सत्यकथा - सुखी जीवनाचा बट्ट्याबोळ marathi bodhakatha

सत्यकथा - सुखी जीवनाचा बट्ट्याबोळ marathi bodhakatha

सत्यकथा - सुखी जीवनाचा बट्ट्याबोळ 

marathi bodhakatha 

आजच्या काळात काय आणि प्राचीन काळात काय आपण संपत्तीसाठी भावाभावांमध्ये असणारे भांडणे वाद विकोपाला गेलेले अशा अनेक घटना ऐकतो. चूक दोन्ही बाजूची असली तरी कोणीही माघार घेत नाही. वैर इतके वाढते की एकमेकांचे तोंडही पहात नाहीत. आणि आयुष्यभर क्रोध द्वेषात जगत असतात. व एकमेकांना दुषणे देत असतात. अशीच एक घटना - 

एका सेठजींनी त्यांच्या धाकट्या भावाला व्यवसायासाठी तीन लाख रुपये दिले. त्या पैश्यांमुळे त्याचा व्यवसाय चांगलाच स्थिरावला, पण व्यवसायात चांगली बरकती येऊनही त्याने आपल्या मोठ्या भावाला पैसे परत केले नाहीत. मोठ्या भावाने पैसे बऱ्याच वेळा मागितले पण तो टाळत राहिला. 

अखेर दोघांमध्ये जोराचे भांडण झाले, पुढे ते भांडणही इतके वाढले की दोघांनी एकमेकांच्या घरी येणे-जाणे पूर्णपणे बंद केले. घृणा आणि द्वेष यामुळे अंतर्गत संबंधात खुप दुरावा आला. सेठजी प्रत्येक वेळी प्रत्येक नातेवाईकांसमोर आपल्या धाकट्या भावाची टीका, अनादर आणि निंदा करू लागले. त्याला कृतघ्न म्हणू लागले. 

सेठजीही चांगले आस्तिकही होते, रोज सकाळी उठून ते परमेश्वराचे ध्यान करीत असत. पण त्यामुळे त्यांची आध्यात्मिक साधना ढासळू लागली. भजन देवपूजेच्या वेळीही ते आपल्या धाकट्या भावाचाच विचार करू लागले. व त्याला दूषणे देऊ लागले. त्या मानसिक त्रासाचा परिणाम शरीरावरही होऊ लागला.  अस्वस्थता वाढली. त्यावर उपाय करूनही त्यांना स्वस्थ वाटेना.  शेवटी तो शेठ एका साधूकडे गेला आणि त्याने आपली व्यथा सांगितली. 

संत म्हणाले :- 'शेठ!  तुम्ही काळजी करू नका.  देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. तुम्ही काही फळे आणि मिठाई घेऊन तुमच्या धाकट्या भावाच्या घरी जा आणि त्याला भेटताच त्याला एवढेच म्हणा, 'हे अनुज!  माझ्याकडूनच चूक झाली आहे, मी सर्वार्थाने अयोग्य केले. तू मला माफ कर.'

      सेठजी म्हणाले:- "महाराज! मी त्याला संकटात मदत केली आहे आणि "क्षमा" देखील मीच मागायला हवी का!"

संताने उत्तर दिले:- "कुटुंबात असा कोणताही संघर्ष असू शकत नाही, ज्यात दोन्ही बाजूंची चूक नसेल. जर एका बाजूची चूक एक टक्का, दुसऱ्या बाजूची नव्वद टक्के असली तरी चूक दोन्ही बाजूंचीच असतेच. मान्य आहे की त्याची चुक जास्त आहे पण तुमची ही चूक काही ना काही नसतेच कारण भांडणारे दोघेही सदोष असतातच, दोघांचीही चूक असतेच"

      सेठला काही समजले नाही. तो म्हणाला:- "गुरूवर! मी काय चूक केली?"

     संत म्हणाले, “तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला मनातल्या मनात वाईट समजले - ही तुमची पहिली चूक आहे. तुम्ही इतर नातेवाईकांकडे त्याची निंदा, टीका केली आणि तिरस्कार केला - ही तुमची दुसरी चूक आहे. त्याच्या चुकांकडे क्रोधित होऊन घृणास्पद नजरेने पाहिलं - ही तुमची तिसरी चूक आहे.

    आणि त्याची निंदा स्वतःच्या कानांनी ऐकली - ही तुमची चौथी चूक आहे. तुम्हाला तुमच्या धाकट्या भावाबद्दल घृणा आणि द्वेष आहे - ही तुमची शेवटची चूक आहे. या चुकांमुळे तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला दुखावले. तुम्ही त्याला दिलेले दु:ख तुमच्याकडे अनेक पटीने परत आले आहे. म्हणून तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन त्याच्याकडे जा, आणि आपल्या चुकांबद्दल "क्षमा" मागा. अन्यथा पुढील सर्व आयुष्य तुम्ही शांतपणे जगू शकणार नाही आणि शांतपणे मरणारही नाही. तुमचा आत्मा भटकत राहील. माफी मागणे ही एक उत्तम साधना आहे.  आणि तुम्ही खूप चांगले साधक आहात."

सेठचे डोळे उघडले. आपल्या चुकांचा पश्चाताप झाला. संतांना नतमस्तक होऊन फुलं, फळं घेऊन तो धाकट्या भावाच्या घरी पोहोचला घरातले सर्वजण जेवणाच्या तयारीत होते. त्याने दार ठोठावले. दार शेठच्या पुतण्याने उघडले.  शेठला समोर पाहून तो अवाक् झाला आणि आनंदाने जोरजोरात ओरडू लागले, "मम्मी! पप्पा!! बघ कोण आलंय! काकाजी आले, काकाजी आले ."

लहान भावाने दाराकडे पाहिलं. त्याला वाटलं, 'आपण स्वप्न तर पाहत नाही ना?' मोठ्या भावाला नम्रतेने आलेला पाहून धाकटा भाऊ आनंदाने प्रफुल्लित झाला, 'अहाहा!  पंधरा वर्षांनी आज मोठा भाऊ घरी आला आहे.  त्याचा घसा प्रेमाने गदगद झाला होता, मनातली जळमटे कधीच गळून पडली होती. तो काहीच बोलू शकत नव्हता.  सेठजींनी फळे आणि मिठाई टेबलावर ठेवली आणि हात जोडून धाकट्या भावाला म्हणाले: - "भाऊ! आतापर्यंत माझ्याकडून खुप चूक झाली, मला माफ कर."

     मोठ्या भावाच्या मुखातून "क्षमा" हा शब्द बाहेर पडताच धाकट्याच्या मनातील प्रेम अश्रूंवाटे ओसंडून वाहू लागले. धाकट्याने शेठचे पाय धरले. आपल्या चुकीची क्षमा मागून रडू लागला. मोठ्या भावाचे प्रेमाश्रु धाकट्या भावाच्या पाठीवर पडत होते आणि धाकटा भावाचे पश्चातापयुक्त प्रेमळ अश्रू मोठ्या भावाच्या पायावर पडू लागले.

      क्षमा आणि प्रेमाचा अथांग महासागराचा बांध फुटला होता. घरातले इतर सगळे शांत, व गप्प, सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. लहान भावाने उठून पैसे आणून मोठ्या भावासमोर ठेवले.  थोरला भाऊ म्हणाला, "भाऊ! मी आज हे पैसे मागायला आलो नाही. मी माझी चूक दूरूस्त करायला आलो आहे, माझ्या निर्जीव साधनेला जिवंत करायला आलो आहे, आपल्यातला द्वेष नष्ट करायला आलो आहे आणि बंधु प्रेमाची गंगा पुन्हा पहिल्यासारखी अखंड प्रवाहित व्हावी यासाठी आपल्यातल्या भांडणरूपी बांध फोडायला आलो आहे.

पंधरा वर्षात पहिल्यांदा मला इतके समाधान झाले आहे. माझे तुझ्या घरी येणे यशस्वी झाले, माझे दुःख पुर्ण नाहीसे झाले. आता मला खुप आनंद वाटत आहे."

     धाकटा भाऊ म्हणाला:- "दादा! हे पैसे घेईपर्यंत माझ्या मनातील पश्चात्तापाची अग्नी शांत होणार नाही. मला खूप लाजिरवाणे वाटेल, म्हणून हे पैसे घे. नाहीतर मी स्वतःला माफ करू शकणार नाही."

      सेठजींनी धाकट्या भावाकडून पैसे घेतले आणि त्यांच्या इच्छेनुसार भावजयै, पुतण्या आणि भाचीमध्ये वाटून दिले. नंतर सर्वजण गाडीत बसले, आणि मोठ्या भावासोबत त्याच्या घरी पोहोचले. पंधरा वर्षांनंतर, त्या संध्याकाळी जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र आले प्रेमाने एकमेकांना भेटले, तेव्हा असे वाटले की जणू फक्त प्रेमच प्रत्यक्ष मूर्ती धारण करून तिथे पोहोचले आहे.

        संपूर्ण कुटुंब प्रेमाच्या अथांग सागरात न्हाऊन निघाले होते. सर्वांनी एकमेकांची माफी मागितली. जेवणाच्या वेळी सर्वांनी एकमेकांना प्रेमाने मिष्टान्न भरवले. पुन्हा पहिल्यासारखे एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. लहान भावाची "माफी" मागितल्यावर त्या सेठजींच्या मनातले दु:ख, चिंता, तणाव, भीती, निराशा असे मानसिक रोग मुळापासून नाहीसे झाले आणि परमेश्वर साधना पुनर्जीवित झाली. पुन्हा साधनेत मन लागू लागले, स्मरण साधू लागले. 

म्हणून मित्रांनो या घटनेचे तात्पर्य असे की, एकमेकांमधला द्वेष विसरून सदैव आनंदित राहण्याचा प्रयत्न करा. जमीन इस्टेट प्रॉपर्टी हे काहीच सोबत येणार नाहीये. आपले प्रेमाचे वर्तन आणि चांगले कर्म हेच जिवाच्या बरोबर येतात. आणि या संपत्तीमुळे होणारे भांडणही आपल्याला सांप्रत सुखाने जगू देत नाही. आणि मेल्यानंतरही नरकाचे साधन बनते. 


  जे मिळाले आहे ते पुरेसे आहे. 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post