ज्ञानरूपी आरशाचा उपयोग
पण तो काही सामान्य आरसा नव्हता. तो अद्भुत आणि अलौकिक आरसा होता. त्या दैवी आरशात कोणत्याही व्यक्तीची मनःस्थिती, अंतःकरणातील भाव प्रतिबिंबित करण्याची अद्भुत क्षमता होती. त्या आरशाचे महत्व गुरुवर्यांनी त्याला समजून सांगितले. व ते पुढे म्हणाले “हा आरसा तुला वेळोवेळी तुझ्या चुकांबद्दल मार्गदर्शन करील.”
गुरुजींच्या या आशीर्वादाने शिष्याला खूप आनंद झाला. त्याने विचार केला की निघण्याआधी आरशाची परिक्षा का पाहू नये. कारण असला अद्भुत आरसा आतापर्यंत त्याने कधीही ऐकलेला नव्हता न पाहिलेला होता म्हणून आरशाची क्षमता का तपासू नये? असा विचार त्याच्या डोक्यात येणे सहाजिकच होते. आरशाची परीक्षा घेण्यासाठी तो उतावीळ झाला होता. परीक्षा घेण्याच्या घाईत त्याने प्रथम आपल्या एका गुरुबंधूसमोरच आरसा धरला. आणि त्या शिष्याला धक्काच बसला. ज्या गुरुबंधूला मी इतके महान समजत होतो, त्याच्या हृदयात आसक्ती, अहंकार, क्रोध इत्यादी वाईट गुण स्पष्टपणे दिसत असल्याचे तो आरसा दाखवत होता.
“माझा हा सर्वांना मान्य पूजनीय गुरुबंधू कितीतरी दोषांनी भरलेला आहे” या विचाराने त्यांना खूप वाईट वाटले. व तो दुःखी अंतःकरणाने गुरुंना नमस्कार करून तो आरशासह गुरुकुळातून निघून गेला, पण संपूर्ण रस्त्यात त्याच्या मनात एकच गोष्ट चालू राहिली की, ज्याला आपण थोर समजले त्याच्या ठिकाणी सर्व वाईट गुण आहेत व आपण त्याला आदर्श मानत राहिलो,”
इतरांची परीक्षा घेण्याचे साधन त्याच्या हातात आले होते, त्यामुळे तो भेटेल त्याची परिक्षा पाहू लागला. त्याने त्याच्या अनेक जिवलग मित्रांची आणि इतर ओळखीच्या लोकांची त्यांच्यासमोर आरसा ठेवून परीक्षा घेतली. प्रत्येकाच्या हृदयात अनेक वाईट गुण पुरेपुर भरलेले दिसून आले. त्या काळात त्याला जे काही अनुभव आले ते सर्व दुःखदायक होते, तो विचार करत होता की जगात सगळेच इतके वाईट का झाले आहेत, सगळेच दुटप्पी मानसिकतेचे लोक आहेत. सगळ्यांचेच दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत.
वरून जे जसे दिसतात ते तसे नसतात...
या निराशाजनक विचारांत बुडलेल्या दुःखी अंत:करणाने तो कसा तरी घरी पोहोचला. व त्याचे लक्ष त्याच्या पालकांचे लक्ष गेले. त्यांच्या वडिलांना समाजात मोठी प्रतिष्ठा होती. त्याचे वडील संकटसमयी सर्वांना मदत करीत असत त्याची आई ही खूप दयावान होती, त्याच्या आईला तर लोक साक्षात देवीचे रूप म्हणत. या आरशाद्वारा यांचीही परीक्षा झाली पाहिजे असा विचार सहज त्याच्या मनात आला. आणि त्या आरशातून त्याने आई-वडिलांचीही परीक्षा घेतली... त्यांच्या हृदयातील बरेच वाईट गुणही त्याला दिसले. आणि त्याला खूप वाईट वाटले. तसेच “या जगात दुर्गुणांपासून कोणीही पूर्णपणे मुक्त नाही. जग हे सर्व जग खोटेपणावर चालते...”
आता त्याच्या मनाची अस्वस्थता सहन करण्यापलीकडे होती. त्याने आरसा उचलला पुन्हा गुरुकुलाकडे निघाला. अहोरात्र चालत लवकरात लवकर पोचला आणि सरळ जाऊन गुरुजींसमोर उभा राहिला... त्याची मनाची चंचलता, द्विधा मनस्थिती पाहून गुरुजींना त्याच्या सगळ्या परिस्थितीचा आधीच अंदाज आला होता.
शिष्य नम्रपणे गुरुजींना म्हणाला:- “गुरुवर, तुम्ही दिलेल्या आरशाच्या साहाय्याने मी अनेकांची परिक्षा घेतली व त्यात मला असं दिसलं की प्रत्येकाच्या हृदयात अनेक दोष नांदत आहेत, एकाचेही हृदय दोषांनी मुक्त नाही, या आरशाने मला एकही मनुष्य निर्दोष दोषांनी मुक्त असा सज्जन दाखवला नाही. मी क्षमा मागतो गुरुवर की, मी जगात सज्जन म्हणून प्रसिद्ध असलेल्या माझ्या पालकांमध्ये सुद्धा अनेक दोष पाहिले, याचा मला खूप त्रास होतो आहे.”
तेव्हा गुरुजी हसले आणि त्यांनी आरसा शिष्याकडे वळवला.
विद्यार्थी स्तब्ध झाला.....
त्याच्या मनाचा प्रत्येक कोपरा राग, द्वेष, अहंकार, क्रोध अशा वाईट गुणांनी भरलेला होता, असा एकही कोपरा नव्हता जो शुद्ध असेल... आपले अंतःकरण इतक्या अपरिमित दोषांनी भरलेले असून आपण इतरांचे दोष पाहिले याविषयी त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली.
पुढे गुरुजी म्हणाले:- “भल्या माणसा ! मी तुला हा आरसा तुझे स्वतःचे अवगुण पाहण्यासाठी दिला होता आणि ते अवगुण दूर करून तुझे जीवन सुधारण्यासाठी हा आरसा उपयोगी आणि शील याची मला खात्री होती परंतु तू इतरांचे दोष शोधण्यासाठी या आरशाचा उपयोग केला त्यामुळे तुझी अशी अवस्था झालेली आहे. इतरांचे अवगुण पाहण्यात जितका वेळ घालवला तितकाच वेळ जर तू स्वतःला सुधारण्यात घालवला असता तर आतापर्यंत तुझे व्यक्तिमत्व पुर्ण बदलले असते. आणि इतके दिवस तू या आरशात पाहून इतरांच्या दोषांचे मनन केले त्यामुळे ही तुझ्या दोषांमध्ये वाढ झाली.”
या कथेचे तात्पर्य असे की परमेश्वराने आपल्याला ज्ञानरूपी आरसा स्वतःचे दोष पाहून ते दोष फेडण्याचा प्रयत्न करण्यासाठी दिलेला आहे, पण तो ज्ञानरुपी आरसा आपण इतरांना दाखवत सुटलेले आहोत. व स्वतःच्या ठिकाणी असलेली द्रव्य लालसा, प्रसिद्धी, किर्तीपरायणता आणि त्यामुळे घडणारे रहस्यमय ब्रह्मविद्याशास्त्राचे कथन इत्यादी महादोष, अविधी कळत नकळत आपल्याला घडत आहेत. याकडे आपले सपशेल दुर्लक्ष आहे. म्हणून हा आत्मज्ञानरुपी आरसा आपल्याला स्वतःच्या ठिकाणचे दोष दाखवत नाही कारण आपण कधीही त्या आरशासमोर उभे झालेलोच नाही. मुळात देवाने ज्ञान कशासाठी दिले? याचा आपल्या सर्वांना विसर पडलेला आहे.
असो! ज्ञानाचा सदुपयोग कसा करावा? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
Khup chan mahaiti
ReplyDelete