संस्कृत सुभाषित रसग्रहण -
पावको लोहसंगेन मुद्गरैरभिहन्यते ।
अहो दुर्जनसंसर्गात् मानहानिः पदे पदे।
पावको लोहसंगेन मुद्गरैरभिहन्यते॥
अर्थ :- दुर्जनांच्या संगतीत राहिल्याने मनुष्याची पदोपदी मानहानीच
होते. (आता हेच पहा की) लोखंडाच्या संगतीत
राहिल्याने अग्नीलाही ऐरणीवर घणाचे घाव सोसावे लागतात.
टीप- बर्याचदा वाईट लोकांची संगत धरल्याने मनुष्याला वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अशावेळी पावको लोहसंगेन मुद्गरैरभिहन्यते ही संस्कृत लोकोक्ती बोलण्यात येते. मराठीतही या अर्थाची एक म्हण आहे ती अशी, असंगाशी संग प्राणाशी गाठ याच संदर्भात संस्कृतमधील 'अव्यापारेषु व्यापार असा वाक्प्रचारही अनेक संस्कृतानुगामी भाषांमध्ये प्रचलित आहे. अहो, 'कोळश्याच्या व्यापारात हात काळेच होणार ना? मागे आपण नीतीशतकातील मूर्खपद्धति प्रकरणात एक श्लोक पाहिला होता त्याचा अर्थही या लोकोक्तीशी जुळतो. तो श्लोक असा,
वरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरै: सह।
न मूर्खजनसम्पर्को सुरेन्द्रभुवनेश्वपि॥
(एकवेळ) वनचरांच्या (पशुंच्या) संगतीत अवघड डोंगरदऱ्यातून भटकणेही पत्करले (परवडले), पण मूर्खाच्या सोबतीने अगदी इंद्रभवनातील सुखसुद्धा मिळत असेल तर तेही नको. संत कबीरजी म्हणतात,
उजल बुन्द आकाश की, परि गयी भुमि बिकार।
माटी मिलि भइ कीच सो, बिन संगति भौउ घार॥
आकाशातून पडणारे पावसाचे थेंब निर्मळ व स्वच्छ जमीनीवर पडताच मात्र विकार पावतात. मातीत मिसळून त्यांचा चिखल होतो. चांगली माणसेसुद्धा अशाचप्रकारे वाईट संगतीत राहून बेकार होतात कारण संगतीचा माणसाच्या चारित्र्यावर, गुणांवर, वागणुकीवर तसेच दैनंदिन व्यवहारावरसुद्धा प्रभाव पडतो. दुर्जन संगती परिणाम सांगणारी अनेक संस्कृत सुभाषिते आहेत. त्यापैकी एक असे,
दुर्जनेन समं सख्यं प्रीतिं चापि न कारयेत् ।
उष्णो दहति चांगारः शीतः कृष्णायते करम् ॥
इथे दुर्जनांना कोळश्याची उपमा दिली आहे. सुभाषितकार कवी म्हणतो की कोळशाशी सख्य (मैत्री) कधीही करू नका कारण गरम कोळसा (निखारा) जर हाताळला तर तुमच्या हातास जाळतो आणि थंड थंड कोळसा हातात घेतला तर हात काळे होतात. याच अर्थाने हिंदी संतकवी रहिमदासाचाही एक दोहा आहे.
ओछे को सतसंग, ‘रहिमन’ तजहु अंगार ज्यों ।
तातो जारै अंग , सीरे पै कारो लगे ॥
हे रहीम, चांगल्या माणसानं दुर्जनांची साथ सोडलेलीच बरी, ती निखार्यासारखीच होय. पेटता निखारा हातात घेतला तर पोळणे अटळ आहे आणि विझलेला निखारा (कोळसा) जवळ केला तरी, त्याचा कलंक (काळा डाग) लागणारच. अशाच प्रकारे दुर्जन सुद्धा रागात असेल तर तुमचा नाश करू शकतो आणि तो शांत असताना तुम्ही त्याच्याशी मैत्री केली तर तुमची सगळीकडे अपकिर्ती, बदनामी होते.
म्हणूनच,
पावको लोहसंगेन मुद्गरैरभिहन्यते। ही केवळ लोकोक्तीच
नाही तर शिकवणदेखील आहे.