संस्कृत शब्दार्थ सुभाषित रसग्रहण - saujanya shuchiman sunskrit-subhashit
३) सौजन्यम् 4) शुचिमनः
लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकै:।
सत्यं चेत्तपसा च किं शुचिमनो यद्यस्ति तीर्थेन किम्।
सौजन्यं यदि किं गुणै: सुमहिमा यद्यस्ति किं मन्डनै:।
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना ॥
या श्लोकात सौजन्यम् व शुचिमनः शब्द आलेला आहेत त्याचा अर्थ काय? ते आपण पाहुया
सौजन्यम् ...
हा एक इतका मोठा गुण आहे की
त्याच्यासमोर अन्य सर्व गुण फिके पडतात! संगीत, अभिनय, चित्रकला, क्रीडा, स्थापत्य,
मूर्तिकला इत्यादि सर्वच्या सर्व चौसष्ट कला एखाद्याच्या अंगी
पूर्णत्वानं आहेत असं गृहीत धरलं तरीही त्याच्याकडे सौजन्य नसेल तर त्या सर्वांची
माती होईल.
एको
हि दोषो गुणराशिनाशी असं एक वचन ऐकल्याचं आठवतं. कोणताही गुण हा मौल्यवान खडा.. हिरा म्हणून गृहीत धरला तर सौजन्य हे त्याची शोभा
वाढवण्यासाठी सोन्याचं कोंदण ठरेल.. पण ते
नसेल व उलट दुर्जनता, उद्धट.. उर्मट वृत्ती असेल, अहंकार असेल तर त्या गुणवंताच्या आसपासही कोणी फिरकणार नाही व गुणप्रदर्शनार्थ
वावही मिळणार नाही!
विद्या
विनयेन शोभते या न्यायानं कोणत्याही कलाक्षेत्रातली उच्चकोटीची
विद्या प्राप्त झाल्यावर .. त्याविषयी रसिकांची.. जाणत्यांची कौतुकाची पाठीवर थाप
पडल्यावर किंवा विविध प्रतिष्ठा प्राप्तपुरस्कार मिळाल्यावर जर त्या व्यक्तीला
आपले हात आकाशाला टेकल्यासारखं वाटत असेल तर त्याच्या पतनाला फार वेळ लागणार नाही
व अन्य कुणीही कमी गुणवान केवळ सौजन्याच्या बळावर त्या जागी येऊन बसू शकेल. There is always a room
at the Top असं त्यामुळेच म्हणत असावं.
अत्युच्ची
पदी थोरही बिघडतो हा बोध आहे खरा हे गुणवान
पण सौजन्यहीन माणसाबाबतीत नेहमीच खरं ठरतं!
शीलवान
सबसे बडा सब रत्नन की खान !
तीन
लोक की संपदा आ रही शील मे समाय !!
------------------------------------
शुचिमनः
तीर्थानामुत्तमं
तीर्थं विशुद्धिर्मनसः पुनः।
पवित्र मन हेच खरं
तीर्थांमधलं उत्तम तीर्थ असं स्कंदपुराणात म्हटलंय.. याच पुराणात सत्य, क्षमा, इंद्रियनिग्रह, सर्वभूतदया,
प्रियवचन, ज्ञान व तप अशा सप्ततीर्थांचाही
उल्लेख आहे..
ध्यानपूते
ज्ञानजले रागद्वेषमलापहे ।
यः
स्नाति मानसे तीर्थे स याति परमां गतिम् ।। स्कंद
पुराण
ध्यानानं पवित्र झालेल्या व ज्ञानरूप जलानं भरलेल्या रागद्वेषादि मल दूर करणार्या मानसतीर्थात जो स्नान करील त्याला देहान्तानंतर परम गति मिळेल.. मिळते! तर शंकराचार्य सांगतात.. तीर्थं परं किं? स्वमनो विशुद्धम् । श्रेष्ठ तीर्थ कोणतं? तर स्वतःचं निर्मळ.. विशुद्ध मन!
तीर्थ शब्द तॄ या मूळ धातू पासून बनला असून त्या धातूचा अर्थ
प्लवन व तरण असा आहे. तीर्यते अनेन
इति तीर्थम् ..
याच्या साह्यानं तरून जाता येतं.. म्हणून तीर्थ असा शब्द सिद्ध झाला.. तरति पापादिकं यस्मात् तत् तीर्थम् अशी सुद्धा
तीर्थ शब्दाची व्युत्पत्ति सांगतात.
धर्म काम व मोक्ष हे तीन
पुरुषार्थ या तीर्थयात्रांनी साधले जातात
खरे पण त्यासाठी अर्थ हा पुरुषार्थ मात्र खर्ची पडतो! सत्त्वगुणी मोक्षार्थ
तीर्थयात्रा करतात, सत्त्वरजोगुणी धर्मसंग्रहार्थ
तीर्थांना भेटी देतात व रजोगुणी ऐहिक, पारलौकिक लाभार्थ
तीर्थवास करतात. पण तीर्थयात्रा करणारांनी हेही लक्षात ठेवायला हवं की
अन्यक्षेत्रे
कृतं पापं तीर्थक्षेत्रे विनश्यति ।
तीर्थक्षेत्रे
कृतं पापं वज्रलेपो भविष्यति ।।
पाप व पुण्य यांचा मनाशी
घट्ट संबंध असल्यामुळे तीर्थात जाऊन पुण्य करायचं किंवा अन्यत्र केलेल्या पापांचं
तीर्थक्षेत्री जाऊन निवारण करायचं अशा खर्चिक उद्योगापेक्षा मन पापपुण्याच्या
पार.. सर्व द्वंद्वं व त्रिगुणांच्या पार न्यावं! म्हणजेच विशुद्ध मनानं, निर्मळ मनानं, निःसंग मनान जीवन जगावं! कराव्या
लागणार्याकोणत्याही कर्मामागे फलासक्ति न ठेवता केवळ कर्तव्यभावनेनं ते करावं! त्यासाठी
सदैव भागवतीकथा करावी.. ती ज्या घरी होते त्यालाही तीर्थ ही संज्ञा मिळते!
कथा
भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे ।
तद्गृहं
तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम् ।।
सर्वाणि
तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदारकथाप्रसंगः असं जे
म्हणतात तेही मनाच्याच संबंधानं! संकल्पविकल्पात्मकं मनः
अशी मनाची व्याख्या सांगतात... मना
सत्यसंकल्प जीवी धरावा असं संत रामदास सांगतात ते मन शुद्ध
करून त्याला, ते ज्याच्या जवळ आहे त्याला व तो ज्या घरात.. समाजात..
राष्ट्रात राहतो त्यांना तीर्थत्व मिळवून द्यावं या हेतूनच!
तीर्थीकुर्वन्ति
तीर्थानि असं नारदीय भक्तिसूत्रात
एक सूत्र आहे! खरा भक्तच तीर्थांना तीर्थत्व मिळवून देतो.. देत असतो! परमप्रेमी
भक्ताचं मन नेहमी विशुद्धच असतं.. निर्मळ असतं.. फलासक्तिविरहित असतं.. असं मन
असल्यावर आणखी वेगळी तीर्थ कशाला हवीत? विशुद्ध, निर्मळ मनातच परब्रह्माचं प्रतिबिंब पडत असल्यानं.. देव वास करत असल्यानं
अशा माणसाला अन्य तीर्थक्षेत्रांमधे काळ दवडण्याची आवश्यकता नसते.
पण जो मनुष्य तीर्थक्षेत्री जाऊन वा राहून सदैव लोभी राहतो, असंतुष्ट राहतो, धर्माचरणाचं सोंग आणतो व परस्त्रीरत असतो तो पापाचरणीच म्हणायला हवा! या उलट जो साधक स्वतःला नानाविध क्लेशकष्टत्रास सहन करायला लागत असूनही कुणाकडूनही दान घेत नाही, नित्य सत्यच बोलतो व मनःसंयमनानं समाधिसुख भोगतो तो तीर्थांना उपकारकच असतो!
भगवद्भक्तीच्या साधनांमधे
तीर्थयात्रा जरी "अधमाधमा" म्हटली गेली असली तरी तिच्या माध्यमातून
माणसामाणसांच्या मनामनात रमणार्या भगवंताचं दर्शन, त्या
तीर्थयात्रिकांची मनोभावे सेवा भक्तिमार्गावर पाऊल ठेवायला व भक्तियात्रा सुरू
करायला निश्चितच साह्यकारी ठरेल. त्यांच्या वाट्याला आलेली दुःख कोणत्या कर्मांचा
परिपाक असू शकतील व त्यांना कोणत्या भाग्यरेखेनं तीर्थक्षेत्री वास घडतोय याचं
चिंतन स्वतःचं मन शुद्ध करायला व परिणामतः स्वदेहातच मानसतीर्थ तयार करून
भगवद्रूपात विलीन व्हायला उपकारक ठरेल!
तन
को जोगी सब करे मन को बिरला कोय ।
सहज
सब विधी पाईए जो मन जोगी होय ।।
शरीराचा नाही तर मनाचा संन्यास झाला पाहिजे असं
पवित्र मन म्हणजे भगवंताचे अधिष्ठान असा मनाचा संन्यास घडला पाहिजे नाही काय?
चिंतन लेखन :- श्रीपादजी
केळकर कल्याण