माझी सर्वज्ञ श्रीचक्रधर माऊली
आज्ञा मी भंगिली तुझी स्वामीराया
माझी "सर्वज्ञ” माऊली! माऊली म्हणजे माता. आपण मातेला आई म्हणतो, अशी माझी सर्वज्ञ आई. आई म्हणतांना माझे हृदय गहीवरून येते, कारण आमची आई आम्हांला अज्ञानपणातच सोडून गेली. खरच मी पापीणीने माझ्या आईला खूप दुखविलं. अधम जीवावर उदास होऊन गेलेली आई आम्हाला पुन्हा मिळणार नाही ! आता आम्ही आमच्या आई वांचून पोरके झालो. माझी आई आम्हाला सोडून उत्तरा पंथी निघून गेली. जसे शाळेतून येणाऱ्या बाळाची आई आपल्या बाळाची वाट पाहाते. तीला वाटतं आपल्या बाळाने शाळेतून येताच मला आई म्हणून हाक द्यावी आणि मी त्याला पळत जाऊन मीठी मारावी. आपल्या कूशीत घ्यावं. तशी माझी आई आमची पश्चात प्रहरी निढळावर हात ठेऊन नामाच्या आवाजाची वाट पाहाते, माझा भक्त उठून माझं नाम स्मरण करत असेल कां ?
पश्चात प्रहरी बाळाचे चिंतन करणारी अशी कुठलीच माता नाही. पण माझी आई सकाळी - सकाळी आमचे सर्वच जीवांचे चिंतन करते. तरी पण हा अधम जीव अशा नैसर्गिक स्नेह असलेल्या मातेची आठवण करत नाही. बेशुद्ध अवस्थेत मानव आपल्या सुखाच्या स्वप्नात तल्लीन राहातो. माझ्या मातेला आम्हाला सोडून कायमचे जायचे होते. म्हणून माझ्या आईने आम्हाला क्षणाक्षणाला कामी येतील असे सूत्र, देऊन गेली व स्वतःचे स्नेह हे नैसर्गिक आहे, असं सुद्धा सांगीतल. माझ्या मातेचे काही सूत्र असे आहेत की ते ऐकून अस वाटते की आपण उगीच भूमीला ओझच आहोत.
आपल्या मातेने आम्हाला शिक्षण दिलं ! पण आम्ही तिने शिक्षण दिल्या प्रमाणे एकही वचन पाळले नाही. आता अशी आई आम्हाला कधी मिळणार? ती फक्त आम्हासाठी तिच्या आनंदमय साखरे सारख्या गोड स्वरूपीच्या लीळा, चेष्टा व तिचे निरंतर नामस्मरण देऊन गेली. खरंच माझ्या माऊलीचे स्मरण करतांना माझ्या अंतःकरणात दुःखाचा कल्लोळ उठतो. त्या वेळेस मला माझ्या बालपणातील एक कविता आठवते, “आई म्हणू मी कुणा, आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोक भारी" व भानखेडीतील श्रीनागदेवाचार्यांचं चरीत्र आठवतं. नागदेवाने म्हटले माझा देव नाही. माझा देव आम्हाला (मला) सोडून गेला. आता मला कोणीच नाही.
स्वामींच्या विरहात व्याकूळ झालेले नागदेव, त्यांना माहादाईसाने आपला देव रूद्धपूरासी आहे व तूला देवाने तिथे बोलवले. महादाईसा ही श्रीनागदेवाचार्यांची बहीण होती. तीने श्रीनागदेवाचार्यांना, आपल्या भावाला देव ऋद्धिपूरला आहे असे सांगून तोंडावरची माती काढून त्याला पाठीवर घेतले. पण श्रीनागदेवाचार्य उर्फ भट्टोबास हे नेहमी स्वामींच्या जवळ राहत होते. त्यांना बरेच दिवस स्वामींच सन्नीधान लाभले (मिळाले) मातृत्वा-पितृत्वापेक्षाश्रेष्ठ प्रेम मिळाले होते. अशी माझी “सर्वज्ञ” श्रीचक्रधर माऊली डोळ्याला सुद्धा दिसत नाही.
ज्या पवित्र ठीकाणी स्वामींच्या पवित्र पद्स्पर्शाने झालेले जे स्थान आहेत. त्या ठिकाणी माझ्या माऊलीच्या अजूनही आठवणी आहेत. तिथे गेल्यावर असे वाटते याच ठिकाणी माझी श्रीचक्रधर माऊली राहीली असती तर किती आनंदाचा वर्षाव आम्हावर झाला असता. पण पापी जीवांवर उदास होऊन गेलेली माझी आई आता नाही मिळत पुन्हा आम्हाला, तिच्या वांचून कसं जगाव, कसं राहावं? हे सुद्धा सांगणारे कोण आहे. मानवी तर चालत्या माणसाला बोट दाखविणारी आहे.
माझी आई समुद्र आहे. निसर्ग आहे, तिनेच सृष्टी निर्माण केली, तिच्यात सारं जग सामावल, भीकाऱ्याला भीक दिली, तान्हेल्यास पाणी दिले. भटकत्यास आश्रय दिला, किती गुणवान आहेस माझी आई, जंगलातला क्रोधावलेल्या वाघाला सुद्धा, माझ्या आईला पाहाताच, त्याला ही वाटते माझी जन्मदाती आईच भेटली. त्याचा क्रोध श्रीचक्रधर माऊलीचे दर्शन होताच क्षणातच शांत झाला. त्याला श्रीमूर्ती पाहाताच खूप आनंद झाला. त्याला असं वाटत होत.
अशी तेजस्वी, सुंदर, लंबकर्ण, विशालनेत्र, उंच कपाळ, अजानबाहू, सकुमार, दैदिप्यमान सुंदर श्रीमुर्त आहे तरी कोण, अशी मानवी मूर्त आपण आता पर्यन्त पाहिली नव्हती. पण स्वामींच्या श्रीमुर्तीत प्रकाश असल्यामुळे त्याला कोणीतरी ईश्वर अवतारच आहेत असे प्रत्ययाला आले. वासराने गाईकडे धाव घ्यावी तसा तो दुरूनच धावत गेला. श्रीमुर्ती पाहाताक्षणी तो शांत झाला. आनंदमय, हितचिंतक जननी मातेने सर्वच जीवांना प्रेम दिले. आम्ही निकृष्ट जीव तुझी फक्त दुःखातच आठवण करतो.
सुखात तर आमच्या मानवीत तल्लीन राहातो. माझ्या आईला कळत होते हा जीव माझ्यावर बेइमान होइल म्हणून आताच सोडवलेल बरं. खरंच हा जीव बैमान आहे, निकृष्ट आहे, तुझ्यावर खरंच बैमान झाला असता, आताच दुःखापुरते तुझं नाव घेतो, सुखात पुन्हा विसरून जातो. खरंतर आपलं दुःख निवारण करणारा परमेश्वरच आहे. येवढया अफाट सृष्टीत अविद्यादी बंधनाने बद्ध असलेला, येवढ्या एक्यांशी कोटी सव्वा लक्ष दहा देवतांच्या अंतर्याग-बहिर्याग साधनाने सुद्धा मुक्त होत नाही. केवळ निर्वेव निराकार असलेला परमेश्वर साकार होतो. कृपावशे अवतार घेतो. स्वतःचे सन्निधान देतो. पण जीव हा अविद्येने ग्रासलेला असल्यामुळे तो जातीचाच आंधळा आहे.
त्याला आपल्याला सर्व काही परमेश्वरच देतो याची आठवण नाही. जन्मल्या बरोबरच त्याला खोटे कार्य करण्याचे व्यसन लागलेलं असत. जीवाच जन्मल्या बरोबर पहिल व्यसन म्हटल तर खोटे बोलणेच होय, स्वतःच्या जीवासाठी परमेश्वराला देव न म्हणून आजकाल मानवालाच (डॉक्टरलाच) देव म्हणतो. डॉक्टर च्या हातात १०-१२ हजार रूपये देतो आणि तिथून निघतांना म्हणतो डॉक्टर साहेब मला लवकर बरं करा, तुमचे उपकार होतील. त्यालाच आपण पैसे दयायचे आणि त्याचे उपकार पण मानून घ्यायचे.
म्हणजे तो आपल्याला दुःखविचारूनच, औषध देतो, तोच देव झाला, किती मानवी जीवन विचित्र आहे. ज्या परमेश्वराने जीवाला घडवल, मढवल, जीवांची रचना केली. सृष्टी निर्माण केली. सार जीवन त्याच्या हाती आहे. आन हा मानवी डॉ. ला आपूले विकत जीवन अर्पण करतो. त्या कनवाळू मातेला बिलकूल आठवत नाही. खरं तर तीच आपली जीवनाची धन संपत्ती आहे.
यावरून माझ्या स्वामींनी एक सूत्र दिले आहे. “सकळही संपत्ती तिया असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती" किती सुंदर सूत्र आहे परमेश्वराचे ! पण संपत्ती दिसत नसल्यामुळे जीव चावरा, बावरा, सारखा करतो. तस पाहिल तर जीवांजवळ धन, संपत्ती येणं-जाणं हे अर्जकत्वाचंच असतं. अर्जकत्व जीवांच्या कार्यानूसार, अधिकारानूसार परमेश्वराच्या आज्ञेवरून मायेने जोडलेले असते. तीही माया आपल्या स्वातंत्रीने करत नाही. तिला परमेश्वर आज्ञा देतात, परमेश्वराची आज्ञा जर मायेने अतिक्रमली तर तिचा बोध हरतो. माया सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेच्या व्यतिरिक्त वर्तन करत नाही. अन जीव हा इतका अधम असून येवढा मोठा परमेश्वर आनंदाचा पूतळा असून त्यांच्या सूत्राधारे आज्ञा पालन करत नाही. खरंच जर परमेश्वराने आपले दोष बाहेर घातले असते तर आपल्या पोटी सूरी खूपसून सो- सो करत मरावं लागलं असतं. आपली जर जीवाची थोरी देवाने सांगीतली असती तर डोळे उठून माथ्याला जाण्याला वेळच लागला नसता. पण कनवाळू मातेने फक्त सूत्रातच सूचित केलं,
पोरेहो या शब्दात कणव करून सांगीतल, पोरेहो लेकरांनो ! तूमची जर थोरी सांगीतली तर तूमचे माथ्याला डोळे वेळच जाण्याला लागला नसता. त्या दयावान परमेश्वराने जर का आपले दोष बाहेर घातले असते तर पोटी सूरी खूपसून सो-सो करत मरावे लागले. पण त्या माऊलीने मायपणा करून आपल्यावर कृपा केली. पोटी सूरी खूपसून सो सो करत मरण्याची वेळ आणली नाही. तरीपण आजकाल मानव परमेश्वराचे हे देह आहे त्या देहाचा, विषाने, चाकूने, सूरीने, अग्नीने, त्याचा घात करतो अन चतुर्विध दुःखाच्या कोर्टात सजा भोगत बसतो. त्याला एकच कोर्ट भोगावं लागत नाही. च्यार प्रकारचे कोर्ट भोगावे लागतात. आताचे, मुंबई, दिल्ली मोठ्या कोर्टाची सजा भोगलेली बरी. पण ती सजा फार कठीण आहे.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी आपली माऊली आहे. तिने आपल्याला सूत्रात सर्वच देऊन गेली. आपणा लेकरांना सावध, सुचित करून गेली. पण मानव अजून बेसावध अवस्थेतच आहे. अविद्येने ग्रासलेले जीव अजूनही सूत्राच्या शोधात जात नाही. अविद्याही जीवात कणाकणात भरल्या गेली. तरीही ती कृपा माऊली जर का जीवाने हाक मारली, तर जीवाला तारण्यासाठी हजरच असते, किती अनंत उपकार आहेत आपल्यावर परमेश्वर माऊलीचे. अशा महान सर्वज्ञ श्रीचक्रधर माऊलीच्या श्रीचरणी माझे शतशः साष्टांग दंडवत प्रणाम
श्रीचक्रधर माऊली माझी टाकूनी गेली ।
तूज वांचोनी दाही दिशा जगी शून्य झाली ।।
तूज वांचोनी नाते गोते नाही कोणी उरले ।
प्रेमरूपी हे सूत्र तूझे मज अपूरेच झाले ।
हिन दिन मी बालक तूझे मज घेई पदरी ।
तू माय माझी माऊली मज घेऊनी श्रीचरणी क्षमा करी ।।
पू. त. उज्ज्वला बाईजी महानुभाव