नीरक्षीरविभागे तु हंसो हंसो, बको बकः संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

नीरक्षीरविभागे तु हंसो हंसो, बको बकः संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit

 संस्कृत सुभाषित रसग्रहण 

sunskrit Subhashit knowledgepandit

नीरक्षीरविभागे तु हंसो हंसो, बको बकः।


प्राण्यांमध्ये सिंहाची महती सुभाषितकारांनी खूप वर्णिली आहे. त्याप्रमाणे पक्ष्यांमध्ये हंसाची महती खूपच गायिली आहे.

एकेन राजहंसेन या शोभा सरसो भवेत्।

न सा बकसहस्रेण परितस्तीरवासिना ॥

एका राजहंसामुळे सरोवराला जी शोभा प्राप्त होते ती भोवताली किंवा तीरावर असलेल्या हजारों बगळ्यांनी सुद्धा प्राप्त होत नाही. राजहंस हा संस्कृत कवींचा अत्यंत आवडता पक्षी आहे. त्याला दैवयोगाने एक शक्ती प्राप्त झालेली आहे, ती म्हणजे 'नीरक्षीर-विवेक' दुधातील दूध व पाणी वेगळे करण्याची शक्ती! दिसायला हंस व बगळा दोघेही पांढरे शुभ्रच असतात.

हंसः श्वेतो बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः।

नीरक्षीरविवेके तु हंसो हंसो बको बकः ॥

हंस पांढरा, बगळा पांढरा मग दोघात फरक काय? नीरक्षीर विवेक करण्याच्या वेळी हंस तो हंस व बगळा तो बगळा असतो.

सत् व असत् याचा भेद ज्याला कळतो अशा बुद्धिमान माणसाला हंसाची उपमा देतात. संस्कृत मध्ये 'सः अहम्' 'तो ईश्वर म्हणजे मीच' या अर्थी उलट अक्षरे करून 'हंसः' असा शब्द वापरतात. श्रेष्ठ संन्याशाला 'परमहंस संन्याशी' म्हणतात. जे जे धवल, उदात्त, त्यागी आहेत त्यांच्यासाठी हंसाचे उपमान वापरले जाते.

ग. दि. माडगुळकर यांचे एक प्रसिद्ध गीत आहे. त्यात ते म्हणतात, की एका तळ्यात अनेक बदकांची पिले रहात होती. त्यात एक राजहंसाचे पिलू चुकून होते. बदकाची पिले त्या राजहंसाच्या पिलाची चेष्टा करीत, की ते कुरूप आहे, वेडे आहे. त्याला कोणी संगे घेत नव्हते. ते बिचारे राजहंसाचे पिल्लू निमुटपणे सारी अवहेलना सहन करीत होते. एके दिवशी राजहंसाचा थवा आला. त्यांनी त्या आत्मविस्मृत हंसपिलाला सांगितले की, 'तू बदक नाहीस तर राजहंस आहेस.' मग ते त्यांच्याबरोबर मानससरोवराकडे उडून गेले. हंस मानससरोवराशिवाय रमत नाही.

अस्ति यद्यपि सर्वत्र नीरं नीरजमण्डितम् ।

रमते न मरालस्य मानसं मानसं विना ॥

जरी सर्वत्र कमळांनी सुशोभित पाणी असले तरी हंसाचे मन मानस सरोवराशिवाय रमत नाही. श्रेष्ठ लोक श्रेष्ठ ठिकाणीच रममाण होतात. अवतारकार्य  संपल्यावर पूर्वीचे श्रेष्ठ मानव हिमालयातच जात असत. असाच एक हंस इतर नीच पक्ष्यांच्या संगतीत गेला

हंसोऽध्वगश्रममपोहयितुं दिनान्ते।

कारण्डकाकबककोककुलं प्रविष्टः।।

मूकोऽयमित्युपहसन्ति लुनन्ति पक्षान् ।

नीचाऽश्रयोहि महतामपमान हेतुः॥  

दिवसाच्या शेवटी एक हंस हिंडण्याचे श्रम शांत करण्यासाठी कारंडव, कावळा, बगळा यांच्या समुदायात गेला. तिथे तो हंस मुका आहे, म्हणून ते पक्षी त्याची चेष्टा करू लागले. त्याचे पंख उपटू लागले. नीच माणसाचा आश्रयसुद्धा अपमानांस कारण होतो. एकदा एक हंसाचा थवा उडत जात असता, विश्रांतीसाठी एका नदीतीरी थांबला. तिथे कावळे होते. त्यांना त्या राजहंसांना पाहून विस्मय वाटला. त्यांनी चौकशी केली, "कुठून आलात?" "मानस सरोवरावरून" हंस म्हणाले, "तिथे खायला काय असते?" कावळ्यांनी पृच्छा केली. "तिथे आम्ही मोत्यांचा चारा खातो." हंस उत्तरले. त्यावर कावळे तिरस्काराने म्हणाले, "हात्तीच्या ! तिथे पिंडाचा भात मिळत नाही ना? मग धिक्कार असो तुमच्या मानस सरोवराचा."

घाणीत रममाण होणाऱ्या माणसांना मानस सरोवराचे काय महत्त्व ?

हंसाचे चालणे डौलदार असते. सुंदर स्त्रीच्या चालण्यास राजहंसाच्या चालण्याची उपमा दिलेली सर्वत्र आढळते.

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post