मार्गशीर्ष महिमा विधी व अनुष्ठान
महानुभाव पंथिय ज्ञान सरिता
सर्व अच्युतगोत्रीय परिवारास पवित्र अशा मार्गशीर्ष मास निमित्त हार्दिक शुभेच्छा... हा मास आपल्या सर्वांना भक्तिमार्ग संपन्न व विशेष फलदाई जावो, ज्ञान साधना, भक्ती साधना, नाम साधना जास्तीत जास्त घडो अशी श्रीदत्तात्रेय प्रभूंचे चरणी प्रार्थना आहे...
मासांना मार्गशीर्षोSहम्' ... या श्लोकाद्वारे गीतेतुन मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. याबाबत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात... सर्व महिनेत मार्गशीर्ष महिना उत्तम आहे व तो मी आहे. म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागेपुढे मृगशीर्ष नक्षत्र असते. म्हणून या पवित्र मार्गशीर्ष महिनेत कर्मरहाटीतील देवता साधक विविध व्रतवैकल्य, उपासतापास करून देवतेची साधना करतात.
तर दैवरहाटीतील आपले महानुभाव साधक या महिनेत जास्तीत जास्त विधी अनुष्ठान म्हणजे, सुत्रपाठ, लीळाचरित्र, श्रीमदभगवद्गीता पठण नामस्मरण चिंतन, कीर्तन प्रवचन तसेच श्रीपंचावतार उपहार तसेच साधुसंतांचे ठिकाणी अन्नदान, वस्त्रदान भजन, पूजनादी अवसर केले जातात.
या महिनेत त्याचा विशेष लाभ साधकाला होतो.ईश्वर साधना करणेसाठी मार्गशीर्ष मास हा उत्तम महिना आहे कारण या महिन्यातच मार्गाशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी श्री कृष्ण भगवंत निरोपीत श्रीगीता निरोपण दिवस आहे तर दुसर म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला पहाटे चार वाजता परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार ही याचं महिन्यात झाला आहे.
मागशीर्ष महिनेतील या पवित्र काळात श्रीमद्भगवद्गीता, सुत्रपाठ, पठण नामस्मरण चिंतन करताना जीवाला एक प्रकारची नवसंजीवनी प्राप्त होते. त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असतांना आपले मन स्वच्छ ठेवावे. देवाचे नाम घेतांना फक्त नामाचाच विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा.
कारण ह्या महिन्याचे पूजा पाठ मनुष्याला सुख शांती समाधान देवून मनातील दृष्ट प्रवृत्ती, वाईट वासना घालविते. तीच शक्ति मनुष्याला जगण्याचे धैर्य व बळ देते व मनुष्य अधिकाधिक धर्मदृढ होते. कारण ह्या महिन्याची वैशिष्ठ्येच तशी आहेत. ह्या माहिन्यात ईश्वर साधकाने यथोचित आचार विचाराचे पालन करत मन स्वच्छ ठेवले व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे.म्हणून हा मार्गशीर्ष महिना सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे.
मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन ते नितळ स्वच्छ झाल्यामुळे देवाला अर्पण करणे म्हणजे मार्गशीर्ष.अशी कर्मराहाटीत धारणा आहे.या उत्तम व पवित्र मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्तात्रेय प्रभूंचा अवतार झालेमुळे श्री दत्तात्रेय बाळक्रिडा या ग्रंथाचे पठन केले जाते.
म्हणून साधकाने आपल्या वेळेनुसार एक किंवा दोन अध्यायचं पठण करावे. तसेच श्री दत्तात्रेय प्रभूंच्या नामाच्या अकरा किंवा एकवीस गाठी नामस्मरण एकाग्रचित्ताने करावे. तसेच नित्यादींनी पाचव्या नामाचे निरंतर नामस्मरण करावे. सेवा करायची झालेस... श्रीदत्तप्रभूंच्या विशेषाची सेवाही एक किंवा अर्धातास आपण एकाग्र चित्ताने करावी. सोबत दुसऱ्या नामाचे शांतचित्ताने उच्चारण करावे.