विद्वत् दुर्जनांच्या लांब रहावे नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

विद्वत् दुर्जनांच्या लांब रहावे नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

 24-4-2022 

दुर्जन मनुष्य विद्वान असला तरी त्याच्यापासून लांब राहावे.

नीतिशतकम् - neeti-shatak subhashits 

भर्तृहरी संस्कृत श्लोक 

दुर्जनः परिहर्तव्यो विद्ययालंकृतोऽपि सन् । 

मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयंकरः ॥


मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित

छंद :- वसंततिलका

विद्यासमन्वितहि दुष्ट परित्यजावा। 

त्याशीं बुधे न सहवास कधी करावा ॥ 

ज्याच्या असे विमलही मणि उत्तमांगीं। 

तो सर्प काय न घडे खल अंतरंगीं ॥


मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे 

छंद :- अनुष्टुभ 

विद्याभूषित ऐसाही टाळावा नित्य दुर्जन । 

मस्तकीं रत्न ज्याच्या, तो सर्प भीतिद काय न ॥ 

गद्यार्थ- दुर्जन हा विधेनें मंडित असला, तरी त्याची संगति टाळावी. ज्याच्या मस्तकीं रत्न असतें असाही सर्प काय भयंकर नव्हे. 

विस्तृत अर्थ :- दुर्जनास (तो) विद्येने अलंकृत असला तरी दूर सारावे. रत्नाने युक्त असला म्हणून काय साप भयंकर नसतो का?

दुष्टत्व हे कायम त्याज्यच आहे. अगदी तो दुर्गुणी विविध अन्य गुणांनी संपन्न असला, तरीही तो स्वीकार्ह ठरतच नाही, हेच प्रस्तुत सुभाषितातून महाकवी भर्तृहरींनी सुस्पष्ट रीत्या प्रतिपादन केले आहे.

अनेकदा दुष्टाच्याही ठिकाणी अनेक गुण असतातच की. अगदी उदाहरणेच द्यायची तर रावण केवढा विद्वान होता? कंस केवढा पराक्रमी होता? दुर्योधन केवढा शूर होता? अफजल खान केवढ्या सेनेचा नायक होता? या सगळ्यांच्याच जवळ काहीना काही गुण तर होतेच ना? पण तरीही ते वध्यच होते. कारण, या सगळ्या गुणांनी युक्त असले तरी ते दुष्ट होते.

रावण केवढाही विद्वान असो. देवी सीतेवर वाईट नजर ठेवण्याइतपत अध:पतित होता. स्वत: केवढाही थोर भक्त असू द्यात, शिवोपासक असू द्यात. इतरांच्या उपासनेकरिता, ऋषी मुनींच्या साधनेकरिता समस्यारूप होता. त्यामुळे त्याच्या गुणांकडे पाहत दुर्गुणांना विसरणे शक्य नसते. तो वध्यच असतो.

आपल्याकरिता रावण वध संभव नसले तरी रावण-त्याग तर संभव आहेच ना? याकरिताच कवींनी 'परिहर्तव्यो' शब्द योजिला. मारावा नाही, तर दूर सारावा, टाळावा, असा त्याचा अर्थ. हे सहज करता येण्यासारखे आहे ना?

असा त्याचा त्याग करताना त्याच्या हानिकारकत्वालाच प्राधान्य असावे. त्याच्या गुणांची भुरळ पडू नये, याकरिता महाकवु भर्तृहरींनी नागाचा दृष्टान्त दिला. डोक्यावर नागमणी असला म्हणून काय सर्प संग्राह्य थोडाच ठरतो. जवळ थोडाच केला जातो?

म्हणून दुर्जन मनुष्य विद्वान असला तरी त्याच्या लांब राहावे तो कधी आपला घात करील हे सांगता येत नाही. कारण दुर्जन हा सज्जनांच्या प्रत्येक गुणाची निंदा करतो. त्याला सज्जनांचे गुण सहन होत नाहीत. पाचही पांडव सद्गुणी होते पण दुर्योधन त्यांच्या प्रत्येक गुणाचे दोष करायचा आणि निंदा करायचा त्यांच्याशी द्रोहाने वागायचा.

दुर्जन मनुष्य सज्जनांच्या गुणांचे दोष कसे करतो ते पुढील श्लोकात कवी सांगत आहेत-  

मुळ संस्कृत श्लोक :- भर्तृहरी 

जाड्यं ह्रीमति गण्यते व्रतरूचौ दम्भः शुचौ कैतवं। 

शूरे निर्घृणता मुनौ विमतिता दैन्यं प्रियालापिनि॥ 

तेजस्विन्यवलिप्तता मुखरता वक्तर्यशक्तिः स्थिरे तत् 

को नाम गुणो भवेत् सुगुणिनां यो दुर्जनैनङ्कितः ॥


मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित

छंद :- शार्दूलविक्रीडित

लज्जेनें जड; दांभिक प्रतिपणें; कापट्य शौचें गणी,

 शौर्ये निर्दय, भार्जवें लुडबुड्या, कीं दीन सद्भाषणीं ॥ 

मानेच्छा तरि मूर्ख; की बडबड्या वक्ता, निकामी भला,

ऐसा तो गुण कोणता खलजनीं नाहींच जो निंदिला ॥


मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे 

छंद :- शार्दूलविक्रीडित

लज्जा मांद्य, व्रतस्थ दांभिक, ठरे पावित्र्य कापट्य ते

शूर क्रूर, मुनी विमूढ, मधुरा वाणी ठरे दैन्यसें ॥ 

वक्ता जल्पक धीर, दुर्बळ ठरे; तेजस्वि गर्वी ठरे, 

दुष्टानिंदित कोणता गुण गुणी लोकांतला सांग रे ॥


गद्यार्थ- ( दुष्ट हे सर्वच गुणांची निंदा करतात; ) गुणी लोकांतला असा कोणता गुण आहे, कीं, ज्याची दुष्टांनीं ( आजवर ) निंदा केलेली नाहीं लज्जेला ते जडत्व म्हणणार! व्रताला ढोंग ! पावित्र्याला कपट ! शौर्याला क्रौर्य! मुनिव्रताला वेडगळपणा ! प्रियभाषणाला लाचारी | स्वाभिमानाला गर्व । बोलक्याला बडबड्या ! धिमेपणाला दुर्बलता | म्हणणार (प्रत्येक सद्गुणाला वाईट नांव आहेच. )

विस्तृत अर्थ - शालीनतेला मंदत्व, व्रताचरणास भोंदूपणा, शुद्धतेस लबाडी, शौर्यास निर्दयता, मौनास बुद्धपणा, मधुर भाषणास लाचारी, बाणेदारपणास असामाजिकता, वक्तृत्वास तोंडाळपणा, गंभीरतेस दुबळेपणा समजले जाते. मग सज्जनांचा असा कोणता गुण आहे ज्याला दुष्टांनी नावे ठेवलेली नाहीत?

स्वत: काहीही न करता कुणी काही करत असेल, तर त्यात उणिवा शोधणे व त्याला नावे ठेवत राहणे हा दुर्जनांचा एकसूत्री कार्यक्रम असतो. अशा या दुष्टांच्या लेखी सज्जनांचे सर्वच गुण, या दुष्टांची स्वतःचीच दृष्टी विकृत असल्यामुळे, वाईट रूपातच दिसतात. मग ते या सद्गुणांनाही विपरीत रीत्या दुर्गुणरूपातच प्रस्थापित करू पाहतात.

कुणी सज्जन, शालीन असेल, लज्जासंपन्न असेल, तर ते त्याला मंद म्हणून मोकळे होतात. व्रताचरणात असेल तर सोंग करतो नुसते, असे म्हणतात. शुद्धतेची आवड असेल तर लबाड अर्थात दाखविण्याकरिता शुद्धता पाळतो, असे म्हणतात. पराक्रमी व्यक्तीचे शौर्य अशांच्या लेखी क्रौर्य असते, निर्दयता असते, तर मौनाला ते अज्ञानाचाच परिणाम म्हणतात.

स्वाभिमानाने उगाच कुणात मिसळत नसेल, तर त्याला असामाजिक, तुसडा, गर्विष्ठ म्हटले जाते; तर वक्तृत्वास बाष्कळपणा. गंभीर असेल, स्थितप्रज्ञ असेल तर त्यास दुबळा ठरविले जाते.

सोप्या शब्दांत काय? तर सज्जनांच्या समस्त गुणांना दुष्टांनी कलंकित करण्याचे व्रतच घेतले आहे. फक्त प्रश्न हाच आहे की, अशांच्या मताला किंमत ती किती द्यायची? समीक्षेची यांची पात्रता  काय? यांचे कर्तृत्व काय? 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post