भोळसर लोकांना कपटी माणसे फसवतात संस्कृत सुभाषित रसग्रहण Sunskrit Subhashits
व्रजन्ति ते मूढधिय: पराभवं भवन्ति मायाविषु ये न मायिन:।
प्रविश्य हि घ्नन्ति शठास्तथाविधानसंवृताङ्गान्निशिता इवेषव:॥
~ १.३०, किरातार्जुनियम्
अर्थ :- कपटी लोकांशी जे कपटीपणे वागत नाहीत, त्या बावळट माणसांचा पराभव होतो. ज्याप्रमाणे धारदार बाण उघड्या (कवच नसलेल्या) त्वचमध्ये प्रवेश करून घात करतो, त्याप्रमाणेच तशा प्रकारच्या (भोळसटपणे विश्वास ठेवणाऱ्या, शहाणपणाचे कवच नसलेल्या) माणसांचा ठग (दुष्ट, शठ) नाश करतात.
टीप- 'भारवेरर्थगौरवम्' संस्कृत महाकवींमध्ये ज्या चार महाकवींच्या रचना वैशिष्ट्यांचे प्रामुख्याने गुणगाण केलेले आहे त्यात महाकवी भारवीच्या लेखनातील अर्थपूरकता, अर्थपूर्णता ह्या गुणवैशिष्ट्याचा उल्लेख केला गेला आहे. भारवीचे लेखन आशयाच्या अंगाने परिपूर्ण आणि वाचकाला पटणारे भावणारे आहे असे म्हटले जाते. वरील श्लोकार्थावरून ते आपल्या लक्षात येतेच.
अंगी कपट नसलेली, साधीभोळी माणसे सहज कोणावरही विश्वास ठेवतात आणि ठकविली जातात. त्यांची फसवणूक होते. यासाठी मनुष्याकडे शहाणपणाचे चिलखत हवे असे वरील श्लोक सांगतो. ज्ञानी, शहाणा, चतुर, हुशार, अक्कलवंत ह्या संज्ञा एकमेकांना समानार्थी असल्या तरी त्यांमध्ये अर्थानुषंगाने सूक्ष्म भेद आहे. हा भेद जाणत्याला बरोबर कळतो. शहाणपण असणे म्हणजे जाणीवेत असणे कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूची साधकबाधकता ओळखण्याचे कौशल्य अंगी असणे हा महत्त्वाचा गुणच नव्हे तर अनिष्टांपासून वाचण्याचे ते चिलखत आहे असे वरील श्लोक सांगतो.
असे असले तरी काही ज्ञानी माणसे अतिशहाणीही असतात. ज्यांना प्राप्त केलेल्या ज्ञानाचा कसा वापर करावा हे कळत नसते. आपल्याहून ज्ञानी जगात कोणी नाही याचा त्यांना गर्व आणि अहंकार असतो. अर्थातच ते त्या भ्रमात असतात. कोणाशीही वाद घालण्यासाठी सदैव तयार असतात. त्यामुळे शहाणपण, अक्कल, ज्ञान असावे पण त्याचा व्यर्थ अहंकार असू नये.
याविषयी खुलासेवारपणे भाष्य करणारा तुकोबारायांचा एक अभंग यानिमित्ताने आपण पाहूया,
वरीवरी बोला रस ।
कथी ज्ञाना माजी फोस ॥
ऐसे लटिके जे ठक ।
तयां इह ना पर लोक ॥
परिस एक सांगे ।
अंगा धुळीही न लगे ॥
तुका म्हणे हाडें ।
कुतऱ्या लाविलें झगडें ॥
एखाद्याने स्वतःच्या ज्ञानाच्या, शहाणपणाच्या, ब्रम्हज्ञानाच्या विषयी वरवर कितीही गप्पा मारल्या अगदी रसभरीत वर्णन केलं तरी अनुभवाचुन ते फोल होत. असे ठक इहलोकातही सुखी होत नाहीत आणी त्यांना परलोकातही सद्गती मिळत नाही. दुसऱ्याचे ऐकून जो तेच घोकंपट्टी केल्याप्रमाणे बडबडतो त्याच्या अंगाला परमार्थाची धूळही लागत नसते. तुकोबाराय म्हणतात असे वाचाळपाणे ज्ञान मिरविणारे मग आपापसात वाद घालत रहातात. अशा लोकांचे अवस्था हाडाच्या तुकड्यासाठी भांडणार्या कुत्र्यांसारखी असते.
मात्र जे प्राप्त केलेल्या ज्ञानाचा विवेकी उपयोग करतात त्यांच्यासाठी ते ज्ञान चिलखताप्रमाणे प्रतिकूलतेपासून त्यांचे रक्षण करते.
संकलन व टीप : अभीजीत काळे
हे संस्कृत सुभाषित “किरातार्जुनियम् ” या काव्यातले आहे. संस्कृत साहित्याच्या इतिहासात लघुत्रयी आणि बृहत्रयी यांना रचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. महान कवी कालिदास यांचे रघुवंशम कुमारसंभवम् आणि मेघदूतम् हे लघुत्रयी अंतर्गत गणले जातात आणि किरातार्जुन्यम् शिशुपालवध आणि नैशाधिया चरितम् ही महाकाव्ये बृहत्रयी अंतर्गत गणली जातात.
किरतार्जुन्यम् हे महान कवी भारवी यांचे रचना कार्य आहे, ज्यामध्ये भारवी या महान कवीने भावनेपेक्षा कलेच्या बाजूकडे अधिक लक्ष दिले आहे. भारवीच्या काव्यात भाषा, रस, अलंकार, श्लोक इत्यादी सर्व विषयांची सुंदर परिपक्वता त्यांच्या बहुविद्याशाखीय ज्ञानाचे द्योतक आहे. यावरून काव्यात अनेक ठिकाणी विविध शास्त्रांचे ज्ञान दिसून येते.
किरातार्जुनियम् या काव्यात अनेक प्रकारचे छंद अलंकार रस रिती वृत्ती हे सर्व ओतप्रोत भरलेले आहेत. काव्यामध्ये अनेक छंदांचा वापर केलेला आहे. पण कवीला वंशस्थ छंद अधिक प्रिय आहे असे वाटते कारण बरेच श्लोक वंशस्थ छंदात आहेत. वरील सुभाषितही वंशस्थ छंदात आहे.