संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
आजची लोकोक्ती - कष्टः खलु पराश्रयः।
शिरसा धार्यमाणोऽपि सोमः सौम्येन शम्भुना।
तथापि कृशतां धत्ते कष्टः खलु पराश्रयः॥
अर्थ :- अहो, साक्षात शंभू महादेवांनी चंद्राला अगदी सौम्यतापूर्वक डोक्यावर धारण (संभाळ) करूनही, तो (चंद्र, अधूनमधून का होईना) कृश होतोच, रोडावतोच, हे अगदी खरं आहे की दुसऱ्याच्या आधारावर (आश्रयाने) जगणे कठीणच असते.
हाच श्लोक छत्रपती संभाजीराजांनी रचलेला विविध विषयांवरील संस्कृत श्लोकांचा संकलनग्रंथ असलेल्या 'बुधभूषण' या ग्रंथातील चंद्राशी निगडीत अन्योक्तींच्या संकलनातही आढळतो. कष्टः खलु पराश्रयः। परक्याच्या अश्रयाला रहाणे खरोखरच कष्टप्रद व अपमानास्पद असते. मनुष्याने स्वभिमानाने रहायला हवे. जिथे आपल्याला अपमानास्पद वाटत असेल, जिथे आपल्या अस्तित्वाला किंमत नसेल तिथे रहाण्यात अर्थच काय.
इंग्रजी भाषेत एक उक्ती आहे, 'Dependence is indeed painful.' जी कष्टः खलु पराश्रयः। ह्या लोकोक्तीशी साधर्म्य दाखवते. धृतराष्ट्राच्या आश्रयाला असल्याने महाभारतातल्या वस्त्रहरणप्रसंगी भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्यांसारख्या वीरवरांनादेखील त्यांच्या मनाविरुद्ध चाललेला दुर्योधनादिकांचा अत्याचार निमूटपणे पहावा लागला तो त्यांच्या गौरवासाठी खरोखरच कष्टप्रद व अपमानास्पदच होता.
भगवद्गीतेतही श्रीकृष्ण अर्जूनाला कर्तव्य सांगताना म्हणतात, संभवितस्य चाकीर्तिः मरणादतिरिच्यते। संभावित मानुष्यासाठी अपमान, कमीपणा मरणाहून अधिक दुःखदायक असतो. कष्टः खलु पराश्रयः। हाच आशय असणारे काही संस्कृत श्लोक शोध घेताना माझ्या वाचनात आले ते ही आपण पाहूया,
विना कार्येण ये मूढा गच्छन्ति परमन्दिरम्।
अवश्यं लघुतां यान्ति कृष्णपक्षे यथा शशी॥
जी मूर्ख माणसे काहीही काम नसताना दुसऱ्याच्या घरी जातात, त्यांना कृष्णपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे कलेकलेने कमी होत जातो, क्षय पावतो त्याप्रमाणे कमीपणा जे मूर्ख लोक काही काम नसताना दुसऱ्याच्या घरी जातात, त्यांना कृष्णपक्षातील चंद्र ज्याप्रमाणे क्षय पावतो त्याप्रमाणे अवश्य कमीपणा येतो.
साधारणतः अकराव्या शतकाच्या आसपास चिंतामणीभट्टाने 'शुकसप्तति' नावाच्या एक कथाग्रंथ रचला. या ग्रथांत प्रभावतीनामक एका व्यापाऱ्याच्या पत्नीला तो व्यापारासाठी परदेशी गेला असताना त्यांनी पाळलरल्या पोपटाने सांगितलेल्या सत्तर कथा आहेत. म्हणूनच ग्रंथ 'शुकसप्तति' म्हणून प्रसिद्ध आहे. वरील श्लोकाच्या अर्थाचा एक श्लोक 'शुकसप्तति'च्या एका कथेमध्ये समाविष्ट आहे. तो असा,
उडुगणपरिवारो नायकोऽप्यौषधीनाम्
अमृतमयशरीरः कान्तियुक्तोऽपि चन्द्रः ।
भवति विकलमूर्तिर्मण्डलं प्राप्य भानोः
परसदननिविष्टः को न धत्ते लघुत्वम् ॥ ६३.२, शुकसप्तति
अमृतमय किरणांनी सुशोभित असणाऱ्या नक्षत्रतारकांचा राजा म्हणविला जाणाऱ्या तसेच ज्याला औषधींचा नायक म्हटले जाते असा चंद्रही दिवसा जेव्हा सूर्य आकाशात असताना दिसतो तेव्हा तो तेजहीन भासतो. हे खरेच आहे की दुसऱ्याच्या घरी आश्रय घेतल्याने कोणाला बरे कमीपणा येत नाही?
कोणत्याही मनुष्याचे काय काय केल्याने नुकसान होते? त्याला कशाकशामुळे कमीपणा येतो? हे विशद करून सांगणारा हा श्लोक तर अधिक स्पष्ट बोलणारा आहे,
कष्टं खलु मूर्खत्वं कष्टं खलु यौवनेषु दारिद्य्रम्।
कष्टादपि कष्टतरं परगृहवासः परान्नं च॥
खरोखरच मूर्खपणा म्हणजेच अडाणीपणा हा माणसाला कमीपणा आणतो त्यामुळे व्यवहारकुशलता नसल्याने त्याचे नुकसान होते. ऐन तारुण्यात निर्धनता मनुष्याला कमजोर बनवते कमीपणा आणते. तारुण्यसुखांपासून पैसा नसल्याने मनुष्य वंचीत राहातो आणि कष्टप्रद जीवन वाट्यास येते असंही इथे सुभाषितकार कवी सांगत आहे परंतु या दोन्हींपेक्षाही अधिक कषटपूर्ण अधिक कमी पणा देणारे काही असेल तर ते म्हणजे परावलंबित्व, परक्याच्या आश्रयाला राहाणे हेच खरोखर अतिकष्टदायक होय.
इथे ही लोकोक्ती वाचताना मला प्रकर्षाने आठवतात ती संगीत रणदुंदुभी नाटकातील मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी गायलेली दोन पदे जी आपण दीनानाथांच्या समकालीन नसल्याने आशा भोसले, पं अभिषेकी रामदास कामत यांच्या आवाजात आजवर ऐकतो आहोत. त्यापैकी पहिले म्हणजे,
परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला।
सजिवपणी घडती सारे मरणभोग त्याला ॥
पराश्रय परावलंबित्व परवशता दुर्दैवाने ज्याला लाभते त्याला जिवंतपणीच मेल्याहून मेल्यासारखे अपमानास्पद जीवन जगावे लागते. आणि दुसरे पद असे,
दिव्य स्वातंत्र्य रवि आत्मतेजोबले
प्रगटता अवनितलि कोण त्या लोपवी ॥
स्वयंपूर्ण असा स्वातंत्र्यसूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याला थोपविणे, विझवणे कोणाला शक्य होणार आहे? स्वपराक्रमाने जगणे आत्मस्नमान वाढविणारे असते तर परावलंबित्व लज्जास्पदच होय. दुसऱ्याच्या आश्रयाने रहाणे कमीपणाचेच. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिऊच नये. कष्टः खलु पराश्रयः।
लेखक :- अभिजीत काळे सर
🌹