बालकांसाठी श्रीचक्रधरप्रभुंची लीळा - आणि वाघोबा धूम पळाले

बालकांसाठी श्रीचक्रधरप्रभुंची लीळा - आणि वाघोबा धूम पळाले

बालकांसाठी श्रीचक्रधरप्रभुंची लीळा आणि वाघोबा धूम पळाले 

आपला महाराष्ट्र व जवळचा मध्यप्रदेश  यांच्या सीमेवर सुकळी नावाचे गाव आहे. भंडारा जिल्ह्याच्या सरहद्दीवरचा भाग डोंगराळ आहे. सर्व भागात जंगल पसरलेले आहे. आदिवासी माणसं लहान-लहान झोपड्या करून राहत असतात. त्यावेळी तर या भागात खूपच दाट जंगल होते. खळखळ वाहणारे नाले, उंच उंच वाढलेली झाडे, त्यावर किलबिल करीत असलेले पक्षी, दाट झुडपात-वेलीत लपून बसलेली श्वापदे यांनी परिसर भरलेला होता. या दाट जंगलातून वाट काढत श्री चक्रधरस्वामी एकदा सुकळी या गावी आले. गावाजवळ भीमेश्वर नावाचे एक सुंदर मंदिर होते.

आसपासच्या लोकांना हे मंदिर मोठा आधार वाटायचे. वाराणसीच्या यात्रेला जाणारा रस्ता या मंदिराजवळून जात होता. यात्रेकरू येत. या मंदिरात मुक्कामाला राहत व विश्रांती घेऊन पुढे जात. हे मंदिर दगडात बांधलेले होते. बाजूला मोकळे पटांगण, चारही बाजूंनी आवाराची उंच भिंत व तिला लागून यात्रेकरूंना उतरण्यासाठी केलेल्या खोल्या, असे त्या मंदिराचे स्वरूप होते. 

सर्व लोकांना त्या शांत परिसरात जाऊन राहावेसे वाटत असे, लोकांची तेथे खूप गर्दी असायची, परंतु आता ते मंदिर ओस पडण्याची पाळी आली होती. कारण एक भला मोठा वाघ त्या मंदिरात येऊ लागला होता. रात्रीला तो वाघ मंदिरात येऊन बसत असे. त्याच्या डरकाळ्यांनी सगळे जंगल दणाणून जात असे. त्याच्या भीतीने लोक मंदिराकडे जाण्याला घाबरू  लागले. 

ज्यांना पूजाअर्चा करावयाची असेल ते जमावाने जात. नगारे, ढोल, तुतारी यासारखी मोठमोठी वाद्ये वाजवीत. झांजांचा आवाज करीत. घंटानाद करीत त्या आवाजाने वाघ मंदिराच्या बाहेर येत असे. मग लोक हिंमत करून मंदिरात जात. सर्व गावाला त्या वाघाची खूप भीती वाटत होती.

अशा वेळी श्री चक्रधरस्वामी त्या गावात आले. त्यांची एक पद्धत होती. ते कोणाच्या घरी राहत नसत. जवळ कोणतेही सामान नसायचे. ते संन्यस्तवृत्तीने राहत. कमरेला फक्त एक वस्त्र. या अवस्थेत ते सुकळी या गावी आले व मुक्कामासाठी मंदिराकडे जाऊ लागले. लोकांनी त्यांना अडविले. 

मंदिरात वाघ येत असतो. 'तो तुम्हाला उपद्रव करील, उगीच जीव धोक्यात घालू नका,' असे लोकांनी सांगितले, परंतु स्वामींनी त्यांचे काही ऐकले नाही. ते मंदिराच्या दिशेने चालू लागले. सकाळ झाली. लोक उठले. पूजा करण्यासाठी मंदिराकडे जाऊ लागले. त्यांना वाटले की, रात्री वाघाने स्वामींना खाल्ले असेल. ते आपल्याला पाहायला मिळेल. 

मंदिराजवळ येताच त्यांनी मोठमोठ्याने वाद्ये वाजविण्यास सुरुवात केली. खूप आवाज केला; पण आज बाघ काही बाहेर आला नाही. लोकांना आश्चर्य वाटले. हिंमत करून ते मंदिरात गेले. पाहतात तो काय? मंदिराच्या चौकात श्री चक्रधरस्वामी शांतपणे डोळे मिटून सकाळच्या प्रसन्न वेळी मांडी घालून बसलेले होते. भीतीचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. लोक त्यांच्याजवळ आले.

वाघाबद्दल स्वामींकडे चौकशी केली. स्वामींनी सांगितले, रात्रीच्या वेळी वाघ आला. माझ्याकडे पाहून त्याने डरकाळी मारली; पण मी घाबरलो नाही. मी त्याच्यापेक्षाही प्रचंड आवाज केला. सिंहासारखा माझा आवाज ऐकून वाघ आवाराच्या भिंतीवरून उडी मारून पळाला. “आता तो वाघ पुन्हा येथे येणार नाही. जा! घाबरू नका. दररोज मंदिरात येत जा.” स्वामींचे धीराचे बोलणे ऐकून लोकांना दिलासा मिळाला. त्यांनी स्वामींचा जयजयकार केला. त्या वेळेपासून ते मंदिर व गाव वाघाच्या भीतीपासून मुक्त झाले.

लोकांनी स्वामींना गावात नेले; पण स्वामींनी मात्र कोणताच सन्मान घेतला नाही. गावात हाताच्या ओंजळीत भिक्षा मागितली. नदीकाठी जाऊन एका खडकावर बसून भोजन सुरू केले. त्यावेळी गावातला एक व्यापारी आपल्या मुलाला घेऊन तेथे आला. त्याच्या मुलाला पिशाच बाधा झाली होती. तो सैरावैरा पळत होता, म्हणून साखळीने त्याला जखडून ठेवले होते.

स्वामींनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले. आपल्या कृपादृष्टीने त्याची पिशाचबाधा दूर केली. त्याच्या साखळ्या सोडण्यास सांगितले. मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरविला व आपल्या सोबत भोजनास बसविले. आपला प्रसाद दिला. त्या वेळेपासून त्या मुलाची भूतबाधा राहिली नाही. या दोन्ही ठिकाणी 'डाकराम सुकळी' या गावी स्वामींचे मंदिर आहे.

असे होते श्री भगवान श्री चक्रधरस्वामी, दुःखितांचे दुःख हलके करणारे व सामान्यांचे भीतीपासून रक्षण करणारे. स्वामींनी आपल्या महाराष्ट्रातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला, लोकांची दुःखे जाणून घेतली, समतेचा उपदेश केला, लोकांना अहिंसा शिकविली.

तात्पर्य, निर्भय बना, दुसऱ्याचे दुःख जाणून  घ्या..

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post