गीता धर्म आणि व्यापक अहिंसा परमो तत्त्व -
'गीता' आणि 'अहिंसा' शक्यच नाही असे माझ्या एका सहकारी (गीतेविषयी काहीसे अज्ञान) मित्रांने म्हटले व त्याच्या पुष्ट्यर्थ 'गीतेचा आदी मध्य व अन्त' हा युद्ध (त्यांच्या मते हिंसा) करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आहे असे त्यांनी म्हटले मग त्यांना गीतेतील अहिंसा तत्त्व मी माझ्यापरीने समजावून सांगितले. तो विचारप्रपंच या लेखानिमित्ताने आपल्यासमोर सादर करीत आहे.
तसे (वरवर) पाहू जाता भगवंतांनी स्वतः आपल्या अवतार मीमांसेचे कारण सांगताना
परित्राणाय साधून विनाशायच दुष्कृताम्। (४ ८)
सज्जनांचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेकरिता मी वारंवार प्रकट होतो असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे विश्वदर्शनप्रसंगी
'कालोस्मि लोकक्षयकृत्प्रवृध्दो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ।' (११०३२)
लोकांचा क्षय करणारा मी उग्र काळ आहे. याठिकाणी लोकांना मारण्याकरता प्रवृत्त झालो आहे. तथा
'मया हतास्त्व जहिमां व्यथिष्ठा ।
युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ।। (११-३४)
हे वीर मी पूर्वीच मारलेले आहे. मी मारलेल्या यांना तू मार, भिऊ नकोस, युद्ध कर, रणांगणांत तू शत्रूंना जिंकणार आहेस. असे सांगितले. तसेच
'जित्वा शत्रून्भुडःक्ष्व राज्यं समृध्दम् । (११-३३)
शत्रूंना जिंकून धनधान्याने समृद्ध अशा राज्याचा उपभोग घे.
तसेच 'शौर्यं तेजो धृतिर्दा युद्धे चाप्यपलायनम्। (११-४३)
शौर्य, तेज, धैर्य, दक्षता, युद्धात पळून न जाणे, दान, जनतेवर राजसत्ता चालविणे हे क्षत्रियांचे प्रकृतिजन्य कर्म होय असे सांगितले व बऱ्याच ठिकाणी युद्धास तयार हो, युद्ध कर, तेच तुला श्रेयकारक आहे असे म्हटले म्हणजे एका दृष्टीने कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला युद्ध म्हणजे नरसंहार एवं हिंसा करण्यास प्रवृत्त केल्याचे दिसून येते. मग असे का? त्यावेळी अर्जुनाकरिता ते त्याचे उचित कर्म होते. असुरांचा संहार करुन सत्यधर्माची स्थापना करायची होती आणि अशी हिंसा निस्वार्थ निष्काम हेतूने केल्यास तो त्या दोषाने बद्धीत होणार नाही अशी शास्त्रोक्त ग्वाही त्यांनी वेळोवेळी दिली व 'हत्वापि स इमॉंलोकान् हन्ति निबध्यते (१८-१७) या लोकांना ठार मारुन देखील तो ठार मारणारा ठरत नाही. त्या कर्माने तो बद्ध होत नाही. (पाप लागत नाही) असा सल्ला दिला. मग खरेच कृष्ण भगवंतांनी हिंसेची मोकळीक सर्वांना सर्वकाळी दिली काय? नाही. उलटपक्षी गीता तत्वज्ञानामध्ये पापजन्य हिंसेचा सर्वत्र निषेध केला असून अहिंसा हा दैवी गुण व परम आवश्यक मोक्षार्थीसाठी व समाजहितव्यतेसाठी परम लाभदायक असल्याचे दिसून येते ते पाहू. वर्तमान स्थिती
हा लेख लिहिण्याचे आणखी एक कारण म्हणजे वर्तमान काळातील सर्वदेशांतील हिंसाचाराचे स्तोम, दहशतवाद, सीमाप्रश्न, संघटना वाद, वृथा धर्माभिमान भोग वासना, अर्थप्राप्ती इ. विविध कारणांनी मोठ्या प्रमाणावर होणारे घातपात शिकारीसाठी केले जाणारे निष्पाप पशुपक्षी प्राण्यांची राजरोस प्रचंड कत्तल खरोखरंच हे योग्य, आवश्यक आहे काय? या मार्गाने जाणारे जीव योग्य मार्गाने जात आहेत काय? त्याचे त्यांना काय परिणाम फळे भोगावे लागतात याचे त्यांना ज्ञान आहे काय? याच्या सविस्तर ज्ञानाचे परिज्ञान त्यांना समाजातील सूज्ञ माणसांना, अनभिज्ञांना व त्यामुळे हिंसेकडे आकर्षित झालेल्याना, होणाऱ्यांना झाले पाहिजे. ते अत्यंत आवश्यक होय. आसुरी संपदा -
वर सांगितलेले हिंसेचे विविध प्रकार व त्याची कारणे ही आजच अस्तित्वात आहेत असे नाही. पूर्वापार हे चालत आले आहे तशी शास्त्रामध्ये त्याची ग्वाही ही आहे व या विनाशकारी समाजघातकी वृत्तीची सर्वत्र निर्भत्सनाही केली आहे. गीतेमध्ये 'आसुरी संपदा' म्हणून उल्लेख येतो. जसे
अहंकार बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता (१६-१८)
अहंकार, शक्तीचा गर्व, उन्मत्तपणा, विषयवासना, क्रोध हे दुर्गुण आहेत.
तथा
‘असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि (१६-१४)
या शत्रूंना मी ठार मारले दुसऱ्या शत्रुला देखील ठार करीन.
'ईहन्ते कामभोगार्थमन्याये नार्थसंचयान् । (१६-१२)
हे आसुरी लोक कामोपभोगाकरिता अन्यायाने पुष्कळ द्रव्य संचय करण्याची हाव धरतात. तसेच
'प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोहिताः (१६-९)
अज्ञान व अन्यथाज्ञानयुक्त असे अल्पबुद्धी क्रूरकर्मी, घातकी लोक जगाचे अहित (घात करतात. 'मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः । राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः (९-१२) अशा अतिस्वार्थी आसुरी स्वभावाचा आश्रय धरून वागणाऱ्यांच्या आशा, कामे, त्यांचे ज्ञान व्यर्थ ठरते. अशा शब्दात भगवंतांनी आसुरीवृत्ती, आसुरी कर्मे व तशा व्यक्तींचा धिक्कार केला आहे.
परिणाम -
अशा आसुरी संपदेचे कारण सदोष तमगुण सांगितला असून
'ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत' (१४-९)
हा तमगुण ज्ञानावर आवरण घालून कर्तव्यमूढतेच्या मार्गाला नेतो. घात करवतो असे सांगितले आहे. अशा लोकांकडून घोर घोर वाईट कर्मे घडून
'जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छान्ति तामसाः (१४-१८)
असे निकृष्ट तामसगुणाचे लोक निम्न हीन लोकांत जन्म घेतात. त्यांची गतीही हीन होते. तसेच 'प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ' (१६-१६) विषयभोगात आसक्त असलेले हे आसुरी लोक हीन नरक योनीमध्ये पडतात. या वृत्तीचा उजृंभ व त्यामुळे होणाऱ्या नरकप्राप्तीचे कारण पुढील श्लोकात सांगितले आहे.
भगवंत म्हणतात
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधंस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रत्यजेत् (१६-२१)
काम, क्रोध, लोभ असे तीन प्रकारचे नरकाचे द्वार असून आत्मविघातक आहे म्हणून या तिन्हींचा त्याग करावा. एवं अशी आसुरी संपदा इहलोकात स्वतःला तथा इतरांना पीडादायक असून परलोकातही हिचे फळ देवता त्या जीवाला घोर नरकांच्या रूपाने देतात हे शास्त्रसंकेत सर्वांनी जाणून या वृत्तीचा त्याग करून सदाचार करणे आवश्यक आहे. ते सर्वांसाठी परम लाभदायक आहे. विविध हिंसा - हिंसेचे प्रामुख्याने तीन प्रमुख भेद आहेत.
१) शारीरिक हिंसा
ही हिंसा सर्वांना श्रुत दृष्ट आहे. मनुष्याने मनुष्यांची तथा दृश्य प्राणी, पशु, पक्षी, जीव, जंतू, कीटक यांची हत्या करणे यामध्ये दोन भेद, एक, कळून स्वार्थसिद्धी करता तर दुसरी, अनाहूतपणे, अप्रत्यक्षरित्या, चालता बोलता स्वाभाविक होते ती यापैकी दुसरी हिंसा जरी मोठ्या प्रमाणात बाधक नसली तरी ती चुकवून कमीत कमी हिंसा केल्यास दृष्टादृष्टी त्याचा लाभ जीवांना होत असतो. उदा. पाणी गाळून प्यायल्याने जीव जंतूंची हिंसा चुकून ती आपल्या आरोग्यालाही लाभदायक असते. असो सूक्ष्म हिंसा व तिचे परिणाम हा स्वतंत्र विवेचनाचा विषय आहे. शारीरिक हिंसेचा दुसरा प्रकार
'अशास्त्रविहीतं घोरं तप्यंते ये तपो जनाः । (१७-५)
शास्त्रविहीत नसलेले घोर स्वप्नाचे तपाचरण केल्यास शरीरातील जीव जंतू पंचमहाभूतादि समूहाला, त्यायोगे प्रत्यक्ष परमेश्वराला कष्ट देणाऱ्या लोकांनाही आसुरी वृत्तीचे लोक मानले आहे म्हणून धर्मविधीत सुद्धा कुशलतेने व सावधानतेने वागण्याचा उपदेश स्वामींनी केला आहे.
२) वाचिक हिंसा -
दुसरा हिंसेचा प्रकार आहे वाचिक हिंसा. म्हणजे आपल्या बोलण्याने वाणीने दुसऱ्याचे मन दुखवणे, दुसऱ्याचा अपमान करणे त्याला कष्ट देणे. जसे कुणाला सदा सर्वदा फटकळ बोलण्याची सवय असते. असे लोक चांगल्या गोष्टी तथा व्यक्तींनाही नावे ठेवतात. वाचिक हिंसा सामान्य
नसते. कधी कधी हिचे गंभीर परिणाम होतात हे श्रीचक्रधर प्रभूंनी सांगितले आहे (सुत्रपाठ आ. १७३) भावार्थानेः काही वेळी कधी कधी अपमानामुळे पुढील मनुष्य आत्मघात करून घेतो, नेहमी जळत राहतो इ. त्यामुळे नरकांची निष्पत्ती होते. म्हणून मनुष्याने
'अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मय तप उच्यते ।।१७-१५।।
या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कोणाच्याही मनाला न लागणारे, परंतु खरे, गोड आणि पथ्यकारक भाषण करणे आणि शास्त्रस्मरणाचा अभ्यास करणे याला वाचिक तप असे म्हटले आहे ते आचरावे. म्हणजे वाचिक हिंसा चुकून प्रेम लाभ प्राप्त होतो. (पुढीलाचे तथा आपले दुःख चुकते)
३) मानसिक हिंसा -
हिंसेचा हा अतिसूक्ष्म प्रकार होय. हा आस्तिक माणसाच्या लक्षात येणेसुद्धा कठीण आहे. तेव्हा अश्रद्धमाणसाची कथाच वेगळी. यात कुणाविषयी वाईट चिंतनही करायचे नाही असे सांगितले आहे मग तो शत्रू असला तरी त्याविषयी अहित, घात, पराभव आदी चिंतन करणे त्याच्या नुकसानीवर आनंद प्रसन्नता प्रकट करणे इ. मानसिक हिंसा होय. शत्रू वर दूर तर स्वामी श्रीचक्रधरांनी मुक्तीची चाड तेणे मुंगीचे वैर न चिंतावे (आ. ६५) असा स्पष्ट आचारच आपल्या साधकाला सांगितला आहे. तर श्रीकृष्ण भगवंतांनी,
'मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मान समुच्यते' ।। १७-१६ ।।
मन प्रसन्न ठेवणे, सौम्यता, मौन, आत्मनिग्रह आणि शुद्ध भावना यास मानसिक तप म्हणतात. ते आचरावे असे सांगितले आहे. इतकेच काय पण सत्कर्मातही सुक्ष्म हिंसा सभवू शकते म्हणून तिच्यापासूनही सावध राहिले पाहिजे जसे
'असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ।।१७-२२ ।।
म्हणजे सत्कार न करता अवहेलना करून जे दिले जाते. त्याला तामस दान म्हटले आहे. एवं त्या सत्कर्माचे महत्त्व फलीत कमी सांगितले गेले आहे. एवं उपरोक्त त्रिविध हिंसा ही स्वतःला तथा दुसऱ्याला तसेच ऐहिक तथा पारलौकिक दृष्टीने दुःख दैन्य व पापमूळ असल्याने त्या सर्वांनी सर्वथैव त्यजाव्यात असे बहुधा सर्वच धर्मसंप्रदाय एवं शास्त्र व संतांनी उद्बोधीत केले आहे. अपवाद समाजसेवा, देशसेवा, दुर्बलांचे रक्षण, यासारख्या बाबींमध्ये प्रथम सांगितल्याप्रमाणे काही कर्मे ही रास्त ठरविली गेली आहेत नव्हे, तर ते त्यांचे उचित कर्म एवं स्वधर्म असतो हे शास्त्र विहीत सत्य आहे. सप्तव्यसन निषेध केवळ अहिंसा तत्त्व आचरले म्हणजे झाले असे नाही तर पांतीप्रसंगी आणखी काही महत्त्वपूर्ण त्याज्य गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्यांचा निषिद्धकर्मे एवं आसुरी संपदेमध्ये समावेश केला गेला आहे. जसे द्यूतः मद्यः मांसाहार, वेश्यागमन, शिकार, चोरी, परद्वारसेवा ही सप्तव्यसने याच पातीला असत्यभाषण: दुष्टसंगतीः कठीण दंड कठोर भाषण इ. गोष्टी प्रामुख्याने त्याज्य केल्यास स्वतःचे पर्यायाने समाजाचे शुद्धीकरण होऊन सुख-शांती, समृद्धी सर्वत्र नांदण्यास उपयुक्त होत असल्याचे सिद्ध झाले आहे. नव्हे यालाच धर्मराज्य म्हटले गेले आहे. दैवी संपदा वाईट गोष्टींचा त्याग करणे याला निषेध त्याग म्हटले आहे. याचबरोबर चांगल्या गोष्टींचा अंगिकार करणेही सज्जन तथा संत पुरूषास परम आवश्यक असते. अशा पुरूषांची दैवी लक्षणे वेळोवेळी भगवंतांनी सांगितली आहे. त्यांचा सद्वर्तनाशी पर्यायाने त्रिविध अहिंसेशी संबंध असल्यामुळे सारांशरूपाने पुढे देत आहोत. ही दैवी संपदेची तथा एवं गुण विशिष्ट पुरूषांची लक्षणे गीतेमध्ये कधी स्थितप्रज्ञ, कधी गुणातीत, कधी यथार्थज्ञानी, कधी योगी, कधी भक्त तर कधी स्वतंत्र दैवीसंपदा म्हणून उल्लेखिले आहेत. जसे
दुःखेष्वनुद्विममनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधाः स्थितधीर्मुनीरूच्यते ।। २-५६ ।।
दुःखात ज्याचे मन विषण्ण होत नाही, सुखाचे ठायी ज्याला अभिलाषा नाही. प्रीती, भय, क्रोध ही ज्याची सुटली आहेत, त्याला स्थितप्रज्ञमुनी म्हणतात. यासोबतच तो
नाभिनन्दति न द्वेष्टी: विषया विनिवर्तन्ते,
रागद्वेषवियुक्तैस्तुः आत्मवश्यैर्विधेयात्मा,
प्रसन्नचेतसो,
विहाय कामान् यः सर्वान् पुमांश्चरति निस्पृहः
निर्ममो निरहड्कार स शान्तिमधिगच्छति ।।२-७१।।
जो आसक्ती सोडून, निरिच्छ, ममत्व शून्य व निराभिमान होऊन कर्तव्य करीत राहतो त्यालाच शांती मिळते असे सांगितले आहे. पुरूष सर्व त्याचप्रमाणे
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः (६-८)
ज्याचे मन आत्मज्ञान व सृष्टीज्ञानाने तृप्त झाले आहे. जो निर्विकार, जितेंद्रिय, तथा माती दगड व सोने यात एकरूपता पाहतो त्याला योगारूढ म्हणतात. तथा पुढे हितकर्ता, मित्र, शत्रू, वैरी, तटस्थ, मध्यस्थ, द्वेष करण्यासारखा बांधव, सज्जन व दुर्जन याविषयी समानता राखनारा असा पुरूष श्रेष्ठ मानला जातो -8),
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा (६-१८)
मनुष्य सर्व वासनांतून निरिच्छ होतो, त्याला योगी असे म्हणतात. असा योगी कशाला कुणाला त्रास देईल? कशाला कोणाची हिंसा करील? उलट अहिंसा हे त्याचे आभूषणच असेल. उलट तो
'आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।। (६-३२)
आपणाला जसे सुख-दुःख तसेच सर्व जीवमात्राला अशा दृष्टीने जो सर्वत्र सारखे पाहू लागतो तो योगी मानला जातो, असा तो होतो.
असा श्रेष्ठ योगी, संत अथवा सज्जन
'अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।
निर्ममो निरहड्कार सम दुःख सुखः क्षमी (१२-१३)
सर्व प्राणिमात्राविषयी द्वेष नसलेला, मित्रभाव व करूण भाव ठेवणारा, ममत्व व अहंकाररहित, सुख-दुःख सम मानणारा क्षमाशील असल्यामुळे भगवंताला परमप्रिय असतो. असा पुरूष प्राणिमात्राची मौज म्हणून अथवा स्वादपूर्तीसाठी हिंसा करील असे आपल्याला वाटते काय? छे, मुळीच नाही. म्हणून खेळ
अशा श्रेष्ठ पुरुषाला शत्रु, मित्र, मान, अपमान, शीत, उष्ण, सुख, दुःख, समान असावी लागतात. तथा त्याने संसारातील आसक्तीचा त्याग केलेला असतो म्हणूनच तो भगवंताचा प्रिय व मोक्षाला अधिकारी असतो (१२-१८) अशीच पण थोड्याशा फरकाने न द्वेष्टीः सम दुःख सुखः स्वस्थ समलोष्टाश्मकांचन, तुल्यप्रियाप्रियो, तुल्य निन्दात्मसंस्तुती, तुल्य मित्रारिपक्षयो, एवं गुणविशिष्ट पुरुषाला गुणातीत (त्रिगुणमुक्त) म्हटले आहे (१४-२२ ते २५)
पंधराव्या अध्यायातील
निर्माणमोहा जितसंगदोषा
अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः।
द्वद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञै
र्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययंतत । (१५-५)
या श्लोकामध्ये ज्याचा अभिमान व मोह नाहीसा होऊन ज्यांनी आसक्तिरूप दोषाला जिंकले आहे. जे अध्यात्मज्ञानात स्थिर झाले, ज्यांच्या वासना शांत झाल्या, ते ज्ञानी लोक सुखदुःखादी अशा अनेक द्वंद्वातून मुक्त होऊन अविनाशी पदाला पोहोचतात असे सांगितले आहे.
सरळ सरळ अहिंसा शब्दाचा उच्चार भगवंतांनी निवडक ठिकाणीच केला आहे. जसे
'अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्
दया भूतेष्वलोलुत्वम् मार्दवं हीरचापलम् ।।१६-२॥
यात अहिंसा, सत्य, क्रोध नसते, त्याग, शांती, दुष्ट बुद्धी न बाळगणे, प्राण्यांवर दया करणे, निर्लोभता, नम्रता, अविचाराने न वागणे इ. दैवी संपदेच्या पुरूषांची (आणखीही बरीचसी) लक्षणे सांगितली आहे. एवं कुठल्याही माणसाकडून कुठल्याही कारणाने हिंसा भगवंताला अभिप्रेत नसल्याचे जागोजागी आपणास दिसून येते. मनुष्यत्व नव्हे तर प्राणिमात्रावर दया करण्याचा संदेश प्रभूंनी दिला आहे. श्रीचक्रधरस्वामींनीही स्पष्टरित्या (आ. २३२) या वचनात स्पष्ट आचार संकेत देऊन अहिंसेचा परम संदेश सर्वांना दिला आहे.
‘देवद्विजगुरूप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रम्हचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ।।१७-१४ ।।
या श्लोकातही प्रभूंनी स्पष्ट व प्रत्यक्ष अहिंसा शब्दोच्चार करून देव, ब्राम्हण, (संत), गुरू, व विद्वज्जन यांचा आदर सत्कार करणे, शुचिर्भूतपणा असणे, सरळपणे वागणे, ब्रह्मचर्य आदी गुणांच्या आचरणाला शारीरिक तप म्हटले आहे हे विशेष होय. ब्रह्मचर्य केवळ सन्यासासाठी नसून कर्मयोगी माणसानेही आपल्या सर्व इंद्रियावर संयम तथा त्यांचा सदुपयोग करणे या अर्थानेही अभिप्रेत आहे. असेच भगवंतांनी ब्राह्मणत्वाचे लक्षण सांगितले आहे.
'शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेवच ।
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ।।१८-४२ ।।
या एवं शांती, शम, दम, तप, शुचिर्भूतपणा, सहनशीलता, सरळपणा, अध्यात्मज्ञान, व ईश्वरनिष्ठा हे ब्राह्मणाचे प्रकृतिजन्य कर्म होय. अर्थात इतरांनी ते आचरावयाचे नाही असे नाही तर सर्वांसाठी ते लाभप्रद आहे. आपण आपल्या शुद्ध कर्माचरणाने ब्राह्मणत्व, संतत्व, सज्जनत्व, श्रेष्ठत्व प्राप्त करून घेणे आपल्यासाठी लाभप्रद आहे. परमगती व्यावहारिक एवं अशा प्रकारे वाईट गुणांचा त्याग आपण केल्यास व चांगल्या गुणांचा अंगिकार केल्यास समाजात सुख-शांती समृद्धी नांदेल. सामाजिक प्रतिष्ठा (नैतिक) प्राप्त होईल. दुःख दैन्य पाप चुकेल.
पारमार्थिक - पारमार्थिकदृष्ट्या तर आसुरीसंपदेचा त्याग करून दैवी संपदेचा अंगिकार करणे प्रत्येक साधकाला परम आवश्यक असते. ते त्याच्या मोक्षानुभूतीला, ईश्वरप्राप्तीला कारण असते असे भगवंत म्हणतात.
'दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता। (१६-५)
दैवी स्वभाव मोक्षासाठी तर आसुरी संपदा संसारात बंधनाला कारण मानल्या गेल्या आहेत म्हणून आपण सर्वांनी त्रिविध अहिंसा तत्त्वाचा अंगिकार करून आपला इहलोक परलोक सर्वांसह सुखकारक व श्रेयस्कर करण्याचा प्रयत्न करू.
॥ जय श्रीकृष्ण जय श्रीचक्रधर ।।
लेखक :- म. गोपीराजबाबा विद्वांस