संसार मायाजालातून सुटण्यासाठी अनन्य शरणागती हाच एक मार्ग आहे
परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्रीकृष्ण हे प्रेम व माधुर्याचे सागर आहेत. 'कृष्ण' हा शब्द कल्याणकारी आहे. 'कृष्ण' याचा अर्थ आहे, 'परमआनंद! आपण सर्वच आनंदाच्या शोधात आहोत. मायेमुळे वारंवार निराशेला सामोरे जावे लागते. माता-पिता हे आपल्या बालकांची काळजी घेतात, ते त्यांचे कर्तव्य आहे; पण ते त्यांच्या बालकांचे अंतिम संरक्षणकर्ते नाहीत.
'माया' म्हणजे प्रकृती. ती अतिशय प्रबळ आहे. तिला जिंकणे जवळजवळ अशक्य आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “केवळ मला शरण येऊन मनुष्य मायेच्या तडाख्यातून मुक्त होऊ शकतो. आपण आपले अंतःकरण शुध्द केले पाहिजे.”
अमृत म्हणजे अशी वस्तू, जिचा कधीच नाश होत नाही, मृत्यू होत नाही. भौतिक जगात कुठेही सुख नाही. येथे सुख प्राप्त करणे अशक्य आहे. विचारवंत किंवा बुध्दीमान बनल्याशिवाय कोणतीही व्यक्ती असा विचार करू शकत नाही की 'ती' शरीर नसून 'आत्मा' आहे.
“माया महाठगिनी हम जानी!!”
पंचेद्रिय व ज्ञानेंद्रियांवर अधिपत्य गाजवणारे, त्यांना सतत अनित्य वस्तूकडे धाव घेण्यास भाग पाडणारे हे 'मन' नित्य' अशा परमेश्वराकडे बळजबरीने न्यावे लागते. हत्तीला अंकुशधारी माहूत सुतासारखा सरळ करतो. ईश्वरीय ज्ञानच आपले 'मन' शांत करते, संयमित करते. “पेराल तेच उगवेल!”
ईश्वराची ही सृष्टी एक प्रकारची 'शेती' होय. कर्माचे जो जसे 'बी' पेरेल. त्याचेच फळ त्याला मिळणारे असते. ईश्वर ही कोरी कल्पना नाही, तर आधुनिक काळाची एक वैज्ञानिक सत्यता आहे. त्याचा रसास्वाद भगवद्गीतेत सतत चाखावयास मिळतो. रस चाखून चाखून तो कमी होतच नाही, उलट त्याचा स्वाद अधिकाधिक मधुरच होत जातो.
मायेला सिमेपार करावयास ईश्वरीय शक्ती पुरेशी आहे. भगवद्गीतेच्या उपदेशाप्रमाणे ही शक्ती सर्व मानवजातीत असतेच परंतु सत्संगाच्या व गुरूकृपेच्या अभावी ती झाकली आहे. त्याची उकल होणे म्हणजेच परमानंद प्राप्ती!
जैसे जाकी भावना तैसे फल होय!
ईश्वरीय प्रेमशिवाय अध्यात्मजीवन शक्य नाही.
भगवंत सर्वोच्च नियंत्रण करणारा आहे. भगवान श्रीकृष्णाबरोबरचा आपला स्नेह इतका घनिष्ट आहे की श्रीकृष्णप्रेमाचा पुसटसा स्पर्श होताच आपले जीवन अमृततुल्य ती बनते. ईश्वराशिवाय भौतिक जीवन हे विकृतरूप होय. माया सतत आपला पाठपुरावा करते. परंतु ईश्वरीय ज्ञानगंगेत ही माया छिन्नविछिन्न होते.
भौतिक गुंतागुंती एका तुरूंगाप्रमाणे आहेत. जर बालवयापासून आपल्याला ईश्वरीय भावनेने प्रेरित केले तर हे मानवीय दुःखमय भौतिक बं जीवन अतिशय हलके-फुलके होऊन, जीवन रहस्य उलगडावयाला, जीवन म सहज सुखी व्हायला फारच मदत होईल. यात तिळमात्र शंका नाही.
स्वसंरक्षण हा निसर्गाचा पहिला नियम आहे. तो आत्मानुभवाने सहजगत्या प्राप्त होतो. आम्ही सर्व परमेश्वराची लेकरे आहोत. त्यांचा वर्षाव सतत आपलेवर होतच असतो. नुसते वय वाढल्याने एखादा ज्ञानसंपत्र होतो असे नाही. तो पाच वर्षांचा आहे की पन्नास वर्षांचा याचा काहीही फरक पडत नाही. वय झालेले नसून देखील मनुष्य वृध्द होऊ शकतो.
मनुष्य कितीही महान शास्त्रज्ञ असला तरी तो चुका करणारच. चुका होणारच. हा बध्द जिवांचा स्वभावच आहे. चूक लहान मोठी असू भा शकते. प्रश्न तो नाही, परंतु भौतिक प्रकृतीने (मायेने) बध्द झालेला क मनुष्य नक्कीच चुका करतो. त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे -
“सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज
अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः।।” (गी.अ.१८/६६)
परमेश्वराला शरण जाणे, ईश्वरीय ज्ञानाला शरण जाऊन ते आचरणात आणणे होय.
नित्य व अनित्य वस्तुबाबत विवेक जागृती, ही आध्यात्मिक यशाची पहिली पायरी होय, असे संत सांगतात. आपण साधनाही करतो व परत मायेच्या आकर्षणाने त्यालाच 'सत्य' समजून आपली फजितीही करवून घेतो, हे कळून 'न' कळण्या इतपत हास्यास्पद नव्हे काय? याचा सुक्ष्मविचार करणे आवश्यक आहे.
ग्रह म्हणजे पकडणे निग्रह म्हणजे सोडून देणे. म्हणजे मनाला बंधनात टाकणाऱ्या वस्तूंपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे उलट श्रवण मनन, चिंतनाचा ध्यास, आत्मतत्त्वाविषयीचे ज्ञान, योग्य सद्गुरूकडून समजावून घेणे म्हणजेच 'नित्य' अशा परमेश्वराच्या ज्ञानगंगेत, खोल बुडी मारून परमानंद प्राप्त करणे होय.
भौतिक वस्तुत रत होणे. आकर्षित होणे म्हणजेच माया. त्यापासून दूर जाणे, त्या वस्तूंचा त्याग करणे हीच परमेश्वराजवळ जवळीक साधणे होय. भगवान श्रीकृष्णाचे चरण हेच शरणस्थळ आहे. भगवद्गीता ‘त्याग’ शिकविते.
एक फार मोठा श्रीमंत व्यापारी होता त्याच्याकडे अमाप संपत्ती होती आणि तो सतत निरंतर आपली संपत्ती कशी वाढेल यासाठी प्रयत्न करत असायचा. त्यामुळे त्याला मानसिक शांती अजिबात नव्हती. तो सतत उद्विग्न असायचा माझी संपत्ती कशी वाढेल? माझ्या संपत्तीचे रक्षण कसं होईल? कोणी घेऊन जाणार नाही ना? चोर येणार नाही ना? राजा हिसकावून घेणार नाही ना? अशा प्रश्नांनी त्याच्या अंतःकरणात घर केले होते.
एके दिवशी त्याला एका साधुचे दर्शन झाले साधुचा शांत चेहरा. प्रसन्न आश्चर्य पाहून व्यापारी फार आश्चर्यचकित झाला. त्याने साधूला वरून खालून पाहिले साधू जवळ फक्त दोन वस्त्र आणि हातात झोळी, काखेत गोरख झोळना इतकेच होते तरीही साधू अतिशय सुखी व प्रसन्न वाटत होते व्यापाऱ्याने साधूला नमस्कार केला. व त्यांना घरी येण्यासाठी विनंती केली साधूने विनंती मान्य केली व तो त्यांना घरी घेऊन आला. बसायला आसन टाकून नंबर वृत्तीने साधून जवळ बसला व आपली व्यथा मांडायला सुरुवात केली. त्याने साधूंना म्हटले माझ्याकडे अमाप संपत्ती आहे. तरीही मी उद्विग्न आहे याबद्दल मी अनेक देवीदेवतांची भक्ती केली तीर्थस्थाने केली तरीही मला शांतता लाभली नाही यावर काही उपाय आपल्याला माहित असेल तर मला सांगा.
साधूंना त्याचा आजार लक्षात आला त्यांनी त्याचा हात पाहिला व सांगितले तू दहा दिवसांनी मरणार आहेस म्हणून तुला जे काही पुण्यकर्म करायचे असतील ते तू करून घे कारण तुझ्या सोबत ही संपत्ती येणार नाही तुझ्या सोबत फक्त तुझे चांगले कर्म येतील व्यापारी आणखीन चिंतित झाला त्याला दोन गोष्टी हिताच्या सांगून साधू निघून गेले. मग त्या व्यापारी धनिकाने विचार केला की आतापर्यंत जे झाले ते झाले, आता आपण द्रव्य कमावण्याचा हव्यास सोडून दहा दिवसपर्यंत जास्तीत जास्त देवधर्म करावा असा विचार करून त्याने देवधर्मास आरंभ केला. आठ दिवसात खूप दान केले. अनेक ब्राह्मणांना जेवू घातले. गरिबांना द्रव्य देऊन अन्न देऊन त्यांच्या गरजा पूर्ण केल्या.
नवव्या दिवशी त्याने विचार केला कि आता फक्त आजचा दिवस राहिला आहे उद्या आपण मरणार असा विचार करत असताना त्याच्या लक्षात आले कि पहिल्या पेक्षा आपली उद्विग्नता अनेकपटीने कमी झालेली आहे आणि आपल्याला मानसिक शांती लाभलेली आहे. आणि त्याच वेळेला ते साधू पुन्हा त्याला भेटायला आले व त्याला म्हणाले, “तुला आता कसे वाटते आहे?” तो म्हणाला “मला मरणाची अजिबात भीती वाटत नाहीये व माझं मन पूर्णपणे शांत झालेलं आहे.” आता मी उद्या सुखाने मरायला तयार आहे.
ते साधू बाबा स्मित हास्य करत त्याला म्हटले अरे भाग्यवान माणसा हेच तर सुखाचे रहस्य आहे प्रत्येक दिवस “कधीही मरण येऊ शकते” असाच विचार करून जगायचा असतो. आणि प्रत्येक दिवशी दिवसभरात होईल तेवढे सत्कर्म करायचे असतात द्रव्याच्या हव्यासाने लोभाने तुझ्या अंतःकरणात शांतिने घर केले होते. जेव्हा तू परमार्थाचा विचार केलास तेव्हा तुझे मन शांत व्हायला सुरुवात झाली आणि निकाल प्रत्यक्ष तुझ्यासमोर आहे तू आता पूर्ण शांत आहेस आणि तू उद्या मरणार आहेस हे मी तुला हे समजावण्यासाठी सांगितले होते तुझे आयुष्य भरपूर आहे. म्हणून काळजी करू नकोस पण उरलेले आयुष्य देवाधर्मात सात कर्मात खर्च कर”
उपदेश करणे, हे संताचे गुरुंचे प्रत्यक्ष भगवद्गीता सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचे या मानवजातीला महान मदतकार्य आहे. त्यांची उपदेशामृत वाणी ही आपणास तारक आहे. भवसागर पार करावयास ती मदत करते. मी परमेश्वराचा अत्यंत ऋणी आहे. हे अमृतमय ज्ञान अवर्णनीय आहे. तो मधुर रस चाखावयास मिळतो हे मी माझे भाग्य समजतो. माझी ही 'श्रध्दा' परमेश्वर चरणी अर्पण करतो आहे.
शेवटी म्हणावेसे वाटते
भगवान मेरी नय्या, उसपार लगा देना!
अब तक तो निभाया है, आगे भी निभा लेना!
संभव है झंझटो में, मै तुमको भूल जाऊ!
पर नाथ मेरे तुम भी, मुझको ना भूला देना!