सत्य महिमा संस्कृत सुभाषित रसग्रहण - satya mahima sunskrit-subhashit
३) सत्यम्
लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकै:।
सत्यं चेत्तपसा च किं शुचिमनो यद्यस्ति तीर्थेन किम्।
सौजन्यं यदि किं गुणै: सुमहिमा यद्यस्ति किं मन्डनै:।
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना ॥
या श्लोकात सत्यम् शब्द आलेला आहे त्याचा अर्थ काय? ते आपण पाहुया
श्रीमद्भागवतात धर्माचे चार
पाय असल्याचा उल्लेख आहे...
तप, शौच, दान व सत्य.. धर्म या चार पायांवर उभा असल्याचं
म्हटलंय... या चारांना धरून माणसानं आपलं आचरण ठेवलं तर तो खरा धार्मिक! पण कृत त्रेता
व द्वापार या तीन युगात एकेक पाय गळून पडत सध्याच्या कलियुगात सत्य या एकाच पायावर
धर्म उभा आहे असं सर्वत्र दिसतं!
स्वार्थापोटी सत्याचाही
अपलाप होताना सर्वत्र दिसतोय. तपाचा लोप अभिमानामुळे आधीच झालाय. विषयासक्तीनं
शौचाचा पवित्राचरणाचाही पुढे नाश झाला.पाठोपाठ मदोन्मत्ततेमुळे दयाही संपली. आता
उरलाय तो धर्माचा एकच पाय जो सत्यरूपात आहे. पण तोही पाय शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा वैचारिक पातळीवरही सत्याला
धरून जगण्याची तयारी दिसत नाही म्हणून गळून पडणार असं दिसतंय!
practical view च्या
नावाखाली वा चंगळवादाच्या नवनवीन कल्पना अंगीकारण्याच्या हव्यासापोटी सर्वत्र तप,
शौच, दया यांचा बळी दिला जातो. सत्य थोड्याफार
प्रमाणात उरलेलं असलं तरी स्वार्थाचा विषय आला की प्राणिमात्रांबद्दलची व माणसांबद्दलची सत्यविषयक आस्था मागे पडते,
मागे टाकली जाते!
तसंच श्रीमद्भगवद्गीतेतही
सोळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे गुण सांगताना सत्य हा त्यापैकी एक असल्याचा
उल्लेख आहे. भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ या तीन्हीमधे ज्याचा बाध होत नाही तेच
सत्य! संत
ज्ञानेश्वर पसायदानात :- भूतां
परस्परे जडो मैत्र जीवांचे असं जे मागतात त्या भूतांचं आत्यंतिक हित ज्यात आहे. असतं ते सत्य...,
यद्भूतहितमत्यंतं तत्सत्यम् ।
स्थल, काल, वस्तु, पदार्थ, व्यक्ति, परिस्थिति यापैकी कशानंही जे बाधित होत
नाही ते सत्य! म्हणून आचार्य जेव्हा जगन्मिथ्या असं म्हणतात तेव्हा
तीन्ही त्रिकाळी जे अपरिवर्तनीय म्हणून उरतं तेच सत्य... तेच जग सतत
बदलत राहतं ते मायाजनित.. मायिक असा त्याचा अर्थ असतो! लौकिक जीवनात.. व्यवहारात
अशा या सत्याची कास धरून जगायचं झालं तर तेच एक मोठं तप आहे...
कोणत्याही परिस्थितीत सत्यच
बोलायचं.. सत्यानंच वागायचं.. सत्याचीच पाठराखण करायची असं ठरवणं सोपं आहे, पण जेव्हा स्वतःचं नुकसान होतंय की काय अशी नुसती शंका जरी आली तरी माणसं सत्यापासून
फारकत घेतात.. दुरावतात.. त्याच्या बरोबरचा संबंध तोडतात किंवा नाकारतात! प्राण
गेला तरी पर्वा नाही पण मी सत्यालाच धरून ठेवीन असं म्हणणार्याला खरंच अनेक
संकटांना तोंड द्यावं लागतं.. अनेकांचे शिव्याशाप, तळतळाट
शिरावर घ्यावे लागतात! कुटाळकी, टवाळकी, निंदानालस्ती स्वीकारावी लागते.. तेच खरं तर तप असतं!
संत तुकारामांच्या आयुष्यातला एक प्रसंग ऐकलाय... कसायाच्या हाताला हिसडा मारून गाय
आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात तुकारामांच्या समोरून
जाते.. पाठोपाठ कसाई येतो व तुकारामांना ती कोणत्या दिशेनं
गेल्याचं विचारतो. खरं सांगावं तर गाईच्या हत्येला मदत केल्याचं पाप डोक्यावर
येण्याची भीती व खोटं सांगावं तर असत्य बोलण्याचं पाप गळ्यात पडणार! अशा पेचात
अडकलेले असतानाच महाराजांनी चतुराईनं दिलेलं उत्तर ऐकण्याजोगं आहे...
ते म्हणाले ज्यांनी (डोळ्यांनी!)
गाईला जाताना बघितलं ते बोलू शकत नाहीत व जी (जीभ!) बोलू शकते तिनं पाहिलंच नाही! सत्यानं
वागणं ही तारेवरची कसरत आहे.. व्यवहारात सत्य एकदाच जरी बोललं गेलं तरी ते लक्षात
ठेवावं लागत नाही.. पण एकदाच बोललेलं असत्य कायम लक्षात ठेवून तेच सत्य असल्याचा
उद्घोष वारंवार करावा लागतो!
अन्यथा ते असत्याचं पितळ
उघडं पडेल व समाजात नाचक्की, अप्रतिष्ठा, आर्थिक नुकसान, विश्वासार्हहीनता पदरी पडेल! पण ती
करायला हवी, त्यासाठी लागतील ते परिश्रम उचलायला हवेत! आजकाल न्यायालयासमोर उपलब्ध... वर्तमान
राज्यघटनाधारे केलेल्या कायदे नियमांच्या चौकटीत व निर्विवाद पुराव्यांनिशी (ते
खोट्याच्या आश्रयाने मिळवलेले असले तरी!)
जे सिद्ध होईल तेच सत्य
मानलं जातं.. गत्यंतर नसल्यानं सत्य मानावं लागतं! पण ते सत्यच असतं / तेच सत्य
असतं / ते सत्य असतंच असं नाही! कारण ते स्थल
काल - घटना - व्यक्ति - वस्तुपदार्थ- सापेक्ष असतं! चारही युगात ब्रह्मांडात
कुठेही कोणत्याही जीवाला कोणत्याही वस्तुपदार्थात कोणत्याही परिस्थितीत जे
एकरूपानं आढळतं.. अनुभवाला येतं ते सत्य.. परमसत्य! तेच भगवद्रूप..
सत्यव्रतं
सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये ।
सत्यस्य
सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना: ।।
(श्रीमद्भागवत (१०।२।२६)यात
व्यक्त केल्याप्रमाणे!
अशा सत्यस्वरूप भगवंताचा
साक्षात्कार होण्यासाठी सत्य हेच एक साधन
स्वीकारलं की अन्य तपं हवीतच कशाला?
चिंतन लेखन :- श्रीपादजी केळकर कल्याण