संस्कृत शब्दार्थ सुभाषित रसग्रहण - sadvidya sumahima sunskrit-subhashit
सुमहिमा... व सद्विद्या.. शब्दार्थ
लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकै:।
सत्यं चेत्तपसा च किं शुचिमनो यद्यस्ति तीर्थेन किम्।
सौजन्यं यदि किं गुणै: सुमहिमा यद्यस्ति किं मन्डनै:।
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना ॥
या श्लोकात सुमहिमा... व सद्विद्या.. शब्द आलेला आहेत त्याचा अर्थ काय? ते आपण पाहुया
सुमहिमा...
सुमहिमा = सुख्याति.. सुप्रसिद्धि
.. सत्कीर्ति.. बर्याच लोकांना आपण सुंदर.. सुरूप दिसावं.. चांगलं दिसावं!.. आपली
चार माणसांमधे दिसण्यावरूनही वट असावी.. पत वाढावी.. प्रतिष्ठा वाढावी असं वाटत असतं! पण नुसत्या दिसण्यानं माणसाला
कधीच टिकाऊ प्रतिष्ठा.. प्रसिद्धि मिळत नाही. कारण रूप.. तुलनेनं खूप अल्पजीवी
असतं... दीर्घकाळ टिकते, टिकू शकते ती सत्कीर्तिच!
चांगलं दिसण्यापेक्षा चांगलं
असण्याला अधिक महत्त्व असतं. पण त्यासाठी चांगले गुण, चांगली विद्या.. चांगलं शिक्षण.. चांगले संस्कार आत्मसात करावे लागतात
व त्यासाठी कष्ट उपसावे लागतात.. सतत
व्यासंगी रहावं लागतं! ...मिळवलेल्या विद्या शिक्षणाची, केलेल्या
तपाची, विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवून मिळालेल्या यशाची,
कष्टपूर्वक केलेल्या कलासाधनेची कालान्तरानं चेहर्यावर एक वेगळीच
झळाळी दिसू लागते.. डोळ्यात आत्मविश्वासाची झाक दिसू लागते.. देहबोली बदलते! हीच
खरी आभूषणं!
सोन्या - चांदीची वा अन्य आभूषणं झिजतात, चेहर्यावरची
रंगरंगोटी, रंगभूषा अल्पावधीत उडून जाते.. वस्त्रभूषा.. वेषभूषा
विरते! पण यशकीर्तीतून, कर्तृत्वातून, सुस्वभावातून मिळणारा सुमहिमा अन्य
भूषणांना.. मंडणांना फिकं पाडतो.. त्यांची आवश्यकताच पुसून टाकतो! तो उत्तरोत्तर
वाढत जातो.. तेजाळत जातो! ..मिळतो तो
सुमहिमा व गाजवला जातो तो स्वमहिमा! सुमहिमा लोक गातात व स्वमहिमा..स्वतःचं
प्रस्थ अहंकारातून प्रस्थापित करण्याचा उद्योग केला जातो!
स्वमहिमा गाणं सुमहिम्याला
मारकच.. पण सुमहिमा स्वतःच्या आचारविचार उच्चारादिकातून प्रकट झाला तरच लोक
मानतात.. स्वीकारतात!
सद्विद्या..
सामान्य.. पोट जाळण्यासाठी
लागणारी.. उदरनिर्वाहार्थ उपयोगी असणारी विद्या सुद्धा जितकी दुसर्याला द्यावी
तितकी वाढत जाते..! व्ययेकृते वर्धत एव नित्यम् अशीच ती असते. पण सा
विद्या या विमुक्तये या वचनानुसार
ब्रह्मसायुज्य साधून देणारी विद्या.. आत्मविद्या.. ही सद्विद्या मात्र चिरंतन, अविनाशी असते! ती ज्याला मिळाली तोच खरा धनी.. श्रीमंत! ज्या विद्येनं
कैवल्यप्राप्ति होते ती खरी लक्ष्मी! बाकी सारं धन, श्रीमंती
क्षणिक.. तात्कालिक.. अल्पजीवी.. येणारीजाणारी!
सरस्वतीके
भाण्डारकी यही है अनुपम बात ।
ज्यों ज्यों खर्चत बढत रहे बिनु खर्चत खुट जात ।।
हे तत्त्व सद्विद्येला
सर्वाधिकतेनं लागू होतं! भौतिक सुखसाधनं लौकिक द्रव्यानं, धन संपत्तीनं जरी विकत घेता आली तरी त्या सुखाचा अनुभव जीवाला घेता येणार
नाही.. जर विविध विवंचनांनी, भय चिंतांनी तो ग्रस्त असेल तर!
पण सद्विद्येनं आत्मबोध झाला तर बाह्य सुख दुःखांचा.. भयचिंतांचा आत स्पर्शही
होणार नाही व आनंदसागरावर लहरत असल्याचा अनुभव मात्र येत राहील!
कैवल्याची.. परमेश्वराच्या
ज्ञानाची अनुभूति मिळून दैवी संपत्तीच्या "अभय" या
पहिल्या गुणावर आरूढ होता येईल व मग कुठेच अटकाव राहणार नाही! सद्विद्येनं तो
देवच ते निरवयव, निर्गुण, अखंड, सच्चिदानंदस्वरूप परब्रह्म आहे अशी परमेश्वराची ओळख पटून तदितर द्रव्य, धन, पशु पक्षी, व्यक्ति
इत्यादि स्वरूपातल्या सर्व संपत्तीबद्दल तुच्छता, अनासक्तता,
निर्माण होईल व एक प्रकारची अलिप्तता निर्माण होऊन असंगत्व साधेल.. अपरिग्रहवृत्ति
बाणेल! म्हणून एक सद्विद्या मिळवली की अन्य धनांची काय तमा?