नीतिशतकम् - neeti-shatak subhashits
संस्कृत सुभाषित रसग्रहण
चातकाची याचना आणि मेघाची उदारता
याचते त्रिचतुरः पयः कणांश्चातको जलधरं पिपासया।
सोऽपि पूरयति विश्वमम्भसा हन्त हन्त महतामुदारता ।।
अर्थ :- चातक पक्षी तहानेने व्याकुळ होऊन आकाशाकडे मुख करून जलधरास, मेघास तीन-चार पाण्याच्या थेंबांची याचना करतो. (पण परिणाम स्वरूपात) तो (मेघ) देखील संपूर्ण विश्व जलमय करतो. अहाहा! काय ही मोठ्यांची उदारता.
दानशूरांच्या असीम दातृत्वाचा गौरव करणारे असे हे सुभाषित. चातकाच्या रूपात आशाळभूत याचकाचे वर्णन करीत कवीने दात्यांच्या अलौकिकत्वाचे किती सुंदर शब्दात वर्णन केले आहे.
चातक हा लहानसा चिमणीएवढा पक्षी. त्याची चोच ती केवढी? त्यात पाणी बसणार ते किती? आणि मुळात त्याची तहान ती किती? तो बिचारा तीन-चार थेंबच ' मागतो. त्याची तेवढीच गरज असते आणि तेवढाच आवाकाही. तो तेवढेच मागतो.
पण गंमत पहा. मागणाऱ्याने जरी त्याच्या आवाक्यात मागितले तरी देणारा त्याच्या आवाक्यानुसारच देणार ना? त्यानेही तीन-चारच थेंब दिले असते तर मग काय मजा राहिली असती? देणारा असीम आहे. त्याने इतके दिले की एका चातकाचीच नव्हे तर समस्त जगताची गरज भागविली.
यालाच म्हणतात ईश्वरीय दातृत्व. कुरुक्षेत्रावर पहा ना! एका शंकाग्रस्त अर्जुनाने स्वत:च्या समस्येकरिता प्रश्न केला. पण, देणारे आहेत परब्रह्म परमेश्वर अवतार भगवान श्रीकृष्ण. ते तेवढ्याचपुरते बोलतील तर फायदा काय? अर्जुनरूपी चातकाच्या सादाला भगवद् रूपी जलधराने प्रतिसाद दिला आणि सकळ ब्रह्मांड संतापशामिनी वाक्गंगा प्रसविली. जगताला भगवद्गीता लाभली. त्या ज्ञानमेघाने संपूर्ण अज्ञानाने तापलेल्या सृष्टीला तृप्त केले. मागणाऱ्याचे कल्याण झालेच, इतरांना मागण्याची गरजच संपेल असे मिळाले. याला म्हणतात महानता.
उदारता हा गुण जसा तसा परमेश्वराच्याच ठिकाणी वर्ततो. मूठभर पोहे भेटीला आणणाऱ्या सुदाम्याला त्याबदल्यात श्रीकृष्ण भगवंताने हेमनगरी भेट दिली. अशी उदारता जीव देवतांच्या ठिकाणी नसते.
सहस्त्रार्जुनाने फक्त हात मागितले. पण श्रीदत्तात्रेय प्रभू महाराजांनी त्याला समुद्र वलयांकित पृथ्वीचे राज्य देऊन पुन्हा लोकांचे जाणून मनोरथ पूरवशील असा वर दिला.
परमेश्वराच्या अवतार याला काही सीमाच नाही. तो आपली कृपा जीवांवर सारखी वर्षतच आहे. पण जेव्हा त्या परमेश्वराच्या सन्मुख होत नाही. दृष्टपर संपत्ती इस्टेट भरभराटी व्हावे म्हणून देवतांना साकडे घालतो पण परमेश्वराला शरण जात नाही.