महाभारतातील चमत्कारिक गोष्टी
Mahabharat katha - story
गांधारीची दृष्टी पडताच युधिष्ठिराच्या पायाची नखे काळी झाली
मित्रांनो!! धर्मग्रंथात महाभारताला पाचवा वेद म्हटले आहे. महाभारताची कथा जितकी मोठी आहे तितकीच ती रंजक आहे. महाभारतामध्ये अनेक उपकथानकं आहेत. महाभारताचे लेखक महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास आहेत. या ग्रंथात एकूण एक लाखाच्या वर श्लोक आहेत, म्हणून महाभारताला शतसहस्त्री संहिता असेही म्हणतात.
आत्तापर्यंत आपण महाभारतातील अनेक कथा आणि घटना ऐकल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला महाभारताशी संबंधित आणखी एक घटना सांगत आहोत, १०० कौरवांची आई गांधारीने दृष्टी टाकताच युधिष्ठिराच्या पायाची नखे काळी पडली. हे कसे घडले? कधी घडले? ते आपण पाहुया
महाभारताचे भयंकर युद्ध १८ दिवस चालले. युद्धात लाखो युद्ध महायुद्ध धारातीर्थी पडले. श्रीकृष्ण भगवंताच्या कृपेने पांडवांचा विजय झाला. कौरवांची अकरा अक्षौहिणी सेना नष्ट पावली. कौरव सैन्यातले कृपाचार्य, अश्वत्थामा आणि कृतवर्मा हे तीनच योद्धे जिवंत राहिले.
युद्ध संपल्यानंतर पाचही पांडव आणि सोबत श्रीकृष्ण भगवंत हस्तिनापुराला धृतराष्ट्र आणि गांधारी यांचे सांत्वन करण्याच्या हेतूने भेटायला गेले. त्या वेळी दुर्योधनासोबतच्या गदा युद्धात भीमाने कमरेखाली वार केला व दुर्योधनाचा मृत्यू झाला होता. ते युद्ध नियमांच्या दृष्टीने अन्याय्य होते. परंतू भीमाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली होती म्हणून भगवंतांच्या दृष्टीने तो न्यायच होता.
पण दुर्योधनाच्या अशाप्रकारच्या मृत्युने आणि आपल्या शंभरही पुत्रांच्या मृत्युने गांधारीही संतापली होती. पांडव भीतभीतच गांधारीजवळ आले. गांधारीने रागारागात दुर्योधनाच्या मृत्यूविषयी विचारल्यावर भीमाने गांधारीला सांगितले की, मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली, प्रतिज्ञा पूर्ण करणे हा क्षत्रियाचा धर्मच आहे, आणि जर मी दुर्योधनाला अधर्माने मारले नसते तर त्याने मला मारले असते. तुझ्या दृष्टीमुळे दुर्योधनाचे शरीर वज्रवत् झाले होते. त्यामुळे दुर्योधनाशी युद्ध कोणीही जिंकू शकले नसते.
तेव्हा गांधारी म्हणाली की, तू रणांगणात दुशासनाचे रक्त प्यायलेस, ते न्याय्य होते का? तेव्हा भीम म्हणाला की दुशासनाचे रक्त माझ्या दातांच्या पलीकडे गेले नाही. ज्या वेळी दुशासनाने द्रौपदीचे केस पकडले, त्या वेळी मी अशी प्रतिज्ञा केली होती.
मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली नाही तर मी क्षत्रिय धर्माचे पालन करू शकलो नसतो. आणि तो आमच्याशी जन्मभर धर्मानेच वागला म्हणून त्याच्यासोबत मीही अधर्माचे वर्तन केले. द्रौपदी वस्त्रहरण होत असताना तो पतीबद्दल तुमच्या मुलाने काय काय उदगार काढले हे सर्व तुम्हाला माहीत आहेत.
तुमच्या मुलाला मारल्याशिवाय आम्ही या निष्कंटक पृथ्वीचे राज्य कधीही भोगू शकलो नसतो. तुमच्या मुलाने तर याहीपेक्षा नीच कर्म केले होते भरसभेत द्रौपदीला मांडी दाखवून 'माझ्या मांडीवर येऊन बस' असे म्हटले होते. तुमच्या पापात्मा पुत्राला मी तेव्हाच मारून टाकले असते तर बरे झाले असते त्यामुळे एवढे मोठे युद्ध टळले असते. पण मी धर्मराज युधिष्ठिराच्या आज्ञेने गप्प होतो. आम्ही वनवासात गेल्यानंतरही तुमच्या नालायक पुत्राने आम्हाला सतत त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याच्यासोबत जे वर्तन केले ते योग्यच आहे.
भीमानंतर राजा युधिष्ठिर गांधारीशी बोलण्यासाठी पुढे आला. कौरवांची माता गांधारीला युधिष्ठिराचा खूप खूप राग आला होता, युधिष्ठिर समोर येताच गांधारीची दृष्टी डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीच्या खालून युधिष्ठिराच्या पायाच्या अंगठ्याच्या नखांवर पडली आणि ते अंगठ्याचे नख काळे झाले. त्याआधी युधिष्ठिराचे नख चांगले सुंदर होते.
कारण गांधारी पतिव्रता होती. पतिव्रता धर्माच्या पालनामुळे तिच्या दृष्टीमध्ये एवढी शक्ती होती कि, ती दृष्टीनेच एखाद्याला भस्म करू शकत होती. मोठ्या भावाचे नख काळे पडलेले पाहून अर्जुन श्रीकृष्ण भगवंतांच्या मागे लपला आणि नकुल आणि सहदेवही इकडे तिकडे गेले.
थोड्या वेळाने गांधारीचा राग शांत झाला. पुत्र वियोगाने ती रडू लागली. राजा युधिष्ठिराने तिचे सांत्वन केले भगवंतांनी ही समजूत घातली. नंतर पांडवांनी तिच्याकडून आशीर्वाद घेतला.