भाग ००३ प्राचिन संस्कृत मराठी कथा संग्रह

भाग ००३ प्राचिन संस्कृत मराठी कथा संग्रह

 भाग ०० प्राचिन संस्कृत मराठी कथा संग्रह


कथा ११

चमत्कारीक शब्दांचा आशिर्वाद

       भोजराजा विद्वानांचा कदरदान होता. विद्वानांची या ना त्याप्रकारे परीक्षा घेऊन परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्याला द्रव्य देऊन तो संतुष्ट करीत असे. भोजराजाच्या दातृत्वाच्या कथा दूरवर पसरल्या असल्याने देशोदेशींचे विद्वान त्याच्या दरबारात उपस्थित होत आणि आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करुन राजाकडून द्रव्यलाभ करुन घेत.

       काहीवेळा गरीब ब्राह्मण आपल्या जवळच्या तुटपुंज्या विद्येने राजाला खूष करुन राजाकडून बक्षीस उपटत. पण अशावेळी ते कालिदासाला शरण जाऊन त्याची मदत घेत.

       एकदा असाच एक गरीब ब्राह्मण कालिदासाकडे आला आणि त्याने आपल्या दारिद्र्याचे रडगाणे कालिदासापुढे गाईले. कालिदासाने त्याची विचारपूस केली. पण त्या ब्राह्मणास नित्य कर्म सोडून दुसरे काहीच येत नव्हते. कालिदासाला त्याची दया आली. त्याने त्या ब्राह्मणास एक कानमंत्र दिला आणि दुसरे दिवशी दरबारात हजर राहावयास सांगितले.

       दुसरे दिवशी कालिदासाने सांगितल्याप्रमाणे तो ब्राह्मण मोठ्या रुबाबात दरबारात प्रवेश करता झाला. कोणीतरी मोठा विद्वान आलाय असं समजून राजा सिंहासनावरुन उठून त्याला सामोरा गेला आणि त्याने त्या ब्राह्मणास नमस्कार केला. त्यामुळे मात्र तो ब्राह्मण गडबडून गेला. वरवरचा उसना रुबाब गळून पडला. कालिदासाने सांगितल्याप्रमाणे. राजाला आशीर्वाद देण्यासाठी त्याने तोंड उघडले. त्याने राजाला आशीर्वाद दिला.

       'त्रि पीडास्तु दिने दिने' कालिदासाने त्याला 'सुपीडास्तु दिने दिने' असा आशिर्वाद द्यायला सांगितला होता. राजा, तुला दररोज गोड त्रास व्हावा.  पण ब्राह्मणाने गडबडून भलताच आशिर्वाद दिला. राजा संतापला. आता त्या गरीब ब्राह्मणाला शिक्षा होणार असे समजून कालिदास उभा राहिला. आणि म्हणाला. 'महाराज. ह्या विद्वानाने आपल्याला खोल अर्थभरित असा आशीर्वाद दिला आहे. त्याला म्हणावयाचे आहे,

प्रदाने विप्रपीडास्तु शिशुपीडास्तु भोजने ।

शयने पत्निपीडास्तु त्रिपीडास्तु दिने दिने ॥

       दानाचे वेळी राजा तुला ब्राह्मणांचा त्रास व्हावा. भोजन समयी बालकाकडून त्रास व्हावा व शयनाचे वेळी पत्नीकडून. अशाप्रकारे दररोज तुला तीन प्रकारचे गोड त्रास व्हावेत. राजा संतुष्ट झाला व त्याने धन देऊन त्या ब्राह्मणाचा सत्कार केला.

  ******************

कथा १२

 

कालिदासाची थोरवी

       'उपमा कालिदासस्य' असं म्हणून केवळ याच प्रांतात कालिदास थोर होता असं दर्शवणं हा त्याच्या काव्यशक्तीचा उपमर्द करण्यासारखं आहे. श्रीमंत परंतु क्लिष्ट नाही अशी शब्दयोजना, थोड्या शब्दात संपूर्ण चित्र उभं करण्याचं सामर्थ्य, शब्दमाधुर्य, सहज विग्रह करता येण्यासारखे संधी याबाबतीत त्याचा हात धरणारा अन्य कवि असेल असं वाटत नाही. 'रघुवंश' या महाकाव्यातील काही प्रसंग तर त्याने अत्यंत बहारीने रंगवले आहेत.

       पाचव्या सर्गातील राजा रघु आणि वरतंतु ऋषींचा शिष्य कौत्स्य यांच्यात घडलेला प्रसंग वर्णन करताना त्याने दाखविलेले कौशल्य तर स्तिमित करणारे आहे.

       विश्वजीत यज्ञामध्ये आपली सर्व संपत्ती दान केल्यामुळे निष्कांचन झालेल्या रघुराजाकडे वरतंतु यांचा शिष्य कौत्स्य धनाच्या इच्छेने येतो. राजा त्याचे रितीस अनुसरुन स्वागत करतो आणि त्याला हात जोडून प्रश्न करतो.

अप्यग्रणीर्मन्त्रकृतामृषीणां । कुशाग्रबुद्धे कुशली गुरुस्ते ।

यतस्त्वया ज्ञानमशेषमाप्तं । लोकेन चैतन्यमिवोष्णरश्मे ॥

       सर्व चराचर सृष्टी ज्याप्रमाणे ज्याचे किरण उष्ण सुखकर आहेत अशा सूर्याकडून चैतन्य प्राप्त करते त्याप्रमाणे मंत्रदृष्ट्या ऋषीमध्ये अग्रणी असलेल्या अशा ज्या तुझ्या गुरुकडून तू समग्रविद्या प्राप्त केलीस ते तुझे गुरुजी कुशल आहेत ना. कौत्स्याला तो कुशाग्रबुद्धे म्ह. ज्याची बुद्धी दर्भाच्या पात्यासारखी तल्लख आहे. असा म्हणून संबोधतो. एवढ्या थोड्या शब्दात कालिदासाने किती माहिती दिली आहे.

       आपलं शरीर, वाचा आणि मन यांच्या सहाय्यानं त्यानी जी तप साधना केली आणि जी इंद्राचं सिंहासन डळमळून टाकण्याइतकी उग्र आहे, तिच्यात काही अडचणी तर येत नाहीत ना? ज्या वृक्षांचं संगोपन तुम्ही पुत्रवत केले त्याना वादळासारख्या आपत्तीपासून काही इजा तर संभवत नाही ना? अशी सर्व चौकशी करून झाल्यानंतर दिलीप राजा म्हणतो,

 

तवार्हतो नाभिगमेन तृप्तं मनो नियोग क्रिययोत्सुकं मे

अप्याज्ञया शासितुरात्मना वा प्राप्तोऽसि संभावयितुं वनान्माम् ॥

       आपल्या सारख्याच्या केवळ दर्शनाने माझ्या मनाचे समाधान झालेले नाही. आपल्या आज्ञेचं पालन करण्याची इच्छा माझ्या मनात आहे. आपण आपल्या गुरुच्या सांगण्यावरुन माझ्याकडे आला आहात की आपणहून मला भेट द्यायला आला आहात?

       कौत्स्य मनात इच्छा बाळगून आला होता. पण राजाच्या हातात जे पूजापात्र होते ते मृत्तिकेचे होते. राजाने सर्व संपत्तीचे दान केले होते त्यावरुन आपली इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही हे त्याच्या ध्यानी आले. पण मनाची एवढीही विषण्णता न दाखवता कौत्स्य म्हणता,

भक्तिः प्रतीक्ष्येषु कुलोचिता ते पूर्वान्महाभाग तयातिशेषे ।

व्यतीतकालस्त्वहमभ्युपेत स्त्वामर्थिभावादिति मे विषादः ॥

शरीरमात्रेण नरेन्द्र तिष्ठन्नाभासि तीर्थप्रतिपादितर्द्धि ।

आरण्यकोपात्त फलप्रसूति: स्तम्बेन नीवार इवावशिष्टः ॥

अर्थात :- दारी आलेल्याचं प्रेमपूर्वक स्वागत करणं हे राजा तुझ्या कुलाचं ब्रीदच आहे. पण त्याही बाबतीत तू सर्वाना मागं टाकलं आहेस. परंतु काळ उलटून गेल्यानंतर मी तुझ्याकडं धनाच्या इच्छेनं आलो आहे याबद्दल माझ्या मनान विषाद आहे. हे राजा, आपलं सर्व धन योग्य ठिकाणी दान करून झाल्यानंतर तू वनवासी लोकानी धान्याची कणसं काढून नेल्यानंतर उरणाऱ्या एखाद्या ताटा सारखा रोपाच्या दिसत आहेस.

       तेव्हा मी माझं काम आता दुसऱ्या कोणाकडून तरी करुन घेईन. पाण्याचा वर्षाव करुन रित्या आलेल्या शरद ऋतुतील मेघाला चातक पक्षी जलाची याचना करुन त्रास देत नाही.

       असं म्हणून परत फिरु इच्छिणाऱ्या कौत्स्याला रघुराजानं थांबवलं. 'मुनीवर', तो म्हणाला. ‘‘आपल्या गुरुला काय गुरुदक्षिणा देण्याची आपली इच्छा आहे.’’

       कौत्स्य म्हणाला. विद्यार्जन समाप्त झाल्यानंतर गुरुदक्षिणा काय द्यायची असे मी गुरुजींना विचारले. त्यावर ते म्हणाले. आजपर्यंत तू जी माझ्या ठिकाणी भक्ती दाखविलीस तीच माझी गुरुदक्षिणा, मला अधिक काही नको. पण मी वारंवार आग्रह केल्यामुळे ते म्हणाले. माझ्याकडून तू चौदा विद्या ग्रहण केल्यास तेव्हा चौदा कोटी सुवर्णमुद्रा मला गुरुदक्षिणा म्हणून दे.

       आपल्या दारी आलेल्या याचक विन्मुख होऊन दुसऱ्याकडे जावा हे आपल्या कीतींला बट्टा लावणारं ठरणार असे वाटून रघूने त्याला किंचित काळ थांबण्यास सांगितले. रघूने कुबेरावर स्वारी करण्याची तयारी केली. आपल्यावर स्वारी करावयास रघू निघाला आहे हे कुबेराला कळले मात्र, त्याने रघूच्या जामदारखान्यात सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. राजाने ही सर्व सुवर्णरास घेऊन जा असे कौत्स्यास विनविले. परंतु गुरुला द्यावयाच्या गुरुदक्षिणेपेक्षा एकही अधिक सुवर्णमुद्रा घ्यायला कौत्स्याने नकार दिला. तो कौत्स्यही धन्य आणि याचकाने मागितलेल्यापेक्षा अधिक देणारा तो राजाही धन्य !

       भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटावा अशी अनेक चित्रे कालिदासाने आपल्या काव्यात रंगविली आहेत.

  ******************

कथा १३

मृत्यूदेवता यमराजाचा भाऊ

       समस्यापूर्ती हा संस्कृत काव्यातील एक अभिनव प्रकार आहे. मध्ययुगातील विद्वान राजे कवितेचा एक चरण सुचवत असत. त्यांच्या दरबारातील कवींनी किंवा राज्यातील कवींनी उरलेले चरण जुळवून ती कविता पूर्ण करावयाची असे. अर्थात जुळलेले ते चरण त्याच वृत्तात असले पाहिजेत ही अट असेच. शिवाय अर्थाच्या दृष्टिनेही सुचविल् चरणाला साजेशी असली पाहिजे.

       त्यामुळे या प्रकारात कवीच्या कवीत्व शक्तीची परीक्षा तर होत असेच, पण त्याचं कल्पना चातुर्यही कसास लागे. ज्याचे काव्य उत्तम ठरेल त्याला राजाकडून घसघशीत बक्षीस प्राप्त होई. काही काही वेळा दोन कवी वेगळ्या रीतीने समस्यापूर्ती करीत. त्यामुळे श्रोत्यांच्या आनंदात भर पडत असे.

       आयुष्यात दवाखान्याची पायरी चढायला न लागणारे महाभाग विरळेच. प्रकृतीत बिघाड झाला की वैद्याला शरण जाण्याशिवाय गत्यंतरच नसते. त्यावेळी तरी वैद्य तारणहार वाटतो. वकील, शिक्षक, व्यापारी या सर्वांपेक्षा वैद्याला मान जास्त. असं असूनही वैद्याची, त्याच्या ज्ञानाची टवाळी केली गेली नाही असे क्वचित घडते. अर्थात ही खाजगीत. पुढील समस्यापूर्तीवरुन याची कल्पना येईल. राजाने समस्या

       दिली. वैद्यराज नमस्तुभ्यं (वैद्यराजा, तुला नमस्कार असो.) कवीला वैद्यावरील आपला राग व्यक्त करायला चांगली संधी मिळाली तो दरबारात म्हणाला,

वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर ।

यमस्तु हरति प्राणान् वैद्यः प्राणान् धनानिच ॥

हे वैद्या! तुला नमस्कार असो. तू यमराजाचा भाऊ आहेस. फरक एवढाच की यम फक्त प्राण हरण करतो तू प्राण तर हरण करतोसच. पण त्याबरोबर रोग्याचे धन ही लुबाडतोस.

       दुसऱ्या एका कवीचे एवढ्यावर समाधान झाले नाही. त्याने आपल्या कल्पना शक्तीला स्वैर सोडले. तो म्हणाला,

वैद्य राज नमस्तुभ्यं क्षपिता शेष मानव ।

त्वयि निन्यस्त भारोऽयं कृतान्तः सुखमेधते ॥

अर्थ :- वैद्यराज, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सर्व मानव जातीला क्षपित केले आहे. आपल्या कामाचा भार तुमच्यावर सोपवून यमराज सुखात कालक्रमणा करतो.

  ******************

कथा १४

कालिदासाचे चातुर्य

       राजाच्या दरबारात एखाद्याच्या वरचष्मा झालेला इतर दरबारी लोकांना सहन होत नाही. त्याचे पाय खाली ओढण्यासाठी ते संधी शोधत असतात. भोजराजच्या दरबारात महाकवि कालिदासाला मिळणारा मान इतर कवींना सहन होत नसे. पण करणार काय? त्याच्या सारखी कवित्वशक्ती त्यांच्याजवळ नसल्याने त्यांचं काही चालत नसे.

       कालिदासावर जळणारा 'शतंजय' नावाचा असाच एक कवि होता. कालिदासाचं न्यून दाखविण्यासाठी त्यानं एकदा एक श्लोक रचला आणि आपल्या शिष्याला तो भोजराजाकडे पोहोचता करावयास सांगितले.

       आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे तो श्लोक घेऊन शतंजयाच्या शिष्य लगबगीने चालता असता त्याची वाटेत कालिदासाशी गाठ पडली. काय शिष्यवर, कोठे एवढ्या त्वरेने चालला?’ कालिदासाने त्याला विचारले.

       शिष्य भोळा, तो नम्रपणे म्हणाला, "गुरुजींनी एक नवीन श्लोक रचला आहे. तो राजे साहेबांना सादर करावयास चाललो आहे.

       'बघू तरी तुझ्या गुरुजींनी एवढा काय श्लोक लिहिला आहे तो.

       कालिदास म्हणाला, कालिदासाची गुणज्ञ म्हणून ख्याती असल्यानं शिष्यानं मोठ्या आनंदानं तो कालिदासाच्या हवाल ना. कालिदासानं तो वाचला.

अपशब्द शतं माघे भारते च शतत्रयम् ।

कालिदासे न गण्यन्ते कविरेको धनंजयः ॥

       माघ कवीच्या काव्यात शंभर अपशब्द आढळून येतात. 'महाभारता' त तर तीनशेच्यावर. कालिदासाच्या काव्यात आढळून येणाऱ्या अपशब्दांची तर गणतीच करायला नको. शतंजय कवीला मात्र त्या कवींचा हा दोष दाखवून देण्यासाठी एकच अपशब्द वापरावा लागतो. पर्यायाने कवी म्हणवून घ्यायला एकच कवी आणि तो म्हणजे धनंजयः

       ‘‘वा! छान काव्य केलंय की तुझ्या गुरुजींनी. पण लिहिताना ते एके ठिकाणी काना द्यायला विसरलेले दिसतात. तुझी परवानगी असेल तर मी ती चूक दुरुस्त करतो.’’

       कालिदास म्हणाला. ‘‘हे काय विचारणं झालं ? करा ना दुरुस्ती. एका चुकीमुळे माझ्या गुरुजींना कमीपणा यायला नको.’’

       शिष्य प्रांजलपणे म्हणाला. कालिदासाने श्लोकातील पहिल्याच 'अपशब्द' शब्दातील '' ला काना दिला. तेवढ्या दुरुस्तीने श्लोकाचा अर्थ पार बदलून गेला.

आपशब्द शतं माघे भारते च शतत्रयं ।

कालिदासे न गण्यन्ते कविरेको धनंजयः ॥

       माघ कवीच्या काव्यात आप म्हणजे पाणी या शब्दाला समान अर्थी असे शंभर शब्द सापडतील. तर महाभारतामध्ये तीनशे सापडतील. कालिदासाच्या काव्यात 'आप' या शब्दाला समानार्थी किती शब्द सापडतील याची तर गाणनाच करता येणार नाही. शतंजय कवीच्या काव्यात मात्र 'आप' हा एकच शब्द आढळतो. कवीचे शब्ददारिद्रय यावरुन दिसून येते.

       भोजराजाच्या दरबारात जेव्हा तो शतंजय रचित श्लोक वाचला गेला. तेव्हा शतंजयाची मान खाली गेली.


 ******************

कथा १५

धारानगरीला कालिदासाचे पुनरागमन

       भोजराजाच्या पदरी वस्तुत कालिदास कधीच नव्हता असे बऱ्याच विद्वानांचे आहे. पण भोजराजाला काव्याचे अतोनात वेड असल्याने कालिदासासारखा कविश्रेष्ठ

       त्याच्या पदरी असला पाहिजे असे गृहीत धरुन अनेक दंतकथा प्रचलित झाल्या. अशीच एक दंतकथा भोजराजाचं काव्यवेड आणि कालिदासाचं काव्यरचनेवरील प्रभुत्व प्रदर्शित करणारी आहे.

       एकदा राजा भोज कालिदासाला म्हणाला, "हे कविश्रेष्ठा, तुझा शेवटचा ग्रंथ ऐकव. 'शेवटचा' या शब्दामुळे कालिदास रागावला आणि धारानगरी सोडून एकशीला नगरीस गेला. कालिदासाच्या वियोगानं भोजराजा शोकाकूल झाला. आणि त्याला शोधण्याच्या हेतूने एका भिक्षेकऱ्याचे रुप घेऊन हिंडत हिंडत अखेर एकशीला नगरीस आला.

       कालिदासाने त्या भिक्षेकऱ्यास मोठ्या विनयाने विचारले. ‘‘योगीराज, रहाणार कुठले?’’

       तेव्हा भिक्षेकरी म्हणालाल, ‘‘मी धारानगरीचा रहाणारा.’’

'धारानगरी' हा शब्द ऐकताच कालिदासाने लगबगीने विचारले.

‘‘तिथला भोजराजा कुशल आहे ना? ’’

‘‘त्याबद्दल मी काय सांगू ?’’  असं म्हणून भिक्षेकरी थांबला.

‘‘काय असेल ते स्पष्ट सांगा.’’ कालिदास म्हणाला.

‘‘भोजराजाचा स्वर्गवास झाला.’’ भिक्षेकरी म्हणाला.

       ते ऐकताच कालिदास जमिनीवर कोसळला आणि म्हणाला, महाराज, तुमच्याशिवाय मी एक क्षणभरही जिवंत राहू इच्छित नाही. मीही तुमच्या पाठोपाठ येतो."

       असा बराच शोक करुन कालिदासाने श्लोक रचला.

अद्य धारा निराधारा निरालम्बा सरस्वती ।

पण्डिताः खण्डिता : सर्वे भोजराजे दिवं गते ।।

       आज धारानगरी अनाथ झाली. सरस्वतीचा आधार नाहीसा झाला. सर्व पण्डितांचा सत्यानाश झाला. कारण आज भोजराजा स्वर्गवासी झाला.  

       कालिदासाचा तो श्लोक ऐकून तो भिक्षेकरी मूर्च्छित पडला. त्याबरोबर हा दुसरा तिसरा कोणी नसून भोजराजा आहे हे कालिदासाने ओळखले. 'महाराज, तुम्ही मला आज फसवलतं' असं म्हणून कालिदासानेही शोक व्यक्त केला. राजा शुद्धीवर येताच आपल्या श्लोकात थोडा बदल करुन तो म्हणाला.

अद्य धारा सदाधारा सदालम्बा सरस्वती।

पण्डिता: मण्डिताः सर्वे भोजराजे भुवि स्थिते ॥

       भोजराजा या पृथ्वीतलावर आहे आणि आज धारानगरी सर्वांचं आश्रयस्थान झाली आहे. सरस्वतीला आधार मिळाला आहे. सर्व पंडितांचं सत्कारपर्वक स्वागत झालं आहे.

       त्याच्या या कवित्वावर खूष होऊन राजानं त्याला आपल्या छातीशी धरलं आणि नंतर ते दोघंही आनंदाने धारानगरीला परतले.

---------

कथा १६

तप्त अग्नि चंदनाप्रमाणे थंडगार झाला

       भोजराजा एकदा दरबारात आला आणि दरबारात उपस्थित असलेल्या कवींकडे पाहून म्हणाला,

काल रात्री मी एक आश्चर्याची गोष्ट पाहिली.

सगळ्यांनी उत्सुकतेने राजाकडे पाहिलं. राजा पुढं म्हणाला,

हुताशनश्चंदन पड्ङ्क शीतलः ।

अग्नि चंदनाच्या लेपाप्रमाणे शीतल झाला.

       राजाच्या मनात काय आहे ते लक्षात येताच मात्र कवींचे चेहरे पडले. ही तर राजाने त्यांच्या पुढे ठेवलेली समस्या होती. तिची पूर्ती करणे कठीण होते. सर्वजण गप्प झालेले पाहून राजा म्हणाला, “काय कुणालाच हे कसं झालं हे सांगता येत नाही ? कालिदास उठला आणि म्हणाला, महाराज, यात विशेष काय आहे ? ऐका.

सुतं पतन्तं प्रसमीक्ष्य पावके

न बोधयामास पति पतिव्रता ।

तदाभवत्पति भक्ति गौरवात्

हुताशनश्चंदन पङ्क शीतलः ॥

       आपला मुलगा आगीत पडतोय हे पाहून सुद्धा आपल्या मांडीवर झोपी गेलेल्या आपल्या पतीला त्या पतिव्रतेनं जागं केलं नाही. त्या पतिव्रतेची आपल्या पतीवरील निष्ठा पाहून अग्नीही चंदनाच्या उटीप्रमाणे थंड झाला.

 

कथा १७

हनुमंताचे रामायण

       एकदा नर्मदेच्या डोहात कोळ्याना एक शीलाखंड सापडला, त्यावर काही अक्षरं होती. ते कोळी तो शीलाखंड घेऊन राजाकडं गेले.

       हनुमानाने रामायण रचले आणि ते शीलाखंडावर कोरुन डोहात टाकले अस ऐकिवात होतं. त्यामुळे हे काय आहे ते वाचून उलगडा झालाच पाहिजे असं वाटून राजानं लिपी जाणणाऱ्यांना पाचारण केलं. लिपी जाणणाऱ्यांना त्या शीलाखंडावर दोन ओळी आढळून आल्या.

अयि खलु विषम पां भवति हि जन्तुषु कर्मणां विपाकः ।

       पूर्वी केलेल्या कर्माचा परिणाम खरोखर मनुष्याला संकटात टाकणारा ठरतो.  या श्लोकात पूर्वार्ध काय असावा याबद्दल राजाला उत्सुकता लागून राहिली. त्याने आपल्या राज्यातील कवींना आवाहन केले आणि योग्य पूर्वार्ध सुचविणाऱ्यास पारितोषिक जाहीर केले.

       भवभूतीकडून पुढील पूर्वार्ध आला.

क्व नु कुलमकङ्क मायताक्ष्याः क्वनु रजनीचरसंगमापवादः ।

       विशाल नेत्र असलेल्या सीतेचे एवढासा सुद्धा डाग नसलेले कुल कोठे आणि राक्षसाच्या घरी राहिल्यामुळे आलेला दोष कुणीकडे पण 'ध्वनिदोष ' असल्यामुळे तो राजाच्या मर्जीस उतरला नाही.

       दुसऱ्या एकाने -

क्व च ननु जनकाधिराजपुत्री क्व च दशकंधर मन्दिरे निवासः ।

       असा पूर्वार्ध दिला. राजाधिराज जनकाची कन्या कुठे आणि तिच्या कपाळी दहा तोंडे असलेल्या रावणाच्या मंदिरामध्ये राहण्याचे नशिब कोठे..

       तिसऱ्या एकाने असा पूर्वार्ध दिला.

हरशिरसि शिरांसि यानि रेजुः शिव शिव तानि लुठन्ति गृध्रपादे ॥

       शंकराच्या डोक्यावरील केसामध्ये ज्यांचा वास त्याना अरेरे! जटायुच्या पायाशी लोळण घ्यावी लागते.

       राजाने तिन्ही कवींचा योग्य सन्मान केला.

----------------

कथा १८

महाकवि कालिदासाने चातुर्याने ब्रम्हराक्षसाला संतुष्ट केले.

       भोजराजाने विलासासाठी एक राजमंदिर बांधलं. पण त्याचा गृहप्रवेश व्हायच्या षिक अगोदरच एका ब्रह्मराक्षसानं त्यात ठाण मांडलं. रात्री जे कोणी तिथं वसतीला येतील त्यांना त्यानं खाण्याचा सपाटा सुरु केला. राजानं मांत्रिकांना बोलावलं, पण त्यानाच तो खाऊ लागला. काय करावं? राजाला काही सुचेना. त्याने कालिदासाला बोलावलं.

       कालिदास म्हणाला, ‘महाराज, हा राक्षससकलशास्त्र प्रवीणः कविश्व भाति

हा सर्व विद्यामध्ये प्रवीण कवि असावा. त्याला संतुष्टकरुन कार्यभाग नाणि पाहिजे. मी प्रयत्न करतो.

       कालिदासासारखे विद्वत्व राक्षसाच्या तावडीत द्यायला राजा काही तयार होईना. पण कालिदासाने राजाची समजूत काढली व तो रात्री मंदिरात जाऊन झोपला.

हा अपूर्व पुरुष पाहून राक्षस गरजला.

सर्वस्य द्वे ।  

कालिदासानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं

सुमति कुमति संपदापत्ति हेतू ।

अर्थात :- चांगली बुद्धी ही वैभवाला आणि वाईट बुद्धी ही संकटाला कारणीभूत ठरते.

 

दुसऱ्या दिवशी ब्रह्मराक्षस कालिदास परत आलेला पाहून म्हणाला,

वृद्धो यूना।  म्ह. म्हातारा आणि तरुण

कालिदासाने उत्तर दिले, सह परिचयात्त्यज्यते कामिनीभिः ।

अर्थात :- सलगी झाली की स्त्रिया त्यांचा त्याग करतात.

 

तिसऱ्या दिवशी ब्रह्मराक्षसानं कालिदासाला प्रश्न केला.

एको गोत्रे! म्ह. एक गोत्र असेल तर ?

कालिसानं तो चरण पूर्ण केला.

प्रभवति पुमान्यः कुटुम्बं बिभर्ति । ब्रह्मराक्षसानं कालिदासाला समस्या दिली.

स्त्रीपुंवच्च ! स्त्री जर पुरुषासारखी वागायला लागली तर?

 कालिदासाने ताबडतोब तो चरण पूर्ण केला.

प्रभवति यदा तद्धि गेहं विनष्टम्। म्ह. तसं जर झालं तर सर्व घराचा नाश झाला म्हणून समजावं

पूर्ण श्लोक असा तयार झाला :-

छंद : शिखिरीणी

सर्वस्य द्वे सुमति कुमति संपदापत्ति हेतू ।

वृद्धो यूना सह परिचयात्त्यज्यते कामिनीभिः ।

एको गोत्रे प्रभवति पुमान्य कुटुम्बं बिभर्ति  

स्त्री पुंवच्च प्रभवति यदा तद्धि गेहं विनष्टम् ॥

ब्रह्मराक्षस कालिदासाला म्हणाला,

'सुमते तुष्टोस्मि किं तवभिष्टम् ।

अर्थात :- हे भल्या माणसा ! मी संतुष्ट झालो आहे. तुला काय पाहिजे ते माग.

कालिदासाने त्याने राजमंदिर सोडून जावे अशी प्रार्थना केली. ब्रम्हराक्षसाने ते मान्य केले व ब्रह्मराक्षस तेथून  निघून गेला.

--------

कथा १९

स्तुति कोणाला प्रिय नाही?

       पालखी पदस्थाची स्तुति हे काही विसाव्या किंवा एकविसाव्या शतकाचेच ब्रीद नव्हे. पूर्वीच्या काळीही धनवानांची किंवा राजांची स्तुति केली जात असे. पण तिला सध्या सारखे लांगूलचालनाचे स्वरुप आलेले नव्हते. स्तुति करणाराही पंडित असे. लाळघोट्या नसे.

एकदा एक कवि राजाच्या दरबारात आला आणि म्हणाला,

दूरेऽपि श्रुत्वा भवदीय कीर्ति कर्णो हि तृप्तो न च चक्षुषी मे ।

तयोर्विवादं परिहर्तुकामः समोगतोऽहं तव दर्शनाय ॥

हे राजा, तुझी कीर्ति दूरवरुन माझ्या कानी आली आणि माझे कान तृप्त झाले. परंतु माझ्या डोळ्याचं काही समाधान झालं नाही. त्या दोघांच्यात आपला सतत झगडा चालू राहिला त्यांच्या त्या वादाचं निराकरण करावं या उद्देशानं मी आपल्या दर्शनाला आलो आहे.

दुसरा एक कवि राजाच्या दरबारात येऊन म्हणाला,

 राजंस्त्वत्कीर्तिचंद्रेण तिथय: पूर्णिमाः कृताः

मद्गेहान्न बहिर्याति तिथिरेकादशी भयात् ॥

 राजा, तुझ्या कीर्तिरुपी चंद्रानं साऱ्या तिथ्या पौर्णिमा करून टाकल्या आहेत.  तुझ्या कीर्तिला क्षय कसा तो माहीत नाही. पण त्याचा परिणाम काय झाला आहे माहीत आहे का? माझ्या घरातून एकादशी भीतीनं बाहेरच पडत नाही. आपल्या दारिद्र्याचं रडगाणं न गाता कवीनं चातुर्याने ते राजाच्या नजरेस आणलं यामुळं राजा संतुष्ट झाला.

तिसरा एक कवी म्हणाला,

आकर्ण्य भूपाल यश स्त्वदीयं विधूनयन्तीह न के शिरांसि ।

विश्वंभराभङ्ग भयेन धात्रा नाकारि कर्णो भुजगेश्वरस्य ॥

हे राजा, तुझी कीर्ति कानी पडून शेषाची मस्तके कंपायमान होऊन त्याच्या डोक्यावर असलेल्या पृथ्वीची शकले होतील या भयाने विधात्याने शेषाला कानच प्रदान केले नाहीत.

       पुढचा कवि उभा राहिला आणि म्हणाला, हे राजा तुझी कीर्ति सौंदर्याच्या बाबतीत स्पर्धा करण्यासाठी चंद्राच्या जवळ गेली. परंतु त्याला कलंकित झालेला पाहून ती सागरात स्नान करायला गेली. परंतु त्या सागराला कुंभात ज्याचा जन्म झाला आहे अशा अगस्ती ऋषीने पिऊन ते उष्टे पाणी टाकून दिले आहे असं ऐकून ते ब्रह्मदेवाचे कमंडलू पवित्र करण्यासाठी ब्रह्मलोकात गेली.

त्वत्कीर्तिः शशिनः समीपमगमत्कान्ति प्रतिस्पर्धया

दृष्टवा तं च कलझिकनं पुनरसौ स्नातुं जगामाम्बुधिम् ।

श्रुत्वा तं च घटोद्भवेन मुनिना पीतोज्झित  

पुण्यं ब्रह्मकमण्डलुं कलयितुं ब्रह्माण्डमन्यं ययौ ॥

पुढचा कवि उठला आणि म्हणाला,

कर्पूरादपि केतकादपि दलत्कुन्दादपि स्वर्णदी

कल्लोलादपि कैरवादपि चलत्कान्तादगन्तादपि

दूरोन्मुक्त कलङ्क शंकर शिरः शीतांशु खण्डादपि

श्वेताभिस्तव कीर्तिभिर्धवलिता सप्तार्णवा मेदिनी ॥

अर्थ :- कापूरापेक्षा, केतकीच्या पानापेक्षा, पांढऱ्या फुललेल्या कुंदकळ्यापेक्षा, गंगेच्या लाटापेक्षा, श्वेतकमळापेक्षा, चंद्रापेक्षा शंकराच्या शिरावर असलेल्या कलंकापासून मुक्त असलेल्या थंड किरणाच्या चंद्रकलेपेक्षा शुभ्र असलेल्या तुझ्या कीर्तिने सप्तसागराने वेष्टित अशी ही पृथ्वी शुभ्रमय करुन टाकली आहे.

शेवटचा कवि उठला आणि म्हणाला,

त्यजसि यदपि लक्ष्मी कीर्तिमासाद्य दानैर्

व्रजति तदपि कीर्तिः सिन्धुपारं न लक्ष्मी -

कथय क इह हेतुनारवेश त्वदीये वसति हृदय पद्मे नन्दसुनुर्मुरारी ॥

हे राजा, तू दान देऊन लक्ष्मीचा त्याग केलास आणि कीर्तिला जवळ केलेस तरी तुझी, कीर्ति सागर पार करून गेली, लक्ष्मी गेली नाही. तुझ्या हृदयरुपी काळामध्ये तर नंदाचा पुत्र, राक्षसाचा शत्रू वसती करुन आहे. तेव्हा हा मनुष्याचा अवतार धारण करण्यामध्ये तुझा हेतु तरी काय आहे ?

 ******************

कथा २०

कालिदास मला सोडून तर जाणार नाही !

कालिदास आपल्याला सोडून जाणार तर नाही अशी भोजखाजाच्या मनात नेहमी शंका येत असे. काय कारणाने अशी विद्वरत्ने सोडून जातात हे जाणून घेण्यासाठी राजाने समस्या दिली.

तेन देशान्तरं गता त्यामुळे ती दुसऱ्या देशात निघून गेली.

राजाची मनातील इच्छा पूर्ण झाली. पण ती वेगळ्या प्रकारे स्तुति कोणाला नसते? राजाची चांगल्या शब्दात स्तुति केली तर आपल्याला चांगला द्रव्यत्नाभ होईल या कल्पनेने कवीने समस्यापूर्ती करताना राजाची स्तुति करुन घेतली.

सरस्वती स्थिता कण्ठे लक्ष्मी कर सरोरुहे ।

राजेन्द्र कुपिता कीर्तिस्तेन देशान्तरं गता ॥

हे राजाधिराज ! तुझ्या गळ्यात सरस्वती, तुझ्या करकमलामध्ये लक्ष्मी याचें वास्तव्य पाहून रागावलेली कीर्ति देशोदेशी गेली. राजाला त्याच्या शंकेचे उत्तर मिळालं होतं. कालिदासाची कीर्ति देशोदेशी पसरेल आणि कदाचित तो आपल्याला सोडून जाईल.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post