न्यायशास्त्राचा 'ईश्वर' विचार
भारतातील तात्विक संप्रदायांना दोन भागांत विभागण्यात आले आहे.
१) आस्तिक आणि २) नास्तिक. वेदप्रामाण्य मानणाऱ्यांना आस्तिक म्हटले जाते आणि वेदप्रामाण्य न मानणाऱ्यांना नास्तिक म्हटले जाते. यानुसार सहा तत्त्वज्ञाने आस्तिक आहेत. १) न्याय २) वैशेषिक ३) सांख्य ४) योग ५) मीमांसा आणि वेदांत. यांना 'षड्दर्शन' असे म्हटले जाते. चार्वाक, जैन आणि बौद्ध यांना नास्तिक म्हणतात. कारण हे वेदाला मानत नाहीत.
आस्तिक आणि नास्तिक यांची आणखी एक व्याख्या आहे. जे ईश्वराचे आस्तित्व मानतात. त्याला अस्तिक म्हणतात आणि जे ईश्वराची सत्ता मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणतात. सांख्य आणि मीमांसा ईश्वराला मानत नाहीत तरीही त्यांना आस्तिक म्हटले जाते. कारण ते वेदाला मानतात.
न्याय आणि वैशेषिक मिळून एक संपूर्ण तत्त्वज्ञान होतं. यांच्यात किंचित फरक आहे. परंतु या दोन्ही संप्रदायांचं ईश्वराविषयी मत समान आहे. म्हणून या दोघांना संयुक्त संप्रदाय 'न्याय-वैशेषिक' म्हटले जाते.
महर्षी गौतम याला न्यायशास्त्राचा रचयिता म्हटले जाते. या न्यायशास्त्राला तर्कशास्त्र, प्रमाणशास्त्र, वाद-विद्या असही म्हटलं जातं. या शास्त्रात तर्कशास्त्र आणि प्रमाणशास्त्र यावर फार जोर दिलेला आहे. न्यायशास्त्र ईश्वरवादी दर्शन आहे. हे शास्त्र ईश्वराला फार महत्त्व देतं. म्हणून न्यायशास्त्राचा विचार भारतीय तत्त्वज्ञानात महत्वपूर्ण मानला जातो. न्यायशास्त्रात 'प्रमाण' शास्त्रानंतर ईश्वरालाच महत्त्व दिलेलं आहे. ईश्वराची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी न्यायशास्त्राने अनेक तर्क दिलेले आहेत.
न्यायशास्त्रानुसार आत्मा दोन प्रकारचा आहे. १) जीवात्मा आणि २) परमात्मा. ईश्वर जीवात्म्यापासून पूर्णतः भिन्न आहे. ईश्वराचं ज्ञान नित्य आहे आणि जीवाचं अनित्य, आंशिक आणि मर्यादित आहे. ईश्वर पूर्ण
आहे आणि जीव अपूर्ण आहे. ईश्वर बद्धही नाही आणि मुक्तही नाही. बंधन आणि मोक्ष हे शब्दप्रयोग ईश्वराला लागू पडत नाहीत. याविपरीत जीवात्मा अगोदर बंधनात असतो आणि नंतर मुक्त होतो. ईश्वर जगाचा पालक, सृष्टा, संहारक आहे. ईश्वर सृष्टीची रचना शून्यातून करीत नाही. तो सृष्टीची रचना पृथ्वी, जल, वायू, अग्नि यांच्या परमाणूंपासून आणि आकाश, दिक्, काळ, मन आणि आत्मा यांच्याद्वारे करतो. सृष्टी रचनेत ईश्वराचं योगदान अनमोल आहे. परमाणूंच्या संयोजनाने सृष्टीची रचना होते. पण हे परमाणु गतिहीन आहेत. ईश्वर या परमाणूंना गतिमान करतो. त्यामुळे ईश्वराशिवाय सृष्टीची कल्पनाच करता येत नाही. जगाची व्यवस्था व्यवस्थित चालण्यामागे सर्वशक्तिमान, सर्वज्ञ व्यक्ती म्हणजे ईश्वरच असू शकतो. ही सृष्टी ईश्वर सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ असल्याचं प्रमाण आहे. ईश्वर जगाचा पालनकर्ता आहे. तो विश्वातील विभिन्न वस्तु स्थिर ठेवतो. जर ईश्वराने विश्वाला धारण नाही केलं तर विश्वाचा अंत होईल. विश्वाला धारण करण्याची शक्ती फक्त ईश्वरातच आहे. ईश्वराला संपूर्ण विश्वाचे ज्ञान आहे. ईश्वराच्या इच्छेशिवाय विश्वातील पानही हालत नाही.
ईश्वर सृष्टा आणि पालनकर्ता असून तो संहारकर्ताही आहे. मातीच्या घड्याचा जसा नाश होतो तसा विश्वाचाही होतो. जेव्हा विश्वात नैतिक आणि धार्मिक पतन होतं तेव्हा ईश्वर आपल्या विध्वंसक शक्तींनी विश्वाचा विनाश करतात. तो विश्वाचा संहार नैतिक आणि धार्मिक अनुशासनासाठी करतो.
ईश्वर जीवाच्या कर्माच फळ देतो. जीवाच्या सर्व कर्माचा निर्णायक ईश्वर आहे. शुभ कर्मांचं फळ सुख आणि अशुभ कर्माचं फळ दुःख असतं. जीवाला त्याच्या शुभ-अशुभ कर्मानुसार ईश्वर त्याला सुख किंवा दुःख देतो. ईश्वराच्या कृपेनेच जीव मोक्ष मिळविण्यात यशस्वी होतो. ईश्वराच्या कृपेनेच तत्त्वज्ञान प्राप्त होतं. तत्त्वज्ञानामुळेच मनुष्य मोक्षानुभूतीची कामना करतो. ईश्वराच्या कृपेशिवाय मोक्ष अशक्य आहे.
न्यायशास्त्रात ईश्वराला अनन्त मानलेले आहे. ईश्वर अनंत गुणांनी युक्त आहे. त्यापैकी सहा गुण प्रधान आहेत. या गुणांना 'षडैश्वर्य' म्हटले जाते.
ते सहा गुण असे. १) आधिपत्य (Majesty) २) वीर्य (Almighty) ३) यश (all glorious) ४) श्री (infinitely beautiful) ५) ज्ञान (Knowledge) आणि ६) वैराग्य (Detachment) इ. हे गुण ईश्वरात पूर्ण रूपाने व्याप्त आहेत. • ईश्वराच्या अस्तित्वाचं प्रमाण
न्यायदर्शनात ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी अनेक तर्कांचा प्रयोग केलेला आहे. त्यापैकी हे मुख्य आहेत.
१) कारणाश्रित तर्क
विश्वाकडे पाहिल्यावर विश्वात दोन प्रकारच्या वस्तु दिसतात. पहिल्या प्रकारच्या वस्तूंना निरवयव म्हटले जाते. कारण त्या वस्तु अवयवहीन आहेत. या वस्तूत आत्मा, मन, दिक्, काल, आकाश, पृथ्वी, जल, वायू, अग्नि यांचे परमाणु येतात. हे परमाणू नित्य आहेत. यांची नित्यता ईश्वरासमान आहे. त्यामुळे यांचा नाश आणि निर्मितीचा प्रश्नच येत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वस्तूचं उदाहरण सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, पर्वत, समुद्र इ. आहेत. हे मातीच्या घड्याप्रमाणे अनित्य आहेत. या सावयव वस्तूंच कारण काय? प्रत्येक सावयव वस्तूच्या निर्मितीसाठी दोन कारणे लागतात. १) उपादान कारण आणि २) निमित्त कारण. मातीच्या घड्याचं उपादान कारण माती आहे आणि निमित्त कारण कुंभार आहे. म्हणून या सावयव वस्तूही कोणी निमित्त कारण किंवा कर्त्याद्वारे उपादान (परमाणूंच्या कारणांच्या संयोगाने उत्पन्न होतात. तो कर्ता निश्चितच बुद्धीमान आहे. कारण कर्त्याशिवाय उपादान कारणांचं असं व्यवस्थित रूप शक्य नाही. घटही तोच बनवू शकतो. ज्याला मातीचं (उपादान कारण) प्रत्यक्ष ज्ञान आहे. घट बनवण्याची इच्छा आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न करतो. तद्वत् ज्याला परमाणूंचे अपरोक्ष ज्ञान आहे. ज्याला विश्व निर्माण करायची इच्छा आहे आणि त्यासाठी तो प्रयत्नशील आहे तोच चेतन पुरूष विश्व बनवू शकतो. याप्रमाणे कर्त्याचे सर्व गुण ईश्वरातच दिसतात. म्हणून विश्वाचं निमित्त कारण म्हणजे कर्त्याच्या रूपात ईश्वराचं अस्तित्व सिद्ध होतं. याला कारणाश्रित तर्क म्हटले जाते. कारण हा तर्क कार्य कारण सिद्धान्तांवर आधारित आहे. विश्वाला कार्य मानून ईश्वरालाकारणाच्या रूपात सिद्ध केलेलं आहे..
२) नैतिक तर्क
जगातील लोकांकडे पाहिल्यास त्यांच्या सुख-दुःखात अत्यंत विषमता आहे. जगात काही लोक सुखी आहेत तर काही दुःखी आहेत. काही लोक कष्ट न करता सुखाचा उपभोग घेत आहेत तर काही लोक जीवापार कष्ट करूनही आपल्या प्राथमिक गरजाही भागवू शकत नाहीत. काही लोक बुद्धिमान आहेत तर काही मूर्ख आहेत. कुठे कुठे असे चित्र दिसते की, पुण्य करणारी व्यक्ती दुःख भोगते तर पाप करणारा सुख भोगत असतो. मनात सहजच प्रश्न निर्माण होतो की या विषमतेचं काय कारण आहे? कारण-नियमाप्रमाणे प्रत्येक घटनेचं कारण असतं. या नियमाने विश्वातील लोकांच्या भाग्यात विषमता आहे याचही कारण निश्चित असेल. कारण शून्यातून कोणत्याही घटना निर्माण होत नाहीत. विश्वातील विभिन्न घटनांचा नियामक आहे. 'कर्म-नियम' (Law of Action) या नियमाने मनुष्याच्या सर्व कर्मांची फळे सुरक्षित राहतात. शुभकर्मांनी सुखाची प्राप्ती आणि अशुभ कर्माने दुःखाची प्राप्ती होते. याप्रमाणे शुभ किंवा अशुभ कर्म क्रमशः चांगल्या किंवा वाईट फळाला कारण ठरतात. म्हणूनच कर्मच आपल्या सुख आणि दुःखाचे कारण आहे.
आपल्या कर्मांची फळे आपल्याला एकाच जीवनात मिळत नाहीत. काही कर्माची फळे या जीवनात मिळतात आणि काही फळे संचित राहतात. म्हणून असं मानलं जातं की, वर्तमान जीवन मागील जन्माच्या कर्मांचे फळ आहे आणि आताच्या कर्माचं फळ पुढील जीवन असेल. आपल्या शुभ कर्मांनी पुण्य मिळते आणि अशुभ कर्मांनी पाप लागतं. न्यायशास्त्रात शुभ किंवा अशुभ कर्मांनी उत्पन्न पुण्य आणि पापाच्या भंडाराला 'अद्दष्ट' म्हणतात. वास्तविक अद्दष्ट हे आपल्या मागील जन्माच्या आणि आताच्या पाप-पुण्याच्या कर्मांचं भांडार आहे. या अद्दष्टामुळे मनुष्याला वर्तमानकाळात आणि भविष्यात सुख-दुःखाची प्राप्ती होते. पण हे अद्दष्ट 'अचेतन' म्हणजे जड आहे. त्यामुळे ते स्वतः कर्म आणि त्यांच्या फळांची व्यवस्था करू शकत नाही. त्यासाठी एखाद्या बुद्धीमान मनुष्याची आवश्यकता आहे. अद्दष्टाचा संचालक जीवात्मा होऊ शकत नाही. कारण त्याच ज्ञान मर्यादित आहे. त्यामुळे त्याला अद्दष्टाविषयी काही ज्ञान नाही. जीवात्म्यात एवढं सामर्थ्य नाही की तो अद्दष्ट फळे आपल्या ईच्छेप्रमाणे मिळवू शकेल. त्यामुळे अद्दष्टाचा संचालक म्हणून ईश्वराला मानणे आवश्यक आहे. तो सत्य, शाश्वत, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ आहे. म्हणून तो अद्दष्टाचं संचालन करू शकतो. जर्मन तत्त्वज्ञ 'कान्ट' यानेही या नैतिक युक्तीला प्रामाणिक म्हटले आहे. त्याच्या मते ईश्वरच पुण्याला सुखाशी आणि पापाचा दुःखाशी संयोग करतो.
(३) श्रुति आधारित तर्क -
श्रुति ईश्वराच्या अस्तित्वाची चर्चा करते म्हणून श्रुति ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. तो सर्व विषयांचा स्वामी आहे. सर्वज्ञ, अन्तर्यामी आहे, जगाचे कारण आहे, सृजक आणि संहारक आहे (माण्डुकय उपनिषद ६). तो सर्व जड आणि चेतन वस्तुंचा संचालक आहे. (श्वेताश्वतर उपनिषद १८). तो सर्व आत्म्यांचा शासक आणि जगाचा कर्ता आहे. (कौशितक उपनिषद ४७, ४८). तो कर्माचं फळ देणारा आणि सर्वांचा आश्रय आहे, तो जीवांच्या कर्माचे फळ देणारा आहे. (श्वेताश्वतर उपनिषद ६,२,६६) तो सर्वांच्या हृदयात निवास करतो आणि सर्वांचा संचालक आहे. (बृहदारण्यक उपनिषद (४.४). भगवान श्रीकृष्णानेही गीतेत स्वतः म्हटले आहे. मीच या जगाचा माता-पिता आहे. संचालक आणि स्वामी आहे. सर्वांच अंतिम ठिकाण मीच आहे. प्रभू, साक्षी, निवास, आधार मीच आहे (गीता ९-१७,१८). या श्रुतिंवरून ईश्वर सृजक, पालनकर्ता, संहारक, सर्वांचं स्वामी, कर्म-फलदाता आणि विश्वाचा नैतिक संचालक असल्याच प्रमाण मिळतं. या श्रुति ईश्वराच्या अस्तित्वाचा उल्लेख करतात. त्यावरून ईश्वराची सत्ता प्रमाणित होते.
म. युवराज बाबा