श्रीकृष्ण भगवंत हे विष्णूचे अवतार नाहीत

श्रीकृष्ण भगवंत हे विष्णूचे अवतार नाहीत

 श्रीकृष्ण भगवंत हे विष्णूचे अवतार नाहीत



    भगवान श्रीकृष्णांना वैकुंठ निवासी विष्णूचा अवतार नसून परात्पर भगवंताचा अवतार आहे. 

    भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात

यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।

तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ (गीता ८/६)

    म्हणजेच हे अर्जुना! जीवनात योग साधना आणि ध्यान करत असताना शेवटच्या वेळी मनुष्य जे काही विचार करत, आठवत शरीराचा त्याग करतो, तीच गोष्ट पुढे त्याला प्राप्त होते.

    भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या वचनानुसार, जो कोणी श्रीकृष्ण भगवंतांला वैकुंठ निवासी विष्णूचा अवतार मानतो आणि त्यांचे ध्यान करताना प्राणत्याग करतो, त्याला निश्चितच वैकुंठ लोकाची प्राप्ती होते.

    तसेच जे भगवान श्रीकृष्णांचे भक्त श्रीकृष्णाला परब्रह्म परमेश्वराचा अवतार मानून श्रीकृष्णाची पूजा करतात, त्यांना परब्रह्म परमेश्वराचे अढळ शाश्वत असे परम स्थान प्राप्त होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात-

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन ।

मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥

 (गीता ८/१६)

    अर्थात हे अर्जुना ! ब्रह्मलोक  आणि ब्रह्मलोकाच्या खाली असणार्‍या सर्व देवता लोकी गेलेले जीव पुण्य संपल्यावर, योग्यता संपल्यानंतर पुन्हा या जन्म-मरणाच्या चक्रात भटकायला येतात, परंतु मला(श्रीकृष्ण भगवंत) प्राप्त झाल्यानंतर पुनर्जन्म होत नाही. तो कायमचा या जन्ममरणाच्या चक्रातून सुटतो.

    पुढे श्रीभगवान म्हणतात-

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।

यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥

 (गीता 15/6)

    अर्थात माझे शाश्वत, अविनाशी, अगाध असे स्थान सूर्य, चंद्र, किंवा अग्नीच्या प्रकाशाने प्रकाशित होऊ शकत नाही, जिथे गेल्यानंतर पुन्हा या मृत्यूलोकात यावे लागत नाही, ते माझे सर्वोच्च स्थान आहे. मला पावलेल्या सर्व भक्तांचे निवासस्थान आहे. म्हणून मज परमात्म्याच्या परम निवासस्थानाला मोक्ष म्हणतात, जिथे गेल्यावर हा जीव जन्ममृत्यूपासून कायमचा मुक्त होतो.

    श्रीमद्भागवतातील सातव्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायात नारद युधिष्ठिराचा संवाद आहे. राजसूय यज्ञात चेदिराज शिशुपालाचे शिर उडवल्यानंतर सर्वांच्या समोर भगवान श्रीकृष्णांमध्ये तो विलीन झाला. ते पाहिल्यावर युधिष्ठिराने देवर्षी नारदजींना विचारले की, भगवान श्रीकृष्णाचा द्वेष करणारा शिशुपाल भगवान श्रीकृष्णचरणी कसा लीन झाला? कारण असा मोक्ष केवळ भक्तांनाच मिळतो, आणि शिशुपाळाने तर भगवान श्रीकृष्णांना अनेक प्रकारे शिवीगाळ कररून आणि अपशब्द बोलून अपमान केला.

    तेव्हा नारदांनी युधिष्ठिराला सांगितले की, तुझे दोन्ही मावस भाऊ शिशुपाल हे कधीतरी वैकुंठातील विष्णूचे मुख्य पार्षद जय-विजय नावाचे द्वारपाल होते. एके काळी ब्रह्माचे चार मानस पुत्र सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार, फिरत फिरत वैकुंठ लोकात पोहोचले. जय आणि विजय या दोन्ही द्वारपालांनी ब्रह्मदेवाच्या या चारही मानस पुत्रांना सामान्य कुणीतरी ऋषी समजून आणि त्यांना वैकुंठ भुवनात जाण्यापासून रोखले.

तेव्हा रागावून ब्रह्मदेवाच्या या चार मानसपुत्रांनी जय-विजय यांना शाप दिला, "तुम्ही दोघेही विष्णूच्या जवळ राहण्यास योग्य नाही. म्हणूनच लवकरच तुम्ही पापी राक्षसी प्रजातीत जाल.

    जेव्हा ते वैकुंठातून पडू लागले. त्यांनी सनकादिकांची प्रार्थना केली व उःशाप मागितला. तेव्हा सनकादिक म्हणाले - बरं तीन जन्मात हा शाप भोगून तुम्ही पुन्हा या वैकुंठात याल.

    पुढे, नारदांनी युधिष्ठिराला सांगितले की या शापामुळे जय आणि विजय दोघेही या मृत्यूलोकात आले आणि ते कृतयुगात दितीचे पुत्र होऊन जन्मले, मोठ्याचे नाव हिरण्यकश्यपू आणि धाकट्याचे नाव हिरण्यक्ष होते. समस्त राक्षस जातीत हे दोघेही श्रेष्ठ मानले जात होते.

    वराह अवताराने हिरण्याक्षाचा वध केला. आणि नरसिंह अवताराने हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण केले.

 दुसऱ्या जन्मात ते रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात प्रकट झाले. त्यांच्या वडिलांचे नाव पौलस्त्य मुनी आणि आईचे नाव केश्नी होते. तेव्हा विष्णु अवतार रामाने त्या दोघांचा वध केला.

    पुढे नारद युधिष्ठिरजींना म्हणाले - त्याच जय-विजय या जन्मात तुमच्या मावशीचे पुत्र क्षत्रिय कुळात शिशुपाल आणि दंतवक्त्र या रूपात जन्मले.

    भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या सुदर्शन चक्राने दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पापांचा नाश होऊन ही सनकादीकांच्या शापातून मुक्तता झाली आहे.

    ही कथा श्रीमद भागवतातच येते. विष्णुचे वैकुंठ धाम हे मोक्ष नाही हे या कथेवरून सिद्ध होते. कारण तेथे गेल्यावरही मृत्यूलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागतो,

    परंतु भगवान श्रीकृष्ण गीतेत स्पष्टपणे सांगतात की, माझे परम निवासस्थान मोक्ष आहे, जिथे मृत्यूच्या जगात पुन्हा जन्म मिळत नाही. त्यामुळे विष्णूचे वैकुंठधाम हे भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या धामापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. आणि खुपच हिन आहे.

    तर वाचक हो आपण स्वत: विचार करू शकतात की श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार कसा असू शकतो? यावरून श्रीकृष्ण हे वैकुंठातील विष्णूचे अवतार नसून परब्रह्म परमेश्वराचे अवतार असल्याचे सिद्ध होते.

    आणि श्रीकृष्ण भगवंतांनी ही श्रीमद्भगवद्गीतेमध्ये कुठेच सांगितलेले नाही की मी वैकुंठवासी विष्णूचा अवतार आहे. भगवंत गीतेत असेच म्हणतात कि मी सर्व देवतांच्या पलीकडे आहे माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही.

    त्याचप्रमाणे काशीखंड नावाच्या ग्रंथात शिवशर्मा नावाच्या ब्राह्मणाने विष्णूची पूजा करून दहा लाख वर्षे वैकुंठाचे सुख प्राप्त केल्याचा उल्लेख आहे. पण त्याचे पुण्यक्षय होताच शेवटी त्याला विष्णुपुरीतून मृत्यू लोकात ढकलले गेले आणि नंदीवर्धनाच्या देशात एका राजाच्या कुळात त्याचा जन्म झाला. यावरून हेही सिद्ध होते की, विष्णूदेवतेच्या वैकुंठामध्ये जाऊन जन्म-मृत्यूपासून मुक्ती मिळत नाही,

    आणि भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या परम निवासस्थानात गेल्यावर पुन्हा जन्म मिळत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार नाहीत.

    तसेच कथा कल्पतरू आणि मूलस्तंभ या ग्रंथात असे लिहिले आहे की, वैकुंठाला जाताना शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले विष्णूचे दर्शन होते आणि तेथे २ लाख स्त्रियांचा सुखोपभोग मिळतो, परंतु जेव्हा पुण्य नष्ट होते. तेव्हा तत्काळ त्याला मृत्यूलोकात यावे लागले.

    संत तुकोराम हे सनातन धर्माचे महान संत मानले जातात. विष्णूच्या वैकुंठ जगाविषयी ते म्हणतात,

मागों जरी पद वैकुंठ। तें एव एकदेशी करंटे

    म्हणजेच संत तुकोबा म्हणतात की, मी विष्णूना वैकुंठ धाम मागितले तर ते एकदेशी आणि फारच लहान फळ आहे. छांदोग्योपनिषदात लिहिलेले आहे

न ह वै सशरीरस्य सतः प्रियाप्रिययोरपहतिरस्त्य शरीरं वाव सन्तं न

प्रियाप्रिये स्पृशतः (छां० ३०. ८.१२.१)

    म्हणजेच हे मृत्युलोक, स्वर्ग, वैकुंठ इत्यादि लोकांच्या वर असलेले सर्व लोक पुण्य कर्म केल्याने प्राप्त होतात, परंतु जेव्हा पुण्य नष्ट होते तेव्हा तेथून परत यावे लागते.

    म्हणजेच जोपर्यंत आत्म्याचा शरीराशी संबंध आहे तोपर्यंत सुख-दु:ख होणारच. वैकुंठात गेल्यावरही जीवाला शरीर मिळते ज्याद्वारे तो वैकुंठातले विषय सुख भोगतो, परंतु मोक्ष तर केवळ जिवालाच प्राप्त होतो शरीरा सहित जे काही मिळते त्याला मोक्ष म्हणता येत नाही. फक्त जीवालाच मोक्षाचे निवासस्थान प्राप्त होते, शरीराला नाही त्यामुळे वैकुंठ आणि भगवंताचे परमधाम यात निश्चितच मोठा फरक आहे.

       संत एकनाथ यांनी भगवान श्रीकृष्ण भगवंतांची प्रार्थना करताना भागवतात लिहिले आहे की, मला ना स्वर्गाची आशा आहे ना वैकुंठातल्या वासाची,  मला अष्टांग योगाचीही गरज नाही कारण या योगाने जन्ममरणाचे बंधन संपत नाही. म्हणून हे भगवान श्रीकृष्ण! मला वैकुंठ स्थानाच्या कितीतरी पटीने श्रेष्ठ असलेले आपले परम निवासस्थान मला द्या.

    तसेच संत एकनाथ आपल्या एकनाथ भागवतात लिहितात की जेव्हा या जगाचा संहार होतो तेव्हा स्वर्ग, कैलास, वैकुंठ, सत्यलोक आणि शेषशयाचा क्षीरसागर हे सर्व नष्ट होतात, परंतु महाप्रलय होऊनही परमेश्वराचे परम निवासस्थान कधीच नष्ट होत नाही. म्हणूनच परमधाम हे शाश्वत, अविनाशी, नित्य आहे. आणि वैकुंठ लोक हा अनित्य आहे नाशिवंत आहे.

     संत एकनाथ श्रीकृष्ण भगवंताला प्रार्थना करतात - हे श्रीकृष्ण देवा! आपला वास जिथे आहे असे आपले परमधाम कधीच नष्ट होत नाही आपण परब्रम्ह परमेश्वराचे पूर्ण अवतार आहात. यावरून हेच सिद्ध होते कि भगवान श्रीकृष्ण हे वैकुंठाचे निवासी नाहीत.

     विष्णू हे वैकुंठ निवासी आहेत, म्हणून श्रीकृष्ण हे वैकुंठातील विष्णूचे नसून परब्रह्म परमेश्वराचे अवतार आहेत. जे श्रीकृष्ण भगवंताला वैकुंठातील विष्णूचा अवतार मानतात ते अज्ञानाने भ्रमित आहेत. आणि हा त्यांचा खोटा भ्रम आहे.

    ब्रह्मा हे विश्व निर्माण करतात, विष्णूजी त्याची देखभाल करतात आणि महादेवजी त्याचा नाश करतात, असे अनेक धर्मग्रंथांमध्ये मानले जाते, परंतु श्रीमद्भगवद्गीतेत कुठेही असे म्हटलेले नाही.

    भगवान श्रीकृष्ण म्हणतात

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।

अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ (गीता ७/६)

    अर्थात - भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, मी सर्व योनींचा आणि प्राण्यांचा, देवतांचा धारण करणारा आहे. मी हे जग निर्माण करतो आणि मी त्याचा नाशही करतो.

       त्यामुळे इतर धर्मग्रंथ आणि श्रीमद्भगवद्गीतेतील मतांमध्ये खूप मोठा फरक आहे. इतर धर्मग्रंथ, वेद, व्यास इत्यादी ऋषी-मुनींनी रचले आहेत, परंतु श्रीमद्भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्ण महाराजांच्या मुखातून निघणारी ज्ञानाची पवित्र सरिता आहे. सा गीता लोकपावनी। ती गीता सर्व जगाला पावन करते आहे.

 

    ऋषी-मुनींच्या विचारांमध्ये मतभेद आहेत, त्यामुळे त्यांची मते खरं मानता येत नाहीत. परंतु परब्रह्म परमेश्वराचे अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्ण महाराजांनी दिलेली श्रीमद भगवद्गीतेची शिकवण ही सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि त्रिकाळाबाधीत सत्य आहे.

    किंबहुना धार्मिक ग्रंथात लिहिले आहे-

'विचित्ररूपाः खलु चित्तवृत्तयः', 'पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना' 

    म्हणजे सर्व लोकांची मानसिक वृत्ती भिन्न असते आणि भिन्न शरीरांचे विचार भिन्न असतात. म्हणूनच प्रत्येकाचे एक मत असणे अशक्य आहे. सर्व लोकांचे बोलणे एक नाही हे काय सांगावे लागते पण एकच व्यक्ती आयुष्यात अनेक वेळा आपले विचार बदलत राहतो.

       म्हणूनच मनातले विचार नेहमी बदलत असतात, त्यामुळे त्यांचे विचारही वेळोवेळी बदलत राहतात. याविषयी महाभारतात यक्षाने युधिष्ठिराला विचारले - खरा मार्ग कोणता? पुरुषाचे युधिष्ठिराने उत्तर दिले -

तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य वचः प्रमाणम् ।।

       म्हणजे माणसाने केलेले युक्तिवाद, मांडलेले विचार कायम नसतात. बदलत राहतात. कारण एकाचा तर्क दुसर्‍याच्या विचारांचे खंडन करतो.

       वेदातही विविध प्रकारची मतं प्रतिपादन केले आहेत. त्यातही एका ऋषिचे बोलणे दुसर्‍या ऋषीच्या विरोधात मांडलेले आहे. त्यामुळे कोणत्याही ऋषींचे मत प्रामाणिक मानले जाऊ शकत नाही. म्हणून परात्पर भगवंताचे, परमेश्वराचे अवतार जे काही सांगतात तोच खरा मार्ग आहे,

       कारण भगवंताचे कितीही अवतार झाले तरी ते नेहमी एकच खरी गोष्ट सांगतात, कोण्याही युगात निरूपण केले असो परमेश्वराने सांगितलेल्या तत्वात काही फरक नाही. म्हणून, गीता इतर धर्मग्रंथांपैकी सर्वात प्रामाणिक ग्रंथ आहे. आणि गीता हाच एक प्रमाण ग्रंथ आहे.

       श्रीमद्भगवद्गीते देवाने ‘मी विष्णुचा अवतार आहे’ असे कुठेही म्हटलेले नाही. विष्णु, महादेव, ब्रम्हा इत्यादि सर्व देवता या परमेश्वराच्या दासी आहेत. सेविका आहेत. आणि परमेश्वर सर्वशक्तिमान आहेत. त्या परमेश्वराचे अवतार श्रीकृष्ण भगवंत आहेत.

    वेद आदि सर्व शास्त्रे त्रिगुणात्मक आहेत, त्रिगुणांचा विषय सांगणारे आहेत. हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात

त्रैगुण्या विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवर्जुन । (गीता २/४५)

    अर्थात - हे अर्जुना! वेदांचे विषय रज, तम आणि सत्व हे तीन गुण आहेत, आणि त्रिगुण हें बंधक आहेत. म्हणून हे अर्जुना, तू निर्गुण हो. म्हणून वेदांचे ज्ञान त्रिगुणात्मक आहे. आणि गीतेचे ज्ञान निर्गुण आहे.

    त्याचप्रमाणे सर्व देवता त्रिगुणात्मक आहेत. ब्रह्मा हे रजोगुण प्रधान आहेत, विष्णु हे सत्वगुण प्रधान आहेत, महादेव हे तमोगुण प्रधान आहेत, परंतु भगवान श्रीकृष्ण हे कोणत्याही देवतेचे अवतार नाहीत, ते परब्रह्म परमेश्वराचे निर्गुण अवतार आहेत. म्हणून देवता आणि परमेश्वर भिन्न आहेत.

    परमेश्वराला देवता म्हणणे, देवतेसमान समजणे हे मोठे अज्ञान आहे, अन्यथाज्ञान आहे. एका ग्रंथात लिहिले आहे की, ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी समुद्रात मिळते, त्याचप्रमाणे कोणत्याही देवाची भक्ती केशवांना प्राप्त होते. ही अंधश्रद्धा गीतेला मान्य नाही, कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, देवव्रता देवान्‌ यान्ति म्हणजे जे देवतांची पूजा करतात ते देवतांना प्राप्त करतात, भुतानि यान्ति भुतेज्या म्ह. जे भूतांची पूजा करतात त्यांनाच भूतत्व प्राप्त होते. आणि यान्ति मद्याजिनोपि मां म्ह. जे माझी भक्ती करतात तेच मला प्राप्त करतात. म्हणून जो ज्याची पूजा करतो तो त्यालाच प्राप्त करून घेतो. तात्पर्य देवी देवतांच्या भक्तीने कधीही श्रीकृष्णभगवंतांचे पद प्राप्त होऊ शकत नाही.

    जगतमान्य शंकराचार्य जी यांनी प्रबोध सुधाकर नावाच्या ग्रंथात लिहिले आहे की, भगवंतांचे सामर्थ्य पाहण्यासाठी ब्रह्मदेव वज्रमंडळातील वासरे आणि गोपाळ चोरून आपल्या ब्रह्मलोकात घेऊन गेले, त्यांना वाटले आपण या श्रीकृष्णाची फजिती केली. आणि एका पुन्हा वर्षाने पाहण्यासाठी गोकुळात आले, तेव्हा सर्वकाही पहिल्यासारखे पाहून ब्रम्हदेव भ्रमित झाले. आणि श्रीकृष्णभगवंताला शरण आले. भगवान श्रीकृष्णांनी त्यांना म्हणाले, असंख्यात ब्रम्हा आणि अनेक विष्णू, अनेक महादेव श्रीकृष्ण भगवंतांच्या श्रीचरणांवर मस्तक ठेवून भगवान श्रीकृष्णाचे चरणामृत घेत असल्याचे दाखवले. तेव्हा ब्रम्हा श्रीकृष्णदेवाला शरण आला.

    अशाप्रकारे श्रीकृष्ण भगवंत हे अगाध, निर्विकार, अनंत, अवर्णनीय, अतींद्रिय परमेश्वर असून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव या तिन्हींहून भिन्न आहेत. आणि त्यांच्यापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ आहेत.

    संत एकनाथ आपल्या भागवतात भगवान श्रीकृष्ण महाराजांबद्दल लिहितात- हे श्रीकृष्णा! तू किती महान आहेस की, लक्ष्मीला तुझे दर्शन व्हावे म्हणून नारायणाने द्वारकेतून त्या ब्राह्मणाच्या मुलांचे हरण केले.

    त्यानंतर श्रीकृष्ण भगवंत अर्जुनासमवेत नारायणाच्या निवासस्थानी गेले. लक्ष्मी-नारायणांनी उठून त्यांचे स्वागत केले आणि अलौकिक पूजा केली. यावरून हे सिद्ध होते की भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वराचे अवतार आहेत, देवाधिदेव आहे आणि जर सर्व देवतांमध्ये शक्ती असतील तर भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तिमान परमेश्वर आहेत. तर सर्व सृष्टीचा नियंता भगवान श्रीकृष्ण कुठे! आणि वैकुंठाचा निवासी विष्णू कुठे! या दोघांमध्ये अनंतपटीने फरक आहे. तात्पर्य श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार नाही.

गीतेपेक्षा श्रेष्ठ शास्त्र नाही.

गीता सुगीता कर्त्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः ।

    एक श्रीमद्भगवद्गीतेचा पूर्ण अभ्यास आवश्यक आहे. बाकी शास्त्रांचा विस्तार अभ्यासून  काय उपयोग? म्हणजेच सर्व धर्मग्रंथ वाचून काहीच फायदा नाही.

    कं शास्त्रं देवकीपुत्रगीतम् । एको देवो देवकी पुत्र एव ।

    एको मंत्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॥

    अर्थात :- जगात जर कोणता धर्मग्रंथ असेल तर तो देवकीपुत्र भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आहे, आणि जगात जर देव असेल तर तो फक्त देवकीपुत्र श्रीकृष्णभगवंतच आहे, आणि जगात कोणता सर्वश्रेष्ठ मंत्र असेल तर तो म्ह. त्या श्रीकृष्णाचे नाम हाच सर्वात मोठा मंत्र आहे, आणि जगात काही करण्यायोग्य असेल तर ते गीतेत सांगितल्या प्रमाणे करणे हेच जीवाच्या हितावह आहे.

       म्हणून सर्वात आधी गीतेच्या ज्ञानाने भगवान श्रीकृष्णाला चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि मग त्यांची भक्ती करा, तरच मनुष्याला त्यांचे परम धाम, मुक्तीधाम प्राप्त होऊ शकते.

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post