भाग 2 यमपुरीतील नरक यातना वर्णन Part 02 Description of hell torture in Yampuri

भाग 2 यमपुरीतील नरक यातना वर्णन Part 02 Description of hell torture in Yampuri

 दिनांक :- 23-4-2022 

भाग 02 यमपुरीतील नरक यातना वर्णन 

Part 02 Description of hell torture in Yampuri 

कर्मरहाटीतील परमेश्वराचा अनन्य भक्त नाही, किंवा परमेश्वराचे ज्ञान असूनही जो परमेश्वराची अनन्य भक्ती करीत नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यावर तो परमेश्वराला प्राप्त होत नाही अर्थातच त्याला यमपुरीत नेले जाते. यमपुरी नेताना तो रस्ता कसा असतो? चालताना त्या जीवाला काय त्रास होतो याचे वर्णन शास्त्रांमध्ये आलेले आहे. ते वर्णन आपण या लेखात पाहणार आहोत.

यमपुरीत जीवाला इतके भयानक दुःख भोगले जाते की, आपण ते वर्णन ऐकले तरी आपल्या अंगावर काटा उभा राहील. यमपुरीत जीवाला एक विशिष्ट प्रकारचे देह दिले जाते. त्या देहा धारे जीवाला असंख्य प्रकारचे दुःख भोगवले जाते त्यालाच यातना देह असे म्हटलेले आहे. आपल्या सामान्य देहात असताना देह खंडले किंवा तुटले तर आत्मा निघून जातो. तसे त्या यातनादेहाचे नाही. ते तुटले फुटले अग्नीत जाळून टाकले तरी त्यातून आत्मा बाहेर येत नाही. यमदूत त्या देहाला पूर्ववत करून टाकतात.  

यमदूत जीवाला नरकाच्या रस्त्याने घेऊन जातात त्या रस्त्यावर कुठल्याही वृक्षाची सावली नाही. उन्हातून चालताना त्या जीवाला खूप त्रास होतो. जणूकाही बाराही आदित्य (सूर्य) त्याच्यावरच तपतात अशाप्रकारचे दुःख त्याला होते. त्या यमपुरीच्या रस्त्यावर अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही तहानेने भुकेने तो जीव व्याकूळ होऊन जातो. त्या यमपुरी चा रस्त्याने घेऊन जाताना त्याला पायात खिळ्यासारखे काटे टोचतात. त्या भयंकर वेदना सहन केल्यावाचून त्याच्याकडे काही पर्याय नसतो. 

रस्त्याने जाताना महाभयानक सर्प त्याच्या सर्वांगाला दंश करत असतात. कावळे त्याच्या डोक्यावर बसून त्याच्या डोळ्यांना टोच मारून इजा करतात. मध्येच महाभयानक कुत्रे अंगावर येऊन चावा घेतात, विंचू चावतात. वाघ-सिंह इत्यादी हिंस्र पशु झडप घालून त्याचे मांस तोडतात. पण ते यातना देह पुन्हा जसेच्या तसे होऊन जाते. हे सर्व सांयोगिक दुःख भोगत असताना जीवाला खूप त्रास होतो, भयंकर यातना होतात. 

यमपुरीत जीवाला अशी पत्र नावाचे महाभयंकर नरक भोगवली जातात. असि+पत्र = असि म्हणजे तलवार आणि पत्र म्ह. पाने. ज्या झाडाची पाने तलवारीसारखी तीक्ष्ण धारदार आहेत. यमदूत त्याला असीपत्र वृक्षावर फेकून देतात तो तुकडे तुकडे होऊन खाली पडतो. पुन्हा ते देह जोडले जाते पुन्हा भेटतात. हे असे नरक भोगतांना किती महाभयानक यातना होत असतील ते भोगणाराच जाणे. म्हणून या महाभयंकर नरकांपासून वाचण्यासाठी चांगले कर्म करीत राहावे वाईट कर्म करू नये. 

त्या यमपुरीच्या रस्त्यावर चालता चालता मध्येच तो अत्यंत खोल अशा पाणी नसलेल्या अंधाऱ्या विहिरीत पडतो. विहीर अत्यंत खोल असल्यामुळे त्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही. पुन्हा काही वेळाने त्याला तेथून काढले जाते पुन्हा तो त्या काटेरी रस्त्याने चालू लागतो. तो काटेरी रस्ता म्हणजे जणूकाही खिळे चाकू अशी अत्यंत धारदार शस्त्रे त्या रस्त्यावर उर्ध्व केलेली असतात. त्यावरून जीवाला चालवले जाते. अंधकार असल्यामुळे तो ते चुकवूही शकत नाही. 

कधी तो जीवात्मा त्या यातना देहानिशी उष्ण पाण्याच्या खोल डोहात पडतो तर कधी चिखलाच्या डबक्यात पडतो त्या डोक्यातली किडे त्याच्या सर्वांगाला तोडतात चावतात. कधी अचानक त्याच्या सर्वांगावर विस्तवाचा पाऊस पडतो. आणि त्याच्या अंगावर वीजही कोसळते. मोठ्या-मोठ्या पाषाण आणि एवढ्या गारा(बर्फ) पडतात. अशा रक्तबंबाळ झालेल्या त्याच्या देहावर खाऱ्या पाण्याचा पाऊस पडतो त्यामुळे सर्वांगाची लाही लाही होते. परंतु भयंकर आरडाओरडा करणाऱ्या त्या जीवाची हाक ऐकायला तिथे कोणीही नाही. यमदूतांना त्याच्या पापाचे ज्ञान असल्यामुळे त्याची कीव येत नाही.

अर्ध्या रस्त्यावर गेल्यावर तिथे “वैतरणी” नावाची नदी लागते. त्या वैतरणी नदीचे ही वर्णन महाभयंकर आलेले आहे. त्या वैतरणी नदीत पाणी नसून रक्त वाहते. मांस आणि रक्ताचा चिखल असलेल्या त्या नदीच्या काठी हाडांचे ढीग लागलेले असतात ती नदी १०० योजन रुंदीची आहे. असे गरुड पुराणात म्हटले आहे. अशी महाभयानक नदी पार करताना जीवाला असंख्य यातना होतात फार दुःख कष्टाने ती नदी पार केली जाते. 

ती वैतरणी नदी खुप खोल आहे त्या नदीमध्ये मनुष्याचे केस हेच शेवाळ साचलेले असते. त्या नदीमध्ये मोठे मोठे वज्र झाडांचे मगर सुसर आधी प्राणी आहेत. ती नदी पार करताना सुईसारखे मुख असलेले भयानक किडे चहूकडून या जीवावर आघात करतात. त्या नदीमध्ये प्राणभक्षी मासे याच्या शरीराचे मांस तोडून खातात. नदीतून तोंड बाहेर काढले तर वरून वज्रासारखी चोच असणारे गिधाडे, कावळे याच्या डोक्यावर चोचीने आघात करतात. 

त्या रक्ताच्या नदीच्या प्रवाहात वाहत जाणारा जीव रडत ओरडत विलाप करत असतो पण त्या यमदूतांना यत्किंचितही त्याची कीव येत नाही. भुकेने आणि तहानेने व्याकूळ असलेला तो जीव त्या नदीतील अत्यंत उग्र घाणेरडा वास असलेल्या रक्त मांसाचे सेवन करून आपली तहान शमवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची भूक किंवा तहान कमी होत नाही. अशी महाभयंकर ती वैतरणी नदी पाहताच पापी जिवाला धडकी भरते. 

पुढे त्या जीवाला महाभयंकर विषारी सर्प आणि विंचू इंगळी इत्यादी प्राणी असलेल्या नदीतल्याच खड्ड्यात टाकले जाते त्यातून त्याला काढणारा कोणीही नाही. त्याचे रक्षण करणारा कोणीही नाही. त्या नदीचा पैलतीर या जीवाला दिसत नाही. मनुष्यदेह आत जाणे खूप पापे केलेली आहेत लोकांना नाडले, फसवले, त्यांचे अंतःकरण दुखावले अशा जिवांना या नदीमध्ये टाकले जाते.

या यातना देह दिलेल्या जीवाला रस्त्याने यमदूत ओढत घेऊन जातात. काहींच्या नाकात बैलासारखे वेसण घालून, नाकात दोरी टाकून ओढले जाते. काहींना पाठीत धारदार शस्त्र घालून ओढले जाते. काहींना कानात सिद्ध करून दोरीवरून ओढले जाते. काहींना अंकुश नावाच्या शास्त्रात फसवून नेले जाते. जीवाने मनुष्यदेह हात केलेल्या पापानुसार वेगवेगळ्या प्रकारचे दुःख भोगले जाते. 

काही पापी जीवांना फार मोठी वजनदार लोखंडाची साखळीने जखडून त्याला चालायला लावतात. त्या एवढ्या मोठ्या लोखंडी साखळीचे वजन घेऊन तो जीव कुंथत आरडाओरडा करत चालत असतो. तो थांबला की यमदूत मुद्गलांनी त्याच्या डोक्यावर हाणतात. यमदूतांनी मुद्गलाने त्याला हाणले कि तो रक्ताची उलटी करतो. पुन्हा तेच रक्त त्याला पाजले जाते. असे महाभयंकर दुःख तिथे भोगवले जाते.

अशाप्रकारे आपल्या दुष्कर्मांना आठवून आठवून तो प्राणी अत्यंत दुःखी होऊन यमलोकात पोहोचतो. असा दुःखाने ग्रसित मंदबुद्धी जीव आपल्या पुत्राला बापाला नातवाला हाका मारतो. त्याला एवढेही कळत नाही की यमपुरीत त्याला वाचवायला ते येणार आहेत का? पुढे तो आपल्या दुष्कर्मांची आठवण करतो. मनुष्यदेहात असून “मी दान केले नाही, परमेश्वराची अनन्य भक्ती केली नाही, साधू-संतांचे भजन पूजन केले नाही, हे मी काय केले? मी स्वार्थासाठी अनेकांचे अंतःकरण दुखावले, अनेकांना फसवले, नाडले, अनेकांच्या असहायतेचा फायदा घेतला” असा पश्चाताप करीत असतो. पण पश्चातापा व्यतिरिक्त काहीही करण्याची त्याची क्षमता नाही हेही त्याला कळते आणि आता पश्चाताप करून उपयोगही नाही हेही कळते. 

हे सर्व नरक चुकवण्यासाठी फक्त एकच उपाय तो म्हणजे परब्रम्ह परमेश्वराचीच अनन्य भक्ती. याशिवाय आणखी दुसरा उपाय नाही. देवता भक्ती कितीही केली कितीही वेळा केली तरी या नरकांपासून मुक्ती होणे नाही.

पुढे यमपुरी गेल्यावर त्याला कशा प्रकारचे दुःख भोगले जाते याचे वर्णन आपण तिसऱ्या भागात पाहणार आहोत. 

यमपुरीतील नरक यातना भाग 01 वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/04/grief-at-death.html


आपल्या प्रतिक्रिया नक्की खाली कमेंट करून कळवा. 

दंडवत प्रणाम







Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post