संस्कृत सुभाषित रसग्रहण
गुप्तचर खाते हे देशाचे अतिशय महत्त्वाचे अंग होए - किरातार्जुनीयम् sunskrit-subhashit
हितं मनोहारि च दुर्लभं वचः।
छंद :- इंद्रवंशा
क्रियासु युक्तैर्नृपचारचक्षुषो
नवञ्चनीया प्रभवोनुजीविभिः।
अतोऽर्हसि क्षन्तुमसाधुसाधु
वा हितं मनोहारि च दुर्लभं वचः॥
स किं सखा साधु न शास्ति योऽधिपं हितान्न यः संशृणुते स किं प्रभुः।
सदाऽनुकूलेषु हि कुर्वते रतिं नृपेष्वमात्येषु च सर्वसम्पदः॥
~ १.४-५, किरातार्जुनीयम्
अर्थ :- (एखाद्या) कार्यासाठी (कामगिरीसाठी) नेमलेल्या दूताने (गुप्तहेराने, कर्माचारी व्यक्तीने) राजाला (स्वामीला, प्रभूला) धोका देणे किंवा फसवणे योग्य नाही. कारण राजा चारचक्षू असतो म्हणजेच गुप्तचर हेच राजाचे डोळे असतात. म्हणून मी तुम्हाला जे सांगेन ते प्रिय असो वा अप्रिय, चांगले असो वा वाईट त्यासाठी आपण मला क्षमा करावी.
वास्तविक पाहता जे बोल हितकर असतात ते मनोहारी किंवा चित्ताकर्षक असणे दुर्लभच होय. त्याला मित्र किंवा सज्जन असा मंत्री कसे म्हणायचे जो शासनकर्त्याला (राजाला) योग्य माहिती वा सल्ला (मार्गदर्शन) देत नाही. आणि (ऐकायला अप्रिय असली तरी) हितकर अशी योग्य माहिती देणार्याचे जो ऐकत नाही त्याला राजा (प्रभू किंवा शासक) तरी कसे म्हणावे? उचित (किन्तु अप्रिय लगनेवाली) कारण परस्परांना अनुकूल असणाऱ्या राजा व अमात्यांवरच (राजाच्या सहकाऱ्यांवरच) राज्याच्या समृद्धीला कारणीभूत असणाऱ्या साऱ्या संपदा प्रसन्न होतात.
टीप- महाकवी भारवीच्या किरातर्जुनीयम् या महाकाव्यात वरील श्लोक समाविष्ट आहे. 'अर्थगौरव' हा भारवीच्या काव्याचा वैशिष्ट्यपूर्ण गुण होय. अर्थगौरव म्हणजे मोजक्या शब्दात खूप महत्त्वपूर्ण असा आशय गुंफणे होय. भारविच्या काव्यात पाल्हाळ न लावता नेमकेपणा असलेली व आशयबद्ध रचना आढळते.
राजा युधिष्ठिराने वनवासात असताना दुर्योधनाच्या राजसभेत हेरगिरी करण्यासाठी, आपल्या परोक्ष तिथे काय कट कारस्थानं शिजतात याची माहिती मिळविण्याच्या कामगिरीसाठी 'वनचर' नावाचा हेर नियुक्त केला. वनवासात असलेल्या राजा युधिष्ठिराला एक महत्त्वाची माहिती देण्यासाठी हा 'वनचर' द्वैतवनात येतो ह्या प्रसंगाने किरातार्जुनीयम् ह्या काव्याची सुरुवात होते.
गुप्तचर हे राज्याचे, देशाचे अतिशय महत्त्वाचे अंग होय. त्याने प्रयत्नपूर्वकपणे मिळविलेली माहिती चांगली असो वा वाईट ती राज्याच्या हिताची असल्यामुळे राजाने ती ऐकलीच पाहिजे असा आशय ह्या दोन श्लोकातून भारविने मांडला आहे. मात्र ह्या श्लोकातून प्रचलित झालेली हितं मनोहारि च दुर्लभं वचः।
ही लोकोक्ती फक्त राजाच नव्हे तर सर्वांना लागू पडणारी आहे कारण ती सांगते की तुम्हाला हितकर असणारे बोल नेहमीच मनोहारी किंवा तुम्हाला आवडणारे असतीलच असे नव्हे. बऱ्याचदा ते तुम्हाला कटू किंवा वाईट वाटतात पण तुमच्या भल्याचे असतात. 'सत्य हे कटू असतं' ही म्हणही आजच्या लोकोक्तीच्या जवळपास जाणारी आहे.
हितं मनोहारि च दुर्लभं वचः।
संकलन व टीप : अभिजीत काळे