आयुष्याची क्षणभंगुरता hindi kabir dohe
आयुष्याची क्षणभंगुरता
कबीर कहा गरबियौ इस जीवन की आस ।
टेसु फूले दिवस चारि खंखर भये पलास ॥२१९॥
अर्थ - कबीर म्हणतात की तारुण्याच्या आशेवर गर्व करणे उचित नाही. कारण ते नश्वर आहे. पळसाच्या झाडावर काही वेळापुरतीच सुंदर फुले उमलतात. नंतर ती झाडे उघडि-बोडकीच रहातात.
मराठी रूपांतर -
पलाशपुष्पापरी मानवा, यौवन क्षणभंगूर ।
पश्चात्ताप तू करशील नंतर, जंव जर्जर होई शरीर ॥९॥
कबीर कहा गरबियौ देही देखि सुरंग ।
बीछडियाँ मिलिबौ नहीं ज्यूँ काँचली भुवंग ॥२२०॥
अर्थ - कबीर म्हणतात की सुंदर शरीराचा गर्व करणे ठीक नाही. कारण एकदा या शरीराचा वियोग झाला तर ते पुन्हा दुसर्यांदा मिळत नाही. उदा. सापाची कात एकदा शरीरापासून वेगळी झाली की पुन्हा ती शरीराला चिकटत नाही.
मराठी रूपांतर -
देह नराचा दुर्लभ जगति, सांगतो तुज मात ।
सर्प कधी का धारण करतो, टाकलेली ती कात ? ॥१०॥
कबीर कहा गरबियौ ऊँचे देखि अवास ।
काल्हि पर्यूँ भुइँ लेटणाँ उपरि जामैं घास ॥२२१॥
अर्थ - कबीर म्हणतात की उंच उंच घरे पाहून अभिमान करणे व्यर्थ आहे. कारण संसार नश्वर आहे. उद्याच जमिनीवर कबरीत झोपावे लागेल. आणि नंतर त्याच्यावर गवत उगवेल.
मराठी रूपांतर -
इमले बांधून उंच उंच तू कशास धरी अभिमान ।
उद्याच कबरीमधे झोपशिल उगवेल वरी लव्हाळं ॥॥
कबीर कहा गरिबियौ चाँम पलेते हड्ड ।
हैबर ऊपरि छत्र सिरि ते भी देबा खड्ड ॥२२२॥
अर्थ - कबीर म्हणातात की अभिमान करण्याची गरज नाही. जे हे शरीर डोक्यावर सुंदर छत्र धारण करून सुंदर घोड्यांवर स्वार होते ते शरीर म्हणजे हाडांचा सापळा असून त्यावर कातडे लपेटलेले आहे. ते केव्हाना केव्हातरी खोल कबरीत गाडले जाते.
मराठी रूपांतर -
क्षणभंगुर या संसारामधे, कशास तो अभिमान ।
अंती पडशील धरतीवरती, करुनी वाकडी मान ॥१२॥
हाड मांस अन् वरी कातडे, ऐसे असे शरीर ।
या देहाच्या अभिमानाने, मरसी वारंवार ॥१३॥
कबीर कहा गरबियौ काल गहै कर केस ।
नाँ जाँणौं कहाँ मारिसी कै घर कै परदेस ॥२२३॥
अर्थ - कबीर म्हणतात की अभिमान करू नका. (हे आयुष्य इतके नश्वर आहे की) घरी किंवा परदेशी मृत्यु कधी केस पकडून मारेल हे सांगता येत नाही.
मराठी रूपांतर
यमदूताने केस पकडले, फरपटवीत नेईल ।
यमदरबारी उभा करुनी तव, मृत्युलेख वाचेल ॥१४॥
चित्रगुप्त हा असे यमाचा, वकील रे सरकारी ।
वकिलपत्र तू तुझे सोपवी, धावेल तो मध्वारि ॥१५॥
जाँमण मरण विचार करि कूडे काँम निबारि ।
जिनि पंथ तुझ चालणाँ सोई पंथ सँवारि ॥२२५॥
अर्थ - जन्म-मृत्यूचा विचार करून वाईट कामे करण्यापासून परावृत्त हो. ज्या रस्त्यावरून तुला चालायचे आहे तो मार्ग ठीकठाक बनवून घे.
मराठी रूपांतर
जन्ममृत्युचा विचार करुनी, सत्कर्मी प्रवृत्त ।
होसिल जर तू कशास चिंता, सहाय तुज भगवंत ॥१६॥
कबीर मंदिर ढहि पड्या ईंट भई सैवार ।
कोई चिजारा चिणि गया मिल्या न दूजी बार॥२२८॥
अर्थ - कबीर म्हणतात की मंदिर ढासळले व त्याच्या विटांवर शेवाळ धरले. कोणी कारागिराने ते निर्माण केले होते. पण आता तो कारागिर पुन्हा दुसर्यांदा ते मंदिर निर्माण करायला मिळणार नाही.
मराठी रूपांतर
या देहाचा धरुनि भरवंसा, विसरलास भगवान ।
देहरूपी मंदिर ढासळता, तारेल अंती कोण ॥१७॥
देह नराचा मिळे एकदा, जरी तू करिशी व्यर्थ ।
पुण्यकर्म ना करता होईल, पशुयोनीही प्राप्त ॥१८॥
मौत बिसारी बावरे अचरज किया कौन ।
तन माटी मैं मिली गया ज्यूँ आटे में लोन ॥२३२॥
अर्थ - अरे मूर्खा, तू मृत्यूला विसरलास यात आश्चर्य करण्यासारखे ते काय आहे ? ज्याप्रमाणे पिठात मीठ मिसळून जाते त्याप्रमाणे हे शरीर मातीत मिसळेल.
मराठी रूपांतर
जन्मा येउनि कसा विसरला मृत्यु अवघड घाट ॥
शरीर हे मातीमधे जाईल जसे पिठामधे मीठ ॥१९॥