महाभारतातील पांडवांकडून शिका यशस्वी जीवनाची ११ सुत्रे

महाभारतातील पांडवांकडून शिका यशस्वी जीवनाची ११ सुत्रे

 महाभारतातील पांडवांकडून शिका यशस्वी जीवनाची ११ सुत्रे 

 जीवन कसे जगायचे ते महाभारतातील पांडवांकडून शिकायला मिळते. मित्रांनो! खरे तर महाभारत आपल्याला सर्व काही शिकवते. पण मुळातच आपल्याला महाभारतातून काही शिकायचेच नाहीये! जी नीतिमूल्ये महाभारतात आहेत, ती कुठेच नाहीत. विद्वानांनी महाभारताला पाचवा वेद म्हटलेले. भारतो पंचम: वेदो । महाभारत म्हणजे एक संपूर्ण समाज शास्त्र, नागरिक शास्त्र होय. 

  महाभारतात शिकण्यासारखे सर्व काही आहे.  वर्तमानात घडणाऱ्या घटनांचा संदर्भ आपण महाभारतातल्या घटनांशी जुळवून बघितला तर  आपण स्वतःच सर्व लिलया समस्या सोडवू शकतो.  महाभारतातील प्रत्येक कथा काही ना काही शिकवून जाते.  चला तर मग आता आपण महाभारतातून जीवनाचे व्यवस्थापन शिकुया!! 

 १. कौटुंबिक ऐक्य :- निरनिराळ्या पुस्तकांमध्ये आपण पांडवांचे जीवन चरित्र बऱ्याच वेळा वाचलेले आहे टीव्ही सिरीयल मध्येही आपण पांडवांचे जीवनचरित्र पाहिले असेलच.  त्यात आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, पाच पांडवांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि कधीही न तुटणारी एकी होती.  पांडव जिथे जिथे गेले तिथे एकत्रच राहत. आणि ते एकमेकांशी कधीही क्रोधाने रागाने बोलले नाहीत. पाचही पांडव एकमेकांची खूप काळजी घेत असत. प्रत्येक पांडव आपल्या ठिकाणी असलेल्या गुणामुळे अद्वितीय होता पण कधीही त्यांना एकमेकांबद्दल मात्सर्य नव्हते आणि त्यामुळेच ते १०० कौरवांचा पराभव करू शकले.

 २. सर्वांशी नम्रतेचे वर्तन :- पाचही पांडव आपल्या कुळातील व बाहेरील सर्व वडिलधाऱ्या लोकांशी नम्रतेने वर्तत होते. ते कधीही मोठ्यांचा अपमान करत नसत.  त्यांना अजिबात गर्व नव्हता आणि पांडवांनी स्वतःला कधीच इतरांपेक्षा सामर्थ्यवान मानले नाही.  त्यांनी हस्तिनापुरचा राजा त्यांचा काका धृतराष्ट्राला आपल्या वडिलांप्रमाणेच दर्जा दिला आणि ते भीष्म पितामह यांच्यापुढे नेहमी बोलले. वेळोवेळी त्यांनी द्रोणाचार्यांप्रती आपला आदरभाव देखील प्रदर्शित केला आणि श्रीकृष्ण भगवंतांच्या आश्रयामध्ये राहून नेहमी त्यांच्या आज्ञेचे पालन केले.

 ३. प्रतिकूल परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनवणे. पांडव १२ वर्षे वनवासात होते, वनवासात असताना, अनेक वेळा कठीण परिस्थितीतही त्यांनी आपला वेळ वाया घालवला नाही. या दरम्यान त्यांनी स्वत:साठी इतर राजांशी मित्रता वाढवली आणि आपले सैन्यबळ वाढवत आधार तर वाढवलाच, आणि तपश्चर्या करून आणि युद्ध अभ्यास करून नाना प्रकारची शस्त्रास्त्रविद्या शिकून करून स्वत:ला अत्यंत शक्तिशाली बनवले.  या वनवासात त्यांना ते सर्व काही मिळाले जे राजवाड्यात राहून कधीच मिळवता आले नसते.  म्हणूनच तुम्हाला हे माहित असले पाहिजे की परिस्थिती कशीही असो, परंतु ती स्वतःला अनुकूल करण्याचे कसब असले पाहिजे. 

 ४. सकारात्मक विचाराने लोखंडही सोने बनते. :- जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये राज्याची विभागणी झाली तेव्हा कौरवांच्या वतीने धृतराष्ट्राने निर्जन खांडववन अरण्य पांडवांना दिले, परंतु पांडवांनी ते सकारात्मकतेने घेतले आणि सकारात्मक वृत्ती ठेऊन भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेने ते त्या ओसाड भूमीवर गेले. इंद्रप्रस्थासारखे  सुंदर शहर वसवले. ते इतके सुंदर होते की संपूर्ण अखंड भारतवर्षात त्याच्यासारखे सुंदर शहर नव्हते. इंद्रप्रस्थ पाहिल्यानंतर दुर्योधनालाही नाही लोभ सुटला आणि त्यांनी पुढे कपट केले. 

 ५. बोलताना संयम ठेवून संतुलित शब्दांचा प्रयोग :- पांडव जेव्हा जेव्हा त्यांच्या मोठ्यांशी किंवा धाकट्यांशी बोलत असत तेव्हा ते संयमित संतुलित भाषा वापरत असत.  आपल्या वतीने त्यांनी कधीही, कितीही क्रोध आला तरीही कोणालाच कटू शब्द बोललेले आढळत नाही, जेव्हा जेव्हा त्यांना कौरवांकडून कटू शब्द ऐकायला मिळाले तेव्हा तेव्हा त्यांनी संयमानेच उत्तर दिले. कौरवांची असभ्य भाषा त्यांनी कधीही वापरली नाही.

६. संयम, पराक्रम आणि धैर्य या तीन गुणांचा नेहमी वापर :- पांडव कठीण प्रसंगातही संयमानेच वागले आणि धैर्याने, पराक्रमाने त्या महा संकटांचा सामना केला.  मग ते लाक्षागृहातून सहीसलामत बाहेर पडणे असो की युद्धात कौरवांकडून त्यांच्या सैन्यातील हजारो सैनिकांना एका दिवसात नेस्तनाबूत करणे असो.  कौरवांसमोर ते सैन्य संख्येने कमा असूनही त्यांनी संयमाने आणि धैर्याने आणि भगवंताच्या कृपेने युद्ध जिंकले.

 ७. नेहमी चुकांमधून काहीतरी शिकलेच. :- पांडव वेळोवेळी घडणाऱ्या चुकांमधून काहीना काही शिकत राहिले आणि तो चुकांमधून मिळालेला धडा ते कधीही विसरले नाहीत.  त्यांनी कधीही त्या चुकांची पुनरावृत्ती केली नाही आणि नेहमी नवीन गोष्टीचे अवलंब करण्याचा प्रयत्न केला.

८. मनात कधीही संभ्रम ठेवला नाही. 

 आपल्या मनात संभ्रम असेल किंवा विरोधाभास, द्विधा मनस्थिती असेल तर आपली निर्णय घेण्याची क्षमता कमी होईल. पांडवांच्या मनात कोणत्याही गोष्टीबद्दल कधीही संभ्रम नव्हता. युद्ध सुरू होण्यापूर्वी राजा युधिष्ठिर रथातून खाली उतरला. आणि म्हणाला, की हे धर्मयुद्ध आहे.  या युद्धात एक बाजुने धर्म आहे आणि दुसऱ्या बाजुने अधर्म आहे.  पण नक्कीच एका बाजूला धर्म आहे. कौरव सैन्यातील ज्या योद्ध्यांना धर्म आमच्या बाजूने आहे, असे वाटते, त्यांना आमच्याकडे येण्याची संधी आम्ही देत आहोत त्यांनी माझ्या सैन्यात खुश्शाल यावे, त्यांचे आम्ही आनंदाने स्वागत करतो, आणि आमच्या सैन्यातील ज्या योद्ध्यांना असे वाटते की, धर्म कौरवांच्या बाजूने राहतो, त्यांनी कौरवांकडे जावे कारण आम्हाला लढायचे आहे. आमचा युद्धाचा निश्चय स्पष्ट असावा, द्विधा मनस्थिती नसावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही.

 ९. नेहमी सत्यासोबत रहावे, अधर्माच्या बाजूने कधीही जाऊ नये

 कौरवांचे सैन्य पांडवांच्या सैन्यापेक्षा खूप शक्तिशाली होते. एक एक करून सर्व योद्धे आणि भीष्म, द्रोण, कृप यांच्यासारखे तथाकथित ज्ञानी पुरुष कौरवांना साथ देत होते. पांडवांच्या सैन्यात असे शूर योद्धे नव्हते. तरीही ते हरले कारण जिथे अधर्मी लोक जास्त, मदोन्मत्त श्रीमंत किंवा मोठे अधिकारी पण तेही नितीमंत नसलेले, तिथे विजय मिळत नाही असे म्हणतात.  विजय नेहमी सत्याचाच असतो, जिथे देव असतो तिथेच सत्य असते, धर्म असतो तिथेच देव सतो, म्हणून सत्याची बाजू कधीही सोडू नका.  शेवटी सत्याचाच विजय होतो.  सत्यासाठी जे काही करावे लागेल ते करा. पांडव नेहमीच सत्याच्याच पाठीशी होते. म्हणून त्यांच्या पाठीशी भगवंत होते. 

 १०. चांगल्या मित्रांची प्रशंसा करा: तुम्हाला प्रामाणिक आणि बिनशर्त पाठिंबा देणारे मित्रही तुमचे आयुष्य बदलू शकतात. पांडवांकडे भगवान श्रीकृष्ण होते तर कौरवांकडे महायोद्धा कर्ण होता. या दोघांनीही दोन्ही पक्षांना बिनशर्त पूर्ण पाठिंबा व सहकार्य दिले होते.

११. संकटप्रसंगी देवाचेच स्मरण आणि देवाचाच सल्ला मानणे. कितीही संकट आले तरी आधी देवालाच प्रार्थना करा. कारण तोच सर्व संकटातून आपल्याला बाहेर काढू शकतो. राजा युधिष्ठिर सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन यांनी वेळोवेळी श्रीकृष्ण भगवंतांचा सल्ला घेतला आणि त्या भगवंतांच्या कृपेने ते महाभारताचे युद्ध जिंकू शकले आणि या संसारा पासूनही मुक्त झाले. 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post