कालचक्रात कुणीही बदल करू शकत नाही
अध्यात्म कथा - आपला मृत्यु चुकवण्याचा असफल प्रयत्न.
एक अत्यंत जाणकार विद्वान पंडित होता. लहानपणापासून मुका आणि एका पायाने अपंग असलेल्या एका जवळच्या बालपणीच्या मित्राला भेटण्यासाठी तो पंडित दुसऱ्या गावी निघाला होता. त्या मित्राचं गाव खूप दूर होतं आणि वाटेत अजून बरीच छोटी-मोठी गावं लागणार होती.
पंडित आपल्याच नादात रस्त्याने चालत जात होता. अचानक त्याला वाटेत एक माणूस दिसला, जो दिसायला आडदांड आणि खूप मजबूत देहयष्टीचा होता, तो मनुष्य ही त्या पंडिताच्या बरोबर मौन राहून चालू लागला.
पंडिताने विचार केला की, “चला बरंय जाऊया एकत्र, सोबत सांगाती असला की, लवकरच मार्गक्रमण होईल. कंटाळाही येणार नाही. मग क्षणानंतर पंडितानेच स्वतःहून बोलण्यास सुरूवात करत त्या माणसाला त्याचे नाव विचारले. तेव्हा त्या माणसाने त्याचे नाव “महाकाल” असे सांगितले.
पंडिताला हे अमानविय नाव फारच विचित्र वाटले, पण त्याला त्या पथिकाच्या नावाबद्दल अधिक काही विचारणे योग्य वाटले नाही. चालता चालता वाटेत एक गाव आले दोघेही सावकाश चालत राहिले. गावात शिरल्यावर महाकाल पंडिताला म्हणाला- “पंडित जी तुम्ही पुढे जा, मला या गावाला काही काम आहे, मी तुम्हाला पुढे पुन्हा भेटेन.”
"ठीक आहे," असे म्हणत पंडित पुढे निघाला. गाव पुर्ण ओलांडे पर्यंत पंडितजींच्या कानावर अशी बातमी आली की, “एका म्हशीने एका माणसाला शिंगे खूपसून मारले” आणि बातमी ऐकेपर्यंत लगेचच महाकाल परत जलदगतीने पंडिताकडे पोहोचला. पंडिताला आश्चर्य वाटले की 'हा एवढ्या लवकर कसा काय आला?' पण पंडित उगाच राहिला.
पुढे वाटेत दोघेही एका गावाबाहेर पोहोचले. सायंकाळ झाली होती. तिथे एक छोटेसे मंदिर होते. त्या देवळात राहण्याची व्यवस्था चांगली वाटली आणि पंडिताच्या मित्राचे गाव अजून दूर होते आणि रात्र होणारच होती, म्हणून पंडित महाकालाला म्हणाला - “रात्र होणार आहे. अख्खा दिवस चालता चालता निघून गेला, मला खुप थकवा आला आहे, म्हणून आज रात्री या मंदिरातच थांबूया. भूकही लागली आहे, म्हणून आपण जेवण करून घेऊ आणि रात्री इथेच पाठ टेकून विश्रांती घेऊन सकाळी पुन्हा निघू” *
महाकाल उत्तरला - “ठीक आहे, पण मला या गावात काही वस्तू द्यायची आहे, म्हणून मी गावात जाऊन येतो, तो पर्यंत तुम्ही जेवण करा, मी आल्यावर जेवण करीन”
आणि असे बोलून तो निघून गेला. पण काही वेळाने त्या गावातून धूर निघू लागला आणि हळूहळू संपूर्ण गाव आगीने पेटले. पंडित आश्चर्यचकित झाले. त्याने मनाशी विचार केला की, हा महाकाल जिथे जातो तिथे काही ना काही लोकांचे नुकसानच का होत आहे? काहीतरी गडबड नक्कीच आहे.
महाकाल परत आला पण पंडिताने महाकालाजवळ रात्रीची वेळ आहे म्हणून याबाबत अजिबात विषय काढला नाही. सकाळी दोघेही लवकर उठले व प्रातर्विधी उरकून पुन्हा आपल्या ईप्सित स्थळाच्या दिशेने चालू लागले. काही वेळाने दुसरे गाव आले आणि महाकाल पुन्हा पंडितांना म्हणाला की-
“पंडित जी… तुम्ही पुढे जा. मला याही गावात काही काम-काज आहे, म्हणून मी गावात जातो, तुम्हाला पुढे वाटेत पुढे गाठतो.”
असे म्हणून महाकाल निघाला. पण यावेळी पंडित पुढे न जाता तिथेच उभा राहिला आणि हा महाकाल कुठे जातो आणि गावात जाऊन काय करतो? हे पाहण्यासाठी महाकालाचा पाठीमागे निघाला. पण महाकालाची गती जलद होती पंडित त्याचा पुरेसा पाठलाग करू शकला नाही गावातील लोकांचे ओरडणे ऐकू आले की, “एका माणसाला साप चावला आणि तो मरण पावला.”
त्याचवेळी महाकाल पुन्हा पंडिताकडे पोहोचला. पण यावेळी पंडिताला ते सहन झाले नाही. त्याने महाकालाला विचारलेच की, “भाऊ तुम्ही आहात कोण? तुम्ही गावात जिथे जाल तिथे काहीतरी नुकसानच का होते आहे? म्हणून मला सांगा की तुम्ही नेमके कोण आहात?”
महाकालने उत्तर दिले :- “पंडित जी… तुम्ही मला खूप ज्ञानी पंडित वाटलात म्हणूनच मी तुमच्यासोबत मार्गक्रमण करीत आहे, कारण ज्ञानी लोकांचा सहवास नेहमीच चांगला असतो. पण मी कोण आहे हे तुम्हाला अजूनही समजले नाही का?”
पंडित म्हणाले :- “मला समजले आहे, पण काही शंका आहे, म्हणून तुम्हीच स्वतः आपला योग्य परिचय दिलात तर बरं होईल”
महाकालाने उत्तर दिले की - “मी यमदूत आहे आणि यमराजाच्या आज्ञेने ज्यांचे आयुष्य पूर्ण झाले आहे त्यांचा प्राण मी हरण करतो.”
पंडिताच्या मनात आधीच अशीच शंका होती. तरीही महाकालच्या तोंडून त्याचा परिचय ऐकून पंडित थोडा घाबरला, पण मग त्याने धाडस करून विचारले- “जर हे सत्य आहे आणि तुम्ही खरोखरच यमदूत आहात तर मग सांगा पुढे कोणाचा मृत्यू होणार आहे?”
यमदुताने उत्तर दिले की, “पुढचा मृत्यू तुमच्या मित्राचा आहे, ज्याला तुम्ही भेटायला जात आहात आणि त्याच्या मृत्यूचे कारणही तुम्हीच बनणार आहात.”
हे ऐकून पंडित स्तब्ध झाला आणि अत्यंत निराश झाला आणि मनात विचार करू लागला की, 'हा महाकाल जर खरंच यमदूत असेल याचे म्हणणे बरोबरच असेल आणि माझा बालपणीचा मित्र माझ्यामुळे मरण पावेल. त्याच्या मृत्यूचे कारण मी बनेल यापेक्षातर मित्राला भेटायला न गेलेले बरे!! निदान मी त्याच्या मृत्यूचे कारण तरी होणार नाही.'
तेव्हा महाकाल म्हणाला- “पंडित जी! मला पण माहित आहे तुम्ही काय विचार करत आहात, पण तुमचा मित्राला भेटायला न जाण्याचा विचाराने त्याचे नशिब बदलणार नाही. तुमच्या मित्राचा मृत्यू निश्चित आहे आणि येत्या काही क्षणातच त्याचा मृत्यू होईल.”
महाकालच्या तोंडून हे ऐकून पंडिताला धक्काच बसला कारण महाकालने त्याच्या मनातले विचार जाणले होते, असा मनकवडीपणा सामान्य माणसाला शक्य नव्हता. परिणामी, पंडिताला खात्री पटली की महाकाल खरोखरच यमदूत आहे. आपल्या मित्राच्या मृत्यूचे कारण आपण बनू नये म्हणून तो ताबडतोब मागे वळला आणि पुन्हा आपल्या गावी परतला.
पण तो वळताच त्याला त्याचा मित्र घाईघाईने त्याच्याकडे येताना दिसला, तो पंडिताला पाहून खूप खुश झाला. आपल्या मित्राचा येण्याचा वेग पाहून पंडिताच्या लक्षात आले की, आपला मित्र कितीतरी वेळ आपला पाठलाग करत आहे, पण तो लहानपणापासून मुका आणि एका पायाने अपंग असल्यामुळे पंडितापर्यंत पोहोचू शकला नाही, आणि हाक मारून पंडिताला थांबवूही शकला नाही. कारण तू मुका होता.
पण मित्र पंडितजवळ पोहोचताच अचानक काय झाले, काय माहित ते पंडितालाही कळले नाही आणि त्या मित्राचा मृत्यू झाला. पंडिताने आश्चर्यचकित नजरेने महाकालकडे पाहिले, जणूकाही तो दृष्टीनेच महाकाला विचारत होता की आपल्या मित्राला काय झाले?
महाकालला पंडिताच्या मनातली घालमेल समजली आणि महाकाल म्हणाला-
“पंडित जी, तुमचा मित्र या आधी गावा पासूनच तुमच्या पाठीमागे लागला होता, पण तो अपंग आणि मुका असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, आणि तुम्हाला हा कधीही मारू शकला नाही हे तुम्हाला समजलेच असेल. त्याने आपल्या सर्व शक्तीनिशी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण म्हाताऱ्या शरीरात तरुणपणाची ताकद नसते, म्हणून अति थकव्यामुळे तुमच्या मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि त्याचे कारण तुम्हीच आहात कारण तो फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या शारीरिक क्षमतेची मर्यादा ओलांडून तुमच्या मागे धावत होता आणि म्हणून तो मरण पावला.”
आता पंडिताची पूर्ण खात्री झाली होती की महाकाल हा खरोखरच यमदूत आहे आणि प्राणिमात्रांचे प्राण घेणे हेच त्याचे काम आहे. पंडित शास्त्र जाणकार ज्ञानी असल्याने त्याला हे माहीत होते की, मृत्यूवर कोणीही नियंत्रण ठेवू शकत नाही आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचेच आहे. हे माहीत असल्याने त्यांनी लवकरच सावरला.
पण अनेकदा त्यांच्या मनात स्वतःच्या मृत्यूबद्दल उत्सुकता होतीच. म्हणूनच त्याने महाकालाला विचारले- “जर माझा मित्र अशाप्रकारे मरणारच होता, तर मग तुम्ही पहिल्यापासून माझ्यासोबत का चालत होते?”
यावर महाकालाने उत्तर दिले - “मी सर्वांसोबतच चालतो आणि प्रत्येक क्षणी बरोबरीने फिरत असतो, फक्त लोक मला ओळखत नाहीत, आणि ओळखण्याचा प्रयत्नही करीत नाहीत कारण लोकांना त्यांच्या सांसारिक समस्यांव्यतिरिक्त, आणि विषयभोगांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या किंवा घटनेच्या संदर्भात विचार करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी, किंवा समजून घेण्यास वेळच नाही. सर्व या संसारीक माहित भ्रमित झालेले आहेत म्हणून मला कोणीही ओळखत नाही, जाणत नाही, नाही मी सर्वकाळ बरोबरच आहे”
पंडितांनी पुढे विचारले- “तुम्ही यमदूत आहात आणि मला माझ्या मृत्यूबद्दल ही उत्सुकता आहे माझा मृत्यू कधी होणार आहे आणि कशा प्रकारे होणार आहे हे तुम्ही सांगू शकाल काय?”
महाकाल म्हणाला- “पंडित जी कोणत्याही सामान्य मनुष्याला, प्राण्याला 'आपला मृत्यु कधी होणार आहे' हे माहित असणे योग्य नाही, कारण मनुष्याला जर आपल्या मृत्यूची वेळ कळली तर तो सदैव दुःखातच राहील, त्या भविष्य ज्ञानाचा त्याला त्रास होईल म्हणून आम्ही कुणालाही त्याच्या मृत्यूबद्दल सांगत नाही,
परंतु तुम्ही एक ज्ञानी व्यक्ती आहात शास्त्र जाणते आहात आणि तुमच्या मित्राचा मृत्यू तुम्ही सहजपणे स्वीकारला आणि लवकरच त्यातून सावरला म्हणून तुम्हाला तुमच्या मृत्यूची वेळ कळल्यावर तुम्ही अस्वस्थ होणार नाही, दुःख होणार नाही असे वाटते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. 'आजपासून बरोब्बर सहा महिन्यांनी तुमचा मृत्यू होईल, आणि याच दिवशी दुसऱ्या राज्यात तुम्हाला फासावर लटकवले जाईल आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः आनंदाने ती फाशी स्वीकाराल.” असे बोलून महाकाल निघून जाऊ लागला कारण आता त्याला पंडितासोबत राहण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.
पंडिताने शक्य तितक्या लवकर आपल्या मित्राचा अंतिम संस्कार केला. सर्व विधी केले आणि पुन्हा आपल्या गावी परतला. पण माणूस कितीही जाणकार असला, तरी त्याच्या मृत्यूची वेळ कळल्यावर त्याला काहीना काही दु:ख तर होणारच आणि तो मृत्यू टाळण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोच, पंडितानेही तसेच केले.
पंडित हा विद्वान असल्याने त्याची कीर्ती त्याच्या राज्याच्या राजापर्यंत पोहोचली होती. त्याला वाटले की राजदरबारात अनेक जाणकार मंत्री आहेत, ते आपल्या मृत्यूशी संबंधित समस्येवर काहीतरी उपाय शोधतीलच. असा विचार करून तो पंडित राजाच्या दरबारात पोहोचला आणि त्याने राजाला सर्व घडलेली हकीकत सांगितली.
राजाने पंडिताची समस्या आपल्या मंत्र्यांना सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला. शेवटी सर्वांच्या सल्ल्याने असे ठरले की, ज“र पंडिताचे म्हणणे खरे असेल तर तो ६ महिन्यांनी नक्कीच मरेल, पण याचा मृत्यू दुसऱ्या राज्यात गेल्यावर होईल. असे विधी विधान आहे पण जर तो इतर कोणत्याही राज्यात गेला नाही तर त्याचा मृत्यू होणारच नाही. म्हणून पंडिताने राज्यातच रहावे बाहेर जाऊ नये.”
राजालाही हा सल्ला योग्य वाटला म्हणून त्याने पंडिताची राजवाड्यात राहण्याची योग्य व्यवस्था केली. आता राजाच्या परवानगीशिवाय त्या पंडिताला कोणीही भेटू शकत नव्हते, पण पंडित स्वतःही कुठेही ये-जा करू शकत होता जेणेकरून त्याला आपण राजाच्या बंदिवासात आहोत असे वाटू नये. तरी पण तू घाबरून भीतीने राजवाडा सोडून कुठेही जात नव्हता. मृत्यूच्या भयाने चांगल्या चांगल्यांचे ज्ञान मावळते.
दिवसामागून दिवस जाऊ लागले. काळ कुणासाठीही थांबत नाही. हळूहळू पंडितांच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली आणि शेवटी तो दिवसही आला जेव्हा पंडितांचा मृत्यू होणार होता. म्हणून पंडितही मृत्यूच्या आदल्या रात्री घाबरून घाईघाईने जेवण करून झोपला, जेणेकरून शक्य तितक्या लवकर ती रात्र आणि दुसरा दिवस निघून जाईल आणि त्याचा मृत्यू टळला जाईल.
पण पंडिताला झोपेत चालण्याचा आजार होता आणि त्याला स्वतःलाही या आजाराची माहिती नव्हती, त्यामुळे त्याने आजाराचा उल्लेख राजा किंवा इतर कोणाकडे करण्याचा किंवा झोपेत चालण्याच्या आजारावर वैद्याकडून उपचार करून घेण्याचा प्रश्नच नव्हता.
खूप दिवसांपासून पंडित आपल्या मृत्यूमुळे खूप चिंतेत असल्याने त्याची पुरेशी झोप होत नव्हती आणि झोपेत चालण्याच्या आजाराचा झटका नीट झोप न आल्यानेच येतो, त्यामुळे त्याच रात्री पंडिताला झोपेत चालण्याचा झटका आला आणि तो उठून झोपेतच त्याच्या खोलीतून बाहेर पडला.
राजवाड्यातून बाहेर पडल्यावर तो घोड्यांच्या तबल्यात आला. तो राजाचा खास पाहुणा असल्यामुळे त्याला कोणीही सुरक्षा-रक्षकांनी अडवले नाही किंवा कसलीही चौकशी केली नाही. तबेल्याजवळ पोहोचल्यावर तो झोपेतच राजाच्या सर्वात वेगवान घोड्यावर स्वार झाला आणि झोपेच्या बेधुंद अवस्थेत राज्याच्या सीमेबाहेर पडला. दुसऱ्या राज्याच्या सीमेवर गेला. एवढंच नाही तर तो दुसऱ्या राज्याच्या राजाच्या महालात पोहोचला आणि योगायोग असा की त्या महालात सुद्धा रात्रीच्या शेवटच्या प्रहारच्या वेळी सर्व लोक गाढ झोपेत असल्यामुळे त्याला कोणीही रक्षकाने अडवले नाही किंवा कोणतीही चौकशी केली नाही.
पंडित झोपेतच थेट राजाच्या शयनगृहात गेला. राणीच्या बाजूला जाईन झोपला. राणीच्या एका बाजूला तो दुसर्या राज्याचा राजा झोपला होता तर दुसऱ्या बाजूला पंडित स्वतः झोपला होता. सकाळ झाली तेव्हा राजाला राणीशेजारी पंडित झोपलेला दिसला. राजाला भयंकर राग आला. आणि पंडितांना अटक करण्यात आली.
पंडिताला तर हेच कळत नव्हते की, तो दुसऱ्या राज्यात आणि थेट राजाच्या शयनकक्षात कसा पोहोचला?' पण त्याचे ऐकणारे तिथे कोणीही नव्हते. राजाने पंडिताला राजदरबारात हजर करण्याचा आदेश दिला. काही वेळाने राजाचा दरबार भरला, तिथे राजाने पंडिताला पाहिले आणि ते पाहून तो इतका संतापला की, त्याने पंडिताला त्याच्या या थोर अपराधाबद्दल फाशी देण्याचा हुकुम सोडला.
फाशीची शिक्षा ऐकून पंडित हादरला. त्याला महाकालाचे शब्द आठवले. तरीही धाडस करून त्याने राजाला सांगितले की “महाराज! मी शेजारच्या राज्यातला ब्राह्मण पंडित आहे, मी एका रात्रीत या राज्यात कसा पोहोचलो ते मला माहीत नाही. आणि मी तुमच्या शयनकक्षात कसा शिरलो आणि तुझ्या राज्यातल्या एकाही रक्षकाने मला का अडवले नाही हेही मला माहीत नाही, पण मला माहित आहे की, मी आज मरणार होतो आणि मला फासावर लटकवले जाणार आहे.”
पंडिताचे बोलणे ऐकून राजाला थोडे विचित्रच वाटले. राजाने पंडिताला विचारले. राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना पंडिताने गेल्या ६ महिन्यांची संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाला- “महाराज…माझ्यातच काय, पण कोणत्याही सामान्य माणसात, किंवा तुमच्या राज दरबारी असलेल्या प्रधान सेनापती यांच्यात एवढी हिंमत कशी असेल की तो तुमच्या शयन कक्षात बसून राणी शेजारी निद्रिस्त होईल? हीतल निव्वळ आत्महत्याच ठरेल आणि मी दुसऱ्या राज्यातून या राज्यात आत्महत्या करायला काबरं येणार?”
राजाला पंडिताचे म्हणणे थोडेसे योग्य वाटले, पण राजाला वाटले की कदाचित तो महाकाल आणि त्याचे मृत्यूचे भाकीत, हे सर्व पंडित मृत्यू टाळण्यासाठीच खोटेच सांगत नसेल कशावरून? म्हणूनच तो पंडिताला म्हणाला -“जर तुझे म्हणणे खरे असेल आणि महाकालाने सांगितल्याप्रमाणे आज तुझा मृत्यू दिवस आहे, तर मी तुझ्या मृत्यूचे कारण होणार नाही, परंतु तू खोटे बोलत आहेस तर. आज तुमचा मृत्यू नक्कीच होणार लक्षात ठेव.”
शेजारच्या राज्याचा राजा हा राजाचा मित्र असल्याने त्याने लगेचच काही सैनिकांसह दुसऱ्या राज्याच्या राजाला पत्र पाठवून पंडिताच्या म्हणण्याच्या सत्यतेचा पुरावा मागितला.
संध्याकाळपर्यंत पाठवलेले शिपाई परत आले आणि त्यांनी येऊन सांगितले की - “महाराज… पंडित जे बोलतात ते खरे आहे. दुसऱ्या राज्याच्या राजाने पंडिताला त्याच्या महालात राहण्याची पूर्ण व्यवस्था केली होती आणि गेले ६ महिने हा पंडित राजाचा पाहुणा होता. काल रात्री राजा स्वतः त्याला त्याच्या शयनकक्षात शेवटचा भेटला आणि त्यानंतर तो या राज्यात कसा पोहोचला हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळे त्या राज्याच्या राजाच्या मते पंडिताला फाशीची शिक्षा देणे योग्य नाही.
पण आता राजासमोर एक नवीनच अडचण आली आहे. त्याने घाईघाईने संपूर्ण माहिती नसताना, न्याय निवाळा न करता फाशीची शिक्षा ठोठावली होती, त्यामुळे आता जर पंडिताला फाशी दिली नाही तर राजाच्या आज्ञेचा अवमान होईल आणि राजाने दिलेल्या शिक्षेचा आदर केला तर पंडित विनाकारण मरेल.
राजाने आपल्या इतर मंत्र्यांना ही समस्या सांगितली आणि सर्व मंत्र्यांनी आपापसात चर्चा करून असे सुचवले की- “महाराज… तुम्ही पंडिताला कच्च्या सुताच्या धाग्याने लटकवा. याने तुमच्या वचनाचा सन्मानही राखला जाईल आणि पंडिताचा मृत्यू सुताच्या धाग्याला लटकूनही होणार नाही, त्यामुळे त्याचा जीवही वाचेल.”
राजाला ही कल्पना योग्य वाटली आणि त्याने तसा आदेश दिला. पंडितासाठी सुती धाग्याचा फास तयार करून नियमानुसार पंडिताला फाशी देण्यात आली.
पंडितही मरणार नाही आणि राजाचे म्हणणे खोटे ठरणार नाही याचा सर्वांना आनंद झाला. आणि सुताचा धागा आपल्याला काहीच इजा करणार नाही असा पंडिताचाही विश्वास होता, म्हणून तोही महाकालाने सांगितल्याप्रमाणे आनंदाने फासावर लटकायला तयार झाला.
ठरल्याप्रमाणे पंडिताला फाशी देताच सुताचा धागा तुटला खरा पण तो तुटण्यापूर्वीच त्याने आपले काम केले. त्या सुताच्या धाग्याने पंडिताच्या गळ्यातील नस कापली गेली आणि पंडित वेदनेने विव्हळत जमिनीवर पडला, हृदयाच्या प्रत्येक ठोक्याने त्याच्या घशातून रक्त वाहत होके आणि काही क्षणातच पंडिताचे शरीर पूर्णपणे शांत झाले. व तो मरण पावला.
सर्व लोक विस्मयचकित होऊन पंडिताला मरताना पाहत राहिले. एक कमकुवत धागा कोणाचा जीव घेऊ शकतो यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता, पण घटना घडली होती, नियतीने आपले काम केले होते.
मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य असे की, जे व्हायचे आहे ते होणारच. आपण कितीही खबरदारी घेतली किंवा कितीही उपाय केले, ते टाळण्यासाठी योजना केल्या, तरी पण प्रत्येक घटना आणि त्या घटनेचे संपूर्ण नियोजन हे आधीच ठरलेले असते. आपल्या हातात काहीही नाही, ते आपण थोडेसेही बदलू शकत नाही. म्हणूनच देवाने आपल्याला भविष्य जाणून घेण्याची क्षमता दिलेली नाही, आपण भविष्याविषयी अज्ञान आहोत म्हणूनच आपले जीवन आपण सुखी आनंदाने जगू शकतो जर आपल्याला भविष्य कळले असते तर जगात एकही माणूस सुखी नसता.
यावर उपाय एकच आहे की जिवंत असेपर्यंत जास्तीत जास्त वेळ देवाच्या आराधनेत, अनन्य भक्ती तू जास्त जास्त काळ जाईल असे वेळेचे नियोजन करावे व आपला वेळ सत्कारणी लावावा कारण आपला देव धर्म आपल्यासोबत येणार आहे.