कथा संग्रह - चंचल मनाच्या नाना तर्‍हा

कथा संग्रह - चंचल मनाच्या नाना तर्‍हा

 कथा - चंचल मनाच्या नाना तर्‍हा 

          मन हे मृगजळासारखे आहे. भासते पण हाती लागत नाही. समजल्यासारखे वाटते पण समजत नाही. असो, मनाचे स्वरूप कसेही पण एक गोष्ट मात्र सत्य ते आपल्याच शरीरात आहे. ते फार प्रभावी आहे. मनाइतकी चंचल दुसरी कोणतीच वस्तु नाही. आपल्या ऐपतीपेक्षा उच्च अपेक्षा मनाच्या ठिकाणी असतात. दुसऱ्याचं सौंदर्य पाहून आपलही तसच असावं अस मनाला वाटते. दुसऱ्याची संपत्ती बघून आपल्याजवळ तशीच असावी अशी खंती मनाच्या ठिकाणी सतत वावरत असते. मन एक पाखरू आहे. त्याला पाखराप्रमाणे उंच भरारी मारावी वाटते. मन एक वायु आहे. त्याला वायुप्रमाणे सतत भ्रमण करावे वाटते. म्हणूनच कवियत्री बहिणाबाई चौधरी आपल्या 'मन' या कवितेत म्हणतात

मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर।

किती हाकला-हाकला फेरी येते पिकावर ॥

म्हणूनच संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात

“मन करा रे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण ।” 

या विषयावर एक रोमांचक कथा रेखाटली आहे. अशी यमुना नदीच्या काठी एक वडाच्या झाडावर एक कावळा राहात होता. तो आपला उदरनिर्वाह करून आपले जीवन आनंदाने जगत होता. आनंदाच्या भरात बरेच दिवस निघून गेले. असाच एक दिवस तिथे एक पांढराशुभ्र, लामलचक मानेचा, सौंदर्यवान बगळा आला. तेथील परिसर बगळ्याला चांगला वाटला. त्याची शिकार तिथे चांगल्या प्रकारे झाली. तेथील वातावरण त्याला रम्य वाटले. मग तो दररोज तिथे येऊ लागला.

अशीच एक दिवस कावळ्याची आणि बगळ्याची भेट झाली. सौंदर्यवान पांढराशुभ्र बगळ्याला पाहून कावळा आश्चर्य चकित झाला. प्रथमतः कावळ्याने बगळ्याला विचारले, “आपण कुठले आहात ? आणि कोणीकडून आलात?” तत्समयी बगळ्याने कावळ्याच्या प्रश्नाला उत्तर दिले, “आम्ही नर्मदा तिरावरचे. तिकडील परिसर भकास वाटतोय. तिकडे पोटापाण्याची व्यवस्था होत नाही म्हणून यमुना नदीच्या तिरावर निवासस्थानासाठी आलोय.” 

हे ऐकून कावळ्याला आनंद वाटला. मग हळू-हळू दोघांची मैत्री जमली. दोघेही एकत्रच राहू लागले. एकमेका वाचून एकमेकाला चैन पडत नव्हते. असे आनंदाने दोघेही एकत्रच राहून लागले.

परंतु मन हे चंचल आहे. कावळ्याच्या मनात एक विचार मात्र सतत घुमत होता. पांढऱ्याशुभ्र बगळ्याकडे पाहून आपल्या काळ्याकुट्ट रंगाकडे पाहून त्याच्या मनाला खंती वाटायची. तो मनात म्हणायचा- 'आपला मित्र किती चांगला आहे. दुधासारखा पांढराशुभ्र, चकचकित मीही तसाच तर किती दिसलो असतो.'

तो परमेश्वराला म्हणायचा- 'हे देवा! मी किती काळा रे आणि माझा मित्र किती पांढरा शुभ्र सौंदर्यवान आहे. हे असे का ? मीच काळा आणि तो पांढरा.' असा शोकाकुल परमेश्वराजवळ कावळा दररोज करायचा. एक दिवस कावळ्याने मित्र बगळ्याला विचारले, 'मित्रा! बगळेदादा!! तू किती सुंदर आहेस रे आणि असा काळाकुट्ट मलाही तुझ्यासारखाच व्हावसं वाटतं.

बगळा स्वरुपाने होता सुंदर, पण स्वभावाने होता कुच्चर 'कावळा स्वरुपाने होता काळा, पण स्वभावाने होता भोळा'

मित्र कावळ्याचे उद्गार ऐकून कपटी (कुच्चर) बगळा म्हणाला, 'काय सांगु मित्रा ! मी पण तुझ्याही पेक्षा काळाकुट्ट होतो. मलाही अशीच माझ्या स्वरूपाविषयी खंती वाटायची एक दिवस मी असे केले की, एका खरखरीत अशा दगडावर बसून मी माझे अंग घासून काढले. काय सांगू मित्रा! मी जस-जसा अंग घासत होतो तसा-तसा माझा रंग पांढराशुभ्र होत होता. असे अंग घासून-घासून मी माझे काळेस्वरुप सर्व नष्ट केले आणि दुधासारखा पांढराशुभ्र होऊन वावरत आहे.'

भोळा बगळ्याला म्हणाला, “मीही तसेच केले तर तुझ्यासारखा त सुंदर दिसेल.” तत्समयी कुच्चर बगळा उत्तरला, “हो मित्रा! त्यात संशयच नाही. न तूही माझ्यासारखाच होशील.” 

असे म्हणून कपटी बगळा स्वगृहाकडे निघून गेला. बिच्याऱ्या भोळ्या कावळ्याने कपटी बगळ्याचे बोल सत्य मानून एका खरखरीत दगडावर आपले अंग घासण्यास सुरुवात केली. जसा-जसा अंग घासत होता तस-तसा पांढरा व्हायचा सोडून लाल होत होता. अंगावरचे पंख जाऊन आतील लाल त्वचा तो दिसत होती तरीही घासतच होता. रक्त निघायला लागले. आतील मांस दिसत होते. मग मात्र व्यथा होऊ लागली मग तडफडू लागला.

मनाला म्हणू लागला, 'मित्र बगळ्याने आपल्याला फसविले. विश्वासघात केला. आपण मात्र बगळ्याचे ऐकून काही चांगले केले नाही. उलट आपण मात्र बगळ्याचे ऐकून आपण आपलाच घात करून घेतला.' असा पश्चाताप करीत नदीच्या रेतीवर आपले देह टाकून चरफटत मरून गेला. 

तात्पर्य :- १) म्हणून मन सतत प्रसन्न ठेवायला हवे. जरी मन प्रसन्न नसेल तरी कावळ्याप्रमाणे शरीर मात्र जाऊ द्यायला नको. म्हणून संत कबीर दास सांगतात-

मन गया तो जाने दे मत जाने दे शरिर । 

२) दुसऱ्याचे वाईट ऐकून आपला घात करून घेऊन नये. म्हणूनच -

"ऐकावे जनाचे, करावे मनाचे"

३) साधी भोळी व्यक्ती बघून फसवा-फसवी (विश्वासघात) करू नये.

कोणाचे वाईट चिंतू नये.


===================

मनुष्याचे खरे कर्तव्य

काशी नगरात मनमोहन नावाचा एक गरीब परंतु प्रामाणिक मनुष्य राहात असे. त्याच्यांत फार दूर दृष्टी होती. आपले भले कशांत आहे, हे तो चांगले जाणत असे. त्याला श्रीरंग नावाचा एकुलता एक मुलगा होता. तो फारच हुशार होता. मनमोहनजवळ होत नव्हतं, ते सर्व खर्च करून त्याने श्रीरंगला, शिक्षण देऊन मोठा इंजिनियर बनविले होते. त्याची आता काळजी मिटली होती.

काही दिवसांनी श्रीरंग कमावतां झाला. मोठमोठे काम त्याला मिळू लागले. वडिलांचे कर्ज पुरते फिटले होते. पुढे श्रीरंगचे लग्न एका श्रीमंत व सुस्वरुप मुलीशी झाले. दिवसेंदिवस मुलगा अती श्रीमंतीकडे वाढू लागला. भला मोठा बंगला त्याने आता बांधला होता. घरी नोकर-चाकर आले होते. मोटार वाहनही आले. श्रीमंती वाढतच होती.

आता मात्र श्रीरंगला आपल्या जुन्या वळणाच्या वडिलांचीही लाज वाटू आपल्याकडे लागली. येणाऱ्या जाणाऱ्या बड्या बड्या लोकांसमोर आपले वडील वावरायला नकोत. म्हणून बंगल्यातील एक बंदिस्त खोलीत त्याने त्यांना राहण्यास बाबा तुम्ही म्हातारे झाल्यानंतर ही बेल तुमच्या उपयोगात येईल सांगितले. वडिलांना काही वस्तुंची गरज भासल्यास त्यांनी ती बेल वाचवूनच मागवावी, असा कटाक्ष त्याने वडिलांना घालून दिला होता.

स्वाभिमानी मनमोहनजींना श्रीरंगचे हे वागणे अपमानास्पद व जहरासारखे वाटले. परंतु इलाज नव्हता. कारण मनमोहनजी आता आजारपणाने जर्जर व फारच अशक्त झाले होते.

मनमोहनजींचा नातू अजय फारच हुशार होता. त्याला वडिलांचे (श्रीरंगचे) आजोबांशी वागणे बरे वाटत नव्हते. त्याने आजोबांकरीता लावलेली बेलच काढून, लपवून ठेवली. सायंकाळी श्रीरंग घरी आला. आज दिवसभर आपल्या वडिलांनी खाण्यापिण्यास काहीच मागितले नसल्याचे त्याच्या बायकोकडून व इतरांकडून त्याला कळले. हे ऐकून श्रीरंग व त्याची बायको पूर्णपणे घाबरली होती. कदाचित वडिलांनी 'राम' तर म्हटला नाही ना? अशी दाट शंका त्या दोघांच्या मनांत आली. नवरा-बायको दोघेही वडिलांच्या खोलीत गेली. पाहतांत तर आपले वृध्द वडील शांतचित्त बसलेले त्यांना दिसले. श्रीरंग वडिलांना बेल न वाजविण्याचे व काहीही न मागण्याचे कारण विचारले. परंतु बेल (घंटा) तर तेथे हवी ना ? घंटेची बरीच शोधाशोध झाली. नातवानेच ती काढून घेतल्याचे नंतर उघडकीस आले. वडील अजयवर खूपच रागावलेत. परंतु घंटा का काढून घेतली याचे उत्तर ऐकून मात्र श्रीरंग व त्याची बायको बरेच खजिल झालेत. अजयचे समर्पक उत्तर असे होते.

'बाबा आपण व आई, आजोबांसारखे म्हातारे झाल्यावर, त्यांच्याप्रमाणेच मागील खोलीत जाऊन बसाल, तेव्हा आपण दोघांनाही ती घंटा उपयोगी पडणार नाही काय? अजयचे बोलणे श्रीरंग व त्याच्या आईच्या जिव्हारी झोंबले. त्याच्या वडिलांचे डोळे पाणावलेत. श्रीरंगने ताबडतोब आपल्या वडिलांची क्षमा मागितली. पुढे अजयच्या आई-वडिलांनी आजोबांची खूप सेवासुश्रुषा करून मनमोहनजींचे भरपूर आशिर्वाद घेतले. 

तात्पर्य - बालमित्रांनो, जमन्मदाते माता-पिताच आपले खरे आश्रयदाते त्यांची सेवासुश्रुषा करणे हेच खरे कर्तव्य होय. सुखमय व आनंदमय जीवन 'खाण' ही नकळत आई-वडिलांपासूनच आपणांस मिळत असते. बालमित्रांनो, आपण आई-वडिलांना कधीही कमी कामा नये. त्यांचे आशिर्वादच सदैव, जीवनभर आपल्या पाठीशी असतात, हे नक्कीच. 

शिवाजी पडोळे 





Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post