जो चुक करत नाही तो प्रशंसेला पात्र होतो- सुभाषित - subhashits

जो चुक करत नाही तो प्रशंसेला पात्र होतो- सुभाषित - subhashits

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

जो चुक करत नाही तो प्रशंसेला पात्र होतो- सुभाषित - subhashits 



अप्रमादं प्रशंसन्ति प्रमादो गर्हितस्सदा!

अप्रमादेन मघवान् देवानां श्रेष्ठतां गतः!!

 - उदानवर्ग

(मूळ पाली: अप्पमदेन मघवा देवानं सेट्ठतं गतो!

अप्पमदं प्रसमन्ति पमदो गरहितो सदा!!)

धम्मपद ३०

चूक न केल्यामुळेच मघवान् 

( इंद्र) देवांमधला श्रेष्ठ बनला. 

(श्रेष्ठ लोक) चूक न करण्याची, जागरूकतेची स्तुती करतात. चुकीची नेहमीच निंदा केली जाते. 

एकदा वैशालीनगरी जवळील कूटग्रामामध्ये बुद्ध रहात होते. एकदा लिच्छवी राजकुमार महाली त्यांच्या प्रवचनाला आला. प्रवचनामध्ये बुद्ध शक्राचा म्हणजे इंद्राचा संदर्भ दिला. म्हणून महालीनं त्यांना विचारलं, " भगवन्, आपण इंद्राला पाहिलंय का?" बुद्ध उत्तरले, " हो" ." इंद्राकडे पहाणं फार कठिण असेल, नाही का?" महाली म्हणाला. बुद्ध उत्तरले, " माझा इंद्राचा परिचय आहे. तो देवांचा राजा कसा झाला तेही मला माहित आहे." महालीच्या विनंतीवरून भगवान् बुद्धांनी इंद्राची कथा सांगितली. 

इंद्र हा पूर्वजन्मी मघ नावाचा तरुण होता. तो मचल नावाच्या गावचा रहिवासी होता. तरुण मी आणि त्यांचे बत्तीस सहकारी मित्र सत्कृत्य करत असत. त्यांनी रस्ते बांधले. धर्मशाळा बांधल्या. शिवाय मी सात नियमांचं पालन करत असे.  ते नियम म्हणजे 

१) आपल्या आईवडिलांचा सांभाळ करणे 

२) वृद्ध आणि गुरुजनांना आदर देणे 

३) नम्रपणे बोलणे 

४) पाठीमागे निंदा नालस्ती न करणे

५) लोभाचा त्याग करून  उदारता अंगी बाळगणे  

६) सत्य बोलणे 

७) रागावर नियंत्रण ठेवणे. हे सात नियम अत्यंत जागरूकतेने पाळल्यामुळे तो देवांचा राजा झाला. 

बौद्ध आणि जैन धर्मांमध्ये मनुष्य देवांहून श्रेष्ठ मानला गेला आहे. पुण्यकर्म केले की देवांचा जन्म मिळतो. आणि त्यानंतर तो पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त करून संन्यासी होऊन साधनेने मोक्ष मिळवतो. इंद्र पुण्यकर्म करून देशांमधल्या श्रेष्ठ बनला. 

कोणताही प्रमाद न करता त्यानं पुण्यकर्म केलं म्हणून तो देवांचा राजा झाला. कोणत्याही कामात जागरूकता, चुका टाळण्याकडे कल महत्त्वाचा. चु का न करता जो काम करतो त्याची प्रशंसा करतात. जो चूका करतो त्याची निंदा करतात.

धम्मपद हा इ.स.पू. ३ ऱ्या शतकातला ग्रंथ आहे. बुद्धानंतर सुमारे २५० वर्षांनंतरचा. याकाळापर्यंत साधारणतः वैदिक वाङ्मय निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली होती. वैदिक संदर्भ जनमानसात स्थिरावले होते. बुद्धानं या संदर्भांना आपल्या विचारांच्या चौकटीत सामावून घेतले. वैदिक शब्दांच्या लोकव्युत्पत्तीदेखील ( folk etymology) या वाङ्मयात दिसतात. प्रस्तुत कथेतला वापरलेला 'मघ' हा शब्द वैदिक आहे. त्यांचा अर्थ ' बक्षिस, संपत्ती, ऐश्वर्य' इ. मघवान् ( ऐश्वर्यसंपन्न, खूप संपत्ती देणारा) हे विशेषण विशेषकरून इंद्राचं. परंतु, त्यातला -वान् ( -वत्) हा प्रत्यय काढून टाकून फक्त मघ हेच विशेषनाम करून टाकले.

उदानवर्गात धम्मपदाच्या पाली श्लोकाचं संस्कृत भाषांतर आहे. या श्लोकाच्या बाबतीत धम्मपदातल्या ओळींचा क्रम बदललेला दिसतो.

*******************

तावदाश्रीयते लक्ष्म्या तावदस्य स्थिरं यशः ।।

पुरुषस्तावदेवासौ यावन्मानान्न हीयते ।।

          सुभाषितरत्नभाण्डागारम्

तावत् ( तोपर्यंत)  

लक्ष्म्या ( संपत्तीचा) 

आश्रीयते ( आश्रय मिळतो),  

तावत् ( तोपर्यंत) 

अस्य ( यांचं) 

यशः ( कीर्ती)  

स्थिरम् ( स्थिर असते), 

तावद् ( तोपर्यंत) 

एव ( च)

 असौ ( ही) 

पुरुषः ( व्यक्ती असते), 

यावत् ( जोपर्यंत)  

मानात् ( त्याचा सन्मान) 

 न हीयते ( कमी होतं नाही). 

मान राखून असणं ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. जोपर्यंत लोक एखाद्याला मान देतात तोपर्यंतच त्याला तोपर्यंतच त्याला पैसाअडका मिळतो. तो श्रीमंत असतो; . तोपर्यंतच त्याची कीर्ती सगळीकडे असते, त्याला सगळे लोक ओळखतात.्तोपर्यंतच जणू त्याचं अस्तित्वही असतं. म्हणून सन्मान टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं.

डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी


(पुणे)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post