देवाचे होण्यासाठी, सर्व सोडावेच लागते mahanubhav-panth dnyansarita

देवाचे होण्यासाठी, सर्व सोडावेच लागते mahanubhav-panth dnyansarita

देवाचे होण्यासाठी, सर्व सोडावेच लागते 

mahanubhav-panth dnyansarita 

संसार आणि परमार्थ ही दोन भिन्न मूल्ये आहेत. ह्या दोन भिन्न वाटा आहेत. संसाराकडे पूर्णपणे पाठ फिरवावी लागते तेव्हा परमार्थाचा प्रकाश दिसू लागतो. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या ईश्वरी प्रेमाची भूक तुम्हाला लागलेली आहे काय? मग तुम्हाला तुमच्या सगळ्या लौकिक आकांक्षावर पाणी सोडावे लागेल; लौकिक आणि पारलौकिक, सांसारिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही प्रकारच्या आकांक्षांच्या वेली आमच्या जीवनाच्या अंगणात प्रफुल्लित स्वरूपात बहरास याव्यात अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

संसार आणि परमार्थ एकाच वेळेस होऊ शकत नाही. एक मुंगी ती चालली होती तोंडात एक तांदळाचा दाणा घेऊन. वाटेत तिला डाळीचा दाणा मिळाला. कबीर तिला म्हणाले : “एक घे, तांदूळ घे नाहीतर डाळ घे. दोन्हीची मिळून खिचडी करणे नको. एकच घे. "

"चिटी चावल ले चली, बीचमें मिल गयी दाल । 

कहे कबीर दो ना मिले, एकले दूजी डाल ॥ "

पारमार्थिक जीवनातला हा अवाधित सिद्धान्त रहीमने जरा निराळ्या पद्धतीने सांगितलेला आहे. तो म्हणतो, 'आध्यात्मिक साधना ही अत्यंत अरुंद गल्ली आहे; तिच्यात आपण व प्रभू हे दोघेही एकाच वेळी राहू शकत नाही. एक आपण तरी राहू किंवा प्रभू तरी राहील.

" रहिमन गली है सांकरी। दूजो ना ठहराई ।

आपुन है तो हरी नही। हरी है तो आपुन नही ।।

येशू ख्रिस्ताने याच आशयाचे मार्गदर्शन केलेले आहे "No man can serve two masters. Ye cannot serve God and mammon."

सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या मुखातूनही याच अर्थाचे वचन बाहेर पडलेले आहे. लौकिक हित आणि पारमार्थिक हित या वेगवेगळ्या वाटा आहेत. जो लौकिक जीवनात श्रेष्ठ पदासाठी उत्सुक झालेला असतो त्याला तिकडे परमार्थात काही किंमत नसते, आणि जो परमार्थात उच्च पद पावलेला असतो त्याला लौकिकात काही स्थान नसते. परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी सांगतात

“एथीचा श्रेष्ठ : तो लोकीचा नष्ठ हे स्वाभाविकही आहे. एकाच वेळी दोन वाटांनी कसे चालता येईल? एकाच वेळी तळमजला व वरचा मजला अशा दोन्ही मजल्यांवर एकाच वेळी कसे बरे नांदता येईल ? Consciousness च्या, जाणिवेच्या, संज्ञाशक्तीच्या, संवित्तीच्या निरनिराळ्या पातळ्या आहेत. पारमार्थिकतेची पातळी ही लौकिकेच्या पातळीहून वेगळी व तिच्याहून कितीतरी वरची आहे. त्यावरच्या पारमार्थिक स्तरावर जाण्यासाठी माणूस अधीर झाला पाहिजे, बेचैन झाला पाहिजे. पोळलेले कुले असते ना? त्याच्यासारखा बेचैन झाला पाहिजे. पारमार्थिक लाभ होईपर्यंत, ईश्वर-कृपा-प्रसाद मिळेपर्यंत, माणूस अखंड जळतच राहिला पाहिजे. अशा अधीर झालेल्या भक्तांसाठी देव येतोच.

जसे सर्वज्ञ अवतरले. तसा तो अवतरतो "God decends, but we have to ascend." आपण खाली पाहात असतो. अधोमुख असतो. रस्त्यात कोणाचा पडलेला रुपया सापडेल का? शोधत असतो. माती चाचपडत असतो. येथल्या मातीचा लोभ सोडून द्यावा. वर पाहावे. अवतार वरून पाहातच असतो. तो आर्त भक्ताला हात देतो. संसाराच्या गाळातून त्याला पाहता पाहता वर काढून घेतो. 

सर्वज्ञांनी संसाराच्या कर्दमातून (संसाररूपी चिखलातून) अशा कैक पीडितांना वर काढून मुक्त केले आहे. परमार्थाची ओढ दुर्लभ आहे. दुःखाची गोष्ट ही की, या पारमार्थिक जीवनाची ओढ फारच थोड्या जीवांना असते. या बाबतीत भगवान् श्रीकृष्णास असा अनुभव आला की,

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । 

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥”

तसा अनुभव सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनाही आलेला आहे. सर्वज्ञ निवाच्या झाडाखाली बसले होते. समोर पाहतात तो सोमवारीच्या निमित्ताने तीर्थस्नान करण्यासाठी आलेल्या यात्रेकरूंची गर्दी.

'एक स्नाने करिताति: एक तर्पणे करिताति: एक पींडप्रदाने करिताति : त्या वेळी सर्वज्ञांनी सारंगपंडितांना विचारले,

पंडित हो! इथे जमलेले लोक हे दृष्ट पर स्वार्थासाठी देवधर्म करत आहेत की अदृष्ट पर मिळावे म्हणून करत आहेत? यावर सारंगपंडित म्हणतात “जी जी हे अदृष्ट पर मिळावे म्हणून करत आहेत” तीर्थस्नानासाठी, बाह्यतः पवित्र व पारमार्थिक वाटणाऱ्या सत्कार्यासाठी, हे लोक जमले आहेत. हे आपल्या ऐहिक आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी जमले आहेत की पारमार्थिक कल्याणाची सात्त्विक इच्छा बाळगून येथे आले आहेत? सारंगपंडितांना वाटले, ही माणसे ज्याअर्थी तीर्थस्नानासाठी आलेली आहेत त्याअर्थी ती सगळी पुण्यार्थी, मोक्षार्थीच. 

म्हणून ते म्हणाले, "जी जी: हे आवघे अदृष्टार्थिए की: " खरेच? हे सगळे अदृष्टार्थी? मुक्तीसाठी उतावीळ झालेले ? आपण पाहू या. "भटोबास ! तुम्ही जरा दवंडी पिटा, मोठ्याने ओरडून सांगा येथे एक कैवल्यदानी मोक्ष देणारा आला आहे. जो मागेल त्याला तो कैवल्य देतो ; मुक्त करतो." भटोबास जमलेल्या गर्दीत फिरले. नदीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत 'फोकरित' गेले. "कैवल्यदानि आला असे : तो घाया घाया कैवल्य देतु असे : " भटोबासाचे ओरडणे व्यर्थ गेले. त्यांच्याकडे कोणी ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. एकाही यात्रेकरूस कैवल्याची ओढ दिसली नाही. 

रवर पाहता देवधर्म करणाऱ्या माणसांकडे पाहून आपल्याला देखील असेच वाटते की हे देवासाठी सर्व करत आहेत पण पूर्ण विचार केला असता लक्षात येते की हे सर्व दृष्टपर ऐहिक सुखोपभोगासाठीच चाललेले आहे. ईश्वरी प्रेमाची अनावर ओढ ही ज्या जीवांची स्थायी वृत्ती असते त्यांच्यासाठीच सर्वज्ञ श्रीचक्रधर अवतरले. त्या दिव्य प्रेमाची प्राप्ती होण्यासाठी संसाराची आसक्ती पूर्णपणे नष्ट होणे आवश्यक आहे.

एक व्यापारी होता. त्याला कुष्ट झाले. 'सोएरीधाएरी तयाची खंती करीती : ' सगळे जवळचे नातेवाईक त्याला कंटाळले. 'माया-बहिणी म्हणती " तूं मर कोठी : मरो का: हें आझुई का जीताए : " तो घर सोडून गेला. गावाबाहेरच्या एका देवळात राहिला. "देवा तू माझा, मी तुझा " या वृत्तीने तो वागू लागला, सर्वज्ञांनी देमतीला सांगितले, “देव माझा मी देवाचा" अशी वृत्ती अंगी मुरल्याशिवाय उद्धार होणे अशक्य आहे. देव मिळावा असे वाटते ना? मग सगळे सांसारिक आधार सोडून द्यावे.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post