हे १२ लोक चुकीच्या वर्तनाने नष्ट होतात neeti-shatak subhashits

हे १२ लोक चुकीच्या वर्तनाने नष्ट होतात neeti-shatak subhashits

नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

हे १२ लोक चुकीच्या वर्तनाने नष्ट होतात 

भर्तृहरी संस्कृत श्लोक 

छंद :- शार्दूलविक्रीडित

दौर्मन्त्र्यान्नृपतिर्विनश्यतियतिः संगात् सुतो लालनाद् ।

विप्रोग्नध्यनात् कुलं कुतनयाच्छीलं खलोपासनात् ।।

नीर्मद्यादनवेक्षणादपिकृषिः स्नेहः प्रवासाश्रयान् ।

मैत्री चाप्रणयात् समृद्धिरनयात् त्यागात् प्रमादाद्धनम् ।।


मराठी अनुवाद वामनपंडित

छंद :- शार्दूलविक्रीडित

दुर्मंत्रे नृप, संगतिस्तव यती, कीं पुत्रही लालनें ।

वेदानध्ययनें द्विजाति; कुल दुष्पु, खलाराधनें ॥ 

नासे शील; न पाहतां कृषि, मदें या लाज मधें फुका

शाठ्यें मित्रपण, प्रवासगमर्ने स्नेह, प्रमादें रुका ॥ ॥


मराठी अनुवाद :- ल. गो. विंझे -

छंद :- शार्दूलविक्रीडित

दुर्मंत्री नृप नष्ट होइ; यति हा संगें, नि लाडें सुत । 

स्वाध्यायाविण विप्र, वंश कुसुतें; सच्छील दुष्टां नत ।। 

मधें लाज; न पाहतां कृषि; दुरी जातां टिके स्नेह न ।

मैत्री प्रीतिविना; समृद्धि अनयें; त्यागें प्रमादें धन ।।


गद्यार्थ- वाईट मंत्री (किंवा सल्ला) मिळाल्यानें राजा नष्ट होतो; संन्यासी (विषयांश) संग ठेवल्यानें; मुलगा, (फाजील) लाड केल्यानें; ब्राह्मण, अध्ययन न केल्यानें; कुल, वाईट पुत्रामुळे; सच्छील, दुष्टांशीं नम्र झाल्यानें; लाज, दारू पिण्यानें; शेती, देखरेख न ठेवण्यानें; स्नेह, दूर जाण्याने ; मैत्री, प्रेम नसण्यानें (किंवा संपल्यानें); समृद्धि, अनीतीनें; आणि (अति) दान दिल्यानें किंवा मूर्खपणे वागण्यानें धन नष्ट होतें.

विस्तारित अर्थ :- १) चुकीच्या मंत्र्यामुळे (सल्ल्यामुळे) राजा, २) आसक्तीने संन्याशी, ३) (अति) लाड केल्याने पुत्र, ४) अभ्यास न केल्याने विद्वान, ५) कुपुत्रामुळे कूळ, ६) दुष्टांच्या संगतीने चारित्र्य, ७) मद्यप्राशनाने लज्जा, ८) न पाहिल्याने शेती, ९) प्रवासामुळे (विरहाने) प्रेम, १०) प्रीतिपूर्ण वागणूक नसल्यास मैत्री, ११) अन्याय (पूर्ण) वर्तना) ने वैभव, १२) उधळपट्टी तथा हलगर्जीपणाने धन नष्ट होते.

जगात कशाने काय नष्ट होते याची सूची देऊन महाराज भर्तृहरींनी कोणत्या गोष्टींना कशापासून सांभाळायला हवे याचाच वस्तुपाठ सादर केला आहे.

राजाच्या पदरी असलेला मंत्री अर्थात सल्ला देणारा प्रधान. असा मंत्री वा त्याचा सल्ला चुकीचा असला तर राजा नष्ट होतो. अशा चुकीच्या सल्ल्यामुळे होणारे कुपरिणाम भोगावे राजालाच लागतात. कारण, शेवटी जबाबदार तोच ठरतो. पर्यायाने राजाने, सत्ताधीशाने चुकीच्या मंत्र्यांपासून तथा त्यांच्या मंत्रणेपासून जपावे.

आसक्तीने यती नष्ट होतो कारण यतित्वाचा आधारच सर्वसंगपरित्याग आहे. तो जर संग करेल तर संसारातूनही गेला आणि संन्यासातूनही. तसेच मर्यादेच्या पलीकडे लाड केले तर संतान वाया जाते. शेफारून जाते. लालनात् बहवो दोषा - अति लाड केल्याने मुलगा/मुलगी दुर्गुणाच्या आहारी जाते. 

अभ्यास न केल्यास विस्मृतीच्या शापाने ग्रस्त ज्ञान माणसाला सोडून जाते व मग असा विद्वान नाश पावतो. कारण, त्याची विद्वत्ताच गेली तर कशाचा विद्वान? म्हणून शास्त्राचे सतत आवर्तन, चिंतन, मनन, मथन करायलाच पाहिजे. 

अयोग्य वर्तनकारी पुत्राने घर अर्थात घराण्याची इभ्रत जाते. समाजात त्या कुळाची घराण्याची बदनामी होते. दुष्टांच्या संगतीने तसेच वागत चारित्र्य विकृत होते. ताडीच्या झाडाखाली दुध पिले तरी लोक ताडी पितोय असंच समजतात. म्हणून दुर्जनांच्या कुसंगात राहू नये. 

पेरणी, मशागत न करता नुसती पडीत ठेवली तर शेती खराब होते आणि सतत प्रवासामुळे दूरच राहिल्यास एकमेकांबद्दलचे प्रेम कमी होते. प्रेमच उरले नाही तर मैत्री लोप पावते आणि फालतू खर्च वा माज केल्यास धनसंपदा जाते. अर्थात या गोष्टींचा रोग होऊ नये असे वाटत असेल, तर नष्ट करणार्या बाबींचे पथ्य करणे हाच उपाय होय.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post