श्रीनिळभट्ट भांडारेकार संक्षिप्त आत्मचरित्र
आज तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मला योग्य अशी संधी प्राप्त झाली आहे. इतके वर्षे मी याच वेळेची वाट पाहतो आहे. जेव्हा जेव्हा जगांमध्ये हाडामासांची जीवंत माणसंही मेल्याप्रमाणे वावरू लागतात ना तेव्हा-तेव्हा मृतांनाही जीवंत होवून बोलावं वाटत की, “अरे ! किती अज्ञानी जीव आहेस तू.” पुर्ण परब्रह्म आनंदचंद्र ! परमेश्वराचे सन्निधान आपल्याला अधिकार नसतांनाही मिळाले. पण आपण नेहमीच परमेश्वराच्या मोक्षानंदाला, कैवल्य सुखानंदाला सोडून काळाच्या अंधाऱ्या पडद्याआड लपणाऱ्या, वाळवंटातील वाळुप्रमाणे चमकणाऱ्या व पाण्याचा आभास करणाऱ्या “मृगजळापाठी" आणखी किती दिवस घालवणार ? याचा थोडा तरी विचार करा. कारण जे बदलणं माणसाच्या हातात नसतं त्याचा त्याने विचार न करणे ठिक पण जे शक्य आहे ते तरी प्रयत्न करून मिळविले पाहिजे. शेवटी “प्रयत्नांती परमेश्वर” मिळतो. मग आणखीन किती दिवस असेच वाया घालवणार. अनेक युगीचे अनंत जन्म असेच पळता पळता व्यर्थ गेले पण हाती मात्र धुपाटणेच राहिले. तुमची अवस्था आज माझ्याने पहावीत नाही म्हणुनच तुमच्याशी थोडेसे हितगुज करावेसे वाटते.
माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण अशा आठवणी ज्या मी माझ्या हृदयाच्या कप्यात “सोनेरी अक्षरात” बंदिस्त करून ठेवलेल्या आहेत त्या आज मी तुमच्यासमोर उघडाव्या वाटत आहेत कारण की, कुणी म्हणतात, आठवणी म्हणजे मोरपिसांसारख्या असतात तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपला सुंगध माग दरवळत ठेवणाऱ्या असतात, पण मला मात्र ते कधीच पटत नाही. माझ्या मते, आठवणी या झंझावातासारख्या असतात! त्या कुठूनही आणि कशाही येऊ शकतात. त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या भुमीवर माग ठेवूनच जातात. आणि इतकच नाहीतर काही वेळा तर त्या मनाच शांत सरोवर पार घुसळून सोडतात. अशी अवस्था आज तुमच्याशी बोलताना माझी झाली आहे. यातुन मी एक शिकलो की, नियतीला
कितीही गरगर फिरवल तरी ते महान संयमाने सहन करीत जीवन जगायचं असतं. पण जिथे जीवंतच माणसे मेल्याप्रमाणे वागतात, तेव्हा ना प्रत्येकाच्या मनातील श्रद्धा-भाव आता व्यवहाराच्या दगडावर बोथट झालेली दिसुन येतेय. त्यामुळे आपल्याच मुर्खपणानं आपल्याच विनाशाचे खड्डे खणणारा माणसासारखा दुसरा कोणीही प्राणी नाही, असे वाटते.
माझ्या मते, कोणतीही गोष्ट ही एखाद्या रोपासारखी असते. तिला निष्ठेचं खत नि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळाले तरच ती वाढते या अभावी उलट ती मरण्याची शक्यता असते. असेच आहे आज तुमचे जीवन व तुमचा भक्ती भाव जे सर्वशक्तीमान परमेश्वराच्या स्मरण, ध्यान, चिंतनाशिवाय जगुनही मेलेलं दिसतय. कारण श्रद्धा ही सामर्थ्यवान असते कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणुस जिवंतच असू शकत नाही. आणि जीवंत नाही तर जीवन तरी कोठुन असणार? जीवनाच्या रथाचे वेग आपल्या हाती घेतले तर या रथाला पाच घोडे असण्याची आवश्यकता वाटते ती म्हणजे सामर्थ्य, महत्वाकांक्षा, निर्भयता, अभिमान आणि औदार्य. हे सर्व गुण फक्त आपल्या दयाळु, मयाळु सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी जे पतीतांचे मालक, दीन-दुबळयाचे माय-बाप आहेत, जीवाचे उद्धारक आहेत. त्यांच्याकडूनच मिळु शकतात. त्यासाठी आवश्यकता आहे ती आजच्या स्पर्धात्मक युगाला सोडून तुम्ही त्या वज्रपंजरू शरणागता दानीला अनन्यभावे शरण गेले पाहिजे. तन-मन-धन पदपंकजी अर्पण करून भोळ्या-भावाने तळमळपूर्वक प्रेमदान मागितले पाहिजे. कारण परमेश्वर हे आपली धरतीआईच आहेत. कारण आई एकच असते, जी जन्म देते आणि पालनपोषण करते. आई ही जगातील अशी एकच व्यक्ती असते की, जिच्या प्रेमाला व्यवहाराची तुला कधीच माहिती नसते. तिला माहिती असतं ते फक्त खरखुरं प्रेम, आणि माणसाचं प्रेम हे धरतीसारखं असतं. अगोदर एक दाणा पेरावा लागतो तेव्हाच धरती अनेक दाण्यांनी टिचून भरलेलं कणीस देते. माणुसही तसाच असतो. प्रेमाचा एक शब्द मिळाला तर त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणानं उधळायला तो तयार असतो. फक्त त्या गंगेला योग्य प्रवाह, वाटचाल मिळाली पाहिजे ती मोक्षमार्गापर्यंत पोहचण्याची परमेश्वर आपली आई व आपण सर्व तिची धरतीच्या रूपाने लेकरं आहोत. आता फक्त गरज आहे ती शरण जाण्याची. पण नेमक तुम्ही तेच करणे विसरता. कारण जेव्हा तुमच्या हृदयाच्या वारूळात विचारांचे असंख्य साप सुळसुळत इकडं-तिकडं फिरू लागतात ना तेव्हा तुमची अवस्था ही पशु पक्ष्यानपेक्षाही अगतिक आणि असहाय्य होऊन जाताना मला दिसते. त्यासाठी एकच उपाय तो म्हणजे मनाला ताब्यात ठेवून सच्चिदानंद सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामीना अनन्यभावे शरण जाणे. “ईश्वरची एक दाता !” कारण मन हे वेड असत आणि भावनांच्या उद्यानातील धुंद केवड्यात हरवत असतं. या मनाच्या मयुराचा पिसारा फक्त परमेश्वर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या भक्ती पूर्णतेसाठीच फुलवायला पाहिजे. तेव्हा कुठे त्यांची कृपादृष्टी अमृतवर्षणी वाणी आपल्याला प्राप्त होवू शकते. यासाठी मी तुम्हांला माझेच अनुभवाचे बोल सांगु इच्छित आहे.
माझे मुळचे गाव हे भांडारा. लोक मला निळभट्ट भांडारेकर या नावाने ओळखत असे. एके दिवशी मी असाच ओसरीवर संस्कृत शब्दाचा अर्थ लावत असताना एक महातेजस्वी अलौकीक पुरूष दारात येऊन उभा राहिले व म्हणाले, “भटो ! मागील फांकी पहा” . त्यांचा तो सुमधुर आवाज कानी पडताच मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले व वर पाहताच ती चांपेगौर, बरवी बत्तीस लक्षणी, सामर्थ्ययुक्त अशी मुर्ती पाहुन मी वेधलो आणि त्याच क्षणी त्यांच्या दृष्टीक्षेपाचा वेध होवुन मला संसाराची नश्वरता कळाली. अरे! एवढे दिवस आपण असेच वाया घालविले पण आता नाही म्हणुन मी माझ्या पत्नीला घर सांभाळी निरोप देवून तेथून निघालो. ज्याक्षणी मी बाहेरतीला गेलो असता मला पाण्याच्या थेंबाने मातीचे ढेकुळ विरघळलेले दिसले तेव्हाच लगेच देहाची अशाश्वतता, नाशिवंतता, लक्षात आली. ऐहिक, कृत्रिम, खंडणीय सुखासाठी परमेश्वराच्या अलौकिक आनंदाला इतके दिवस आपण चुकलो याची खंती वाटु लागली. त्याच क्षणी मी निधार्राने निर्णय घेतला की, आता नाही. “बस ! पुरे झाले.” आज या क्षणापासुन आपण आपले सर्वस्व स्वामींच्या चरणकमली समर्पित करायचे. परमेश्वर तर दयाळु मयाळु मुर्ती ! ते मातेप्रमाणे आपल्याला सांभाळेल आणि खरोखरच याची प्रचीती मला आली. त्या मातेने उदारपणे या पोरक्या लेकराला आपल्या उदरात सामावुन घेतले. माझ कुठे चुकेल तिथे त्याक्षणी मला हितोपदेश करून ती चुक सुधारण्यास शिकवायची. ही माऊली नेहमी माझ्याकडून कर्मनाशार्थं क्रिया करून घ्यायची. माझा जीव जाणुन घ्यायची. जणुकाही ती जननी मला परिसाच्या रूपाने सापडली होती. त्यामुळे मी ही आता सर्वस्व सोडून कधीही दूर न होणारे सर्वस्व मिळवले होते, जे मरणानंतरही माझ्याकडून कोणी काढुन घेवू शकले नव्हते. ही माझी कणवच आहे. असे मला वाटते. म्हणूनच वनात, काटेरी झुडपात हरवलेल्या पाडसाला त्याची हरिणीआई सापडली होती. तिच्या कुशीत अप्रतिम असा सुखानंद प्राप्त होत असे. वाणीतुन अमृतमय शब्द कानी पडून जीवन जणुकाही अमृतप्राशन केल्याप्रमाणे अमृतयुक्त झाले होते. लेकराला जर काटा टोचला तर त्याच्या वेदना आईच्या हृदयाला होतात कारण हृदय हे नाजुक काचेप्रमाणे असते. त्याला कधी तडा जाईल ते कळणार नाही. परंतु ती जननी याला फुलाप्रमाणे जपत होती.
एके दिवशी मला इंगळी चावल्यावर ज्या वेदना असह्य झाल्या त्या तिने एका क्षणात शांत केल्या. तसा मी ही आता सर्वस्व वेचून तिथे रमलो होतो. आता माझे जीवन हे परिपूर्ण गोसावियांचेच होते. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना मला त्यांचे साह्य असायचे असेच एकदिवस माझ्या भाग्याचा काळा दिवस उगवला. भिक्षेला जाताना एका गावातील शाळा देवता हालवून पाडत होत्या. त्यामुळे बरीच लहान-लहान मुले मृत्युमुखी पडणार याची जाणीव होताच मी सगळ्यांना शाळा पडणार म्हणुन मोठयाने ओरडून सांगितले. त्यामुळे देवतेचा क्षोभ माझ्यावर उलटला. करायला गेलो एक, झाले एक. त्या दिवसानंतर मला सारखा बाहिरतीचा उपद्रव होवू लागला. मी पूर्णपणे अशक्त होवून गेलो होतो, ते शारीरिकदृष्टया, पण मानसिकदृष्या मी माझ्या गोसावियांजवळ आनंदी होतो. पण एका गोष्टीची मला फार तळमळपुर्वक खंती वाटत होती की, माझ्या माऊलीला जी सर्व देवतांपेक्षाही श्रेष्ठ, ईश्वरीय अवतार आहे जिला कशाचीही कमी नाही ती माझे सेवादास्य करायची. पण मी तरी काय करणार ? यातून एक गोष्ट मला शिकायला मिळाली की,
माणसाने संयमी असावे । स्वयं दास्यही करावे ।
कृतीतूनच ज्ञान दयावे । शब्दजाळ व्यर्थची ।।
म्हणूनच, ती “मौन्यदेवता” माझ्यावर प्रसन्न झाली होती. पण मला हे सहन होत नव्हतं. कधी एकदाचा मी तिच्या कुशीत आपले प्राण सोडतो, असे झाले. आणि ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघितली तो “सुवर्णमय” दिवस उगवला. त्या दिवशी जरी मला मरण येणार होते तरी त्या मरण्यातच खरे जगणे. उरले होते. मी स्वामींना माझी इच्छा व्यक्त केली. आपल्या मांडीची उशी मला द्या, असे म्हणालो व स्वामींनी आपल्या मांडीवर डोके ठेवुन घेतले. मी त्यांच्या नजरेकडेच पाहत राहिलो, ज्यातुन माझ्या यातना ह्या कमी होत होत्या. त्या मातेने विचारले, “बाळा ! काळवंचना करू का ?” पण मी अट घातली. जर तुमचे सन्निधान व उश्याला मांडी मिळणार असेल तरच. पण ती म्हणाली हे अशाश्वत. हे सांगु शकत नाही. हे ऐकताच मी प्राण सोडला. अखेर संसाराच्या गाड्यातून माझी सुटका झाली. हा क्षण तुम्हांला सांगतावेळी मला गहिवरून येते आहे की, मी मला नशिबवानच समजतो. तसा मी खुप हट्टीही होतो. म्हणुनच शेवटी मी माझ्या माऊलीशी भांडलो की, तुम्ही तर म्हणाला की माझ्या सुखाचा अप्रतिम आनंद देईल आणि आता काळवंचना म्हणून लहान मुलाच्या हातात चॉकलेट दिल्याप्रमाणे समजुत काढता. येथ हे अखेरचे भांडण होते. पण ते प्रेमाचे - भावनेने परिपूर्ण असे सप्तरंगानी बहरलेले निळ्याशार आकाशात मोकळेपणाने स्वच्छंदपणे उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणे होते. खरंच हाच माझ्या आयुष्यातील “सुवर्णमय" असा क्षण होता. जो मी अजुनही अनुभवतोच आहे.
तात्पर्य :- या संसारातील सर्व ऐहिक सुखानंद हा तात्पुरता असून खंडनीय आहे. त्यासाठी परमेश्वराच्या अखंडनीय अशा गोड सुखानंदाला जाणुन त्यांला अनन्यभावे शरण गेले पाहिजे. तरच " या जन्म-मृत्युच्या फेऱ्यातुन मुक्तता होवू शकते. ”
पू. त. वर्षाबाईजी कपाटे