अंतरदिक्षा म्हणजे आत्मवंचना
#अंतरदिक्षा म्हणजे #आत्मवंचना #अंतरदिक्षा एक #कुप्रथा
आपला भारत देश हा जगातील पहिले अध्यात्म्याचे विद्यापीठ आहे असे म्हटले तर ती अत्युक्ती होऊ नये, कारण संपूर्ण जगाच्या तुलनेत सर्वप्रथम भारतातच अध्यात्मविद्येचा आविष्कार झालेला आहे. याची प्रचिती संसोधकांना सखोल अभ्यासाअंती निश्चित येईल यात शंका नाही. भारतात विविध संप्रदायांचा निवास आहे. त्यांचे धर्मही अलग-अलग आहेत. यांत काही साकारवादी आहेत तर काही निराकारवादी आहेत. तसेच काही अनात्मवादी आहेत तर काही आत्म्यालाच परमात्मा मानणारे आहेत. याला अपवाद आहे तो केवळ भौतिकवाद्यांचा. भौतिकवाद्यांचा भाग वगळला तर बहुतेक धर्म संप्रदायात संन्यास घेण्याचा प्रघात दिसून येतो मग तो भेदवादी असो, अभेदवादी असो अगर शून्यवादी असो. या सर्वांनी आपआपल्या अभिष्ट सिध्दीसाठी अर्थात इष्ट प्राप्तीसाठी संन्यासाचा स्वीकार केला असल्याचे निदर्शनाला येते.
काही संप्रदायात पूर्वी असा दंडक होता की, अध्यात्माचा ज्याला अभ्यास करायचा त्याने पहिले संन्यास घ्यायचा आणि नंतर मग कुठे अध्यात्मविद्या आत्मसात करायची. संन्यास घेतल्याशिवाय अध्यात्म म्हणजे त्यांच्या दृष्टीने ब्रह्मविद्या सांगण्याविषयी विनंती केली तेव्हा ते म्हणाले- ब्रह्मविद्या ही संन्यासांनाच आणि संन्यास्यांनीच सांगायची असते. तेव्हा त्यांनी आपल्या आईच्या संमतीने संन्यास घेतला आणि गोविंदपादाजवळ अध्यात्माचा अभ्यास केला. आता अध्यात्म हे कुणी कुणाला सांगायचं, कधी सांगायचं हे ज्या त्या संप्रदायाच्या परंपरेवर अवलंबून आहे. पण येवढे मात्र खरे की आत्मकल्याणेच्छु आहेत त्यांना संन्यासाशिवाय पर्याय नाही. शंकराचार्यांनी बालपणीच संन्यास घेतला असल्याचे आपण पाहिले आहे. पण हा बालसंन्यास मग तो कोणत्याही धर्मातला असो, सर्वाचाच सिध्दीला जातो असे म्हणणे धाडसाचे होईल. “तत्र तं बुध्दिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्” या श्रुतीत भगवंतांनी जो पुरुष (जिवात्मा) सांगितला आहे तोच आपला संन्यास प्रयत्नपूर्वक सिध्दीला नेऊ शकतो. अन्यथा दुःखमाप्तुम् योगत: म्हणजे योगाशिवाय संन्यास सिद्दीला जाणे अतिशय कष्टप्रद आहे. तारेवरची कसरत आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मग तो बालसंन्यासी असो किंवा प्रपंच करून संन्यास घेतलेला धडधाकट त्यागी असो. संसारात त्याने कितीही प्रापंचिक भोग भोगलेले असले तरी वासनेचे पूर्णतः निर्मूलन होणे असंभवनीय असते भाष्यकार म्हणतात - जैसे 'आंबेरस पोटी न सामाये परि वासना उरलीची असे.' हं आता एखादा जर जिर्ण असला किंवा भयंकर अशा रोगाने ग्रासलेला असला तर त्यामुळे वासनेचा उद्रेक होणार नाही. ज्याला योग साधला आहे अर्थात 'नित्यानित्यवस्तुविवेक इहामुत्रफलोपभोगविरागोवैराग्यम् शमदमादि साधनं मुमुक्षत्वमूच' स्वामींच्या या सुत्रानुसार ज्याने तयारी केली आहे म्हणजे जगातील शास्वत अश्वाश्वताचे ज्ञान, सांसारिक आणि स्वर्गादिकांच्या सुखोपभोगाबद्दल विरक्तता ब्राह्मेद्रिये तसेच मनादी अंतर इंद्रियांवर नियंत्र, शीतोष्णादी तथा सुखदुःखादि विषयीची सहनशीलता, आपल्या ईश्वरावर तसेच चतुर्विध साधनांवर निःस्सीम श्रध्दा आणि संसारचक्रातून कायमरुपाने मुक्त होण्याची इच्छा ज्याच्या ठिकाणी आहे त्याचाच संन्यास निर्विघ्नपणे सिध्दीला जातो.
संन्यास सिध्दिस कोणाचा जातो हे यापूर्वीच्या विवेचनावरून लक्षात आले असेलच. तसेच प्रपंच न करता व प्रपंच करून असा दोन प्रकारचा संन्यासही ओघाओघाने कळला असेलच, पण संन्यास घेण्याची मर्यादा काय याबद्दलचा थोडा उहापोह करणे अप्रस्तुत होऊ नये. स्मृतिस्थळात एक स्मृती येते योगभ्रष्टासंबंधीची. त्यावरील गोषवारा असा - श्रीलक्ष्मीद्रव्यांसांनी श्रीमहींद्र व्यासांना प्रश्न केला योगभ्रष्ट कवण दशेचा? यावर श्रीमहींद्रव्यास म्हणाले, असेल आमचीए तुमचीए दशेचा. ते ऐकूण श्रीनागदेवाचार्य म्हणाले माझीए दशेचा नव्हे मा तुमचीए दशेचा काइ होईल?' पंथीय परिभाषेत दशा आणि अवस्था हे दोन्ही शब्द एकमेकांचे पर्यायी असून या दोन्हींचा अर्थ एकच आहे. स्वामींनी दंडी, दर्शी, स्पर्शी आणि कुचमर्दनी अशी चार प्रकारची मानवाची वैषयिक अवस्था अर्थात दशा सांगितली आहे. भाष्यकारांनी ह्या चारीचे पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केले आहे. १२ व्या वर्षापासून ३४ व्या वर्षापर्यंत दंडी. ३४ ते ५६ पर्यंत दर्शी, ५६ ते ७८ पर्यंत स्पर्शी आणि ७८ ते १०० पर्यंत कुचमर्दनी, आचार्यांच्या उपरोक्त वाक्यावरून लक्षात येते की, लक्ष्मींद्रव्यास, महीन्द्रव्यास हे दोघेही आचार्यापेक्षा वयोमानाने लहान होते. लक्ष्मीद्रव्यांसाचा आचार्यांशी योग येतो तो श्री गोविंदप्रभूंच्या सान्निधानी असतांना. आचार्यांचे ३२ व्या वर्षी अनुसरण, स्वामींच्या सान्निध्यातील ४ वर्षे आणि श्री प्रभूंच्या सान्निध्यातील १४ वर्षे. तात्पर्य वयाच्या ५० वर्षांपर्यंत स आचार्य श्रीप्रभूंच्या सान्निध्यात होते.
तेव्हा याच्या आधीच लक्ष्मीद्रव्यासांची भेट तथा अनुसरण झाले असणार. आणि म्हणूनच योगभ्रष्ट तो.. असे आचार्यांनी म्हटले, साठी वरूषाचिया दशेचिया पुरुषासि अनुसणी अधिकार नाही. यावरून स्पष्ट होते की, पंथीय परंपरेनुसार गृहस्थी बोधावंताचा सन्यस्त होण्याचा कालावधी दर्शी अवस्थेपर्यंत म्हणजे वयाच्या ५६ व्या वर्षापर्यंत त्यानंतर संन्यास घेतला अनं नाही घेतला तरी त्याला योगभ्रष्टत्व आक्षेपून १ कोटी, २ कोटी वर्षेपर्यंत परमेश्वराच्या भेटीत अंतर पडते. हा प्रदीर्घ काळ तो चिज्जड मायेच्या स्वरूपी सुखोपभोगात अलीकडे काही विद्वान वेषांन्तर न करता साठीनंतर आम्ही अंतर्दिक्षा घेतली म्हणतात. येवढेच नाही तर घरबसल्या अस्तीपरी आचरल्याचाही दावा करतात हे त्यांचे म्हणणे पाठका प्रमाणे यथेष्ट चेष्टा मानावी काय? संभ्रम पडतो. शिवाय वस्त्रपालट, रंग, क्षौर आदि बाबी गौण आहेत. जगाच्या वेगाने गतिमान होणाऱ्या मार्गातील हे अडथळे दूर केले पाहिजे असे प्रतिपादन करून 'जब अंदर से रंग लाणा नही, बाहरसे रंगाना नाहक है, या ब्रह्मानंदी उक्तीचे उदाहरण देतात. मात्र वरवडे करिता भीतरासि ये ही आचार्यांची उक्ती ते सोयीस्करपणे विसरतात, हे दुर्दैवच व म्हणायला पाहिजे. हं, आता ते स्वतःला ब्रह्म समजत असतील तर प्रश्नच नाही कारण ब्रह्मानंदीचे उदाहरण ब्रह्मवादीच देऊ शकतात. या संदर्भात खूप काही लिहिता येईल, पण त्या प्रपंचात न पडता संक्षेपात काही विचार मांडत आहे. भारतातील अनेक धर्मसांप्रदायिकांचे तसेच इतरही क्षेत्रातील व्यक्तींचे जे विविधवर्णी वेष आहेत ते सारे प्रतिकात्मकच नाही काय? एकाच शहरातील अनेक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे जे गणवेष असतात, ते भलेही प्रासंगीक असतील, तात्कालिक असतील पण अनिवार्य असतातच की नाही? या गणवेषाची अनिवार्यता का? तर तो अमूक अमूक शाळेतील विद्यार्थी आहे हे समजावे म्हणूनच ना. अर्थात प्रतीक रूपाने त्याचा वापर केला जातो हे आपल्या सारख्या शिक्षणक्षेत्रात अध्यापन केलेल्यांना सांगायची गरज पडावी म्हणजे शोकान्तिकाच नाही का? आता मार्गातील अडथळे दूर करावे म्हणजे नेमके काय करावे? वस्त्र पालटच, रंग, क्षौर आदी बाबी गौण आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. तर मग संन्यस्त स्त्रियांनी गोलसाड्या नेसाव्या? ब्लाऊज वापरावे? केशसंभार वाढवावा? वेण्या घालाव्या? आणि संन्यस्त पुरुषांनी सिनेस्टार स्टाईलची वेषभूषा केषभूषा करावी? पारंपारिकतेला चौफेर विरोध होतो म्हणून काय अशाप्रकारे मॉडर्न पद्धतीने रहावे? असे जर अपेक्षित असेल तर मग विवाहबध्द होऊन घटस्फोट होतात, हुंडाबळी होतात लग्न न करता पसंतीच्या पुरुषाबरोबर राहण्याचा हक्क (बायबल उर्फ कमला शर्मास) न्यायाधिश कायद्याने देतात (लोकमत २७ मे २००१) आणि काही मंगळ (सूत्रे) अमंगळ होतात म्हणून विवाहबंधन, विवाहसंस्थाच मोडीत काढलेल्या बऱ्या असे म्हटले तर ते उचित ठरेल काय? ह्या साऱ्या अपवादात्मक बाबी आहेत. ज्या ज्या आश्रमाची जी जी लिखीत वा अलिखीत पारंपारिक पध्दती आहे ती स्वीकारणे अनिवार्य आहे. असो ज्याचे त्याचे आपापले व्यक्तिगत विचार आहेत.
संन्यास म्हणजे काय? याचे ही सर्वसाधारणासाठी विश्लेषण होणे जरूरीचे आहे. यानुषंगाने १२ व्या शतकात काही संप्रदायात संन्यस्त होण्याची कशी पध्दत होती हे पाहणे मनोरंजक ठरेल.
प्रसंग आहे महादाइसांच्या संन्यासाबाबतचा. महादाइसांच्या आग्रहावरून स्वामींनी आश्वासन दिले होते की, तुम्ही वाराणसीहून या मग तुम्हाला संन्यास देऊ. त्याप्रमाणे महदाइसा वाराणसीहून आल्या आणि स्वामींना स म्हणाल्या आपल्या आश्वासनाप्रमाणे आता मला संन्यास द्यावा, त्यावर स्वामी म्हणाले, बाई, उराइतुकिया पाणियांत रिगौनि, ऊर्धबाहो होऊनि मग फोकरिजे संन्यस्तोहं संन्यस्तोहंः परि रागादिक न त्यजे तो काइ संन्यास? तो संन्यास नव्हे बाई. छातीइतक्या पाण्यात शिरायचे, दोन्ही हात वर करायचे रागादिकांचा त्याग न करता. मी संन्यस्त झालो असे मोठ्याने म्हणायचे असा संन्यास स्वामींना मंजूर नव्हता. श्रीमद्भगवद्गीतेत त संन्यासाचा अनेक ठिकाणी उल्लेख आला असून त्याचे काही ठिकाणी स्पष्टीकरण केले आहे. त्या सर्वांच्या गोळाबेरजेचे तात्पर्य स्वामींच्या राग द्वेष काम क्रोध, मद, मत्सर याचा त्याग याचि नावे संन्यासुकी बाई' या एका सूत्रातून अभिव्यक्त होते. सदरहू रागद्वेषादी ह्या निसर्गदत्त बाबी असून प्राकृतिक स्थायीभाव आहे. त्यामुळे त्यांचे समूळ उच्चाटण होणे शक्यच नाही. स्वामीही म्हणतात कारण संन्यास नाही परंतु कार्य संन्यास केला तर होऊ शकतो. म्हणजे प्रयत्ने करून रागद्वेषादींचे कार्य प्रतिबंधित होऊ शकते. मात्र त्यासाठी स्वामींच्या आज्ञापालनाची नितांत गरज आहे. परंतु काही स्वयंप्रज्ञ कर्मसंन्यासात् कर्मयोगी विशिष्यते ह्या भगवंताच्या श्रुतीचे आपल्या सोयीनुसार अर्थ लावून समाधान करून घेतात आणि आपल्या गोत्र कुटुंबात राहून घरीच असतिपरी आचरल्याचा उद्घोष करतात.
पंथात ज्या अनेक कुप्रथा कूळ लावून स्थिरावल्या आहेत त्यामधून एक प्रथा अतिशय दृढमूल होऊन बसली आहे आणि ती म्हणजे अंतर्दीक्षा जी स्वामींच्या आचार्यांच्या, वृध्दाचाराच्या आणि मार्गरूढीच्या काळात सुध्दा अंतर्दिक्षा पुसटही उल्लेख नाही. त्यामुळे ही अंतर्दिक्षा संन्यास कधीपासून अंमलात आली कोणापासून आली तिचे स्वरूप काय इत्यादी प्रश्न निर्माण होतात. यावर एखादा कुणी म्हणेल हात्तीच्या येवढेच ना, स्वामींनीच स्वतः सांगितले की हो, अंतर्दिक्षा म्हणजे रागादि षटकांचा त्याग अन कौपीनोध्दारण. सदरहू म्हणणे गृहीत धरायला हरकत नाही. पण यावर प्रश्न उपस्थित होतो तो असा की, बाह्य प्रतिक नसेल तर मग सन्यस्त असल्याची ओळख काय? यावरही एकाधा म्हणेल स्वामींनीच लिंग चिन्ह मुद्रा यांचा त्याग करायचा सांगितला त्यामुळे बाह्य प्रतिकांची गरज नाही. बरोबर आहे. स्वामींच्या या म्हणण्याला नाकारणे शक्यच नाही. पण स्वामींनी संन्यास घेतला म्हणजे काय केले? तर त्याचे उत्तर हे की त्यांनी महात्मवेष अर्थात यतिमुनीचा वेष परिधान केला हे तर मानावेच लागले ना. वास्तविक पाहता परमेश्वर अवताराला रागादिकांच्या त्यागाची, कौपीनोध्दारणाची किंवा यतिमुनीचया वेषाची आवश्यकता नाही. परंतु यद्यदाचरति श्रेष्ठ याप्रमाणे आपल्या साधकाने अनुकरण करावे म्हणून परमेश्वर अवतार असले तरी त्यांना स्वीकार करावा लागतो. गृहस्थीवेषात घरी राहून संन्यास्तो- दीक्षितों हं म्हणण्यात काही अर्थ नाही आणि कौपीन धारण करण्यालाही महत्त्व नाही. वस्त्रांचा परिग्रह नसावा या दृष्टितून कौपीन धारण करण्यास सांगितले आहे. तिने इंद्रिय होतो किंवा मनोनिग्रह होतो असे काही नाही. ज्याला संन्यास घेण्याची तळमळ आहे पण गुरुंची अडणी का भिक्षूची का मार्गाची अशी परनिष्ठ क्रिया उपस्थित झाली त्याच्याशिवाय दुसरा कोणी निर्वाहकर्ता नाही अशी व्यक्ती घरी राहिली तर अनुसरणापासौनी थोर म्हणजे अनुसरलेल्या व्यक्तीला मोक्ष म्हणजे ब्रह्मानुभूती होते आणि परनिष्ठक्रियावर्तीला ईश्वरानुभूती होते. परंतु अशी वस्तुस्थिती असेल तर, बहाणा नको. गृहस्थाश्रमी श्री वैद्य दत्तराजव्यासांना परनिष्ठ क्रिया घडत असतांना सुध्दा त्याग करून त्यांनी संन्यास द्योतक महात्मवेषाचा स्वीकार केला. अंतर्दिक्षा म्हणून जो प्रकार रूढ झाला त्याच्या बुडाशी पंथपंथेतराच्या मानमान्यतेची अभिलाषाच कारण असावी आणि तसेच नसेल तर मग महात्मवेष घेण्यास संकोच का? 'परदा नही जब कोई खुदासे, बंदो से परदा करना क्या?' संन्यस्ताला महात्मवेषाची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून गोसावी महादाइसासि महात्मेवष दिधला. तसेच जोगी मुंडिला निका दिसे. या सुत्रावरून मुंडनदेखील महात्मवेषाशी निगडीत आहे. स्वामी चौ दिसा मादने आठा दिसा क्षौर करवीत असत. स्वामींच्या प्रयाणानंतर सन्निधानातील महात्मवेषात असलेल्या आचार्यांनी काळे कृष्णभट्टाच्या घटनेनंतर मग गोसावी सांगितला तो असानिधानी महात्मवेष रचिला. सौभाग्यवतीचे प्रतीक जसे कपाळावरील कुंकू तसे संन्यस्ताचे प्रतीक महात्मवेष म्हणून महात्मवेषाला अतिशय महत्व आहे हे स्मृतीतील एका प्रसंगावरून लक्षात येईल.
कोण्यातरी एका महात्म्याने आचार्यांजवळ दुसऱ्या महात्माची चुगली केली. तेव्हा आचार्यांनी विचारले त्यांच्या अंगावर वेष आहे का? यावर तो महात्मा होय म्हणाला. तेव्हा आचार्य म्हणाले वेष असे तरि उरला असे म्हणजे धर्माशी एकनिष्ठ असे. श्रीचक्रपाणि व्यासांच्या चरित्रपाठात तर खुद्द स्वामींनी वेषासंबंधी आपला निर्णय दिला असल्याचे निर्देशिले आहे. कुणीतरी स्वामींना विचारले जी जी योगभ्रष्टासि काइ लक्षण? त्यावर स्वामी म्हणाले अवरधर्म सांडीला अन परधर्म तो आतिचिना तो योगभ्रष्ट बोलिजे. त्यानंतर आचार्यांनी विचारले जी जी अवरधर्म परधर्म म्हणजे काइ ? स्वामी म्हणाले, अवरधर्म म्हणजे विकल्पु - परधर्म म्हणजे वेषधारण. यावरून वेष हा धर्माशी एकनिष्ठ असल्याचे प्रतीक मानले गेले.
या ठिकाणी महात्मा होऊ इच्छुकासाठी म्हणजे संन्यास घेऊ इच्छुकासाठी एक महत्त्वाची सूचना देणे आवश्यक समजतो. ती ही की सांप्रत महात्ववेषाचे वैविध्य आणि वर्णवैचित्र्य पाहून संभ्रमित होऊ नये आणि प्रमाण शून्य अंतर्दिक्षा घेऊन आत्मवंचना करू नये.
वाचक हो, याप्रमाणे यथाप्रति यथामति संन्यास वेषासंबंधीचे जे विवेचन केले आहे ते कितपत बरोबर आहे याचा निर्णय आपणांवर सोपवून लेखणीस विराम देतो.
प्राचार्य कै. श्री दि. वि. बिडकर शास्त्री महानुभाव