जगाची रीत - श्रीमंत तोच गुणवान तोच पंडित neeti-shatak subhashits

जगाची रीत - श्रीमंत तोच गुणवान तोच पंडित neeti-shatak subhashits

नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

जगाची रीत - श्रीमंत तोच गुणवान तोच पंडित 


 जगाची रीत - श्रीमंत तोच गुणवान तोच पंडित 


भर्तृहरी संस्कृत श्लोक 

छंद :- उपजाती 

यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः । 

स पण्डितः स श्रुतवान् गुणज्ञः। 

स एव वक्ता स च दर्शनीयः। 

सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते।।

वामनपंडित मराठी अनुवाद 

छंद :- उपजाति

असे जयाला धन, तोच पंडित । 

कुलीन तो, तोचि गुणी बहुश्रुत ।। 

वो मान्य, तो सुंदर तो विचक्षण । 

धनाश्रमें राहति सर्वही गुण ॥


ल. गो. विंझे मराठी अनुवाद 


छंद :- उपजाति


बने धनानें तर तो कुलीन । 

गुणज्ञ, विद्वान् बहु ज्ञानवान ।। 

वक्ताहि तो, सुंदर तोच होत 

सारे रहाती गुण काञ्चनांत ॥

किंवा

वक्ताहि तो सुंदर तोच साचा। 

साऱ्या गुणां आश्रय कांचनाचा ॥


गद्यार्थ- (एकदां संपत्ति मिळाली की मनुष्य सर्व कांहोतो.) श्रीमंत मनुष्य कुलीन ठरेल, पंडित ठरेल, विद्वान् ठरेल, गुणज्ञ ठरेल, वक्ता; सुंदर (सर्व कांहीं) ठरेल. सारे गुण द्रव्याचा आश्रय घेतात (हेच खरें)

अर्थ :

ज्याच्या जवळ धनवैभव असते तोच कुलवान, तोच पण्डित, तोच ज्ञानी, तोची गुणज्ञ, तोच वक्ता आणि तोच देखणा समजला जातो. (तात्पर्य काय?) तर सर्व गुण सोन्याच्या आश्रयाने राहतात.

जीवनपथावर धनसंपदासंपन्न व्यक्तीसच कसा सर्वत्र मान मिळतो ते येथे महाराज भर्तृहरींनी सुंदर शब्दात वर्णन केले आहे. अशा माणसालाच सर्वगुणसंपन्न समजले जाते.

असा धनसंपन्नच कुलीन म्हटला जातो. त्याच्या वाडवडिलांनी न केलेल्या कार्यांनाही सांगत पुढे त्यांचीही चरित्रे प्रकाशित होतात, कारण प्रकाशित करण्याचा पैसा याच्याजवळ असतो ना? मग त्याचे कूळ मोठे ठरणारच ना? त्यालाच पंडित, ज्ञानी म्हटल्या जाते. तो जे म्हणेल त्यालाच सगळे होकार देणार असल्याने त्याचेच मत योग्य ठरते. ग्राह्य होते. पर्यायाने तोच पंडित ठरत असतो. 

आपले मत इतरांना पटवून देणे हेच तर पांडित्याचे लक्षण आहे आणि त्याच्याकरिता पैशानेच हे कार्य परस्पर साध्य होते. तोच पंडित ठरतो. त्यालाच गुणज्ञ समजले जाते. तो ज्याला जवळ करतो त्यालाच गुणी समजतात व मग हा आपोआपच गुणज्ञ ठरतो.


अशा धनवंतालाच सर्वत्र मार्गदर्शनार्थ बोलाविले जाते. सगळ्या कार्यक्रमांत त्याचेच भाषण ठेवले जाते. पर्यायाने तोच वक्ता ठरतो. सगळे त्याच्याचकडे पाहात राहतात आणि सगळ्यांनी पाहणे हाच दर्शनीयतेचा आधार असल्याने धनवानच देखणा ठरतो. सोप्या शब्दात काय? तर ज्याच्या जवळ पैसा आहे त्यालाच सर्वगुण संपन्न रूपात मान मिळतो. कारण, शेवटी सर्व गुण देखील (समाजातील अनेकांच्या दृष्टीने) सोन्याच्या पैशाच्या आधारेच राहतात.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post