10-4-2022
नीतिशतकम् - neeti-shatak subhashits
संस्कृत सुभाषित रसग्रहण
या ८ गोष्टींचा कमीपणा देखिल शोभून दिसतो
भर्तृहरी संस्कृत श्लोक
छंद :- शिखरिणी
मणि शाणोल्लीढ समरविजयी हेतिदलितो ।
मदक्षीणो नागः शरदि सरिदाश्यानपुलिना ।।
कलाशेषश्चन्द्र सुरतमृदिता बालवनिता ।
तनिम्ना शोभन्ते गलित विभवाश्चार्थिषु नराः ।।
मराठी अनुवाद :- वामनपंडित
छंद :- शार्दूलविक्रीडित
शाणोल्लेख जया असा मणि, रणीं जो वीर घायाळला
संभोगें शिणली अशी नववधू, इस्ती न मस्तावला ॥
ज्यांची स्वच्छ शरद् ऋतूंत पुंलिनें त्या निम्नगा, चंद्रही
"बीजेचा, प्रभु पात्रदत्तधन जो हे शोभती सर्वही ॥
मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे
छंद :- शार्दूलविक्रीडित
पैलू पाडुनि रत्न, वीर विजयी घायाळ युद्धामधीं ।
हत्ती क्षीण मद स्रवून, शरदीं रोडावलेली नदी ॥
चंद्राची उरली कलाहि, सुरतें बाला परिम्लान ती ।
देवोनी धन याचकां नृप, असे हे क्षीणची शोभती ।।
गद्यार्थ– १) पैलूं पाडतांना सहाणेवर घांसून झिजलेले रत्न, २) युद्धांत जखमांमुळे क्षीण झालेला विजयी वीर, ३) मद वाहून वाहून क्षीण झालेला हत्ती, ४) शरद् ऋतूंत वाळवटें थोडी उघडी पडलेली, रोडावलेली नदी, ५) चंद्राची कलाक्षया नंतर उरलेली कोर, ६) सुरतश्रमानें थकलेली बाला, ७) याचकांना धन देऊन गलित विभव झालेला राजा; ८) संयमाने कृश झालेला योगी पुरुष ; या सर्वांना त्यांची क्षीणता हीच त्यांच्या पुष्टीपेक्षां अलंकाराप्रमाणे सुंदर शोभिवंत होते. ("कलाक्षयः श्लाध्यतरो हि वृद्धेः” रघुवंश हे काव्य पहा.)
विस्तारित अर्थ :- सहाणेवर घासून कमी केलेले (पैलू पाडलेले) रत्न, शस्त्राचे प्रहारांनी घायाळ झालेला विजयी वीर, मदोन्मत्ततेमुळे चाल मंदावलेला गजराज, शरद ऋतूत पुळणी कोरड्या पडलेल्या नद्या, एकाच कलेचा (तुकड्याचा) उरलेला चंद्र, रतिक्रीडेत थकून गळून गेलेली नवयुवती, याचकास दान दिल्याने वैभव ओसरलेला पुरुष हे सर्व कृशतेने (कमी झाल्यानेच) अधिक शोभून दिसतात.
जगताचा सामान्य नियम आहे की, वृद्धीत शोभा असते. विकासात वैभव असते. मात्र, येथे महाराज भर्तृहरींनी या सिद्धान्ताच्या पूर्ण विपरीत बाबींची येथे जंत्रीच सादर केली आहे. या सगळ्या अशा बाबी आहेत, ज्या कमतरतेतच शोभून दिसतात. रत्नास पैलू पाडताना रत्न घासून कमी होते. मात्र, त्या घर्षणानेच त्याचे सौंदर्य वृद्धिंगत होते.
युद्धात अनेक वीरांचे शरीर प्रहारांनी क्षतविक्षत होते. मात्र, त्याच्या या खंडिततेतच त्याचे सौंदर्य आहे. हे व्रणच त्याच्या पराक्रमाचे दाखले आहेत. हत्तीला मदमस्तता आली की त्याची गती मर्यादित होते, पण या मर्यादेतच अमर्याद सौंदर्य आहे.
शरद ऋतूत सगळ्या नद्या सुकतात. पण त्यापूर्वी त्यांनी आपल्या विशालधारांनी उभय तटावरील भूमी सुफल केलेली असते.पौर्णिमेस पूर्ण चंद्रात अमृताचा संचय असतो, मग देवता चंद्रातील हे अमृत प्राशन करतात, त्यामुळे तो कमी होतो अशी पौराणिक धारणा आहे. त्यामुळे ही कमतरता दानगत आहे.
रतिक्रीडेनंतरचा थकवा समोरच्यास आनंद दिल्यावर आलेला आहे व दान दिल्यानंतरची गरिबी या सगळ्या बाबी कमतरतेमुळेच सौंदर्यपूर्ण ठरतात.
वैराग्याने देहदमन, मनोदमन, इंद्रियदमन, संयम इत्यादींनी देह कृश केलेला योगी हादेखील अत्यंत शोभून दिसतो. पण कवीने ते लिहिले नाही.