मोह - विनाशकाले विपरीतबुद्धि sunskrit-subhashit

मोह - विनाशकाले विपरीतबुद्धि sunskrit-subhashit

 23-3-2022

sunskrit-subhashit

संस्कृत  सुभाषित रसग्रहण 



लोकोक्ती - 

विनाशकाले विपरीतबुद्धि:।


न भूतपूर्व न कदापि वार्ता 

हेम्न: कुरङ्ग: न कदापि दॄष्ट:।

तथापि तॄष्णा रघुनन्दनस्य 

विनाशकाले विपरीतबुद्धि:॥

                             - चाणक्यनीती.

अर्थ :-

       यापूर्वीच्या काळात कधीही सुवर्णमृग होऊन गेल्याची वार्ता ऐकलेली नाही आणि अशा सुवर्ण मृगास कधी कुणीही पाहिल्याचेही ऐकले नाही. परंतु तरीदेखील सुवर्णमृगाविषयी ऐकले नसताना, पाहिले नसताना देखील रामाला त्या सुवर्ण मृग(हरिण) मिळविण्याचा मोह झाला. तत्वदर्शी पुरुष म्हणतात ते खरंच आहे, प्रतिकूळकाळात चांगल्या बुद्धिमान माणसाची बुद्धीही विपरीत चालते. व त्याच्या विनाशास कारण होते. 

टीप-

    वरील घटना सुभाषितात कविने वर्णन केलेली आहे, आणि तेव्हापासूनच 'विनाशकाले विपरीतबुद्धि:।'  ही लोकोक्ती प्रचलित झाली आहे.

ज्या दाशरथी रामास सच्छील आचरणामुळे मर्यादा पुरुषोत्तम म्हटले गेले आहे. त्याला देखील पत्नीच्या आग्रहावरून कांचनमृगाचा मोह झाला. आणि पुढे समग्र रामायण घडले. त्यामुळे किरकोळ किंचित मोह देखील मोठ्या संकटास कारणीभूत ठरतात. रामासारख्या बुद्धीमान पुरुषालाही ही जर काल्पनिक सुवर्णमृगाचा मोह पडू शकतो तर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात देखील हे का घडणार नाही? त्यामुळे क्षुल्लक लोभात अडकून माणसाने स्वतःवर संकट ओढून घेऊ नये. असाच बोध या सुभाषितामधून प्रत्येकाने घ्यायला हवा. 

या श्लोकासंदर्भात काही पाठांतरे व साम्यश्लोक 

न भूतपूर्व न कदापि वार्ता 

हेम्न: कुरङ्ग: न कदापि दॄष्ट:।

या श्लोकार्धाच्या स्थानी

न निर्मिता केन न दृष्टपूर्वा 

न श्रूयते हेममयी कुरङ्गी।

असा पाठभेदसुद्धा आढळतो.

      याच श्लोकाशी अर्थसाम्य असणारा अजून एक श्लोकही आढळतो. हा श्लोक हितोपदेशात मित्रलाभप्रकरणात आढळतो,  

असम्भवं हेममृगस्य जन्म, 

तथापि रामो लुलुभे मृगाय । 

प्राय: समापन्न विपत्तिकाले 

धियोऽपि पुंसां मलिना भवन्ति ॥ 

           - २.२८, मित्रलाभ, हितोपदेश.

        सुवर्णमृग जन्माला येणे, अस्तित्वात येणे, त्याचे अस्तित्व असणे केवळ अशक्य, असंभव आहे हे ठाऊक असुनही रामाला त्याचा मोह पडला. यावरून हे सिद्ध होतं की संकटकाळ आला असता धीरपुरुषांची बुद्धीसुद्धा मलिन म्हणजे दोषयुक्त, भ्रष्ट होते. वाल्मीकि रामायणायणात मात्र मृत्यू (विनाश) समीप असेल तर मनुष्य विपरीत कृत्यं करू लागतो असा संवाद सीता आणि रावणाला यांच्यात होतो.  रामायणाच्या अरण्य कांडामध्ये हा श्लोक आहे.

न नूनं चात्मनः श्रेयः पथ्यं वा समवेक्षसे ।

मृत्युकाले यथा मर्त्यो विपरीतानि सेवते॥

               ~ ३.५३.१७, वाल्मीकिरामायण.

      सीता रावणाला निति समजावून सांगताना म्हणते, कोणती गोष्ट स्वतःसाठी श्रेयस्कर किंवा पथ्यकर म्हणजेच परिणामी सुखावह होणारी आहे, याचा विचार तूं खरोखर मुळीच करीत नाहीस. म्हणून ज्याचा मृत्यू जवळ आला आहे असा मनुष्य ज्याप्रमाणे विपरीत कर्मांचे अवलंबन करतो लागतो, आणि त्याप्रमाणेच तूं करीत आहेस.

       संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात,

होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं तें ॥

एखादी गोष्ट घडायची असेल तर ज्याच्या बाबतीत ती होणार असते त्याला त्याप्रमाणेच करण्याची (विपरीत) बुद्धी होते. आणि मग ती विपरीत बुद्धीने त्याला शुद्धाशुद्ध याचं भान राहात नाही, चांगल्यावाईटाचा विवेक राहात नाही. तसे पहाता असे होण्यास कारण पूर्वकर्म असावे. त्याशिवाय चांगल्या व्यक्तींचीही बुद्धी ऐनवेळी फिरेल काय? गीतेच्या तिसऱ्या अध्यायात कर्मगती विषयी परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीकृष्ण व भक्तश्रेष्ठ अर्जुन यांच्यातील संवादात अर्जुनदेव विचारतात की

अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः।

अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः॥

अर्थ :- हे वृष्णीकुलश्रेष्ठा (वार्ष्णेया, श्रीकृष्णा) मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही अनिच्छेने दुसरा कोणीतरी बळजबरीने त्याच्याकडून करून घेत आहे अशाप्रकारे पाप का करतो? 

तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः।

महाशनो महापाप्मा विद्धयेनमिह वैरिणम्‌॥

      रजोगुणातून उत्पन्न हे राजसी 'काम व क्रोध' ह्या सगळ्यास कारणीभूत आहेत. हे दोघेही अतिशय खादड आणि पापी आहेत. हे बुद्धीला मोहग्रस्त करतात आणि मनुष्याला पाप करण्यास प्रवृत्त करतात. कितीही विषयभोगांचा आस्वाद घेतलात तरी यांची भूक भागत नाही या पाप्यांनाच तू सज्जन मनुष्यांचा वैरी समज.  

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते।

एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्‌॥

     मन, बुद्धी व इंद्रिये हे सगळे या काम व क्रोधरूपी वैऱ्यांचे वस्तीस्थान आहे.त्यांच्याद्वारेच हे वैरी मनुष्याच्या ज्ञानाला विषयेच्छांच्या लोभाने झाकून त्याला पाप करण्यासाठी मोहीत करतात. श्रीकृष्णार्जुनांच्या ह्या संवादातून विनाशकाळी माणसाची बुद्धी का फिरते? हे सहजगत्या कळून यायला हवं. अनिच्छेने, आगम्यरीतीने अनाकलनीयपणे व अपरिहार्यतेने मनुष्याला मोहात टाकून त्याची बुद्धी विपरीत वागते हेच खरे ,

          'विनाशकाले विपरीतबुद्धि:।

ह्यावर तोडगा म्हणा, उपाय म्हणा वा उपचार म्हणा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांहतात की  इंद्रियांना आधी तू वश कर, नियंत्रणात ठेव. इंद्रयांवर मनाने मनावर बुद्धीने नियंत्रण ठेवले तरच बुद्धी विपरीत वागणार नाही. ह्याच्या अगदी उलट जर मन इंद्रयांच्या व बुद्धी मनाच्या हातचं खेळणं झाली की बुद्धी विपरीत होऊन मनुष्याचा विनाश होण्यास वेळ लागत नाही.

      

संकलन व टीप : अभिजीत काळे

==========

लालच बुरी बला है। अशी हिंदी भाषेतही म्हण आहे म्हणून मोहाच्या नादी लागणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला कवटाळण्या सारखे आहे. विनाशकाले विपरीत बुद्धि याचे आणखीही चरण इतर लोकांमध्ये आढळतात व मराठी श्लोकही आढळतात या सारखाच पुढील एक श्लोक

तो धर्मराजा बहुपुण्यवासी।

का द्युत खेळिले दुर्योधनाशी।

हारौनि राज्य बसला वनाशी।

विनाशकाले विपरीतबुद्धि ।।

भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिर राजाला आधीच सांगून ठेवले होते की, हस्तिनापूरला दुर्योधनाच्या भेटीला जाऊ नका. आणि गेलेच तर दुर्योधनाबरोबर द्युत खेळण्याच्या भानगडीत पडू नका तो कपटी आहे, आणि त्याचा सल्लागारही कपटी शकुणीच आहे, तुमचे सगळे राज्य हिरावले जाईल. पण युधिष्ठीर राजाने श्रीकृष्ण भगवंतांचे ऐकले नाही व दुर्योधनाचा आग्रहाला बळी पडून आपले राज्य गमावले शेवटी त्याचा वाटेला वनवास आला. विनाशकाले विपरीत बुद्धि म्हणतात ती हेच. मनुष्याला अशाच विनाश काल जवळ आला असता नस्त्या उठाठेवी सुचतात आणि तो त्या विनाश काळाच्या स्वाधीन होतो. म्हणून लोभ मोहाच्या नादी न लागता मनुष्याने आपल्या प्रारब्ध प्रमाणे जे मिळेल त्यात समाधान मानायला पाहिजे. 

विनाशकाले विपरीतबुद्धि

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post