अग्रे वह्निः पृष्ठे भानुः (चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra sunskrit Subhashit knowledgepandit

अग्रे वह्निः पृष्ठे भानुः (चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण - मराठी श्लोकार्थ

(चर्पट पंजरिका स्तोत्रम्) Charpat Panjarika Stotra 

 अग्रे वह्निः पृष्ठे भानुः रात्रौ चुबुकसमर्पितजानुः।

करतल भिक्षा तरुतलवासस्तदपि न मुंचत्याशापाशः।।

अर्थ :- (दारिद्र्य.. दैन्य इतकं आहे की) पुढे शेकोटी (तीही दुसर्‍यांनीच कुणीतरी लावलेली)  व मागे.. पाठीवर सूर्यकिरणं हीच हिवाळ्यातली थंडी घालवण्याची साधनं.. ओंजळीत भिक्षा घ्यायची व एखाद्या झाडाच्या आसर्‍यात राहायचं ही क्षुधा निवारणाची व राहण्याची व्यवस्था! (पण म्हणून जगण्याविषयीची) आशेची बेडी सुटते का? जीविताशेचे पाश तुटतात का? तर मुळीच नाही!

चिंतन :- माणसाला जगण्यासाठी किमान आवश्यक असलेल्या गोष्टी जरी जवळ नसल्या तरी त्याची जगण्याची आस इतकी प्रबळ असते की ती प्रतिकूलताही तो पचवतो! श्रीमंती ऊबदार कपडे नकोत पण कमीत कमी अंगभर लपेटायला जाडंभरडं कापड तरी हवं की नको? पण तेही बर्‍याच जणांकडे नसतं! सार्वजनिक ठिकाणच्या कुठल्या तरी शेकोटीशी बसून रात्र कशीबशी काढायची किंवा कुठल्या तरी कोपर्‍यावर रस्त्यात उभं राहून सूर्यकिरणं अंगावर घेत बसायचं ही शीत निवारणाची साधनं! 

        भिक्षा मागायला हाताच्या ओंजळी वाचून दुसरा कटोरा जवळ नाही व बोटांच्या फटीतून गळून गेल्यावर उरलेल्या शिळ्या अन्नाचा गोळा ढकलून पोटातल्या भूकेचा आगडोंब शमवायचा आणि कुठल्या तरी झाडाचा आडोसा घेऊन पाऊस वारा ऊन्ह झेलत बसायचं..

अशा परिस्थितीतलं जगणं कुणाला सुखावह वाटेल? पण ये भी दिन जाएँगे या एकाच भक्कम आशेवर माणूस दिवस काढतोच काढतो! ही आशा नामक बेडी नसती ना तर सगळे पांगळे होऊन जाकीच बसकण मारून बसले असते! पण हे आशा पाश अतिशय चिवट व चिकट असतात.. इतके की माणसाला जगणं सोडून द्यावंसं वाटतच नाही! पहिल्या श्लोकात आचार्यांनी आशेचा वायूशी तर दुसर्‍या श्लोकात आशेचा पाशाशी संबंध लावलाय. अन्नाच्या सत्त्वांशापासून बनणारं संकल्पविकल्पात्मक मन जड असलं तरी इतकं सूक्ष्म असतं की ते वायूसारखंच चंचल राहतं!

        पण प्रतिकूल परिस्थितीतही जगण्याची आशा इतकी प्रबळ, प्रखर असते की ती जगण्याच्या पाशानं जीवाला करकचून आवळून.. बांधून ठेवते!  माणूस असा व इतका हट्टी की स्वप्रयत्नानं आहे ही परिस्थिति सुधारता येत नाही हे उमजत असूनही भगवद्भक्तीकडे.. भगवत्सेवेकडे वळण्याचं नावही घेत नाही!! हे झालं दैनंदिन मूलभूत आवश्यकतांबाबत.. पण आशेची बेडी इतकी प्रबळ असते की  देहाचे हात, पाय, डोळा, कान इत्यादि अवयव कधी दोन्ही.. कधी एक.. तुटून जातात, शरीरात विविध व्याधींनी ठाण मांडलेलं असतं तरीही मनुष्य त्यांच्याबरोबर चिवटपणे झुंजतो.. काही वेळा सकृद्दर्शनी या दुःखांचं स्पष्ट कारण त्याच्या या जन्मातील जगण्यात.. वागण्याबोलण्यात  दिसतही नाही!

एकीकडे अशा शारीरिक हाल अपेष्टा,दैन्य दारिद्र्य यांना तोंड देतानाच तो विविध शाखांमधे  उतारवयातही हट्टानं विद्यार्जन ,कलोपासना करत राहतो..विशेष प्रावीण्यही मिळवतो ! कधी सार्वजनिकरीत्या तर कधी वैयक्तिक पातळीवर कौतुक, प्रशंसा, प्रसिद्धि हेही त्याच्या वाट्याला येतं..

पण त्यामुळे मुळातलं दुःख दूर होत नाही.. फारफार तर तिकडे उपेक्षा करता येते! पण हे यशकीर्ति इत्यादि क्षणिक, अल्पजीवी असतं.. ठरतं! क्षणिक सुखापभोगाकडे वळून तो शाश्वत आनंदाकडे दुर्लक्ष करीत असतो, भगवंताकडे वळायला तयार नसतो !! आचार्य अशा सर्वांनाच त्या वृद्धाच्या निमित्तानं सांगतात की गोविंदाचं नामस्मरण करा.. त्याचा नामजप करा.. त्याची भक्ति सेवा करा! तेच शेवटच्या क्षणी उपयोगात येणार आहे!

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post