बोधकथा - सर्वभुती परमेश्वर दुसऱ्याला दुःख देवू नका
मित्रांनो! तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना? मला देखील गोष्टी सांगायला आवडतात. माझ्या नातवंडांना मला दररोज एक गोष्ट सांगावी लागते. त्यांचा अभ्यास झाल्यावर ते रात्री मला गोष्ट सांगण्याचा आग्रह करतात. मी देखील आवडीने सांगतो. एकतर लहान मुलं मला खूप आवडता म्हणून आणि दुसरं असं की गोष्टी लिहिणं आणि सांगणं मला मला पण आवडते. तुमच्याबद्दल देखील मनांत आवड असल्यामुळेच तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे. साने गुरूजी म्हणत असत, “करेल रंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी त्याचे." म्हणजे मुलांची चांगली करमणूक करणे हे परमेश्वराशी नातं जोडणेच होय.
गोष्ट ऐकतांना मुलं रमून जातात अन् सांगतांना मी देखील ! मग कधी कधी ती गोष्ट महाभारतातील श्रीकृष्ण-कथा असते तर कधी लीळा चरित्रातील श्रीचक्रधरकथा असते. महाभारत ह्या ग्रंथाचं नाव आता चांगलं ठाऊक झालं असेल. अभ्यासाच्या पुस्तकांत देखील या कथा दिलेल्या असतात. “ससीक रक्षण" नावाची श्रीचक्रधर स्वामींची कथा देखील एका पुस्तकात “भूत दया" या नावाने देण्यांत आली होती. रामायण, महाभारत, लीळाचरित्र, या ग्रंथातील कथा गोष्टी मोठ्या छान असतात. त्यांच्यात चांगला बोध असतो. उपदेश असतो. छत्रपती शिवाजीराजांच्या आई जीजाबाईने बाळ शिवाजीराजांना भागवत महाभारतातील कथा सांगून त्यांचे मनावर चांगल्या गोष्टींचा, नीतीचा संस्कार केला होता. परिणाम केला होता. त्या संस्कारापासून एक पराक्रमी नीतीमान आणि धर्मनिष्ठ छत्रपति राजा घडविला गेला होता..
भागवत, महाभारत हे आपणा भारतीयांचे महान ग्रंथ आहेत. ते आपले प्राचीन म्हणजे पुरातन काळाचे इतिहास ग्रंथ देखील आहेत. त्यांच्या महानतेचा मोठेपणाचा आपणा सर्वांना अभिमान वाटावा असे ते ग्रंथराज आहेत. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता तर आता साऱ्या जगालाच मान्य झाली आहे. आदरणीय झाली आहे. जगातील अनेक भाषांमध्ये ती आता लिहीली गेली आहे. इंग्रजी, फ्रेंच, जर्मनी आणि रशियन भाषेत देखील तिची भाषांतरे झाली आहेत. मग आपल्याला अभिमान वाटायला नको कां ? माणसाने जीवनांत कसं जगावं, वागावं यांचे नीतीपाठ देणारे. नीतीची तत्वे शिकविणारे ते आदर्श ग्रंथ आहेत.
आता तुम्हाला लीळा चरित्राविषयी थोडसं सांगतो. आपले हे पुरातन ग्रंथ आपल्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी आपल्यासाठी सद्विचारांचा, चांगल्या विचारांचा आणि नीतीचा आपल्याला दिलेला ठेवा आहे. वैचारिक धन आहे. नीतीची संपत्ती आहे. ती आपण जतन केली पाहिजे, सांभाळली पाहिजे. बरं असो. लीळा चरित्रा विषयी तुम्हाला सांगत होतो तर तो ग्रंथराज म्हणजे ग्रंथांचा राजा. आपल्या मायबोलीतील मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. कळलं ना त्याचं मोठेपण ? त्यांत भगवान श्रीचक्रधर स्वामी म्हणजेच परमेश्वराचं चरित्र आहे. या ग्रंथातील पानोपानी त्यांना “ईश्वरपुरुष" असाच त्यांचा उल्लेख आहे. असंच त्यांना म्हटलेलं आहे. जगातील साऱ्या जीवांचं कल्याण व्हावं, त्यांचा उध्दार व्हावा याची भगवान श्रीचक्रधर स्वामींना सतत तळमळ लागलेली असायची.
पशुपक्षी वृक्ष वेली दुःखी कष्टी माणसं साऱ्यांचं दुःख कमी व्हावं अशी त्यांना कळकळ वाटायची आणि म्हणून ते साऱ्या समाजाला त्यांच्या कल्याणाचा, उध्दाराचा उपदेश करीत सारखे हिंडत असायचे. डोंगर दऱ्यात रानावनात राहणाऱ्या वनवासी आदिवासी लोकांच्या वस्तीवर ते जायचे. जगातील सारी माणसं समान आहेत. सारखीच आहेत. असा उपदेश करीत ते हिंडायचे. माणसांमाणसांत म्हणूनच भावाभावासारखं प्रेम असावं असं ते सांगत असत. फार काय तर इवल्याशा किडा मुंगीत कुत्र्या मांजराच्या शरीरात जो जीव आहे, प्राण आहे. तो तुमच्या माझ्यात असलेल्या प्राणासारखा, जीवासारखा आहे आणि बरं का स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये देखील जीव किंवा प्राण सारखाच आहे. म्हणजे समान आहे. या समतेचा ते उपदेश करीत असत. म्हणून यांच्या शिष्य परिवारांत मोठ्या संख्येने स्त्रिया देखील आल्या. त्यामध्ये कवियत्री महदंबाही होत्या. तुम्ही अलीकडे कवियत्री शांताबाई शेळके तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या कविता वाचता, पण मराठी भाषेतून कविता करायला आरंभ केला तो महदाईसा या कवियत्रीने आणि ती भगवान श्रीचक्रधर स्वामींची शिष्या होती.
आऊसादेवी नावाची एक #नाथपंथी #जोगीण तर विंध्याचलाच्या परिसरातून परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामींचा शोध घेत घेत थेट आपल्या महाराष्ट्रात आली. हा सारा शिष्य परिवार माधुकरी म्हणजे भिक्षा मागत असे. एकदा काय झालं की एका कुत्र्याने एका झोळीतील भाकर पळविली. ते बघताच आऊसा देवीने एक दगड त्याच्या डोक्यात जोराने हाणला. ते कुत्रं बिचारं दुःखाने ओरडत ओरडत पळून गेलं. इकडे दयाळु श्रीचक्रधर स्वामींनी तो दगड जणू आपल्यालाच लागला या वेदनेने स्वतःच डोकं आपल्या दोन्ही हातांनी गच्च धरलं. आऊसादेवीची त्यांच्यावर फार भक्ती होती. तिने बघितले की, श्रीचक्रधर स्वामी तर कुत्र्याच्या डोक्यात हाणलेला दगड, जणू आपल्याच डोक्याला लागला या वेदनेने ते दु:खी कष्टी होत आहेत, हे कसं काय? ती गोंधळून गेली. रडवेली झाली. तेवढ्यात श्रीचक्रधर स्वामीच तिला म्हणाले, “कुत्र्याला का मारलसं?" आऊसादेवीने कारण सांगितलं, "जी जी स्वामी जगन्नाथा," ती श्रीचक्रधर स्वामींना याच नावाने हाक मारायची, आळवायची, “काल याच कुत्र्याने श्रीनागदेवाचार्यांच्या भिक्षान्नाची झोळी पळविली होती आणि आज तेच पुन्हा आलं.
आपल्या भिक्षेची झोळी हे कुत्रं कदाचित पळवेल म्हणून मी त्याला दगड मारला." भगवान श्रीचक्रधर स्वामी तिला समज देण्यासाठी म्हणाले, “अगं पोरी ! या प्राण्यांची कुणी माय बहिण आहे कां? जी त्यांच्यासाठी रांधून ठेवील, मग हे प्राणी तिथे जावून जेवतील? त्यांना दिसेल ती भाकरी पळवून आपलं पोट भरावं लागतं. तुमच्या भाकरी पोळ्या ने त्यांनी पळवू नये यासाठी तुम्हीच त्या नीट सांभाळून ठेवल्या पाहिजे. चूक तुमची आणि शिक्षा मात्र बिचाऱ्या त्या भुकेल्या प्राण्यांना. हे चांगल नाही." तिला श्रीचक्रधर स्वामींचा मुक्या प्राण्यांवर देखील दया करण्याचा उपदेश पटला. तिने आपली चूक कबूल केली आणि भगवान श्रीचक्रधर स्वामींना साष्टांग नमस्कार घालून क्षमा मागितली. पण तिच्या मनांत ही शंका होतीच की आपण तर दगड कुत्र्याला मारला पण स्वामींनी आपलं स्वतःच डोकं आवळलं म्हणून तिने त्यांना प्रश्न विचारला, "कुत्र्याला हाणलेलं तुम्हाला लागलं, म्हणजे स्वामी जगन्नाथा आपण सर्वव्यापक आहात का?" श्रीचक्रधर स्वामी म्हणाले, "होय पोरी ! ईश्वर सर्व ठिकाणी व्यापला आहे. भरला आहे. सर्व प्राण्यांच्या मनाला, शरीराला व्यापून तो उरला आहे. म्हणून कुणालाही दुःख दिलं तर ते (देवालाच) ईश्वरालाच दिल्या सारखं होतं. आऊसा ताईने कान धरून पुन्हा क्षमा मागितली.
अशी आहे ही श्रीचक्रधर कथा. तर माझ्या लाडक्या बालमित्रांनो ! तुम्हाला देखील जर एखादी अशी खोड़ असेल की दिसलं एखादं कुत्र की त्याला दगडानं हाणायचं किंवा एखादं फुलपाखरुं दिसलं की पकडायचं आणि त्याला दोरा बांधून उडवायचं, मुंग्यांची रांग दिसली की सहज गंमत म्हणून ती चिरडून टाकायची, दाणे टिपायला चिमण्या आल्या त्यांना किंवा साळुंकीला खडे मारायचे. अशा खोड-सवयी वाईटच आहेत. त्यामुळे देवाला सुध्दा खत वाटते. ते पाप आहे. तुम्ही म्हणाल पाप म्हणजे काय? तर दुसऱ्याला दुःख देणे हे पाप आणि दुसऱ्याचं दुःख हलकं करणे हे पुण्य. तेव्हां आतापासून तुम्ही मनाशी ठाम ठरवून टाका की कुणाला दुःख होईल, असं काहीही मी करणार नाही." तर मग तो: आवडलीनां गोष्ट तुम्हाला ?
स.भ. प्रल्हाद करकीकर