24-11-2021
दुष्कर्माचा फेरा ! एक सत्यकथा
मित्रांनो !! आपण जन्मभर जे काही कर्म करतो त्या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतात सत्कर्म केले असतील तर सुख मिळते दुष्कर्म केले असतील तर दुःख मिळते आणि खूपच अनाचार केला असेल लोकांची मनं दुखावली असतील तर मरण नाही खूप हलाखीचे मिळते, इतरांचा घेतलेला तळतळात त्यामुळे भयंकर मरण येते असे प्रत्यक्ष कितीतरी घटना पाहण्यात येतात त्यापैकीच ही एक घटना दीपक धारगळकर यांनी लिहिलेली आहे ती पुढे देत आहोत :-
कर्म करावे चांगले । तैचि होतसे जीवनाचे भले ।।१।।
दुष्कर्माचा भोग न चुके । भोगवितसे जीतुचि नर्क ।।२।।
इदी अमीनच्या डॉक्टरला आलेला अनुभव ! त्यांच्या शब्दात.....
६०,००० पेक्षा अधिक, मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांना, सोबत काही पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना, इदी अमिनने, युगांडातून ९० दिवसांच्या आत देश सोडण्याचे फर्मान १९७२ साली काढले होते. त्यात एक चौदा वर्षांची मुलगी पण होती. पुढे २००३ साली, ही मुलगी डॉक्टर होऊन MD झाली आणि सौदी अरेबियात एका इस्पितळात काम करत असताना, एका गंभीर रूग्ण दाखल झाला. त्याला रूग्ण सेवा देणे आवश्यक होते आणि त्याचे नाव होते इदी अमीन !
वाचा त्या अनुभवाचा वृत्तान्त.....
त्या रात्री अडीज वाजता आलेल्या फोन नी ह्या प्रकरणाची सुरवात झाली. Hermodialysis ची मी तज्ञ डॉक्टर असल्याकारणनें, त्या रात्री इस्पितळाच्या समन्वयकाने जेव्हा मला थिजलेल्या आवाजात सांगितले की, आम्ही तुला गाडी पाठवत आहोत ! लगेच निघून ये, एका VIP रूग्णला तातडीचे डायलिसिस करणे अत्यावश्यक आहे, तेव्हां सर्वप्रथम मी स्वतःला सावरले.
इस्पितळाततून गाडी घेऊन येणाऱ्या शोफरची वाट बघू लागले. मी तिथे म्हणजे जेदाहला, 'किंग फैसल स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर' ला एक वर्षाच्या करारावर नुकतेच रुजू झाले होते. महिलांना घराबाहेर पडताना "अबाया" नावाचे संपूर्ण शरीर झाकणारे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे त्यावेळी तिथे अनिवार्य असे.
मी माझ्या विभागात पोहोचले. सर्व प्रथम, शिरस्त्याप्रमाणे, डायलिसिसचे मशीन सज्ज केले, इतर उपकरणे तयार ठेवली आणि ER ( Emergency Unit ) विभागाला फोन करून , पेशंटचा गत तपशील घेण्यास सुरवात केली. समोरचा डॉक्टर अतिशय घाबरलेला वाटत होता आणि माहिती देताना खुपदा मोठ्या आवाजात ओरडत सुद्धा होता. " पेशंट डायलिसिस युनिटच्य मार्गावर असून, त्वरीत त्याला डायलिसिसची गरज आहे. कमीतकमी चार लिटर द्रव, शरीरातून बाहेर काढणे आवश्यक आहे . पेशंट आहे इदी अमीन दादा !" क्षणात मनात विचार आला अरे देवा, वेळी अवेळी, लहानपणी स्वप्नात येणारा हा आग्यावेताळ नसू दे ! तो नक्कीच नसावा... अचानक एका भलाकाय पेशंटला स्ट्रेचेरवर घेऊन डॉक्टर आणि वॉर्डबॉय गडबडीत प्रवेश करीत होते. त्याचे लांब पाय स्ट्रेचेर बाहेर लोंबकळत होते. नाकावर ऑक्सीजन मास्क, आणि तोंडाला जोडलेली नळी, जी स्त्रेचेर खाली असलेल्या ऑक्सीजन सिलेंडरला जोडलेली होती....
हा तो क्रूरकर्मा होता, ज्यांनी ६०,००० हून अधिक आशियाई वंशाच्या युगांडाच्या नागरिकांना देशोधडीला लावले होते. कारण काय तर तुम्ही लोक युगांडाचा सारा पैसा फस्त करीत आहात. त्यावेळेच्या वस्तुस्थिती अशी होती की, युगांडतील ९०% व्यवसाय धंदे आशियाई वंशाच्या नागरिकांचा ताब्यात होते आणि हीच मंडळी सरकारला ९० टक्के कर रूपी महसूल मिळवून देत होती. भारतीय उपखंडातील विविध जाती जमातीच्या लोकांनी आणि त्यांच्या वंश कुळानी, आपल्या मेहनतीच्या बळावर आणि उधमशील व्यवहाराने तिथे बरकत आणली होती. आमच्या पूर्वजांनी युगांडा ला आपली कर्मभूमी मानली होती आणि आम्हाला युगांडा आमचे वतन वाटत होते !
युगांडा त्या वेळी खरोखरच जणू जमिनीवरचा स्वर्ग होता ! युगांडा विषुववृत्ता जवळ असल्याने, वर्षभर तिथे आल्हादायक वातावरण असते. हिरवीगार वसुंधरा, दुधडी वाहणाऱ्या नद्या, तलाव, विवीध प्राणी जाती, सुंदर पक्षी.. काय नव्हते तिथे ? एके काळी युगांडा जणू आफ्रिकेच्या शिरपेचातील जणू मोती !
'"नव्वद दिवसांच्या आत, हा देश सोडा अथवा भयंकर परिणामाना सिद्ध रहा" असे खुले आव्हान त्यांनी रेडिओ आणि टेलिव्हिजन वरून दिले होते.
मी त्या वेळीं चौदा वर्षांची होती. माझ्या आई बाबांनी ठरवले, आता खूप झाले, हा देश आपल्या साठी आता असुरक्षित झाला आहे. आमचे जीवनच धोक्यात आले होते. त्यात माझ्या बाबांनी, इदी अमीनच्या सैन्यातील गणवेशधारी गुंडांना, विरोधकांवर अनेक अत्याचार करताना पहिले होते. ती पण भीती आमच्या मनात होती. ऑक्टोबर १९७२ पर्यंत माझे आई बाबा आणि आम्ही चार भावंडे इंग्लंडला पोहचलो होतो. माझा थोरला भाऊ, दोन वर्षांपूर्वीच इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेला होता. आम्ही सर्व मिळून पाच भावंडे होतो.
इंग्लंडमध्ये आम्हाला आश्रितांचा दर्जा मिळाला होता आणि एका दूरच्या जागी, आमची निवास व्यवस्था केली गेली होती. आजूबाजूच्या ब्रिटिश शेजाऱ्यांनी आम्हाला खूप चांगली वागणूक दिली. आमचे आनंदाने आणि आदरपूर्वक स्वागत केले गेले ! त्यांचे आदरतिथ्य पाहून, माझे बाबा पण खूप भारावून गेले होते.
माझ्या आई बाबांना सुरवातीला नवीन वातावरण आणि परिस्थिशी सामना करताना बराच त्रास झाला. नवीन भाषा, चालरीती, हवामान सारेच अगदी वेगळे होते. पण आम्हीं मुले तिथं लौकर रुळलो.
मुले पटकन नवीन गोष्टी आत्मसात करीत असतात. परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांना नैसर्गिक क्षमता असते. हळू हळू आमच्या मनातील गोंधळ दूर होऊ लागला, भय आणि चिंता कमी होत गेली आणि आम्ही नवीन वातावरणात स्थिरावलो....
पेशंट बरोबर आलेल्या डॉक्टरकडून माहिती आणि रिपोर्ट्स चाळत असताना, मी पेशंटला तपासू लागले. खरे सांगते, माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढत होती की, त्या वेळी ती शेजाऱ्याला स्पष्ट ऐकू आली असती. सोबतचा डॉक्टर, धीर सुटल्यागत, पेशंटला लवकरात लवकर डायलिसिस सुरू करण्याची विनंती करीत होता. मी आता पेशंटच्या अगदी जवळ होते. त्याची प्रकृति अगदी बिकट होती. महतप्रयासाने, त्याचा श्वाससोश्वास सुरू होता. त्याचे हृदयाचे स्पंदन खूप वेगात सुरू होते. ऑक्सीजनचा पुरवठा सुरू असताना देखील, शरीरात ऑक्सीजन अगदी अल्प प्रमाणात जात होते. अचानक स्ट्रेचरवरून त्याचा हाताचा वेतोळा माझा हात धरू पहात होता. तो थंडगार नागाचा स्पर्श जणू ! मी गर्भगळीत झाले. एका क्षणात बालपणीच्या भीतीदायक आठवणी जाग्या झाल्या. ती दुस्वप्ने, त्या चिंता, ते कष्टप्राय भोग, सारे घेर धरून नाचू लागले. मात्र माझे अंतर्मन दिलासा देत होते - " वासंती ! स्वतःला सांभाळ ! हा आता थकलेला जीव, तुझे काहीच वाकडे करू शकत नाही. उलट तुझ्याकडे मदतीची याचना करत आहे ! "
आपल्या क्षीण आणि कापऱ्या स्वरात, माझा हात घट्ट धरत तो मला म्हणाला-
"कृपया मला मदत करा ! मला बरे करा, मी खूप आजारी आहे..."
ER विभागाच्या डॉक्टरनी, त्याला सांगितले होते की, एकदा का त्याच्या शरीरातील अधिकचा द्रव बाहेर काढला, तर त्याला नक्की आराम पडेल.मला आता त्याच्या जवळ बघून, त्यांनी विचार केला होता की, ती हीच डॉक्टर आहे, जी मला अदभुत रीत्या बरे करणार आहे ! त्याच क्षणी, सारे बळ एकटवून, त्याच्या हातांवर, माझा दुसरा हात ठेवत , त्याला दिलासा देत, मी त्याला म्हणाले- "सर, काळजी करू नका ! तुम्ही बरे होण्यासाठी, आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ट्रीटमेंट देत आहोत, तुम्ही नक्की बरे व्हाल ! "
मी प्रथम त्याला मॉनिटर्स बरोबर जोडुन घतले. ट्रीटमेंट सुरू करण्या अगोदर, पेशंटला स्थिर असणे, हे फार महत्वाचे असते, म्हणून मी एका ICU Consultant ला पाचारण केले. माझ्या विभागात येण्यास त्याला काही मिनिटे लागली. तो कॅनडा निवासी होता. पेशंटला तपासल्यानंतर , माझ्या कडे वळून, तो म्हणाला- " मला वाटते, आपण पेशंटला ICU मध्ये ट्रान्स्फर करुया, तिथे तो स्थिर सावर झाल्यानंतर आपण डायलिसिस सुरू करू शकतो ! " त्याला खूप आनंद झाला की, मी त्याची योग्य वेळी मदत घेतली, कारण पेशंटची एकंदर स्थिती पाहता, माझ्या विभागात, त्याच्यावर उपचार सुरू करणे, धोकादायक होते, कारण इदी अमीन, त्या वेळेस, शारीरिक दृष्ट्या एकदम कमकुवत झाला होता आणि तिथे लगेच डायलिसिस सुरू केले असते तर काही ही घडू शकत होते...ICU Consultant ने ER विभागाच्या डॉक्टरना कळवले की, पेशंट ICU मध्ये जो पर्यन्त स्थिरावत नाही, डायलिसिस सुरू करता येणे अशक्य !
ICU मध्ये आम्ही त्याचा स्त्रेचर हलवला. ER विभागाचे डॉक्टर, आता निवांत दिसू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांची जवाबदारी आता संपली होती आणि आमची सुरू झाली होती...
आम्ही त्याचा स्ट्रेचर ICU च्या भल्या मोठ्या हॉल मध्ये हलवला. मी आणि तो आता एकटे त्या रूम मध्ये होतो. ICU चा स्टाफ, त्याचा ताबा घेण्यापूर्वीचे हे शेवटचे काही क्षण होते.त्याची नजर सारखी सारखी माझ्याकडे जीवनदान मागत होती ! कारण ER विभागात, त्याला सांगण्यात आले होते, आम्ही डायलिसिस केल्यानंतर, शरीरातील अधिकचा द्रव बाहेर काढल्या नंतर त्याला श्र्वास घेण्यास आराम पडणार होता.
आता, आम्ही त्याला कशा प्रकारे डायलिसिस ची ट्रीटमेंट देणार आहोत, अन्ननलिकेत नळ्या जोडून, त्याची श्वसन क्रिया कशी सुलभ करणार आहोत, मशिनला जोडल्या नंतर काय करणे अत्यावश्यक आहे, आणि कदचित स्थिर सावर होण्यास कोमा सदृश स्थितीत घेउन जाण्याची अपरिहर्यता, हे सगळे सांगणे माझ्या डुटीचा भाग तर होताच, पण आता माझ्याकडे ICU स्टाफ, रूम मध्ये येण्याआधी काही मिनिटांच्या अवघी होता. आम्ही दोघेच त्या रूम मध्ये होतो. पेशंट भितीनी अगोदरच थरथरत होता. मी माझा धीर एकटवला ! हीच ती संधी, मला नियतीने दिली होती, जिथे, मी थेट त्याचा बरोबर, समोरा समोर भिडणार होते...
मी थेट त्याच्या नजरेला नजर भिडवली ! त्याच्या घाबरलेल्या डोळ्यात पाहत, शांतपणे म्हणाली - "नीट बघ माझ्याकडे ! मी तूझ्या देशातील एक आशियाई नागरिक आहे, जिला तू खूप वर्षांपूर्वी देशोधडीला लावले होतेस ! आठवले? "
त्याचे डोळे लगेच विस्फारले गेले ! चेहेऱ्यावर भरभर विस्मृतीचे पटल बदलत होते! हळू हळू त्याच्या डोक्यात जुन्या घटनांच्या चित्रपट दिसू लागला होता! भय काय असते, हे त्याचे डोळे सांगत होते..
मी ते कधीच विसरू शकत नाही.
त्याची ती घाबरलेली आणि म्यान झालेली नजर, माझ्या नकळत जाऊन काळजात भिडली आणि खरे सांगते एका क्षणात माझ्या बालपणीच्या चिंता, भय, राग, अस्वस्थता.. सारे सारे विरून गेले आणि मी भानावर आले....
इथे एक असहाय, वृध्द, आजारी जीव स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोणापुढे हात पसरत होता ? ज्यांनी युगांडात कित्येक निष्पाप लोकांना देशोधडीला लावले, त्यापैकी, एक जी, त्याच्या समोर डॉक्टर म्हणून उभी आहे, तिच्या समोर लाचार होउन प्राणाची भीक मागत आहे ?
तो टक लावून, माझ्याकडे पहात होता. मी एक निःश्वास सोडला आणि स्पष्ट शब्दात त्याला धीर दिला - "हे पहा, तुम्ही अजिबात घाबरू नका ! मी तुमचे नक्कीच काही वाईट होऊ देणार नाही. उलट मी तुम्हाला बरे होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार हे निश्चित ! पण तुम्हाला कळले पाहिजे, तुमच्यामुळे माझ्या बाबांना इंग्लंडमध्ये खूप वर्षे राहावे लागले, जो त्यांचा कधीच स्वतःचा देश नव्हता. ते तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्ही जरी आमच्या सारख्या कैक आशियाई युगांडावासियाना देशोधडीला लावले, त्यांची घरेदारे, संपत्ती लुटली, तरी ती सर्व मंडळी आज आपल्या मेहनतीने सुस्थिथित आहेत."
त्यानंतर आलेल्या ICU च्या स्टाफने त्यांचा ताबा घेतला. त्यांची स्थिती स्थिर केली आणि मग मी त्यांना डायलिसिसची ट्रीटमेंट सुरू केली. नंतरच्या दिवसात त्यांच्या hermodynamics मध्ये बरीच सुधारणा दिसून येत होती.अचानक Toxic Epidermal Necrolysis ( TEN) ची लक्षणे दिसू लागली आणि त्यांची प्रकृती खालावत गेली...
त्याचा अंत अतिशय वेदनादायक आणि करुण होता. संपूर्ण शरीरावरची त्याची त्वचा, झडू लागली..फळ सोलून झाल्यावर आतला गर जसा दिसतो, तसे त्याच्या शरीरातील पेशी, शिरा, स्नायू शरीर पोखरून बाहेर स्पष्टपणे दिसू लागले होते. खरोखरच वेदनामय जगणे होते ते ! मी त्याच्या पायांची त्वचा झडताना प्रथम पहिली. पायात घातलेला सोक्स ज्या सहजतेने आपण काढतो, तसे त्याचे शरीर झडत होते.ते सहन करण्याच्या पलीकडले असे अतिशय वेदनादायक जिणे होते.. हळू हळू तो कोमात गेला. वेदना कमी करण्यासाठी एव्हाना, आम्ही स्नायुतून वेदनाशामक औषधंचा मारा पण सुरू केला, त्याचे दुःख कमी करत नव्हते, बेशुद्ध अवस्थेत, सुद्धा तो अधून मधून झटके देत होता, तळमळत होता...
१६ ऑगस्ट, २००३ रोजी इदी अमीनचा अतिशय वेदनादायक अंत झाला.दोन महिन्यांच्या त्या खडतर काळात त्यांनी काय सोसले असेल आणि त्याचे शेवटी काय हाल झाले, त्याची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही.
इदी अमीनचा जो शेवट मी अनुभवला आहे, त्यावरून एक निश्चित आहे की, त्याला आपल्या कर्माची पूर्ण परतफेड करावी लागली ! मृत्यु जस जसा जवळ येत गेला, तेव्हा नक्कीच त्याच्या मनचक्षु समोर युगांडातील परागंदा झालेले आमच्या सारखे आशियाई चेहरे तरळून गेले असणार हे नक्की !
मला वाटतं कर्माचा फेरा टाळता येत नाही. तो तुमच्या दुष्कृत्यांचा पाठलाग करत करत तुमच्या पर्यंत ह्याच जन्मी पोहचतो हे निश्चित
जैसी करनी, वैसी भरनी !!!
( व्हॉट्स ॲप वरील एका इंग्रजी अनामिक लेखाचा मराठी वाचकांसाठी स्वैर अनुवाद केला आहे )
दीपक धारगळकर, बोरिवली ( प )