संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदः पिककाकयोः।
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः॥
अर्थ :- कावळा काळा,
कोकिळ पण काळा. कावळा आणि कोकिळामध्ये फरक (भेद, अतर) काय?
वसंत ऋतुचे आगमन झाल्यावर मात्र कळते की कावळा तो कावळा आणि कोकिळ तो कोकिळ.
(वसंत ऋतुचे कोकिळ गोड आवाजात स्वागत करतो,
त्यावेळी दोघांमधील फरक लक्षात येतो).
टीप- अन्योक्ती या अर्थालंकाराचे उदाहरण म्हणजे वरील श्लोक कावळा
व कोकीळ यांच्या माध्यमातून अज्ञ व सुज्ञ यातला फरक हा श्लोक आपल्याला सांगतो. वस्तुतः
कावळा व कोकीळ यांचे बाह्यरूप जवळपास सारखे असले तरी दोघांचे गुण वेगवेगळे आहेत.
वसंत ऋतुचे कोकिळ गोड आवाजात स्वागत करतो,
हा कोकिळाचा स्वाभाव,
मात्र त्यावेळी दोघांमधील फरक लक्षात येतो. याउलट कावळ्याला कितीही चांगले
अन्न मिळाले तरी ते खाल्ल्यानंतर तो घाण खायला जातोच हा कावळ्याचा स्वाभाविक अवगुण
होय. या विषयी मागे आपण 'किं न
पश्यन्ति कवयः' या
लोकोक्ती च्या वेळी संबंधित श्लोकात किं न खादन्ति वायसाः। हे चरण पाहिले होते.
यावरूनच
काकः काकः पिकः पिकः। ही
लोकोक्ती प्रचलित झाली असावी.
शेवटी म्हणतातच ना जात्याच सुंदर असणार्यास सर्व काही शोभते. कोकीळ रुपाने
कसाही असला तरी जात्याच (जन्मतःच) मधुर त्याचा गळा त्याला आकर्षण ठरतो. इतका की
रामरक्षेमध्येही बुधकौशिक ऋषींनी त्याची दखल घेतलेय व वाल्मिकींना कोकिळाची उपमा
दिली आहे.
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥-
रामरक्षास्त्रोत्र.
'काकः काकः'
ह्याच श्लोकाचा रहिमदासाने एका सुंदर दोह्यामध्ये
काव्यानुवाद केला आहे
दोनों रहिमन एक से, जौ बोलत नाहिं
जान परत हैं काक पिक ऋतु बसंत के माहिं
कवीश्रेष्ठ
रहीम म्हणतो की जोपर्यंत दोघांपैकी कोणाच्याही मुखातून बोल निघत नाहीत मूक
असलेले तोवर कावळा आणि कोकिळ दोघेही रंगरूपाने सारखे आसल्याने एकसारखेच दिसतात.
मात्र ऋतुराज वसंताचे आगमन होताच कोकिळाचा गाता कंठ आणि कावळ्याचं कर्कश्श नरडं
यातील अंतर कळून येते.
'काकः काकः पिकः पिकः' याच सुभाषिताशी आशयसाम्य असणारी अजून काही सुभाषिते आहेत.
त्यापैकी काही अशी,
हंसः शुक्लः बकः शुक्लः को भेदो बकहंसयो।
नीरक्षीरविवेके तु हंसो हंसः बको बकः॥
हंसाचा
रंग शुभ्र (पांढरा) असतो आणि बगळासुद्धा शुभ्रच असतो मग दोघांमधे फरक काय?
तर ज्याच्याकडे दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याची कला
(नीरक्षीरविवेक) असते तो हंस होय,
बगळ्याकडे हा विवेक नसतो. त्यामुळे रंग सारखा असला तरी बगळा हा बगळा आणि हंस
तो हंसच असतो.
याचप्रमाणे
अजून एक सुभाषित असे,
मणिर्लुण्ठति पादाग्रे काच: शिरसि धार्यते।
क्रयविक्रयवेलायां काचः काचः मणिर्मणि:॥ (चाणक्यनीती.)
जर
एखादा मनुष्य गाजतरपारखी असेल तर तो रत्नाला पायताणावर सजवतो आणि काचखड्यांना
डोक्यावरच्या मुकुटावर स्थान देतो. पण असे केल्याने रत्नांचे मूल्य कमी होत नाही
आणि काचेचाही भाव वाढत नाही. जेव्हा त्यांच्या खरेदीविक्रीची वेळ येते तेव्हा
बाजारात काच ती काचच ठरते आणि रत्न ते रत्नाचेच मूल्य मिळते.
वरील सर्व सुभाषितांमधून हाच अर्थ
दृष्टीस येतो की वेळेचा महिमा किंवा भाग्यामुळे विद्वान व्यक्तीचा भलेही सन्मान
होवो अथवा न होवो परंतु जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा विद्वान मनुष्याची
विद्वता कसोटीवर खरी ठरते आणि अयोग्य व्यक्तीचं हसूच होतं. हिंदी कवी गिरिधर कविराज आपल्या कुंडलिया रचनेत
लिहितो की,
गुन के गाहक सहस, नर बिन गुन लहै न कोय।
जैसे कागा कोकिला, शब्द सुनै सब कोय॥
शब्द सुनै सब कोय, कोकिला सबै सुहावन।
दोऊ के एक रंग, काग सब भये अपावन॥
कह गिरिधर कविराय, सुनो हो ठाकुर मन के।
बिनु गुन लहै न कोय, सहस नर गाहक गुन के॥
गिरिधर कविराज म्हणतो की मनुष्याची खरी
ओळख त्याच्या गुणांमुळे होत असते. गुणाचे हजार ग्राहक आहेत, गुणी
व्यक्तीचा सहस्र लोक स्वीकार करायला तयार असतात परंतु गुणहीनांना समाजात काहीच
स्थान नाही. ज्याप्रकारे कावळा आणि कोकीळ रंगरूपाने समान दिसले तरी दोघांच्या
वाणीमध्ये आकाश व पाताळाइतका फरक असतो.
कोकीळ त्याच्या मधुर वाणीमुळे जनमानसाला प्रिय असतो परंतु कावळा मात्र त्याच्या
कर्कश आवाजामुळे कोणालच प्रिय नाही. म्हणून कविराज गिरिधर म्हणतात की यावरून आपण
एक निश्चित केलं पाहिजे की या जगात गुणहीन व्यक्तिला काहीच महत्त्व नसते. म्हणूनच
आपणही चांगले गुण अंगीकारायला हवेत.
नाहीतर काकः काकः पिकः पिकः। ही गत येण्यास
वेळ लागणार नाही.