संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
दानं भोगो नाशस्तिस्रो, गतयो भवन्ति वित्तस्य।
यो न ददाति, न भुङ्क्ते, तस्य तृतीया गतिर्भवति ॥७६॥ [भर्तृहरि नीतिशतक]
वामन पंडित मराठी श्लोकानुवाद
द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश ।
कि दान भोग अथवा तिसरा विनाश ॥
जो येथ दान आणि भोग करी न देही ।
त्याच्या धनासी मग केवळ नाश पाही ॥७६॥
- दान देणे, उपभोग घेणे, किंवा नष्ट होणे या संपत्तीच्या ३ गति आहेत जो देत नाही, किंवा भोगत नाही, त्याच्या धनाची तिसरी गति (नाशच) होणार ॥
आपले धन हे न्याय्य मार्गाने मिळविलेले असले पाहिजे. जर अन्यायाने धन प्राप्त केले तर त्या धनाचा ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाश होतो.
चत्वारो धनदायादा धर्माग्निर्नृपतस्करा:।
ज्येष्ठस्य त्ववमानेन कुप्यंति सोदरास्रय: ।।
धर्म, अग्नि, राजा, चोर हे ४ भाऊ आपल्या धनाचे रक्षक किंवा भक्षक आहेत। वडिल भाऊ धर्म। वडिल भावाचा म्हणजे धर्माचा सन्मान ठेवल्यास, धर्म मार्गाने न्याय्य मार्गाने धन मिळविल्यास हे ४ ही आपल्या धनाचे रक्षण करतात। व धर्माचा अवमान केल्यास, अयोग्य मार्गाने धन मिळविल्यास हे ४ही आपल्या धनाचे भक्षण करतात।
हे ४ जण भाऊ असून जर आपण वडील भावाचा म्हणजे धर्माचा अवमान केला तर हे ४ ही आपल्या धनाचा नाश करतात, व वडील भावाचा मान ठेवला, धर्मा प्रमाणे आचरण केले तर हे ४ ही आपल्या धनाचे रक्षण करतात। अधर्माने धन मिळविल्यास अग्नि त्याला जाळून टकतो, राजा हरण करतो, त्याचे धन कोर्ट कचेरी च्या कामात वाया जाते।
आजाराच्या उपचारात खर्च होतो। व उरलेले धन चोर चोरून नेतात। या साठीच तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,
"जोडोनिया धन ऊत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी।" “प्राचीन ऋषि-मुनि ईश्वराची प्रार्थना करतात व उपदेश करतात,
” ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विध्दनम्।।
या जगात जे काही स्थावर जंगम आहे ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे. त्याग भावनेने, आसक्ती रहित वृत्तीने या जगातील वस्तूंचा, धनाचा, ऐश्वर्याचा उपभोग घ्यावा. (मा गृध-आसक्त होऊ नये) (कस्य स्वित् – हे धन, ऐश्वर्य कोणाचे आहे? अर्थात् कोणाचेच नाही.)
धनाच्या ३ गती आहेत.
(१) दानं- आपल्या संपत्ती चा १० वा भाग (१०%) दान धर्म, धार्मिक कार्यासाठी उपयोग करावा.
(२)-भोग-उरलेल्या धनाचा आपल्या प्रापंचीक कामा साठी उपयोग करावा.
(३)- ज्याच्याकडे पुष्कळशी, विपुल संपत्ती असून सुध्दा जो त्या संपत्तीचा केवळ कंजूषपणामुळे किंवा लोभी वृत्तीमुळे दान घर्म ही करीत नाही व स्वतः ही त्या संपत्ती चा उपभोग घेत नाही त्याच्या धनाचा नाश होतो.
पिपीलिकार्जितम् धान्यं मक्षिकासंचितं मधू।
लुब्धेन संचितं द्रव्यं, समूलं हि नश्यति॥- दान, उपभोग व विनाश या तिन प्रकारानेच धनाची विल्हेवाट लागते। जो दान ही करत नाही, स्वत: उपभोग ही घेत नाही, त्याच्या धनाचा नाश होतो। जसा मुंग्यांनी साठवलेल्या धान्याचा आणि मधमाशांच्या मधाचा होतो.
ना तरी निदैवाच्या परिवरी।
लोह्या रुतलिया आहाती सहस्रवरी ।
परि तेथ बैसोनी उपवासु करी। का दरिद्री जिये॥ ज्ञानेश्वरी-९-५९॥
दुर्दैवी, कंजूष मनुष्याच्या घरी हजारो मोहरांनी भरलेल्या कढया पुरलेल्या असून ही तो तेथे बसून उपवास करुन व दरिद्री अवस्था भोगून जीवित कंठितो.
डॉ. गोरखनाथ देवरे नांदगाव