महाभारतातील कूट श्लोक
केशवं पतितं दृष्ट्वा पांडवा: हर्षनिर्भरा:।
रुरुदु: कौरवा: सर्वे हा केशव केशव॥
अर्थ :- श्रीकृष्ण भगवंतालाला युध्दात पडलेले पाहून पांडवांना आनंद झाला व सर्व कौरव रडू लागले- अरेरे श्रीकृष्ण, कृष्णा। श्रीकॄष्ण पडले, मरण पावले. हा या श्लोकाचा सामान्य शब्दशः अर्थ
व्यासांनी महाभारत या ग्रंथाची रचना करण्याचे ठरविले. परंतु त्यांना हा ग्रंथ लिहिण्या साठी बुध्दिमान लिहिणारा मिळेना. शेवटी गणपती हा ग्रंथ लिहिण्यास तयार झाले. व्यास महाभारत सांगत होते व गणपती लिहून घेत होते. परंतु, गणपती ची अट अशी होती कि, मी ग्रंथ लिहिन परंतु तुम्ही सतत सांगत राहायचे. मधे अजिबात थांबायचे नाही. जर तुम्ही थांबलात तर मी पुढे लिहिणार नाही. व्यासांनी गणपती ची ही अट मान्य केली.
व्यासांनी विचार केला, आपण सतत सांगत राहिलो तर आपण जेवण, विश्रांती व इतर दैनिक कामे कशी करायचे? व्यास बुध्दिमान होते. विचार करुन व्यासांनी गणपती ला सांगीतले, माझी ही एक अट आहे- मी सांगीतलेल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ स्वत: च समजून घ्यायचा, त्याचे चिंतन करायचे व अर्थ समजल्यावर च पुढे लिहायचे।
गणपतीने व्यासांचे म्हणणे मान्य केले. महाभारत लिहितांना आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून व्यासांनी मुद्दाम असे काही श्लोक लिहिले कि, त्याचा विचार करताना गणपतीला ही त्यांचा अर्थ समजे ना, गणपती विचार करायचे हा श्लोक असा कसा? याचा काय अर्थ असेल?
गणपती खूप वेळ विचार करायचे, गणपतीची ही बुध्दी चालत नव्हती. तेवढ्या वेळेत व्यास विश्रांती घेत व आपली दैनिक कामे करीत असत. ज्या श्लोकांचे दोन अर्थ आहेत अशा व्यासांनी महाभरतात लिहिलेल्या या श्लोकांना
"कूट श्लोक" असे नाव आहे।
त्यातील च हा एक श्लोक:-
"केशवं पतितं दृष्ट्वा पांडवा: हर्षनिर्भरा:।
रुरुदु: कौरवा: सर्वे हा केशव केशव ॥
या श्लोकाचे २ अर्थ आहेत।
(१) केशव म्हणजे श्रीकृष्ण, श्री कृष्णाला युध्दात पडलेले पाहून पांडवांना आनंद झाला व सर्व कौरव रडू लागले- अरेरे श्री कृष्ण, कृष्णा श्रीकृष्ण पडले, मरण पावले.
श्लोकाचा दुसरा अर्थ-(२)
संस्कृत भाषेत क म्हणजे पाणी, एका नदीच्या (तळ्याच्या) काठावर एका झाडावर कावळे बसले आहेत।
कौरव शब्दाचा एक अर्थ कावळा।
पांडव या शब्दाचा एक अर्थ बगळा।
एक प्रेत (शव) पाण्यात पडलेले पाहून झाडावरच्या कावळ्यांना वाईट वाटले, कारण कावळ्यांना पाण्यातील प्रेताचे मांस खाता येत नाही. खोल पाण्यात कावळ्यांना जाता येत नाही. पाण्यात पडलेल्या प्रेताचे मांस खाता येणार नाही, त्यामुळे कावळे रडू लागले. अरेरे प्रेत पाण्यात पडले!
(के शव- पाण्यात प्रेत) परंतु, त्याच पाण्यात जे बगळे होते, (बगळ्यांना पाण्यात जाता येते) त्यांना मात्र आनंद झाला कि, पाण्यातील प्रेताचे मांस आपल्याला खायला मिळेल।
(१)-संस्कृत भाषेत एकाच श्लोकाचे दोन अर्थ असणारे आणखी एक उदाहरण-
"गोमांसं भक्षयेन्नित्यं पिबेदमरवारुणीम्।
कुलिनं तमहं मन्ये इतरे कुलघातका:॥४७॥
हठयोग प्रदीपिका॥
या श्लोकाचा एक अर्थ रोज गाईचे मांस खावे व (अमरवारुणी-दारु) मद्य प्राशन करावे। जो असे करतो त्यालाच मी कुलवान समजतो। इतर कुलघातक आहेत. या श्लोकाचा दुसरा अर्थ-
"गो शब्देनोदिता जिव्हा, तत्प्रवेशो हि तालुनि।
गोमांसभक्षणं तत्तु महापातकनाशनम् ॥४८॥
गो म्हणजे जीभ, ती टाळूला लावणे हेच गोमांस भक्षण। या श्लोकात योग शास्रातील "खेचरी मुद्रा"
हीचे वर्णन आहे. विसोबा खेचर यांनी ही मुद्रा साध्य केली होती. त्यामुळे त्यांचे नाव विसोबा खेचर पडले।
"जिव्हाप्रवेशसंभूत वन्हिनोत्पादित: खलु ।
चंद्रात्स्रवति य: सार: स स्यादमरवारुणी ॥४९॥"
या मुद्रेत चंद्रकुंडातून जे अमृत स्रवते तिला च अमरवारुणी (अमृताचा स्राव) असे म्हणतात।
(२)-एकनाथी भागवतात वेद किती गहन आहेत याचे वर्णन केले आहे।
"शब्दब्रम्ह सुदुर्बोधं प्राणेंद्रियमनोमयं।
अनंतपारं गभीरं दुर्विगाह्यं समुद्रवत्॥(२१-३६)"
वेदांचा अर्थ समुद्रा सारखा खोल अत्यंत गूढ आहे।
"वेदा: ब्रम्हात्मविषयास्रिकांडविषया इमे।
परोक्षवादा: ऋषया:, परोक्षं च मम प्रियं॥ २१-३५॥
वेदांचे ३ कांड (कर्म, ज्ञान, उपासना) असून त्यात ब्रम्ह आत्मा यांचे (निरुपण) वर्णन आहे. परंतु वेदांचा गूढ अर्थ योग्य व्यक्तीलाच योग्य वेळी कळावा म्हणून ऋषींनी परोक्षवादाने वर्णन केले आहे. परोक्षवाद म्हणजे एकाच श्लोकाचे दोन अर्थ, वाचतांना अर्थ वाटतो, वेगळा व प्रत्यक्ष खरा अर्थ असतो दुसराच।
डॉ. गोरखनाथ देवरे नांदगाव