भाग ००२ प्राचिन संस्कृत मराठी कथा संग्रह
कथा ०५
आपल्या विद्या चातुर्याने ब्राम्हणाचे भले करणारा
कालिदास
एकदा एक गरीब पण विद्वान ब्राह्मण कालिदासा कडे आला आणि त्याने भोजराजा कडून
मला काही द्रव्य मिळवून द्या अशी कालिदासाला विनंती केली.
“आपले
अध्ययन काय झाले आहे?” असे महाकवि कालिदासाने विचारले,
तेव्हा तो गरिब ब्राम्हणाने लज्जित होऊन खाली मान
घालून तिथेच बसला. कारण त्याने काहीही शास्त्रीय अभ्यास केलेला
नव्हता. कालिदासाच्या लक्षात आले की हा अविद्वान ब्राह्मण आहे. कालिदासाला त्याच्या
दारिद्र्याची किव आली होती.
कालिदास पुन्हा म्हणाला “तुम्हाला काहीतरी तर येतच असेल ना?”
मला पुरुषसूक्तातील 'सहस्त्रशीर्षा' एवढा एकच मंत्र येतो. ब्राह्मण म्हणाला,
"काही हरकत नाही,
उद्या राजाच्या दरबारात येऊन तो म्हणा म्हणजे झाले." कालिदास
म्हणाला.
दुसरे दिवशी त्या गरीब ब्राह्मणाला राजसभेत हजर करण्यात आले.
अशी मोठी सभा त्या ब्राह्मणाने पूर्वी कधीच पाहिली नव्हती. त्याचे हातपाय लटलटा कापू
लागले. त्याचे सारे लक्ष कालिदासाकडे होते.
कालिदास उभा राहिला आणि म्हणाला,
'महाराज,
हा ब्राह्मण विद्वान आहे. गरीब आहे. त्याने रचलेली कविता ऐकून
त्याची योग्य संभावना करावी अशी माझी आपणास विनंती आहे.
त्याने त्या ब्राह्मणाला खूण केली. ब्राह्मण म्हणू लागला.
सहर्षशीर्षा पुरुष : सहस्त्राक्षः सहस्त्रपाद् ।
अर्थात = हजार शिरकमले असलेला, हजार डोळे आणि हजार पाय असलेला. अगोदरच भीतिने गांगरलेल्या
त्या ब्राह्मणाला त्याच्या स्मरणशक्तीनेही ऐनवेळी दगा दिला. त्याला पुढे आठवेनाच. तो
शून्य चेहरा करुन उभा राहिला. त्या बरोबर कालिदास चटकन् उभा राहिला आणि राजास म्हणाला,
‘‘महाराज,
या विद्वान ब्राह्मणाला शत्रूवर चाल करुन निघालेल्या आपल्या
अफाट सैन्याचे वर्णन करावयाचे आहे. व ते त्याने पुरुषसूक्तातील या पहिल्या चरणाने आरंभिले
आहे. तूर्त तो विनयाने थांबला आहे. त्याला अभिप्रेत असलेला पुढचा चरण असा आहे.
चलितश्चकितश्छन्नस्तव सैन्ये प्रधावति ।
अर्थात = आपले सैन्यस्वारीवर झपाट्याने निघाले
तेव्हा त्याच्या प्रचंड हालचालीच्या हिसक्याने सहाशीर्ष
चलित = शेष लटपटू लागला
: पुरुषः = इन्द्र : सहस्त्राक्षः
= त्या सेना सागराकडे पाहून चकित: = आश्चर्यचकित झाला आणि सहस्रपाद् = सूर्य सैन्याने उडवलेल्या धुरळ्याने
छन्नः = झाकोळून गेला
आपल्या सैन्याची काव्यमय स्तुती ऐकून राजा संतुष्ट झाला. त्या ब्राह्मणाचे
जन्माचे दारिद्र्य फिटले.
कथा ०६
करंगळीजवळच्या बोटाला 'अनामिका' नाव कसे
पडले
गुरुकुलामध्ये शिक्षण चाललं होतं, कोणी वेदाध्ययन करत होतं, तर कोणाचा न्यायशास्त्राचा अभ्यास चालला होता. कोणी कालिदासाचं
महाकाव्य वाचण्यात गढून गेलं होतं. तर कोणी शब्दरुपावली घोकत होतं. शिष्य अनेक होते.
शिकवणारे गुरुजी मात्र एकच. सध्याप्रमाणं प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक अशी प्रथा
त्या काळी नव्हती. बारावर्ष एकाच गुरुच्या हाताखाली शिक्षण घेऊन त्या गुरुजवळ असलेली
सर्व विद्या हस्तगत करुन विद्यार्थी बाहेर पडत. एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवायचं
असेल तर मग त्यानंतर दुसऱ्या गुरुकडं जाण्याची वेळ येई. द्रोणाचार्यांच्या जवळचं सारं
अस्त्रज्ञान प्राप्त केल्यानंतर दुर्योधन गदायुद्धात विशेष नैपुण्य मिळवण्यासाठी द्वारकेला
बलरामाकडं गेला. अध्यापन करता करताच गुरुचंही अध्ययन अखंड चालूच असे. शिष्यानं उपस्थित
केलेल्या शंकांचं समाधान करता करताच गुरुच्या ज्ञानात भर पडत असे.
त्यादिवशी गुरु आपल्या एका लहानग्या शिष्याला सामान्यज्ञान देत
होते. त्यानी शिष्याला विचारलं, ‘‘महाभूतं किती आहेत. ’’
‘‘शिष्य उत्तरला -
चार'’
‘‘चार? कोणती सांग बरं ?’’
शिष्यानं बरोबर उत्तर दिलं, 'पृथ्वी, आप, तेज वायु आणि आकाश. 'मग ही तर पाच होतात. मोज बरं! हं ठेव आंगठा कनिष्ठिकेवर म्हण पृथ्वी,
आता ठेव अनामिकेवर आप. आता ठेव मध्यमेवर तेज,
आता ठेव तर्जनीवर वायु आणि शेवट अंगुष्ठ आकाश. किती झाली?
पाच! कनिष्ठिका = करंगळी / अनामिका = त्यानंतरच बोट / मध्यमा
= मधलं बोट / तर्जनी = अंगठ्याजवळचं बोट / आणि अंगुष्ठ = अंगठा झाली ना पाच.’’
शिष्याचं समाधान झालं. पण त्याला नवीनच शंका आली. तो म्हणाला,
‘‘गुरुजी,
या बोटाला अनामिका = नाव नसलेलं बोट असं का म्हणतात.?’’ गुरुजी क्षणभर अवाक् झाले. पण त्यानंतर झटकन
म्हणाले, ‘‘वत्स,
त्याचं असं झालं -
पुरा कवीनां गणना कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः ।
अद्यापि तत्तुल्य कवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव
॥
अर्थात = एकदा विद्वान लोक श्रेष्ठ कवींची गणना करत असताना कालिदासाच्या नावानं करंगळी घातली. त्यानंतर दुसरं
बोट मुडपायचं. पण कालिदासाची बरोबरी करु शकेल असा कोणी न आढळल्यानं पुढचं बोट तसेच
राहिलं. आणि तेव्हापासून वत्सा, त्या बोटाचं ‘अनामिका' हेच नाव पडले.
कथा ०७
भोजराचे गर्वहरण
धारानगरीच्या राजा भोज जसा वृत्तीनं उदार होता,
तसाच रसिकही होता. त्यानं कित्येक पंडितांना धन आणि वस्त्रालंकार
देऊन सन्मानित केले होते. एवढेच नव्हे तर कविकुलगुरु कालिदासासारख्या कवीला आपल्या
पदरी आश्रय दिला होता. त्याचा दरबार म्हणजे काव्यशास्त्र विनोदाचं एक आश्रयस्थान झालं
होतं. दूरदूरच्या पंडितांना सन्मानित करण्यासाठी तो नवनवीन युक्त्या योजित असे. देशोदेशीचे
विद्वान आणि कवी भोजराजाच्या दरबारात येऊन आपलं पांडित्य आणि कवित्व प्रदर्शित करीत.
राजाने केलेल्या सत्कारामुळे ते संतुष्ट होत असत. पण राजाच्या स्वतःच्या विद्वतेने,
रसिकतेने, हजरतबाबीपणाने प्रभावित होऊन त्याच्या कीर्तीचे पोवाडे गात मायदेशी परतत.
एकदा भोजराजाने जाहीर केले की जो कोणी कवी स्वरचित असे नवीन काव्य दरबारात
ऐकवील त्याला एकलक्ष सुवर्णमुद्रा देण्यात येतील. एकलक्ष सुवर्णमुद्रा मिळवाव्यात या
इच्छेने व कमीतकमी आपले काव्य राजाच्या कानावर पडेल व त्याची प्रशंसा प्राप्त होईल
ह्या समजुतीने अनेक कवीनी राजाच्या दरबारात हजेरी लावली. पण प्रत्येक कवीला पराभूत
होऊन परतावे लागले. राजाकडून त्यांचा योग्य सन्मान होई. आणि
लक्ष सुवर्णमुद्रांचे पारितोषिक काही कोणाच्या हाती लागले नाही.
कवीने आपले काव्य ऐकवताच राजाच्या दरबारातील एकजण उभा राही आणि हे काव्य आपणास
माहीत असल्याचे सांगून ते धडाधड म्हणून दाखवी. त्यानंतर दुसरा उभा राही आणि तोही ते
म्हणून दाखवे. त्यापाठोपाठ तिसरा. आपले काव्य नवीन असूनही आपल्याला फजिती का पावावे
लागते हे कोणाच्याच लक्षात येत नसे. राजाकडून चांगला सन्मान प्राप्त झाला असूनही,
आपले काव्य नवीन असूनही भरदरबारात ते नवीन नाही असे ठरवले गेल्याने
ख्यातनाम कवीही मनाशी दुखी कष्टी होऊन स्वगृही परतत.
एकदा एक दरिद्री कवी भोजराजाच्या पदरी असलेल्या कालिदासाकडे आला आणि त्याने
आपल्या सांपत्तिक परिस्थितीचे रडगाणे त्याच्यासमोर गायिले. तो म्हणाला,
"कविवर्य कालिदास हो! मी एक नवीन संस्कृत
कवितेची माळा रचली आहे. राजाने
जाहीर केलेले पारितोषिक मला प्राप्त झाले तर माझे जन्माचे दारिद्र्य दूर होईल. आपण
मला काहीतरी युक्ती सांगा.
कालिदासाने त्या कवीची कविता वाचली. ती खरोखरच सुंदर होती. एरवी पारितोषिक
प्राप्त होण्यासारखी होती. कालिदास त्या कवीला म्हणाला,
'विद्वत्वर,
आपली कविता फारच सुंदर आहे. पारितोषिक मिळण्याच्या योग्यतेची
आहे. पण ते मिळणार नाही हे निश्चित. असे करा मी आपल्याला एक कविता देतो. ती उद्या दरबारात
गाऊन दाखवा. आपल्याला पारितोषिक नक्की मिळेल. पण ते मिळाल्यानंतर ही कविता मी रचून
दिली अशी वाच्यता कोठेही करु नका.'
कालिदासाच्या सूचनेप्रमाणे दरबारात कवीने कालिदास रचित कविता म्हटली.
छंद :- स्रग्धरा
स्वस्ति, श्री भोज राजन् त्वमाखिलभुवने धार्मिक: सत्यवक्ता
पित्रा ते संग्रहीता नवनवति मिता रत्नकोट्यो मदीया ।
तास्त्वं देहि राजन् सकल बुद्धजनैर्ज्ञायते सत्यमेतत्
नो वा जानन्ति चेत्, तन्मम
कृतिमपि नो देहि लक्षं ततो मे ॥
अर्थ :- हे भोजराजा, तुझे कल्याण असो. तुझी त्रिभुवनात धार्मिक आणि सत्यवक्ता म्हणून ख्याती आहे. तुझ्या
पित्याने माझ्याकडून नव्याण्णव कोटीची रत्ने घेतली आहेत. ही गोष्ट सत्य आहे. आणि सर्वजण
जाणतात. तेव्हा ती माझी मला परत कर. हे जर तुझ्या दरबारातील सर्व विद्वान लोक जाणत नसतील आणि माझी ही कविताही
जाणत नसतील, ही कविता नवीन आहे म्हणून मला एक लक्ष सुवर्णमुद्रा दे.
ही कविता ऐकल्यानंतर ही आपणास माहीत असल्याचं कोणीच उठून सांगेना. असल्याचे
सांगितलं तर राजाला नव्याण्णव कोटीना मुकावं लागणार आणि आपल्यावर राजाची नाराजी होणार!
त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. कोणीच उठून ही कविता आपणास माहीत असल्याच सांगेना. हे
पाहून राजानं एक लाख सुवर्णमुद्रा मागवल्या आणि कविच्या पदरात ओतल्या.
राजाच्या जवळ बसलेला कालिदास राजाकडं वळून हसत हसत म्हणाला,
‘सुंदर काव्य नाही ?’
फारच भोजराजानं इंगित जाणलं होतं. तो कालिदासाला म्हणाला,
'कविवर,
स्वतःच्या काव्याची स्वतःच इतकी स्तुती करणं चांगलं नाही.'
‘आपल्या पदरी एकपाठी म्हणजे
एकदा ऐकलं की पाठ होणारा.
द्विपाठी म्हणजे दोनदा ऐकलं की पाठ होणारा. आणि
त्रिपाठी म्हणजे तीन वेळा
ऐकले की पाठ होणारा.
अशा कविना ठेवून स्वतःची फजिती करण्यापेक्षा निश्चितच चांगले.
कालिदासाच्या या उत्तरावर
राजा हसला आणि कालिदासही त्या हास्यात सामील
झाला.
कथा ०८
विद्वान कन्या वेदवतीची वर परिक्षा
फार पूर्वी चंपावती नावाच्या नगरीमध्ये नारायण शर्मा नावाचा सर्व शास्त्रामध्ये
पारंगत असलेला असा विद्वान गृहस्थ रहात होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सुशिला. त्याना
वेदवती नावाची कन्या होती. त्या पतीपत्नीनी आपल्या या एकुलत्या
एक कन्येचे केवळ लालन पालन केले नाही तर तिच्या शिक्षणाकडे पूर्ण लक्ष दिले. नारायण
तिच्याकडून अनेक ग्रंथ वाचून घेतले. अनेक शास्त्रांचे अध्ययन करुन घेतले. काव्य आणि
व्याकरण यात तर ती पारंगत झाली. तिच्याजवळ बहुश्रुतता होतीच,
पण त्याबरोबर वाक्पटुताही होती.
ती विवाह योग्य झाली आणि मग मात्र नारायण शर्माचे डोळे उघडले. आता आपल्या ह्या
विद्वान मुलीला अनुरुप वर कोठे शोधायचा या चिंतेने त्याला ग्रासले.
आपल्या पित्याची चिंता लक्षात येऊन वेदवती म्हणाली,
'पिताजी,
काव्य, व्याकरण इत्यादी शास्त्रात विद्वान माझा पती युवकालाच मी म्हणून
निवडू इच्छिते. मीच माझ्या पतीची परीक्षा घेऊन त्याची निवड करीन,
आपण निश्चित असा.
त्याच नगरीमध्ये धनानंद नावाचा एक अत्यंत श्रीमंत गृहस्थ होता. त्याला गौरांग
नावाचा मंदबुद्धीचा मुलगा होता. आळसामुळं त्याने कुठल्याच विषयाचं ज्ञान संपादन केलं
नव्हतं. काव्य आणि व्याकरणाचा तर त्याला गंधही नव्हता. मोठ्या मुष्किलीनं संस्कृतमधील
'देव' या शब्दाची
सर्व रुपं त्याच्याकडून पाठ झाली होती. आपल्या संपत्तीच्या जोरावर वेदवतीला आपली सून
करुन घ्यावी अशी ईर्षा धनानंदाच्या मनात उत्पन्न झाली आणि त्याने सरळ तिला मागणी घातली,
नारायण शर्मा त्यामुळे उद्विन्न झाला. ते पाहून वेदवती म्हणाली,
“पिताजी,
चिंता करु नका. सर्व काही ठीक होईल.
चार जाणकार लोकांना बरोबर घेऊन वधूपरीक्षेसाठी आलेला गौरांग वेदवतीचे लावण्य
पाहून मोहून गेला. तो काहीच बोलत नाही असे पाहून वेदवती म्हणाली,
"पिताजी,
मी याना काही प्रश्न विचारु इच्छिते. '
उपस्थित असलेल्या सर्वांनीच माना डोलवल्या.
वेदवती म्हणाली, “माझा पहिला प्रश्न अगदी सरळ आणि सोपा आहे. 'विहस्य' "हे रुप कोणते?" गौरांगाला फक्त देव शब्दाची रुपेच येत होती. विहस्य हे 'देवस्य ' सारखेच रुप आहे हे जाणून तो ताडकन् म्हणाला,
“हे षष्टीचे एकवचन.
त्याचं हे अज्ञान पाहून बरोबर आलेले लोक चकित झाले.. वेदवती
म्हणाली,
"ठीक आहे. आता 'विहाय' हे रुप आपण ओळखा.
एका क्षणाचाही विलंब न करता गौरांग म्हणाला,
"हे चतुर्थी विभक्तीचे एकवचन.”
त्याचं हे विलक्षण उत्तर ऐकून सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे
पाहातच राहिले. थोडसं हसून
वेदवती पुन्हा म्हणाली, ''अहं' आणि '
कथं' या शब्दांचे व्याकरण सांगा.
गौरांग म्हणाला, ‘ही द्वितीयेची एकवचने आहेत.’
तेव्हा वेदवती हसून म्हणाली,
यस्य ‘षष्टी’ ‘चतुर्थी’ च ‘विहस्य’ च ‘विहाय’ च ।
अहं कथं द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहं कथं ? ॥
(विहस्य आणि विहाय ही ज्याच्या दृष्टिने षष्टी आणि चतुर्थीची
रुपे आहेत. अहं आणि कथं ही द्वितीयेची रुपे आहेत अशाची मी द्वितीया (पत्नी) कशी होऊ?)
आपलं अज्ञान झाकण्यात अयशस्वी झालेला गौरांग लज्जित होऊन आणि
सर्वांच्या उपहासाचा विषय होऊन घरी परतला..
कथा ०९
कविरत्न कालिदासाच्या मृत्यू
कसा झाला? त्याविषयी एक कथा
ज्या कालिदासाने जर्मन कवि गटेला वेड लावले, जर्मनीतला गटे नावाचा कवि
कालीदासाची नाटकांची पुस्तके डोक्यावर घेऊन नाचला होता. की एवढ्या सुंदर उपमा, अलंकार
मी कुठेच पाहिल्या नाहीत. त्या कालिदासाबद्दल वैयक्तिक माहिती मात्र
फारच थोडी आढळते. जी माहिती आहे ती दंतकथेच्या स्वरुपात.
त्या दंतकथाही त्याच्या मोठेपणात भर घालणाऱ्या इतिहासकारांनी संशोधन करून काही
माहिती लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या इतिहासकारामध्येही एकवाक्यता
आढळत नाही. काहींच्या मते 'विक्रम संवत' स्थापन करणाऱ्या विक्रमादित्य राजाच्या पदरी कालिदास होता. काहींच्या
मते,
'मेघदूतांतील अंतर्गत पुराव्यावरून
तो अग्निमित्र राजाचा समकालीन असावा. 'ज्ञानेश्वर एक की दोन' या वादाप्रमाणे काहींनी 'कालिदास एक की दोन' हा वाद उत्पन्न करायलाही कमी केलेले नाही. कालिदासाच्या अनेक
दंतकथा मात्र भोजराजाशी संबंधित आहेत. आपल्याला इतिहास संशोधकांच्या मल्ल युद्धात काय
रस असणार. भोजराजाशी संबंधित असलेल्या दंतकथा कालिदासाच्या
वाङ्मयीन कृतीपेक्षाही जास्त जवळच्या वाटण्यासारख्या आहेत.
भोजराजाला समस्या पूर्तीची आवड होती. समस्यापूर्ती म्हणजे कवितेचा एक चरण दिला जाई आणि
त्या चरणास योग्य अशा अर्थाचे तीन चरण कवीने रचावयाचे. छंद किंवा वृत्त त्या चरणास
योग्य असेच असले पाहिजे हे बंधन अर्थातन असे. अशीच एक. समस्यापूर्वी कालिदासाच्या मृत्यूस
कारणीभूत झाली अशी एक आहे.
कालिदास उत्तर आयुष्यामध्ये भेटकेत भटकता सिंहलद्वीपात गेला. (आजचे श्रीलंका) तेथे तो एका गणिकेच्या घरी राहिला.
कालिदासाचा विरह भोजराजाला सहन होईना त्याने एक समस्या दिली.
कमले कमलोत्पत्तिः श्रूयते न तु दृश्यते ।
अर्थ :- कमळामध्ये कमळाची उत्पत्ति होते हे फक्त कानावर आहे पण प्रत्यक्षात कुणाच्या
पाहण्यात नाही.
ही समस्या पूर्ण करण्याच्या नादाने तरी कालिदास परतेल अशी भोजराजाला वेडी आशा
होती. ही समस्या पूर्ण करणे ‘मी मी’ म्हणणाऱ्या
पंडितांना शक्य होईना. भोजराजाने पारितोषिकाची रक्कम वाढवली. तरी उपयोग होईना. ज्या
गणिकेच्या घरी कालिदास पडून राहिला होता तिला पारितोषिकाची लालसा निर्माण झाली. तिने
सहब म्हणून तो चरण उच्चारला. कालिदास ताबडतोब म्हणाला,
‘बाले तव मुखांभोजे कथामिन्दीकरद्वयं ।’ अर्थ :- हे ! बालिके,
तुझ्या मुखरुपी कमलावर ही दोन नीलकमले कशी?
गणिकेने द्रव्य लालसेपोटी कालिदासाचा खून केला. गणिका भोजराजाच्या दरबारात
हजर झाली.
कालिदासाचा खून झाल्याची वार्ता कर्णोपकर्णी राजाच्या कानापर्यंत पोचली होती.
कालिदासाचा खून व्हावा या गोष्टीमुळे राजा शोकविव्हळ झाला होता. तो असा शोकविव्हळ असतानाच
कोणी एक गणिका आपण पूर्वी जाहीर केलेली समस्या पूर्ण करण्याच्या हेतूने दरबारात आली
आहे असे त्याला कळले.
गणिकेने ती कविता म्हणून दाखविली. तिला वाटले राजा आपल्यावर प्रसन्न होणार
आणि आपल्या पारितोषिकाची रक्कम मिळणार. भोजराजाने सेवकाना पाचारण करुन त्यांच्या कानातहीतरी
सांगितले. गणिकेची उत्कंठा वाढीस लागली. तेवढ्यात सेक्क परतले आणि त्यांनी त्या गणिकेच्या
हातापायात बेड्या ठोकल्या.
ही समस्या कालिदासाशिवाय अशा चपखल शब्दात कोणीच पूर्ण करणार नाही. याबद्दल
त्याची खात्री होती. कालिदासाचा खुनी राजाला सापडला होता. पण त्यापेक्षा कालिदास आपल्याला
कायमची अंतरला हे दुःख भोजराजाला मोठे होते.
कथा १०
बाहेरून आलेल्या प्रकांड पंडिताला
भोयाचे रूप घेतलेल्या कालिदासाने पळवून लावले
स्वतःला प्रकांड पंडित समजणारा एक विद्वान उज्जयनीच्या वेशीवर येऊन दाखल झाला.
त्याच्या विद्वत्तेचा डंका उज्जयनीमध्ये अगोदरच पिटला गेला होता. भोजराजाच्या कानावरही
ही बातमी गेली होती. राजाने पंडिताचा योग्य सत्कार व्हावा या हेतूने पालखी उज्जयनीच्या
वेशीवर पाठवली. विद्वान मोठ्या आढ्यतेने पालखीच्या गोंडा हातात धरून पालखीत बसला.
दिवस थंडीचे होते. पालखी वाहून नेणारे भोई संस्कृत जाणत असतील
की नाही याचा विचार न करता त्या पंडिताने विचारले,
‘शीतं बाधति किम्’=
थंडीचा त्रास होतो काय?’
क्षणाची ही उसंत न घेता एक भोई म्हणाला,
‘न मे
बाधते शीतं यथा बाधति बाधते. ’
आपण 'बाधति'
हा शब्द वापरलात त्याचा मला जेवढा त्रास होतोय तेवढा
थंडीने होत नाही.
'बाध्' हे क्रियापद आत्मनेपदी आहे. त्याचे बरोबर रुप बाधते होते.
पंडिताने ते परस्मैपदी धरुन 'बाधति'
असा प्रयोग केला होता.
आपली व्याकरणातील चूक पंडिताच्या लक्षात आली. पण ती या भोयाने दाखविल्यामुळे पंडित चमकला. ज्या नगरीतले भोयीसुद्धा इतके विद्वान तिथे
आपला काय पाड लागणार असे मनात येऊन तो पालखीतून उतरला आणि तो निघून गेला. तो पालखीवाहक अर्थात दुसरा तिसरा कोणी नसून कालिदास होता. कालिदासाला
आधीच कळले होते की असा अहंकारी विद्वान इथे आलेला आहे. म्हणून कालिदास भोयाचे रूप घेऊन
तिथे हजर झाला होता.