सुभाषित नीतिशतकम्
neeti shatak
भर्तृहरी
परिवर्तिनि संसारे मृत: को वा न जायते ।
स जातो येन जातेन याति वंश समुन्नतिम्।
वामनपंडित
द्रुतविलंबित
उपजणे मरण न चुके नरा
फिरत नित्य असे भवभोंवरा ॥
उपजला तरि तोचि भला गमे
कुल समुन्नति ज्यास्तव घे, रमे ॥
ल. गो. विंझेे
अनुष्टुभ्
मेलेला कोण जन्मे न, संसारी फिरत्या, नर ? ।
आणी उन्नति जो वंशा तोच जन्मे खरोखर ॥ ३२॥
अर्थ :
अखंड भ्रमणशील अशा या संसारात मेलेला कोण (परत फिरून) जन्मास येत नाही ? (पण) ज्याच्या जन्माला येण्याने वंशाची उन्नती होते, तोच जन्मला (असे म्हणावे.)
या परिवर्तनशील संसारात एकच अपरिवर्तनीय बाब आहे ती म्हणजे परिवर्तन. बदल हा जगताचा स्थायीभाव आहे. 'चक्रवत् परिवर्तन्ते ।' हा जगाचा नियम आहे. चाकात जसे ते फिरताना खालचे आरे वर जातात, वरचे खाली येतात, पुन्हा वर जातात असा क्रम सदैव सुरूच असतो, तसेच जगात सर्वच बाबतीत घडते. रात्र झाली की मग पुन्हा सकाळ होणारच. सकाळ झाली म्हणजे पुन्हा रात्र निश्चित आहेच.
याचप्रमाणे जन्माला आला त्याच क्षणी जिवाच्या बाबतीत एक बाब निश्चित झाली आहे की, तो मरणारच. आणि मरणार म्हटल्यावर (मुक्तांचा अपवाद वगळता) पुन्हा जन्मास येणार हेही निश्चितच जन्म-मरणाचा हा फेरा चुकता चुकत नाही. पण कवी येथे एका वेगळ्याच बाबीला समोर ठेवू इच्छितात ती म्हणजे अशा नुसत्या जन्माला येण्याचा उपयोग काय? जन्माला तर काय मेलेला प्रत्येकच पुन्हा येणारच आहे. तो जन्म काय कामाचा?
जन्मला तोच ज्याच्या जन्मास येण्यामुळे त्यांच्या वंशाचा लौकिक वाढत असेल. समजा उद्या आपल्या नातवाने प्रश्न विचारला की, आजोबा / आजी तुम्ही आयुष्यात काय केले? तर याचे उत्तर 'तुझ्या बापाला जन्माला घातले' यापेक्षा काहीतर अधिक असावेच ना? ही देखील वंशवृद्धीच आहे. पण, ही येथे अभिप्रेत नाही.
कुळाचा लौकिक, गौरव, अभिमान वाढेल, अशी कृती ज्याच्या द्वारे घडते त्याचाच जन्म काही उपयोगाचा. इतरांची होते ती केवळ 'गर्भच्युती.' ती सगळ्यांचीच होते. तिला जन्मात परिवर्तित करायला हवे.