वयं पञ्चाधिकं शतम् संस्कृत सुभाषित रसग्रहण
Sunskrit Subhashit
आजची लोकोक्ती - वयं पञ्चाधिकं शतम्।
इतरांशी युद्ध करताना आपण सगळे एकशे पाच
परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम्।
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ।।
- युधिष्ठिर, महाभारत.
अर्थ : -
एकमेकांच्या विरोधात (आपल्यात वाद झाल्यास), आपण पांडव पाच आणि ते कौरव शंभर आहेत. पण दुसऱ्या (परक्या शत्रूशी) वाद झाल्यास असताना आपण एकशे पाच (पांडव अधिक कौरव) आहोत.
टीप - एकात्मतेचा संदेश सांगणारी वयं पञ्चाधिकं शतम्। ही लोकोक्ती वरील श्लोकापासून प्रचलित झाली आहे. आपसात कलह किंवा वाद असले तरी त्याचा फायदा परकियांना, इतरांना घेऊ द्यायचा नाही हा खूप महत्त्वाचा संदेश वरील उक्ती देते.
वरील श्लोकासंदर्भात महाभारतातील कथा अशी आहे.. पांडव द्यूतक्रीडेमध्ये हरल्यानंतर दुर्योधनाने त्यांना १२ वर्षं वनवास व १ वर्ष अज्ञातवास भोगण्यास सांगितले. वनवासाच्या काळात सम्राट युधिष्ठिर द्रौपदी व इतर पांडवांबरोबर वेगवेगळ्या वनांमध्ये वास्तव्य करत होते. एकदा ते हस्तिनापुर जवळच्याच आखेटवनामध्ये वास्तव्यास असल्याची वार्ता दुर्योधनास कळाली. ते वनवासात अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये राहत असल्याने त्यांच्या दुर्दशेवर उपहास करून त्यांची थट्टा करण्याचे दुर्योधनाच्या मनात आले.
'आम्ही आखेटवनात मृगयेला (शिकारीला) चाललो आहोत' असे खोटे सांगून धृतराष्ट्राची अनुमती घेऊन दुर्योधन इतर कौरव व कर्ण यांच्यासह थोडे सैन्य घेऊन निघाला.
पांडवांच्या वास्तव्याच्या कुटीपासून काही अंतरावरच एक सरोवर होते. दुर्योधनाने प्रथम तिथे स्नान करून थोडा आराम घेऊन पुढे जाण्याचे ठरविले. परंतु तो सरोवराजवळ जाताच काही रक्षकांनी त्याला अडविले. त्यांनी दुर्योधनास सांगितले की, "गंधर्वांचा राजा चित्रसेन गन्धर्व व त्याच्या राण्या या वेळी सरोवरामध्ये स्नान करत आहेत, त्यामुळे काही काळ त्याला सरोवराकडे जाण्याची अनुमती मिळू शकत नाही".
हे ऐकून दुर्योधनाचा अहंकार जागा झाला. तो म्हणाला की, "मी हस्तिनापुरचा सम्राट आहे. हे आखेटवन माझ्या राज्याचा भाग आहे. मला सरोवरामध्ये स्नान करण्यापासून कोण रोखणार?" परंतु गंधर्व त्याचे ऐकत नाहीत हे पाहून तो युद्धास तयार झाला.
चित्रसेन गंधर्वाच्या सेनेने दुर्योधनाच्या सेनेला पळवून लावले व दुर्योधनास बंदी केले. त्यावेळी कर्णासारखा महारथीही आपले प्राण वाचवून पळून गेला. दुर्योधनाच्या पळून जाणार्या सैनिकांपैकी काहींनी ही वार्ता तिथून जवळच रहात असणार्या पांडवांना कळविली.
दुर्योधन अशा मानहानीकारक प्रकारे पकडला गेल्याचे ऐकून युधिष्ठिर चिंतित झाला. भीम आणि अर्जुन यांना मात्र आनंद झाला. ते म्हणाले की, "छान झालं. दुर्योधन आमच्या दुर्दशेवर हसायला आला होता त्याला योग्य दंड मिळाला." तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, "झालं हे योग्य झालं नाही. दुर्योधन आपला भाऊ आहे. भले ही आपल्यात विवाद असतील त्यावेळी ते शंभर व आपण पाच आहोत. परंतु, जेव्हा संकट बाहेरील असेल तेव्हा आपण सगळे मिळून एकशेपाच आहोत. तुम्ही दोघे लगेच जा आणि दुर्योधनाला गंधर्वाच्या कैदेतून मुक्त करा. चित्रसेन गंधर्व आपला मित्र आहे परंतु आवश्यकता पडलीच तर त्याच्याशीही युद्ध करा." त्यानंतर भीम व अर्जुन यांनी चित्रसेन गंधर्वाची भेट घेऊन दुर्योधनाची सुटका केली.
दुर्योधनाचे दुर्दैव हेच की शकुनीच्या प्राभावाखाली राहून सतत पांडवद्वेष केल्याने तो पांडवांचा चांगूलपणा जाणू शकला नाही. परंतु युधिष्ठिराने मात्र याच दुर्योधनाने आपले राज्य हिसकावून घेऊन आपल्याला वनवासाला पाठवलेय हा विचारही मनाला शिवू दिला नाही. सज्जन व दुर्जन यांच्या स्वभावातला फरक या प्रसंगातून अधोरेखित होतो.
आपापसात विचारभिन्नता असतानाही संकटकाळी ऐक्य कसं जपायचं हे वरील कथेतून व श्लोकातून दृष्टोत्पत्तीस येथे. परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम्। खेदाची बाब हीच की भारतीयांमधला हा बंधुभाव कुरुक्षेत्रातील युद्धानंतर कायमचा नष्ट झालेला दिसतो. त्यानंतर या हिंदुस्थनावर सतत आक्रमणंच होत राहीली.
अनेक परकीय शत्रूंनी येथे येऊन आपल्यावर आक्रमणे केली आपल्यावर राज्य केलं. आतातरी ऐक्य व अस्मिता जपण्याचं कर्तव्य आपल्यापैकी प्रत्येक भारतीयाचं आहे. याची प्रत्येकाला जाणीव व्हायला हवी. भारताला पाकिस्तानी कट्टर धर्मांध दहशतवादाचा धोका अजूनही आहे. त्यामुळे आपण सगळे एकशेपाच ही भावना जागृत ठेवण्याचा व त्यातून लोकप्रबोधन करण्याचा हा काळ आहे.
वयं पञ्चाधिकं शतम्।
संकलन व टीप : अभिजीत काळे,