भगवतः भक्तिर्दृढाऽऽधीयताम् संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
भगवंताच्या ठिकाणी दृढ भक्ति ठेवा..
भगवतः भक्तिर्दृढाऽऽधीयताम् ...
चिंतन.. :- संतांचा संग खरंच घडला की नाही याचं गमक म्हणजे ते सांगतात त्याप्रमाणे भगवंताची भक्ति तुमच्या अंतःकरणात दृढमूल झाली का? पक्की रुजली का? हे! आचार्य तेच सांगतायत की सामान्य व वरवरची भक्ति नव्हे तर दृढ, न हलणारी भक्ति ठेवा. लेचीपेची, जराशा संकटांनी, दुःखांनी डळमळणारी भक्ति नाही उपयोगाची काही!
भक्ति हा साधकाचा परम धर्म झाला पाहिजे.. आहार, निद्रा, भय, मैथुनरूप सामान्य धर्म नव्हे! वेदव्यास श्रीमद्भागवतात म्हणतात ..
स वै पुंसां परो धर्मः यतः भक्तिः अधोक्षजे।
अहैतुक्यप्रतिहता ययात्मा संप्रसीदति ।।
माणसाचा खरं तर, तोच परम धर्म.. ज्याच्यामुळे भगवंतावर अहैतुकी म्हणजे निरपेक्ष.. निष्काम आणि अप्रतिहता म्हणजे कधीही कोणत्याही कारणानिमित्तानं खंडित न होणारी .. अशी भक्ति भगवंतावर जडेल, ज्यामुळे तो प्रसन्न होईल!..
भक्ति अव्यभिचारीच हवी.. एकनिष्ठच हवी! जर ती नाचरी असेल.. डळमळणारी असेल तर ती खोटी, मायिक ठरेल!... भाव असे जरी मायिक तरी देव होय महाठक.. या न्यायानं सर्वज्ञ देवाला त्या भक्तीतली खोट लगेच कळेल व तुमच्या दुप्पट तुम्हाला तो ठकवेल! पण जर भगवंताच्या ठिकाणी ती परम प्रेमरूपा भक्ति असेल तर ती भक्ताच्या ठिकाणी त्वरित अहैतुक ज्ञान व वैराग्य निर्माण करील...
आजकाल पंडित, भगवान, शास्त्री, तत्वज्ञ अशी बिरुदं त्या शब्दांचे मूळ अर्थ लक्षात न घेता कुणाच्याही नावा मागे लावण्याची टूम निघालेली आढळते. पंडित शब्दाची व्याख्या..
यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितः बुधाः ।।
अशी आहे. ज्याची सर्व शास्त्रविहित कर्मं कामनाविरहित व संकल्पविरहित होऊन आत्मज्ञानरूपी अग्नीत भस्मसात झाली त्याला बुधजन पंडित म्हणतात! माणसं सर्व कर्मं कोणत्या ना कोणत्या स्वार्थानं चांगल्यावाईट संकल्पविकल्पांनी युक्त अशी करत असतात..
त्यांच्या फलरूपी उभ्याआडव्या धाग्यांनी जीवनवस्त्र सतत विणलं जात असतं. सद्गुरूंकडून आत्मज्ञान होईपर्यंत माणसं या धाग्यांच्या गुंत्यात अडकत राहतो.. हे जीवनवस्त्र आवडो नावडो.. सुटता सुटत नाही! पण सद्गुरूंमुळे आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला की माणसं कर्म, अकर्म, विकर्म यांचं यथार्थ ज्ञान होऊन प्राप्त कर्तव्यकर्मं निष्काम कर्मयोगानं निभावत असतात.
त्या ज्ञानाचा प्रवाह अखंड वाहत राहतो... त्यामुळे संचितप्रारब्धक्रियमाण सर्व जळून जाऊन स्फटिकवत् शुद्ध झालेल्या चित्तात परमात्म्याचं स्वच्छ प्रतिबिंब पडतं. अशी ज्याची अखंड स्थिति राहते तो खरा पंडित.. पण्डा नाम आत्मबुद्धिः तया ईरितः स पंडितः। भं भरणे गं गमने जीवाचं भरणपोषण करणं आणि त्याला चांगली गति देणं हेच भग.. ते ज्याच्या जवळ.. तो भगवान!
ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः।
ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा।।
विश्वब्रह्मांडातील.. समग्र ऐश्वर्य म्हणजे नियमननियंत्रण सामर्थ्य, वीर्य.. पराक्रम, यश, श्री.. संपत्ति, ज्ञान आणि वैराग्य सहांना मिळून भग म्हणतात.. ते ज्याच्या जवळ तो भगवान! अशा भगवंतावर परम.. आत्यंतिक.. स्वतःवर असेल त्याहूनही अधिक प्रेम करावं असं आचार्यांचं सांगणं आहे.
देवर्षि नारदांच्या भक्तिसूत्रातल्या प्रमाणे व्रजातल्या गोपींनी जसं भगवान श्रीकृष्णांवर प्रेम केलं तसं.. तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता असं प्रेम करावं. जीवनातले यच्चयावत् सर्व व्यवहार.. कर्मं त्याला अर्पण करणं..
त्याची इच्छा, आवड, आज्ञा म्हणून व इतरांना दोष न देता ते करणं आणि तसंच क्षणांशानंही जरी त्याचं विस्मरण झालं तरी पाण्याविना मासोळी जशी कासावीस होते तशी जीवाची अवस्था होणं ही परम.. श्रेष्ठतम भक्ति होय! इतक्या श्रेष्ठतम श्रेणीचं प्रेम भगवंतावर करावे असं आद्य शंकराचार्य साधकांना सांगतात.
शान्त्यादिः परिचीयतां दृढतरम् शमदम इत्यादींची साधना करून शान्ति.. समाधान.. आनंद इत्यादींना घट्ट धरा... शान्त्यादिः परिचीयतां दृढतरम् जगात काहीही फुकट, विनामूल्य मिळत नाही.. काहीही हवं असेल तर त्यासाठी काही ना काही द्यावं लागतं.. काही खर्च करावं लागतं!
सुखार्थी चेत्त्यजेत् विद्यां विद्यार्थी चेत्त्यजेत् सुखम् । ज्याला सुखासीनतेनं जगायचंय त्यानं विद्येचा.. शिक्षणाचा नाद सोडावा व ज्याला विद्या, शिक्षण हवंय त्यानं सुखासीनतेचा नाद सोडावा. प्रत्येक गोष्टीसाठी काही मूल्य ठरलेलं असतं ते दिल्याशिवाय ती गोष्ट हाती लागत नाही. मला अमुक फुकट.. मोफत मिळालं असं वाटणं हे भ्रममूलक असतं!
मिळालेल्या गोष्टीची किंमत एक तर आधीच वसूल केली गेलेली असते.. किंवा नंतर वसूल करण्यात येत असते.. तीही आपल्या नकळत.. कधी आपल्या अज्ञानाचा लाभ उठवतसुद्धा! कधी या जन्मी तर कधी पूर्व वा पुनर्जन्मी! या देण्याघेण्याच्या हिशेबासाठीच तर पूर्वजन्म पुनर्जन्मासारख्या घटना घडत असतात!
पण या सर्वातून सुटका हवी असेल तर भगवद्भक्ति.. तीही भगवत्साक्षात्कार घडवून देणारी.. हा एकच मार्ग आहे! त्याच्या पूर्वतयारीसाठी साधनचतुष्टय अत्यावश्यक आहे. विवेक, वैराग्य, शमदमादिषट्क आणि मुमुक्षुता. हे तसं सर्वच ठिकाणी आवश्यक असतं. प्राप्तव्याच्या स्वरूपावर, त्याच्या निकडीवर फारतर याचा तपशील बदलेल. प्रस्तुत चरणांशात शमदमादि षट्काचा उल्लेख सुभाषितकार करत आहेत.
विवेकानं प्राप्तव्याची निश्चिती झाली आणि त्या प्राप्तव्या व्यतिरिक्त अन्य वस्तुपदार्थ व्यक्तिपरिस्थिती इत्यादींबद्दलचं वैराग्य अंतरात निर्माण झालं की मग त्याच्या सुस्थिरतेसाठी शम, दम, उपरति, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टी आत्मसात करायच्या असतात. या नंतर चित्तात मुमुक्षुता आली पाहिजे तर भगवद्दर्शन / भगवत्साक्षात्कार. भगवन्मयता आणि मोक्षमुक्ति साधणं शक्य होईल.
सत्संगातून याबद्दल नेमकं मार्गदर्शन मिळालं तरी प्रत्यक्ष कृति.. आचरण साधकानंच करायला पाहिजे. याची सुरवात शम म्हणजे अंतरिंद्रियांवर संयम साधण्यानं होते.. मन बुद्धि चित्त अहंकार यांच्यावरचं नियंत्रण हाच शम.. शमो नाम अंतरिंद्रियनिग्रहः। अंतरिंद्रियं नाम मनः। तस्य निग्रहः श्रवणमनननिदिध्यासनव्यतिरिक्तविषयेभ्यः निवृत्तिः। (आत्मानात्मविवेक)
सदैव वासनात्यागः शमः। (अपरोक्षानुभूति) किंवा एकवृत्यैव मनसः स्वलक्ष्ये नियतस्थितिः शमः।(सर्ववेदान्तसिद्धान्तसारसंग्रह) मनात उठणार्या सर्व वासनांचा त्याग करणं. त्यांच्याबद्दल उपेक्षाभाव वा औदासीन्य असणं. त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारे मनात आलेल्या विचाराला पुढे न रेटणं याला शम म्हणतात..
असा शम ज्याला साधला तो शान्त! मनाचा लगाम खेचून घेतला की बहिरिंद्रियांवरही संयम साधतो.. त्यांचा निग्रह होतो. त्यातूनच पुढे विषयांपासून परावृत्तता जमून तितिक्षा म्हणजे सहनं सर्वदुःखानामप्रतीकारपूर्वकम् चिंताविलापरहितं
या आचार्यकृत व्याख्येप्रमाणे दुःख आतपर्यंत पोहोचू न देणं हे घडू शकतं.. श्रीनागदेवाचार्यवाक्येषु भक्तिः सा श्रद्धा(अपरोक्षानुभूति), श्रद्धा नाम गुरु सिद्धांतवाक्येषु अतीव विश्वासः(आत्मानात्मविवेक) गुरु सिद्धांत वाक्येषु बुद्धिर्या निश्चयात्मिका सत्यमित्येव सा श्रद्धा।(सर्ववेदान्तसिद्धान्तसारसंग्रह)..
अशी जी वर्णिली गेलेली श्रद्धा आहे तीच मुक्तिसिद्धिकारक आहे असं आचार्यांचं सांगणं आहे! ही श्रद्धाच चित्तात समाधान निर्माण करू शकते.. समं नाम ब्रह्म निर्दोषं हि समं ब्रह्म। (भ.गीता..) तस्य आधानं समाधानम् ... चित्तात परब्रह्माची स्थापना.. म्हणजे चित्तैकाग्र्यं तु सल्लक्ष्ये समाधानम् ! त्या एकाच गोष्टीवर चित्त एकाग्र होणं!
शान्त्यादिः परिचीयताम् असं म्हणताना आचार्यांना हे सर्व अभिप्रेत आहे.. हे जमलं की एकेक पायरी वर चढत शेवटच्या पायरीवर म्हणजे परब्रह्मावस्थेत सुस्थिर राहणं जमेल!
✒ श्रीपादजी केळकर कल्याण