभेला,उदराला नसून आपलं
मन परमात्म तत्त्वाशी संलग्न राहण्याला...जीवाचं शिवाशी मीलन घडवण्याला आहे! आशरीरधारणावधि। असं एक सूत्र देवर्षि नारदांनी भक्तांसाठी दिलंय! साधकानं, उपासकानं, भक्तानं आपलं शरीर टिकवण्यापुरतंच अन्नसेवन व तेही अरुचि, बेचव अन्न सेवावं.
म्हणून रामदास,
श्रीधर इत्यादि संतसत्पुरुष भिक्षान्नाची झोळी आधी नदीतलावात
तीनचार वेळा बुचकळून काढीत असत. ज्यामुळे सर्वरस पाण्यात उतरून उरलेला चोथा अन्नाबद्दलच्या
अत्यंत अलिप्त वृत्तीनं तरीही भगवत्प्रसाद म्हणून सेवीत असत! शरीराला महत्त्व कशासाठी? तर जीव देहावाचून राहू शकत नाही व देह या साधनाला मनानं राबवून जीव शिवतत्त्वात
विलीन करायचा आहे म्हणून!
आणि देहाला महत्त्व का द्यायचं नाही? तर ते सवयीचं गुलाम
होतं.
देहातील इंद्रियं मनाला विषयांकडे बळेच खेचून नेतात व मन त्या
विषयांची एकदा गोडी लागली. चटक लागली, सोकावलं की त्या विषयांच्या
प्राप्तीसाठी सुष्टदुष्टशा कोणत्याही कर्माला प्रवृत्त होऊन जीवाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या
चक्रात गुरफटवून टाकतं!
याचना ही गोष्टही माणसाला कमीपणा आणणारी आहे. अनुभव असा आहे की व्यवहारात याचकाला नेहमीच टाळलं जातं. त्याच्याशी
हिडीसफिडीस केलं जातं.. त्याचा अपमान केला जातो!
दुःख,
अपमान, चीड, संताप यांमुळे एरव्ही साधनेत वरवर चढत जाणारा जीव पुन्हा खाली
येतो.
अनर्थाच्या गर्तेत कोसळतो! यदृच्छासंतुष्ट
व्यक्तीला समाजात आदर मिळतो.. साधनेत व्यत्यय
येत नाही...
उत्तरोत्तर अधिक चांगली प्रगति होते.... मनःसंयमन साधून चित्ताच्या एकाग्रतेसाठी ते साह्यकारी होतं. समाधान,संतोष हे मानण्यावर
अवलंबून असतं! रसो हि सः।
हे खरं असलं तरी तो रस भौतिक अन्नातून मिळवण्यापेक्षा भक्तीतून
मिळवणं अधिक इष्ट.
त्यासाठी रसनाजय महत्त्वाचा! याचनेत देहाहंकार
आहे तर यदृच्छालाभसंतुष्टतेत भगवत्कृपेची जाणीव, विनम्रता,
भगवद्विश्वास आहे! स्वादिष्ट अन्नाच्या याचनेमधे ते मिळालं की देणार्याची गुलामी दासता गळ्यात पडते
व यदृच्छालाभानं संतुष्ट राहण्यात आपसूकच भगवंताला आवडणारी भक्ति. ठेविले अनंते तैसेचि
रहावे.. घडते! भगवत्कृतज्ञता निर्माण होते.
याचनेमुळे बद्धता जडते व यदृच्छालाभसंतुष्टतेमुळे मुक्तीकडे पाऊल पडायला मदत होते! क्षुधादुःखं दिने दिने असं असलं तरी याचना त्या दुःखाच्या जाणीवेतून
घडते व क्षुधेलाच खाऊन टाकल्यानंतर यदृच्छालाभसंतुष्टता आपोआप गळ्यात माळ घालते! इंद्रियदमन व मनःशमन अशी दोन्ही उद्दिष्टं साधण्यासाठी आचार्य
साधकाला सांगतात.
स्वाद्वन्नं न तु याच्यताम् विधिवशात्प्राप्तेन संतुष्यताम्।