बोधकथा - स्वत:चे मूल्यांकन (आत्म परिक्षण)

बोधकथा - स्वत:चे मूल्यांकन (आत्म परिक्षण)

 बोधकथा - स्वत:चे मूल्यांकन (आत्म परिक्षण) 

एक खाटीक, बकरीला ओढून नेत होता, तेव्हां बकरीने संन्याशाला समोरून येताना पाहिले व तिची जगण्याची आशा पल्लवीत झाली. डोळ्यासमोर मृत्यू दिसत असल्यामुळे ती विनवणी करू लागली, “महाराज! मला या खाटिकापासून वाचवा. माझी छोटी छोटी कोकरं आहेत. जोपर्यंत मी जिवंत असेन, तोपर्यंत माझ्या कोकरांच्या वाट्याचे दूधसुद्धा मी तुम्हांला देत राहीन.”

बकरीच्या आर्त हाकेचा संन्याशावर काहीच परिणाम झाला नाही. तो निर्विकारपणे म्हणाला, “मूर्ख बकरी, तुला माहित नाही का, मी एक संन्यासी आहे? जीवन-मृत्यू, मोह-माया आणि सुख-दु:खाच्याही पलीकडे. प्रत्येकाला एक ना एक दिवस मरण हे येणारच आहे. असं समज की तुझा मृत्यू, या खाटिकाच्या हातून आहे. जर हे पाप असेल, तर ईश्वर त्याला त्याची शिक्षा देईलच.”

"माझ्याविना माझी कोकरं  मरून जातील.“ असे म्हणून, ती बकरी रडू लागली. तेव्हा संन्यासी बकरीला म्हणाला, "तू मूर्ख आहेस. रडण्यापेक्षा तू ईश्वराचे नामस्मरण कर. लक्षात ठेव, मृत्यू म्हणजे  नवजीवनाचे द्वार आहे. सांसारिक नाती ही मोहाची परिणिती आहे."बकरी खूप निराश आणि उद्विग्न झाली.

जवळच उभा असलेला एक कुत्रा, ही घटना बघत होता. त्याने संन्याशाला विचारलं, "काय हो महाराज, तुम्ही मोह मायेपासून पूर्णपणे मुक्त झाला आहात का?" तो संन्यासी उत्तरला, "अर्थातच! माझं एक खूप मोठ कुटुंब होतं, सुंदर बायको, बहीण-भाऊ, आई- वडील, काका-काकू , मुलगा-मुलगी आणि खूप धन संपत्ती होती. मी, एका क्षणात सर्व सोडून परमेश्वराला शरण गेलो.

सांसारिक प्रलोभनांपासून खूप दूर, सर्व काही त्यागून मी आलो आहे. मोह मायेने भरलेला, निरर्थक संसार सोडून मी आलो आहे, जसे चिखलातील कमळ!" अशा रीतीने संन्यासी बढाया मारू लागला. त्या कुत्र्याने त्याला खूप समजावले, “तुमची इच्छा असल्यास तुम्ही बकरीचा जीव वाचवू शकता. खाटीक तुमचं बोलणं टाळणार नाही. एक जीव वाचला, तर किती चांगलं होईल?”

संन्याशाने, कुत्र्याला जीवनाचे सार समजावून सांगायला सुरुवात केली, "मृत्यू अटळ आहे. आज नाही तर उद्या, प्रत्येक जीवाला एक दिवस मरायचे आहेच. आणि त्याची वृथा काळजी करत जीव स्वतःला त्रास करून घेतो.” पण, जेव्हा संन्यासी आपले ज्ञान पाजळत होता, तेव्हां अचानक फणा काढलेला एक काळा नाग त्याच्या समोर आला.

तो, संन्याशावर का रागावलेला होता हे माहीत नाही, पण जणू काही त्याने ठरवलंच होतं की, तो त्याला डसणारच. नागाला बघून संन्याशाला  खूप घाम फुटला. आणि मोक्ष व आसक्तीवर  प्रवचन देणाऱ्या संन्याशाने मदतीच्या अपेक्षेने कुत्र्याकडे बघितले.

कुत्र्याला हसू आले आणि तो म्हणाला, “संन्यासी महाराज, मृत्यू म्हणजे नव्या जीवनाची सुरुवात असते. मृत्यू एक न एक दिवस तर येणारच आहे. मग वृथा काळजी कशाला करायची?” कुत्र्याने संन्याशाचेच शब्द परत उद्गारले .

आपला उपदेश विसरून, तो संन्यासी काकुळतीला येऊन म्हणाला, "माझे या नागापासून रक्षण कर." पण कुत्र्याने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. कुत्रा त्याला म्हणाला, "तुम्ही, आता यमराजांशीच बोला. त्या बकरीला जगायचं आहे आणि खाटिक बकरीला दूर घेऊन जाण्याआधी, मला माझे कर्तव्य पूर्ण करायचे आहे.”

असे म्हणून कुत्रा उडी मारून नागाच्या दुसऱ्या बाजूला गेला. आणि मग धावत जाऊन त्याने खाटिकाच्या अंगावर उडी मारली व त्याच्यावर तुटून पडला. अचानक झालेल्या हल्ल्याने खाटीक एकदम घाबरून गेला आणि सैरावैरा पळू लागला. ह्या झटापटीत बकरीवरील त्याची पकड सैल झाली आणि बकरी जंगलात पळून गेली.

खाटिकाचा समाचार घेतल्यावर कुत्र्याने संन्याशाकडे बघितले. संन्यासी, समोर असलेल्या मृत्यूच्या भीतीने अजूनही कापत होता. कुत्र्याने, संन्याशाला त्याच्या नशिबावर सोडून पुढे जाण्याचा विचार केला, परंतु त्याच्या सद्सद् विवेकबुद्धीने  तसे करू दिले नाही. तो पळत नागाच्या पाठीमागे गेला, त्याने त्याची शेपटी तोंडात पकडली व त्याला झाडीत भिरकावून दिले. संन्याशाचा जीव भांड्यात पडला. त्याने कृतज्ञतापूर्ण नजरेने कुत्र्याकडे बघितले.

कुत्रा म्हणाला, "महाराज, मला असे वाटते की, जे फक्त स्वत:साठीच जगतात, तेच मृत्यूला जास्त घाबरतात. एका प्राण्यामधे आणि मनुष्यामध्ये काय फरक राहिला, जे फक्त स्वत:चाच विचार करतात? प्राणीसुद्धा इतरांची काळजी करतात.

अंगाला भस्म लावल्याने आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्याने कोणीही परमेश्वराला प्रिय होऊ शकत नाही. ज्यांच्या हृदयात इतरांविषयी दया आणि प्रेम नसते त्यांच्यावर परमेश्वरसुद्धा प्रसन्न होत नाही." धार्मिक प्रवचने फक्त काही काळासाठी त्यांना, त्यांच्या पापांपासून दूर ठेवू शकतात, पण जगण्यासाठी संघर्ष तर अटळ आहे आणि हेच सत्य आहे. जर हृदयात  प्रेम आणि भक्ती नसेल तर, धार्मिक विधी केवळ देखावा ठरतात.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post