महानुभाव पंथीय कविता रसग्रहण
श्रीविश्वनाथबास बिडकर विरचित ध्यानामृत स्तोत्र
प्रायश्चित
छंद :- शालिनी - गण - मा ता ता गा गा
एकी साक्षात् मूर्तीचे ध्यान केले ।
सेवा दास्ये जन्म जीवित दीले ।
ज्याले त्यांचे धन्य होउनि ठेले ।
सर्वा भाग्य दैव साफल्य झाले ||१||
अर्थ :- एकी म्ह. सन्निधानात असलेल्या श्रीनागदेवाचार्य, महादाईसा, म्हाईंभट, इत्यादी भक्तांनी श्रीचक्रधर प्रभुंच्या साक्षात् श्रीमूर्तिचे ध्यान केले. आणि सेवेने दास्याने आपले जन्म जीवित म्ह. भरलेपणे आवडीपूर्वक त्या भगवंताच्या श्रीचरणी वाहून दिले. त्यांचे ज्याले म्ह. जगणे ते धन्य झाले. सर्व प्रकारचे भाग्य थोर दैव उदयाला आले. आणि त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले.
ते पै योगी वंचलो पापिया मी ।
माझ्या ठाइ दोषजा थोर उर्मी ।
तेणे किंदे मारिले जीव धर्मी ।
नाना विघ्नी भस्मिले दुष्ट कर्मी ||२||
अर्थ :- परमेश्वराचे सन्निधान हा थोर मंगळकाळ, फार मोठा सुयोग त्या उत्तम योगाला मी पापिया वंचलो. माझ्या पापांमुळे मला त्या स्वामीचे सन्निधान लाभले नाही. कारण माझ्या ठिकाणी नाना प्रकारच्या थोर थोर दोषांची उर्मी आहे. तमाची उर्मी म्ह. मद, माजलेपन आहे. धनाचा, रूपाचा, ज्ञानाचा मद आहे. आणि त्या मदाच्या अहंकाराच्या अधीन होऊन मी जीवधर्मीयाने असंख्य साधुसंतांचे अंतःकरण दुःखवले. असा मी दुष्टकर्मी म्ह. वाईट कर्मे करणारा आहे. धार्मिक लोकांना नाना प्रकारचे विघ्न करून त्रास दिला. आणि अष्टस्वभाव पालनी सुक्ष्म जंतु भस्मिले. त्यांची हिंसा केली.
सर्वा दोषा कंद जो अंत माझा ।
सामुग्रीचा दुष्ट पै वाफ वोझा । ।
झाल्या तिन्ही त्या मति पाप वोला ।
चित्रे भेदी कार्यरूपे डिरैला ||३||
अर्थ :- माझे अंतःकरण जणूकाही सर्व दोषांचे कंद वाढवणारी भूमीच आहे. त्यात त्या दोषज अंतःकरणी ज्योतिष, वैद्यक, संगीत, इत्यादी आवांतर सामग्री किंवा कर्मरहाटीतील सामग्रीची ती जणूकाही वाफ झालेली आहे. आणि त्या दोषरूप कंदाला अधमती, अधगती, अधरती या मतित्रयाची ओल मिळाली आणि तो दोषरूप कंद अनेक प्रकाराने फुलला. उगवला.
बीजाहंता तेथ पै चित्र जाली ।
उल्लेखी ते भिन्नता देखियेली ।
विस्तारीता दोषरोपे निगाली ।
शाखा कार्य पत्रपुष्पी फुलेली ||४||
अर्थ :- मतित्रयामुळे माझ्या अंतःकरणात चित्र म्ह. विविध प्रकारची अहंता उत्पन्न झाली. स्वतःला श्रेष्ठ, ज्ञानी समजू लागलो. त्या अहंतेच्या उल्लेखांमध्ये भिन्नता असल्याने नाना दोषांची रोपे माझ्या हृदयभुमिकेत फोफावली. पुढे ते दोष वाढत जाऊन असंत कर्म घडून त्यांची फळे मला भोगावी लागतील यात काही शंका नाही.
=======
श्रेष्ठा पापी संग्रहे साधु होए ।
संतामध्ये गौरवा इच्छिताये ।
थोरा दोषी पोळणे दुर ठेले ।
साधुत्वाचा मान घेणे पडीले ।।
अर्थ :- हे महाराजा श्रीचक्रधरा ! मी श्रेष्ठातला श्रेष्ठ पापी असून, पाप्यांचा सरदार असून लोकांदेखत साधु म्हणून मिरवतो. असा मी दांभिक आहे. आणि जे खरे ज्ञानी, वैरागी आहेत त्यांच्याकडून गौरव मान्यतेची दंडवताची अपेक्षा करतो. हे प्रभो!! मी गळीत आहे. आंगवनशीळ आहे, माझ्या ठिकाणी विकार, चेतन स्त्रीविषय सेवन, अहंकार, वैपरित्य, ईश्वरद्रोह असे थोर थोर दोष आहेत पण त्याविषयी मला यत्किंचितही पोळ, अनुताप नाही. आणि वरून मी साधुत्वाचा मान घेतो, स्वतःला साधु म्हणवून घेतो. नामधारकांना वासनिकांना नादी लावून घेतो.
पापा भेणे मानिती क्षेणु जेथे ।
तो मी इच्छी पुज्यता थोर तेथे ।
दंभाहंते योग्यता दाविताए ।
नाना कीर्ती नास्तिकी सांघताए ||२२||
अर्थ :- काही यथार्थ ज्ञानीये, वैरागी माझी कृतकर्मे आणि मळिनता जाणतात. मी माळेकाराच्या दृष्टांतीचा चोर आहे हेही जाणतात. पण तरीही माझा दांभिक आचार पाहून माझी मान्यता करतात. मला हे कळते की हे आपद् धर्म म्हणून माझी मान्यता करत आहे, पण तरीही मी तिथे थोर मान्यतेची अपेक्षा करतो. कुमरत्व राखलेल्या ज्ञानी वैरागी भिक्षुंपेक्षा मला अधिक मान द्यावा अशी इच्छा करतो. आणि मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, योग्य आहे हे दांभिकतेने सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आणि मीही खुप अभ्यास केला आहे, पटकर फाडले आहेत, मी ज्ञानी आहे, मी खुप धर्मप्रसार करत आहे अशी नसलेली किर्ती बोलून दाखवतो.
तेथे माझा मान्यता भंग जाला ।
क्रोधाग्नी जो मस्तकीही निगाला ।
तेणे तेया मंगळा दग्ध कर्ता ।
दुःखा दैन्या पापही वोढवीता ||२३||
अर्थ :- पण ते यथार्थ वैरागी, ज्ञानी माझी कुत्सित कर्मे सगळी जाणतात. म्हणून ते मला विशेष मान्यता देत नाहीत, आणि माझा मान्यतेचा भंग झालेला पाहून माझ्या अंतःकरणात क्रोधाग्निचा भडका उठला आणि मी तमतम करून इतरांची पटकरे उचलून फेकून त्या मंगळकाळाचा मंगळ अवसराचा भंग केला. सगळ्यांना उद्वेग ओढवेल असे वर्तन केले. आणि दुःख, दैन्य पाप हे तिन्ही आंगवून घेतले. अधिकच नरक जोडून घेतले.
पात्री नाना दोषही कल्पिताए ।
नित्याजाते आपुले लोपिताए ।
सोक्ती तर्के धर्मही खंडिताये ।
चर्या निष्ठा देव्हडे दंडिताये ||२४||
अर्थ :- मग पुढे त्या वैरागी, ज्ञानी लोकांचे नव्हते दोष घेऊ लागलो. आणि माझे नित्यनरकाला नेणारे दोष मी आच्छादून ठेवले. ज्ञानी वैरागी पात्रांबद्दल भकू लागलो. आणि सुत्रपाठातल्या वचनांचे स्वोक्तीने अर्थ करून चर्या करणाऱ्या, असतिपरी आचरणाऱ्या चर्यावंतांना माझी मान्यता करत नाहीत म्हणून वाक्बाणांनी दंड करू लागलो. असा मी पापीया आहे.
मी आलस्ये आथीला : म्हणौनि ईश्वरद्रोह केला :
असतिपरी नाचरला : प्रसवबळे ।।
काळावरी ठेऊनि दूषण : चर्या न करी मतिहीन :
इंद्रियार्थ-रसाचे लोलूपण : माझा ठाई असे ।।
अर्थ :- मी आळशी ईश्वरद्रोह करतो. देवाने सांगितलेली असतिपरी आताच्या काळात लागू होत नाही. काळानुसार बदल करावा लागतो. आता भीक्षा मागणे विहित नाही. असे अन्यथाज्ञान पसरवून नामधारकांची वासनिकांची प्रतारणा करतो. आणि तिन्ही वेळ पचनाचे अन्न भक्षण करतो. आणि चर्या करणाऱ्या साधणवंताची निंदा करतो. यांना कळत नाही म्हणतो. अशा नाना दोषांनी मी आथिलेला असून उजळमाथ्याने या परमार्गात वावरत आहे.