श्रीदामोदर बाबा शेवलीकर विरचित
श्रीचक्रधरप्रभू साधक वंदन स्तोत्र
पंचावतार वंदन
छंद :- शार्दुलविक्रिडीत
श्रीकृष्णा
यदुनायका जगदीशा श्रीदत्त अत्रिसुता ।
श्रीद्वारावतीकार
चिदृपवरा श्रीगुंडमा अच्युता ।
श्रीचक्रेश
परात्परा भवहरा योगेश्वरा स्वामिया ।
साष्टांगी नित
नम्र वंदन असे श्रीपंचकृष्णास या ।।१।।
श्रीनागदेवाचार्य नमन
भुजंगप्रयात
कली सर्व संतात जो
श्रेष्ठ ज्ञाता।
जनी वंद्य जो सर्व
पंथाद्य नेता।
महाज्ञात विरक्त
श्रीनागदेवा।
नमस्कार या थोर
महानुभावा ॥२॥
श्रीबाइसा नमन
महाभक्त नागांबिका पंथमाता ।
तिच्या भक्तीने तोष कैवल्यनाथा ।
प्रभुकारणे अर्पिला देह सर्वा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।३।।
श्रीभांडारेकार निळभट्ट नमन
जनी थोर सत् शील श्रीनीळभट्टी ।
गृहा त्यागुनिया निघे स्वामीपाठी ।
मुळारंभिला शिष्य हा प्राप्त देवा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।४।।
श्रीजानोपाध्ये उपाध्येबास नमन
अतिवृद्ध ज्ञानेन्द्र औपाध्य यांनी ।
सदा सर्वदा ध्यायिला मोक्षदानी ।
तयाच्या रूपी घेतसे जो विसावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।५।।
श्रीकमळाइसा नमन
सरोजांबिका ज्ञानसौदामिनी ती ।
हिराई महाज्ञान वैराग्यमूर्ती ।
गुरुशिष्य या भूषवी पंथनावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।६।।
श्रीभाइदेवव्यास नमन
तपस्वी असे जो महाज्ञान रासी ।
सदोदितही तो प्रभु ध्यास त्यासी ।
मुनीराज आचार्य श्रीबाईदेवा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।७।।
श्रीएल्हाइसा उर्फ साधाबाईंना नमन
असे धन्य एल्हाइसा उर्फ साधा ।
तिची भक्ती भोळी मनी भाव साधा ।
च्या पूजने तोष श्रीचांगदेवा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।८।।
श्रीआउसा नमन
महातापसी आउसा ही विदुषी ।
सदा आत्मकल्याण इच्छा तियेसि ।।
अहोरात्र चिंती मला देव व्हावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।९।।
श्रीनाथोबा नमन
जगी श्रेष्ठ नाथोमुनी धन्य तोचि ।
पडे सप्त जन्मेही लेखे तयाची ।।
अशा साधकांच्या पदी पूज्य भावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥१०॥
दायंबा आणि देमाइसा
सदा देमतीचा असे भाव साधा ।
परी चक्रस्वामीवरी पूर्ण श्रद्धा ।
दुजा भक्त दायंब नामे गणावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥११॥
इंद्रभट (नागदेवभट)
परीपूर्ण सद्भक्त श्रीइंद्रभट्टा ।
प्रभुने दिला आपुला वस्त्र फूटा ।
अशा भाग्यवंतास कितीक गावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥१२॥
श्रीमहादाइसा(रूपाइसा) नमन
महासंत ज्ञानी महादाइसा ती ।
महाराष्ट्र देशी तिची फार ख्याती ।
तिने राखिला मार्ग हा श्रेष्ठ तेव्हा ।।
नमस्कार या थोर महानुभावा ।।१३।।
श्रीम्हाईंभट नमन
म्हाईंभट्ट योगी महातत्वज्ञानी ।।
मराठीत गद्याद्य ग्रंथ लीहूनी ।
प्रभुच्या लीळा शोधिल्या पूर्ण पहा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।१४।।
श्रीभास्करभट कवीश्वरबास नमन
कवी भास्कराचार्य शास्त्रज्ञ वक्ता ।
शिशुपाळ ग्रंथादि निर्माण कर्ता ।।
अमर्याद केली जगी धर्मसेवा ।।
नमस्कार या थोर महानुभावा ॥१५॥
श्रीकेशराजबास नमन
शुका सारिखा संत आदर्श योगी ।
मुनी केशराजा महाज्ञात त्यागी ।।
जसा वाङ्मयाचा असे पूर्ण ठेवा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥१६॥
श्रीहिराइसा नमन
हिराई दुजी थोरली श्रेष्ठ त्यागी ।
जशी ज्ञानविद्युल्लता भट्टमार्गी ।
सदा मार्गसंरक्षणा दक्ष पाहा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।१७।।
श्रीदामोदर पंडितबास नमन
सुविख्यात शास्त्रज्ञ दामोदराचा ।
असे पंडितामाजि सन्मान साचा ।
प्रभूचा करी जो मनी नित्य धावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥१८॥
श्रीआनेराजव्यास पारमांडल्य नमन
आनेराज योगीन्द्र हा तत्त्ववेत्ता
असे ब्रह्मविद्येवरी पूर्ण सत्ता ।
तशा ज्ञानचंद्रा किती आठवावा ।।
नमस्कार या थोर महानुभावा ।।१९।।
आद्य मराठी कवि श्रीनरेंद्रबास नमन
कवीरत्न विख्यात नरेन्द्र ज्ञानी ।
पहाकाव्य निर्माण केले जयांनी ।
स्मृतीग्रंथ देतो तयाचा पुरावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥२०॥
श्रीपरशरामबास नमन
पहा परशुरामे स्वज्ञाने बळाने ।
नभा गवसणी घातली ही तयाने ।
अशा ज्ञानियांचा महाज्ञानरावा ।।
नमस्कार या थोर महानुभावा ॥२१॥
श्रीरामेश्वरबास नमन
गुणी थोर रामेश्वरव्यास पंथा ।
जसा ज्ञानमार्तंड भासे समस्ता ।
नसे गुण वर्णावया शब्द ठावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥२२॥
श्रीउंबरी गौराइसे नमन
जया उंबरी गौराइसा नाम आहे ।
जशी चंद्रिकासारखी भासताहे ।।
मदा पंथकार्या समर्पित देवा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।२३।।
श्रीरवळोबास नमन (सह्याद्रि वर्णन ग्रंथकार)
कवीवर्य रवळो महाबुद्धीवंत ।
रचिला असे गोड सैह्याद्री ग्रंथ ।
लिपीचा पहा शोधिला गूढ ठेवा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥२४॥
श्रीबहाळे नारोबास नमन
बहाळे पुरीचे नारोव्यास ज्ञानी ।
परेशापुरा वर्णिले या कवीनी ।।
असा पूर्ण आदर्श त्यागी असावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥२५॥
श्रीकोथळोबास आणि पोमाइसा नमन
असे वंदनीये गुणी
त्यागमूर्ती ।
मुनी कोथळोबा नि पोमाइसा ती ।
श्रीवैराग्यदेवा नमन
तथा तुल्य त्या पूज्य वैराग्यदेवा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥२६॥
श्रीविश्वनाथबास बाळापुरकर नमन
शिशु विश्वनाथे कवी गुणराशी ।
रची ज्ञानप्रबोध या ग्रंथासी ।
जगी ज्ञानियांचा जसा ज्ञानदीवा ।
नमस्कार या थोर महानुभावा ।।२७।।
श्रीधाराशिवकर ओंकारबास नमन
महामान्य ओंकार धाराशिवाख्ये ।
तया वंदिती हे गुरुकुळ आख्ये ।
अशा ज्ञानवज्रा सदा प्रेमभावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥२८॥
श्रीअचळ मुरारिबास नमन
मुरारी मुनी ज्ञानवैराग्य ज्योती ।
तयाची असे सर्व पंथात ख्याती ।
जया भाळला देशीचा बादशाहा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥२९॥
श्रीगुर्जरशिवबास नमन
महाज्ञानसिंधु शिवव्यास धन्य ।
महाभाष्य ग्रंथादि कर्तृत्व मान्य ।
तया सारिखा तज्ज्ञ दूजा न ठावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥३०॥
श्रीसिद्धांते हरिबास नमन
तपाचार्य सिद्धान्त हरीन्द्रव्यासे ।
तिये मांडिले तत्वसिद्धांत ऐसे ।।
दिली मान्यता पंथ नेत्यांनी तेव्हा ।।
नमस्कार या थोर महानुभावा ॥३१॥
श्रीवैद्य दत्तोबास नमन
मुनी वैद्य दत्ता महाचार्य ज्ञाता ।
अनेकास सन्निध दे लाभ वार्ता ।
अशा शास्त्रसंरक्षकासि पुजावा ।
नमस्कार या थोर महानुभावा ॥३२॥
श्रीमुरारिमल्ल विद्वांसबास नमन
महात्मा मुरारी
सुविद्वांस राजा ।
तपेची तपे घाली
साहित्य काजा ।
असा संत शब्दे
किती गौरवावा ।।
नमस्कार या थोर
महानुभावा ॥३३॥
श्रीकमळाकर मुनिबास कोठी नमन
मुनीव्यास कोठी
सुशास्त्रज्ञ मोठे।
तिहीं बांधिले
सर्वही स्थान ओटे ।
असे कार्य कर्ता
पकाराठवावा ।
नमस्कार या थोर
महानुभावा ॥३४॥
चतुर्विध मार्ग वर्णन
परीवार जो
स्वामीचा त्रिप्रकारे ।
जिये दर्शनी
बोधवंतानुसरले ।
तया हात जोडुनीया
नम्र भावा ।।
संपूर्ण
नमस्कार या थोर
महानुभावा ॥३५॥
अशा ज्ञात अज्ञात
ज्या साधकांनी ।
जगी पूर्ण
आयुष्यही घालवूनी ।।
सदोदीत केली बहु
धर्म सेवा ।
नमस्कार
या थोर महानुभावा ॥३६॥