परब्रम्ह परमेश्वर श्रीचक्रधरस्वामींचे अवतार कार्य
गुजरातचा राजा मल्लदेव याने मृत्यूसमयी आपला दत्तक पुत्र सज्ञान होईपर्यंत आपल्या राज्यकारभाराची धुरा प्रधान विशाळदेवाचे हाती सोपविली. हरिपाळदेव हे प्रधान विशाळदेवाचे पुत्र. यांचा जन्म शके १९१६ मध्ये झाला. यादवांचा राजा सिंघण याने शके १९३८ मध्ये भडोचवर केलेल्या स्वारींच्या प्रसंगी तसेच त्याने शके ११४१ मध्ये अनहिलवर केलेल्या स्वारींच्या प्रसंगी प्रधान पुत्र हरिपाळदेव त्यांच्याशी लढला होता. पुढे शके ११४३ वृषभ नाम संवत्सर भाद्रपद शुद्ध द्वितीयेला हरिपाळदेव कालवश झाले.
कालवश झाल्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्य विधीसाठी स्मशानभूमीमध्ये आणण्यात आला. त्यावेळी एक चमत्कार घडला. हरिपाळ देवाच्या मृत शरीरामध्ये दिव्य तेजस्वी अशा ईश्वरी स्वरुपाने प्रवेश केला आणि हरिपाळदेवाच्या देहामध्ये चेतनत्व निर्माण झाले. आणि हे सचेतन झालेले हरिपाळ देव म्हणजेच परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामी.
त्यानंतर सांसारिक जीवनावर उदास असणाऱ्या हरिपाळ देवांनी रामटेकच्या यात्रेला जाण्याच्या निमित्ताने भडोचच्या राजवैभवाचा त्याग केला आणि ते ऋद्धपूर येथे आले. तेथे अलौकिक अवतार श्री गोविंदप्रभू यांच्या कडून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. त्या प्रसंगी श्री गोविंद प्रभुंनी देवाला श्रीचक्रधर या नावाने संबोधले ते नाव परमेश्वराने स्वीकारले...
त्यानंतर ते विदेह अवस्थेमध्ये भ्रमण करु लागले. सुमारे ३६ वर्षांचा काळ एकांकामध्ये व्यतीत केल्यानंतर स्वामी पैठण येथे आले. पैठणला बाईसांना प्रेमदान केल्यावर स्वामींच्या अवतार कार्याला सुरवात झाली. आणि 'यदा यदा हि......सृजाम्यहं' हे द्वापर युगातील भगवान श्रीकृष्णांचे वचन सत्य केले.
तर सर्वज्ञांनी कोणते कार्य केले? कोणती क्रांती केली? यापूर्वी त्या वेळची सामाजिक परिस्थिती काय होती? धार्मिक परिस्थिती काय होती? राजकीय परिस्थिती काय होती? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यावेळी महाराष्ट्रात तो काळ यादवांच्या भरभराटींचा होता. देवगिरीचा यादव राजा सिंघण याच्या काळातच हेमाद्रि या वैदिक पंडिताने 'चतुवर्ग चिंतामणी' या नावाचा वर्षाकाठी २००० व्रते करायला सांगणारा एक बृहद ग्रंथ तयार केला. कोणत्या देवतेकरीता कोणते व्रत करावे, कोणत्या व्रताकरिता कोणते साहित्य हवे, त्या करीता कोणता विधी करावा, कोणती पक्वान्ने करावी, व किती ब्राम्हण जेवायला बोलवावे, याची संपूर्ण माहिती या ग्रंथात दिली आहे. म्हणजे मला तरी वाटते की, पृथ्वीच्या पाठीवर इतकी व्रते प्रतिपादन करणारा यासारखा विस्तृत ग्रंथ नसावा.
त्या वेळच्या लोकांची व्रत वैकल्ये करण्याकडे प्रवृत्ती असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ विनाकारण कोणी तयार करणार नाही. म्हणजे त्या काळात देवी देवतांचे व व्रत वैकल्यांचे प्रस्थ किती वाढले असेल, याची कल्पना या ग्रंथावरून सहज करता येईल.
यादवांच्या राजवटीत स्वास्थ्य लाभल्यामुळे शूद्र म्हणून उपेक्षिलेला अफाट समाज पुष्कळ सुधारलेला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. पण बौद्धिक आणि मानसिक स्थितीची उपासमार होत होती. कारण सर्व धर्म ग्रंथ संस्कृतमध्ये. वादविवाद संस्कृतमध्ये. फक्त पुरावे ऐकल्यामुळे त्यांचे समाधान न होता उलट गोंधळच होई. शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केल्यानंतर वर्णभेद, कर्मकांड व उच्चनीचता ही असह्य झाली होती.
(१) त्या काळचा हिंदू समाज वर्णाश्रम पद्धतीने घट्ट आवळलेला होता.
(२) स्त्री-शूद्रादिकांना मोक्षाचे व धर्माचे द्वार खुले नव्हते.
(३) सर्व धर्म ग्रंथ संस्कृत भाषेच्या कडी कुलपात बंद होते. सामान्य लोकांची मातृभाषा मराठी होती. तर विद्वानांची, ग्रंथांची, तत्त्वज्ञानाची भाषा संस्कृत होती.
(४) शंकराचार्यांचा केवळ अद्वैत आणि रामानुजाचार्यांचा विशिष्ट अद्वैत सिद्धान्त केवळ विद्वान पंडित लोकांनाच ज्ञात होता. सामान्य लोकांना या तत्त्वज्ञानाचा गंधही नव्हता. हे तत्त्वज्ञान ऐकण्याचा शूद्रादिकांना अधिकारही नव्हता.
(५) चातुर्वर्ण्य व्यवस्थेतून निर्माण झालेल्या जातीभेदांने सारा हिंदू समाज उच्च नीचतेच्या व जन्माधिष्ठित श्रेष्ठत्त्वाच्या वातावरणात वावरत होता.
(६) वैदिक मत प्रणालीच्या प्राबल्यामुळे स्त्रीशूद्रादिकांना संन्यास घेण्याचा अधिकार नव्हता.
(७) ब्राम्हण जन्माशिवाय मोक्ष मिळू शकत नाही ही कल्पना रुढ झाली होती.
(८) जप जाप्य, नेम धर्म, व्रतवैकल्ये या द्वारा देवी देवतांच्या उपासनेचे प्रस्थ बरेच वाढले होते.
(९) सर्वसामान्य बहुजन समाज तत्त्वज्ञानाच्या अभावी बाह्य आचाराच्या गर्तेत अज्ञानाने वावरत होता.
अशा परिस्थितीमध्ये सर्वज्ञांनी आपल्या धर्मप्रसाराच्या कार्याला सुरूवात केली. त्यावेळी उपलब्ध असलेल्या वेद, उपनिषद, ब्रम्हसूत्र या कोणत्याही प्राचीन ग्रंथाचा आधार न घेता, स्वतंत्र, स्वयंभू, निश्चितार्थबोधक असे परमेश्वरीय तत्त्वज्ञान समाजासमोर मांडले आणि त्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या हृदयाची जी मराठी भाषा; त्या मराठी भाषेचा आधार घेतला त्याकाळी विद्वानांकडून मान्यता प्राप्त अशा संस्कृत भाषेला बाजूला सारुन मराठी भाषेला धर्म-भाषेचे सिंहासन प्राप्त करुन दिले. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित झालेले त्यांचे शिष्य-प्रशिष्य हे संस्कृत भाषेचे महान विद्वान पंडित असतानाही त्यांनी संपूर्ण ग्रंथ निर्मिती मराठी भाषेतून केली. त्यामुळे मराठी साहित्यामध्ये फार मोठी मोलाची भर पडली असून मराठी साहित्याचे दालन समृद्ध संपन्न झाले आहे. श्रीचक्रधर स्वामींची ही महाराष्ट्राला व मराठी भाषेला फार मोठी देणगी आहे. त्याचप्रमाणे सर्वज्ञांनी शूद्रादिकांना धर्माचे व मोक्षाचे द्वार खुले करुन दिले. चहू वर्णाचा कोणीही असो, त्याला धर्माचा व मोक्षाचा अधिकार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. इतकेच काय पण आपल्या अनुयायांना चहूवर्णी भिक्षा करा. असा आदेश दिला. स्वामींना जातीभेद, स्पृश्यास्पृश्यता मान्य नव्हती. जोगेश्वरी येथे स्वामींची निवास असतांना एका मातंगाने अर्पण केलेला लाडू त्यांनी स्वीकार केला. व एकदा डोमेग्राम येथे स्वामींचा निवास असताना दाको नावाच्या चांभाराने स्वामींना जाडी व चवरी अर्पण केली. त्याचा स्वामींनी स्वीकार केला. आपल्या पंगतीला बसवून त्याला जेऊ घातले. स्वामी स्वतःही ब्राम्हण होते. परंतु त्यांनी 'मी ब्राम्हण आहे' असे कुठेही म्हटले नाही. महदाईसाचा व तिकव नायकाचा जेव्हा वाद झाला, त्याप्रसंगी स्वामी म्हणाले, 'हे ब्राम्हण की क्षत्रिय की वैश्य की शुद्र हे नेणीजे की बाई.? एक वेळ स्वामी हेडाऊंच्या समवेत ओरंगळ प्रांती गेले होते. त्यावेळी तेथे घोड्यांच्या खरेदीसाठी एक व्यापारी आला. तो स्वामींचे सौंदर्य पाहून म्हणाला, ' जी, जी, मला एक कन्या रत्न आहे. तिच्यासाठी मी पायी कापड बांधून पुष्कळ फिरलो. परंतु तिच्या रुपाअनुरुप वर कुठेच मिळाला नाही. तरी आपण तिचा करावा'. त्यावेळी स्वामी म्हणाले, 'एथ जाती कुळ नाही.' म्हणजे स्वामींना जातीभेद हा मुळीच मान्य नव्हता.
स्त्रियांनाही मोक्षाचे दार उघडे करण्याचे धैर्य उघडपणे सर्वप्रथम सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामींनी दाखविले आहे. एकदा स्वामी डोमेग्राम येथे स्त्रियांना मोक्ष मार्गाचे धर्माचे निरोपण करीत होते. त्यावेळी पैठणचे सारंग पंडित ब्राम्हण तेथे येत होते. ते दृष्य पाहून दुरुन ते म्हणाले, 'कैसीया गुलगुलीचा सातसीया परवडी वेढूनी बैसलिया असती. अवघीया नेऊनी घालावीया तेलंग देसी. मग कांडवावे कोदे. मग आपण असावे मनात भावत स्वामींच्या जवळ येऊन पोहचले. तेव्हा स्वामींनी त्यांच्या मनातील भाव जाणून त्यांना सीक्षापण केले आणि म्हणाले, ' धर्माचीया चाडा एथ बाईयाची का नसावे ? हा गा, तुमचा काई जीव याचीया का आन जिऊलिया? तुमई आनु देवो राखीता आणि याते काई आनु देवो राखीता? ऐसे काई एथ असे ? असे शाब्दिकही शिक्षापण केले. म्हणजे ज्याप्रमाणे पुरुषांना मोक्षाचा अधिकार आहे, त्याप्रमाणे स्त्रियांनाही मोक्षाचा अधिकार आहे. हे त्या वेळी स्वामींनी दाखवून दिले. म्हणजे स्त्रियांनाही समानतेचे हक्क देण्याचे कार्य सर्व प्रथम सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी केले आहे.
त्याचप्रमाणे स्त्रियांच्या अनेक समस्या स्वामींनी सोडविल्या आहेत. स्त्री मुक्तीची चळवळ आगरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे यांच्यापासून सुरु झाली. असे जरी आपण म्हणत असलो, तरी सुमारे ८०० वर्षापूर्वीच ही क्रांतीची लाट आली होती. स्त्री मुक्तीची चळवळ सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या काळापासूनच सुरु झाली होती. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आद्य स्त्री मुक्तीचे जनक म्हटल्यास ते वावगे होणार नाही.
स्वामी अहिंसा धर्माचे थोर पुरस्कर्ते होते. आपल्या वृत्तीने, वाणीने व मनाने ते कधीच कुणाला दुखवीत नसत. आणि म्हणूनच संसाराच्या त्रिविध तापानी पोळलेल्या अंतःकरणाचे जीव सावलीसाठी आणि विसाव्यासाठी त्यांच्याकडे येत असत. हिंसा करु नये. हिंसा केल्यामुळे नरक प्राप्त होतात. हिंसा घडलेल्या ठिकाणी साधकाने राहू नये. मुंगीचे सुद्धा वैर चिंतू नये. नेहमी प्रिय भाषण करावे. कोणाच्याही वर्मावर घालणारे अभद्र शब्द बोलू नये. असा अहिंसेचा धर्म त्यांनी शिकविला. देईगावच्या
ब्राम्हणाला पाच मुली होत्या. त्या पाचही मुली विधवा होत्या. म्हणून सर्व लोक त्याला 'पंचरांडा आला, पंचरांडा गेला' असे म्हणत. ह्या चिडविण्यामुळे तो फार दुःखी होत असे. एक वेळ तो स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामी त्याला म्हणाले, 'भटो, या. तुमचीया पंचगंगा निकेनी असती'. तो म्हणाला, 'जी. निवालो जी. मला आजपर्यंत असे चांगले शब्द कोणीच बोलले नाही'. स्वामींनी आपल्या वाणीने त्याचे अंतःकरण शांत केले. बोलणे असे गोड सुखद असावे. त्यात प्रेमाचे पुरण असावे. ऐकणारा प्रसन्न झाला पाहिजे. आपल्या शिष्यांनीही दुसऱ्याचे अंतःकरण दुखविता कामा नये. म्हणून स्वामी किती जपत असत. याचे एक उदाहरण पहा. एकदा पद्मनाभीने परमाणू अनुभव देवाचे अंतःकरण दुखविले. हे स्वामींना बिलकूल आवडले नाही. त्यांनी त्याला आपल्या सान्निधानी येऊ दिले नाही. एके दिवशी एक कुत्रे मठात शिरले. त्या कुत्र्याने भटोबासांची अन्नाने भरलेली झोळी पळवून नेली होती आणि आता दुसऱ्या दिवशी पुन्हा ते कुत्रे मठाकडे आले होते. त्या दिवशी मठाची राखण करण्याचे काम आऊसाकडे होते. तिने त्या कुत्र्याला पाहताच हातात एक दगड घेतला आणि त्या कुत्र्याला मारला. त्याला तो दगड लागताच ते मोठ्याने के काटले. तो आर्त स्वर ऐकता क्षणीच स्वामींनी आपला श्रीमुगुट धरला. जणू तो दगड त्यांच्याच श्रीमुगुटला लागला होता. आणि त्यामुळे त्यांचे शरीर आणि मन दुखविले गेले होते. त्यांनी शांतपणे आऊसाला विचारले, 'हे सुने का हाणीतले' ? ती म्हणाली, 'जी स्वामी जगन्नाथा, काल याने नागदेवाची झोळी पळवून नेली आणि आज हे पुन्हा आले. म्हणून मी याला मारले. स्वामी म्हणाले, 'याला कोणी माय बहीण आहे? की ती याच्यासाठी स्वयंपाक करुन ठेवील? आणि तेथे जाऊन हे जेवण करील? असे तर याला कोणीच नाही. मग ते कुत्रे तुमचे अन्न नेण्यासाठी आले, यात त्याचे काय चुकले? आवश्यकता असल्यास तुम्ही आपल्या अन्नाचा नीट सांभाळ करा. पण त्यासाठी या बिचाऱ्याला का मारता? दयाळू अंतःकरणाच्या सर्वज्ञांचे किती थोर विचार आहेत ? भूतमात्रांना होणारा त्रास जणू आपणालाच होत आहे या भावनेने वागल्यास आपली व इतरांची किती तरी दुःखे कमी होतील. जग सुखाने नांदू लागेल आणि म्हणूनच सर्वज्ञांनी उपदेशही केला. हिंसा घडलेल्या ठिकाणी साधकाने राहू नये. मुंगीचे सुद्धा वैर चिंतू नये. साधकाने नेहमी प्रिय भाषण करावे. कोणाच्या वर्मावर घाव घालणारे अभद्र शब्द बोलू नये. असा अहिंसेचा संदेश त्यांनी दिला. व्यक्तिच्या आणि पर्यायाने समाजाच्या उन्नयनाच्या दृष्टीने स्वामींचा दुसरा आदेश हा आहे की, मनुष्य जीवाने विकारापासून व विकल्पापासून मुक्त रहावे. निवृत्तीमार्गी भिक्षुकाने तर विकारावर संपूर्ण विजय मिळविला पाहिजे. पण प्रापंचिक व्यक्तीनेही संयमशील जीवन जगावे. त्याने स्वैर वागू नये. मद्य मांसादी व्यसनांचा त्याग करुन सात्विक जीवन जगावे. परस्त्री रामन, परद्रव्यापहरण, मिथ्या भाषण, चोरी, निंदा इत्यादी दोषापासून, पापापासून कटाक्षाने अलिप्त रहावे. अशी शिकवण त्यांनी दिली. त्याचप्रमाणे तुम्ही संसार शरण असा की ईश्वर शरण असा, पंचात असा की भक्ती मार्गात असा. तुम्ही प्रयत्नवादी असावे. साक्षेपशील असावे. प्रयत्नवादी जीवाला ईश्वर साह्य करतोच. अशी प्रयत्नवादाची शिकवणही सर्वज्ञांनी दिली. संसार तापाने पोळलेल्या जीवांना अद्वैताश्रित वेदोक्त देवतोपासनेच्या कर्मकांडातून सोडवून परमेश्वराच्या अनन्य भक्तीचा मार्ग त्यांनी उपदेशिला प्रयत्नांची कास न सोडता अखेड ईश्वरस्मरण करावे. मारिता, पूजीता समान मानावा, असा मानवतेचा धर्म त्यांनी शिकविला. वैरीयाचा देवो जाला, तरी काई दगडे हाणौनी फोडावा? असे सांगून सर्वधर्मसमभावाचा व समानतेचा त्यांनी दिव्य संदेश दिला. विश्व बंधूत्वाची शिकवण दिली. हे करण्यसाठी स्वामींनी महाराष्ट्रात अखंड परिभ्रमण केले. त्यात गरीब-श्रीमंत, ब्राम्हण-शूद्र, स्त्री-पुरुष, उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव केला नाही. जीव मात्रांचे आणि पर्यायाने समाजाचे, समग्र मनुष्य जातीचे खरे कल्याण, खरा विकास करण्यास सहाय्यभूत अक्षय मार्गदर्शन आपल्यावचनातून आणि प्रत्यक्ष वर्तनातून त्यांनी दिले. म्हणजे आधी केले मग सांगितले, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आमचे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी. अशी ही स्वामींची शिकवण, त्यांनी दिलेला दिव्य संदेश आपण जर आपल्या जीवनात, आचरणात, कृतीत आणला, तर आपलेही ऐहिक व परमार्थिक जीवन सुखी व संपन्न होईल. जीवनाचे साफल्य होईल. सार्थक होईल, जीवन कृतकृत्य होईल.
लेखक :- त. मालती बाईजी खामनीकर