दिनांक :- 21-4-2022
धर्मनिरपेक्ष - आणि अधर्माची १० लक्षणे dharma
10 Symptoms of Adharma
महानुभाव पंथ - Mahanubhav panth
आजकाल एक शब्द खुप प्रचलित आहे- धर्मनिरपेक्ष. बरेच लोक डिंग्या मारताना दिसतात की, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत आम्ही कोणत्याही धर्माला मानत नाहीत. बाबांनो आधी धर्म शब्दाची व्याख्या समजून घ्या आणि मग स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घ्या.
धर्मनिरपेक्ष हा शब्द पूर्णतः कपोलकल्पित शब्द आहे पश्चिमेकडून सूर्य कधीही होऊ शकत नाही अमावस्येच्या रात्री चंद्रोदय होत नाही त्याचप्रमाणे हा धर्म निरपेक्ष शब्द विरुद्धार्थी आहे. आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये धर्म आणि अधर्म याबद्दल निश्चित मत मांडलेले आहे.
धर्म शब्दाची व्याख्या काय? आणि अधर्म शब्दाची व्याख्या काय? धर्म कशाला म्हणावे? आणि अधर्म कशाला म्हणावे? या बद्दल जे काही विचार आपल्या धर्मग्रंथात मांडलेले आहे ते आज आपण पाहणार आहोत. धर्म म्हणजे फक्त देवतापूजन किंवा पाच वेळा नमाज अदा करणे यालाच धर्म म्हणतात असे नाही धर्म शब्दाचे व्याख्या वेगळीच आहे.
मनुस्मृतीमध्ये अधर्म म्हणजेच पापाची १० लक्षणं सांगितलेली आहेत
"परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्ट-चिन्तनम् ।
वितयाभिनिवेशश्च त्रिविधं कर्म-मानसम् ।।
पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः ।
असम्बद्धप्रलाश्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधम् ।
अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानतः ।।
परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतम् ।।
{मनु० १२/५-७}
१) परद्रव्येष्वभिध्यानम्
अन्यायाने कपट करून पुढील माणसाला फसवून त्याची द्रव्य संपत्ती हरण करण्याची इच्छा हे अधर्माचे पहिले लक्षण होय. जर कोणी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणत असेल तर तो स्वतःचेच हसे करून घेत आहे. कारण मग तो अन्यायाने फसवणूक करून इतरांचे द्रव्य हरण करतो असा अर्थ होईल.
२) मनसानिष्ट चिन्तनम्
नेहमी इतरांचे अनहित चिंतन करत राहणे. हे अधर्माचे दुसरे लक्षण होय. दुसऱ्याचे वाईट हो किंवा इतरांना दुखवुन सुखाची इच्छा करणे. संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी त्याच्या असहायतेचा फायदा घेऊन सुखाची इच्छा करणे.
३) वितथाभिनिवेशः
ज्ञानाचे लक्षण आहे की जे जसे आहे तसेच जाणे त्याला ज्ञान असे म्हणावे असे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी म्हटले आहे. हे झाले धर्माचे ज्ञानाचे लक्षण पण याच्याविरुद्ध धर्माचे. लक्षण असे की ज्ञानाला अन्यथा ज्ञान म्हणणे विद्येला अविद्या म्हणे प्रत्येक गोष्ट धर्म-प्रवाहाच्या, दैवी संपत्तीच्या विरुद्ध करणे म्हणजेच आसुरी संपत्ती आचरणे हे अधर्माचे तिसरे लक्षण होय. मग धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्यांनी स्वतःलाच विचारावे की, आपण असुरी संपत्तीचे आहोत का?
ही वर्णन केलेली तीनही धर्माची लक्षणे ही मानसिक क्रिया आहेत. पूर्वोक्त तीनही व अधार्मिक विचार मनात उत्पन्न होतात. आता पुढे वाचिक अधर्म सांगत आहोत. वाणीद्वारा आचरले जाणारे अधर्म.
४) पारुष्यम्
पारुष्य शब्दाचा अर्थ असा आहे की कठोर बोलणे किंवा पुढच्याला शारीरिक व्यंगावर बोलणे, जसे की, “ये चकण्या” “ये लंगड्या” असे अप्रिय, निंद्य विशेषण लावून इतरांना बोलणे याला पारुष्य असे म्हणतात. तर मग सांगा धर्मनिरपेक्ष बंधुनो! तुम्ही असे पारुष्य बोलणे करता का? जर करत नसाल तर तुम्ही धर्मनिरपेक्ष नाहीत, तुम्ही तर धर्मवान आहात.
५) अनृतम्
अनृत म्हणजे खोटे बोलणे. काही लोक पावलापावलावर निष्कारण काही कारण नसताना बोलत असतात. हे अधर्माचे लक्षण होय. व्यवहारातही बऱ्याचदा खोटं बोलण्याचा योग येतो. खोटे बोलावेही लागते. पण आपल्या खोटे बोलण्याने जर पुढच्याला फायदा होत असेल तरच खोटे बोलावे. आपल्या खोटे बोलण्याने पुढीलाचे खूप नुकसान होत असेल तर अजिबात खोटे बोलू न बोलणे हे धर्माचे लक्षण होईल.
६) पैशुन्यम्
पैशुन्य म्हणजे चुगल्या लावालाव्या करणे. आपल्या मित्राची किंवा शेजाऱ्याची प्रतिष्ठा संपत्ती आदी पाहून इतरांजवळ त्याची निंदा करणे याला पैशुन्य असे म्हणतात. बरेच लोक असे आढळतात की ते तिकडच्या गोष्टी तिकडे सांगतात तो तुझ्याबद्दल असं बोलला हा तुझ्याबद्दल असं बोलला असे लावालाव्या करून भांडणं लावतात आणि गंमत पाहतात. हेही अधर्माचे लक्षण होय.
७) असम्बद्धप्रलापः
म्हणजे परस्पर विरुद्ध बोलणे आधी काही वेगळे म्हटलेले होते नंतर काही वेगळे विधान करणे. वृथा प्रतिज्ञा करणे ज्या प्रतिज्ञा आपण कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा प्रतिज्ञा करणे हे ही अधर्माचे लक्षण होय.
आता इथून पुढे शरीराने घडणारे अधर्म सांगत आहेत.
८) अदत्तानामुपादानम्
अदत्तानामुपादानम् म्हणजे न विचारता दुसऱ्याचा पदार्थ चोरून घेणे त्याची आज्ञा नसताना अनुज्ञा नसताना न पुसत घेणे हेही अधर्माचे लक्षण होय. न विचारता घेणे चोरी करणे दरोडे घालने हा सर्व धर्म होय. म्हणून कुणाचीही वस्तू न विचारता घेऊ नये. कितीही जवळचा असला तरी विचारूनच घ्यावी.
९) हिंसा चैवाविधानतः
धर्मनिषिद्ध हिंसा, म्हणजे एखाद्या इंद्रियांच्या समाधानासाठी, अर्थात जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केलेली हिंसा हाही अधर्म होय आणि शारीरिक पुष्टीसाठी मुक्या प्राण्यांना मारणे आणि त्यांचे मांस खाणे, हा राक्षसीपणा आहे. पशु-पक्षी, पाळीव प्राणी, गाय म्हैस बकरी इत्यादी जे प्राणी आहेत, त्यांना कधीही मारता कामा नये.
१०) परदारोप सेवा
पुरुषांचे पर-स्त्रीगमन, वेश्यागमन आणि स्त्रींयांचे परपुरुषगमण हाही अधर्मच आहे. पती सोडून अन्य पुरुषांशी संबंध प्रस्थापित करणे हे स्त्रीयांसाठी पाप आहे आणि पत्नी सोडून अन्य स्त्रीयांशी संबंध प्रस्थापित करणे हे पुरुषांसाठी महापाप आहे. यामुळे लोह पुतळी नावाचे नरक भोगवले जातात. आणि सांप्रत हे शरीर अनेक रोगांनी ग्रासले जाते. त्या रोगांची नावे आपल्याला माहीतच आहेत म्हणून परस्त्रीगमन वेश्यागमन यापासून स्वतःचे रक्षण करावे.
तर मग सांगा धर्मनिरपेक्ष बंधूंनो! तुम्ही हा सर्व अधर्म करता का? नाही ना! तर मग तुम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष कसे म्हणता? तुम्ही तर धर्मवानच आहात. धर्म कशाला म्हणावे हे आधी समजून घेतले पाहिजे. धर्म हा वाद विवादाचा विषय नसून, धर्म हा आचरणाचा विषय आहे.
ज्याप्रमाणे प्राणवायू ऑक्सिजन असल्याशिवाय कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही त्याप्रमाणे धर्म असल्याशिवाय मनुष्याच्या अस्तित्वाला काहीही अर्थ नाही. ज्याच्या ठिकाणी धर्म नाही तो एक प्रकारे पशूच आहे त्याला मनुष्य म्हणता येणार नाही. ज्याच्या ठिकाणी धर्म नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही.
“धृ धारणे” धर्म शब्द बनलेला आहे. त्याचा अर्थ धारण करणे असा होतो. ज्याने धर्म धारण केला त्या माणसाच्या ठिकाणी पवित्रता असते. आपल्या सदाचरण आणि तो इतरांना सुखावत असतो.